हायड्रोजन- इंधन निर्मितीचा सध्याचा ४०० रु. प्रति किलो खर्च, त्याच्या निर्मितीतले सध्याचे काही प्रश्न यानंतरही नव्या धोरणाचे स्वागत व्हावे, इतके पर्यायी इंधन गरजेचे..

देशातील दोन प्रमुख उद्योगसमूहांनी हायड्रोजन इंधन निर्मितीत रस दाखवणे आणि केंद्र सरकारचे हायड्रोजन धोरण प्रसृत होणे या योगायोगाकडे दुर्लक्ष केले तरी यानिमित्ताने या नव्या इंधनाच्या बऱ्यावाईटाची चर्चा करणे अयोग्य नाही. सध्या साऱ्या विश्वालाच नव्या, स्वच्छ, पर्यावरणस्नेही इंधनाचा ध्यास लागला आहे. दिवसेंदिवस महाग होत चाललेले पेट्रोल / डिझेल आणि त्याहीपेक्षा महाग पडेल अशी पर्यावरणीय हानी ही यामागील प्रमुख दोन कारणे. गेल्या काही वर्षांत आपणही या दिशेने जोरदार मुसंडी मारण्याच्या प्रयत्नात आहोत. याच उद्देशाने अलीकडे विजेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही मोटारींस मोठे उत्तेजन दिले जाते. त्या मोटारींतील विजेऱ्या पुन्हा भारित करण्यासाठी लागणारी वीज तयार करण्यापायी आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर भले कोळसा जाळण्याचा विसंवाद डोळय़ावर येत असेल. पण तरीही या प्रयत्नांचे मोल कमी होत नाही. इथेनॉल या द्रवास पर्यायी इंधन म्हणून उत्तेजन देण्याबाबतही असेच. इथेनॉल आपल्याकडे उसावरील प्रक्रियेतून निर्माण होते. म्हणजे उसासाठी पाणी प्रचंड प्रमाणावर ओतायचे आणि त्यातून तयार होणारे इथेनॉल मोटारींत इंधन म्हणून वापरायचे असे हे सव्यापसव्य. पण ते करण्यास इलाज नाही. कारण पर्यायी इंधनाची भूकच इतकी मोठी आहे की मिळेल त्या मार्गाने ती भागवणे आवश्यक ठरते. याच मालिकेतील पुढचे पाऊल म्हणजे ‘हिरव्या हायड्रोजन’चा वापर इंधन म्हणून करणे. त्यासाठी केंद्र सरकारने मोठा कार्यक्रम जाहीर केला असून त्याकामी जवळपास २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तिचे स्वागत. याच सुमारास दोन बडय़ा उद्योगसमूहांचे हायड्रोजन निर्मितीचे कार्यक्रम जाहीर झाले, हेही स्वागतार्हच म्हणायचे. आता हायड्रोजन या इंधनाविषयी.

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?
24 Year Old Women Pee Turned Black Like Cola Rush To ICU Are You Overdoing Perfect Ratio For Work and Exercise by dr Mehta
तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र
Cancer Treatment
कर्करोगावर उपचार १०० रुपयांत, या गोळीचे फायदे काय? टाटा इनस्टिट्युटच्या डॉक्टरांचा दावा काय?

एक वायू या नात्याने हायड्रोजन यास स्वतंत्र अस्तित्व नाही. कोणाशी ना कोणाशी हातमिळवणी केल्याखेरीज तो टिकू शकत नाही. म्हणजे इंधनासाठी म्हणून त्याचे विलगीकरण करणे आवश्यक. यासाठी सोपा, सहज उपलब्ध घटक म्हणजे पाणी. याखेरीज अन्य मार्गाने, म्हणजे पेट्रोल / डिझेलमधूनही त्यास विलग करता येते. पण तो हायड्रोजन पर्यावरणस्नेही नसतो. त्यास करडा हायड्रोजन असे म्हणतात. पर्यावरणस्नेही हायड्रोजन पाण्यापासून तयार करता येतो. हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक रेणू एकत्र आले की पाणी तयार होते. म्हणून ते ‘एच टू ओ’. यातील हायड्रोजन वेगळा झाला की तो हिरवा हायड्रोजन गणला जातो. या विलगीकरणाच्या प्रक्रियेत प्रचंड ऊर्जा तयार होते. तिचा वापर इंधन म्हणून करणे अशी ही प्रक्रिया. म्हणजे पाणी उकळल्यावर तयार होणाऱ्या वाफेवर इंजिनास पळावयास लावण्यासारखे. तथापि यात महत्त्वाचा मुद्दा पाण्यास उकळणे हा. त्यास जशी ऊर्जा लागते तशीच हायड्रोजनास पाण्यापासून विलग करण्यासाठी ऊर्जा लागते. सद्य:स्थितीत हे सर्वार्थाने महाग आहे. म्हणजे ही प्रक्रियाही गुंतागुंतीची आणि त्यामुळे तिचा खर्चही अधिक. अशा पद्धतीने हायड्रोजनास इंधन म्हणून वापरावयाचे असेल तर या पर्यावरणस्नेही इंधन निर्मितीचा खर्च प्रति किलो सुमारे ४०० रु. इतका आहे. त्याचा वापर वाढला, अधिकाधिक संशोधनांती नवनव्या प्रक्रिया त्यासाठी विकसित केल्या गेल्यास हा खर्च प्रति किलो शंभरभर रुपयांपर्यंत कमी होईल, असे मानले जाते. हे गृहीतक केंद्र सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या हायड्रोजन धोरणाचा आधार.

यात लक्षात घ्यायला हवी अशी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे हायड्रोजन हा केवळ ऊर्जावाहक आहे. तो स्वत: ऊर्जाधारक नाही. त्यामुळे तो वहन करीत असलेल्या ऊर्जेचे रूपांतर विजेत करणे अत्यावश्यक. त्यासाठी ऑक्सिडेशन नावाने ओळखली जाणारी प्रक्रिया असते आणि तीमधील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विजेत झाले की ती वीज मोटार इंजिन वा अन्यत्र पुरवली जाते. सद्य:स्थितीत ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. आणि दुसरे असे की हायड्रोजन निर्मित ऊर्जा साठवण्याची व्यवस्था नाही. म्हणजे निर्माण करा आणि तिथल्या तिथे जाळून टाका या तत्त्वाने तिची निर्मिती होते. म्हणून प्राधान्याने हायड्रोजनचा विचार मोटारींतील इंधनासाठी करण्याचा प्रयत्न आहे. अर्थात यातून निर्माण होणारी वीज साठवण्याची व्यवस्था म्हणजे बॅटऱ्या. आधी या विजेऱ्या आणि नंतर त्यांचे वहन. म्हणजे साठवण्याचा आणि नंतर वहनाचा खर्च! हा आतबट्टय़ाचा व्यवहार. म्हणून वाहनांसाठी प्राधान्याने-  आणि त्यातही दूर अंतरावर जाणाऱ्या मालमोटारी आदींसाठी – हे नवे इंधन जास्त उपयोगी असे मानले जाते. त्याच्या ज्वलनाने ना धूर येतो ना प्रदूषणकारी घटक वातावरणात सोडले जातात. आणि मुख्य म्हणजे त्यासाठी आवश्यक ते पाणी अत्यंत स्वस्तात, सहज उपलब्ध असते. या सगळय़ाचा विचार करून हायड्रोजनकडे उद्याचे इंधन म्हणून अपेक्षेने पाहिले जाते. तथापि अन्य कोणत्याही इंधनाप्रमाणे या इंधनाचेही फायद्याप्रमाणे तोटे आहेत. ते नमूद करायला हवेत. याचे कारण याबाबत आपल्या राष्ट्रीय सवयीप्रमाणे याबाबत आता इतकी हवा निर्माण केली जाईल की जणू हायड्रोजन इंधन म्हणजे संजीवनीच. हे आपल्या ऊर्जाधळेपणास साजेसेच. ते टाळण्यासाठी आता या इंधनासमोरील आव्हानांचा विचार.

यात अग्रक्रमाने मुद्दा येतो तो हायड्रोजनच्या प्रचंड ज्वलनशीलतेचा. त्यामुळे या इंधनाच्या सुरक्षिततेबाबत आताच गंभीर चिंता व्यक्त होते. या त्याच्या ज्वालाग्राही स्वभावामुळे हायड्रोजनची, विशेषत: त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधन-यंत्रणेची साठवणूक अत्यंत अवघड. जितके आव्हान मोठे तितका त्यावरील खर्च अधिक. दुसरे असे की पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करायला लागणारी ऊर्जा अंतिमत: हायड्रोजनपासून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा अधिक असते. म्हणजे अंतिम उत्पादनापेक्षा कच्च्या मालाचाच खर्च अधिक. शिवाय या प्रक्रियेत दोन मूलद्रव्ये अत्यावश्यक. प्लॅटिनम आणि इरिडियम. ही दोन्ही मूलद्रव्ये अत्यंत महाग आहेत आणि आपल्या देशात त्यांचे मोठे उत्पादन नाही. हे विजेवर चालणाऱ्या मोटारींसारखेच. त्या विजेऱ्यात लिथियम आणि कोबाल्ट ही मूलद्रव्ये मोठय़ा प्रमाणावर लागतात. त्यांचा आपल्याकडे तुटवडा आहे आणि जागतिक पातळीवर खनिज तेलाप्रमाणे त्यांच्या मालकीसाठी कधीच स्पर्धा सुरू झाली आहे. लिथियम हे बोलिव्हियादी देशांत मोठय़ा प्रमाणावर आढळते तर कोबाल्ट हे अफ्रिकेतील काही देशांत. या दोन्ही आघाडय़ांवर चीनने मोठी मोठी झेप घेतलेली आहे. अमेरिकेचा इलॉन मस्क याची तर मक्तेदारी म्हणता येईल इतकी या उत्पादनांवर मालकी आहे. आता प्लॅटिनम आणि इरिडियम यांचा विचार व्हायला हवा. बडय़ा देशांत त्यांच्या मालकीचे प्रयत्न याआधीच सुरू झाले आहेत. अर्थात म्हणून आपण प्रयत्न करू नयेत असे अजिबातच नाही. हे व्यक्तीच्या व्यायाम सवयीसारखे आहे. इतरांनी आपल्याआधी कवायती सुरू केल्या म्हणून आपण त्या न करण्याचे काही कारण नाही. तसेच हायड्रोजन, इथेनॉल, सौर, पवन, अणु, कोळसा, जलविद्युत आदी अशा मिळेल त्या मार्गानी अधिकाधिक ऊर्जा मिळवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. आपल्यासारखा महाकाय देश ऊर्जेसाठी कायमच भुकेलेला राहणार आहे. तेव्हा या हायड्रोजन इंधन संशोधनास ऑक्सिजन पुरवण्याचा केंद्राचा निर्णय योग्यच. मुद्दा इतकाच की सर्व बाजू समजून न घेता त्याचा उत्सव करण्याची गरज नाही. हायड्रोजनच्या इंधनवापरास तब्बल दीडशे वर्षांचा इतिहास आहे. तो समजून घेण्याचा शहाणपणा दाखवायला हवा, इतकेच.