आपल्या समाजात गेली काही वर्षे असंतोष दडपला गेला होता. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ही झाकण उडवून देऊन बाहेर पडलेल्या त्या असंतोषाचीच अभिव्यक्ती आहे.

देशात कृमी-कीटकांचे ‘पॅरलल युनिव्हर्स’ अवतरल्यापासून अजब घटना घडू लागल्या. एक पक्ष स्थापन झाला- झुरळांचा पक्ष आणि चक्क एक विरोधी पक्षही आहे- परजीवींचा पक्ष. यांचे म्हणणे काय? ‘तुम्ही गटारे बांधाल तर झुरळांचीच पैदास होणार. आहोत आम्ही झुरळे, तुम्ही कितीही मारा आम्ही संपणार नाही.’ आणि खरोखरच बड्या राष्ट्रीय पक्षांना चिरडून टाकणाऱ्या, प्रादेशिक पक्षांचा चेंदामेंदा करणाऱ्या ‘विकसित भारता’तल्या सर्वशक्तिमान सत्ताधाऱ्यांना तब्बल आठवडाभर झुंजवण्यात हे कृमी-कीटक यशस्वी ठरले आहेत.

झाले असे की, देशाचे सरन्यायाधीश म्हणाले, ‘देशातील काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे आहेत. ते समाजमाध्यामांत, माध्यमांत शिरकाव करतात, माहिती अधिकार कार्यकर्ते होतात आणि सर्वांवर हल्ले करू लागतात.’ त्यांच्या या वक्तव्याला प्रतिसाद म्हणून अभिजीत दिपके या पूर्वी ‘आप’मध्ये कार्यरत असलेल्या आणि सध्या अमेरिकास्थित तरुणाने समाजमाध्यमावर प्रश्न केला- ‘सारी झुरळे एकत्र आली तर?’ मग काही झुरळांनी एकत्र येत समाजमाध्यमी पक्ष तयार केला. नाव दिले ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी). इथवर सारे लुटुपुटुचे भासत होते, मात्र या पक्षाने अवघ्या काही दिवसांत देशातील ‘सर्वांत मोठ्या’ पक्षाच्या समाजमाध्यमी फॉलोअर्सची संख्या पार केली आणि सरकार एव्हाना विस्मृतीत गेलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ पुन्हा हाती घेत एकेका झुरळाला हुडकून मारू लागले. पण झुरळेच ती. ती काही बधेनात. एक मारावे तर दहा येऊ लागली.

आता या साऱ्याचे खापर एकट्या सरन्यायाधीशांच्या माथी फोडणे न्याय्य ठरेल का? ते फक्त ‘झुरळ’ म्हणाले. पण आता अशी शेलकी विशेषणे एतद्देशीय तरुणांसाठी नवी राहिलेली नाहीत. ‘टुकडे-टुकडे गँग’, ‘अर्बन नक्षल’ वगैरे वाट्टेल ते ऐकून घेण्याची सवय त्यांना गेल्या १२ वर्षांत झाली आहे. खरे तर स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, याची जाणीव होण्याचा टप्पा भारतातल्या तरुणांच्या आयुष्यात बहुधा आता आला असावा. ‘अच्छे दिना’च्या आश्वासनास भुलून सत्ताबदल घडवला त्याला तप लोटले, पण शिक्षण, नोकरी, महागाईचे प्रश्न सुटावेत म्हणून आरंभलेली तपश्चर्या अद्यापही फलद्रूप होण्याची चिन्हे नाहीत. शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे, खिसा रिता करून परीक्षांची तयारी करावी तर परीक्षेपाठोपाठ पेपरफुटीच्या बातम्या येतात. पात्र ठरूनही नियुक्त्या नाहीत, सरकारी पदे लाच देऊन खिशात घातली जातात, खासगी क्षेत्रातही नोकरी मिळणे, ती पुरेशा पगाराची असणे आणि टिकणे दुरापास्त. उमेदीच्या काळात घरात बसलेली मुले पाहणाऱ्या पालकांच्या उद्विग्नतेचा ताण वेगळाच. यावर सरकारने योजलेला उपाय काय तर ‘अग्निवीर’सारख्या पाच वर्षे वापरून मग वाऱ्यावर सोडणाऱ्या योजना.

सरकार काही करत नाही, म्हणून विरोधी पक्षाकडे पाहावे तर तिथेही बोंबच. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’कडे पाहून ‘इंडिया आघाडी’ला हात देण्याचा प्रयत्न २०२४मध्ये  झाला, पण ९९ जागा मिळवून काँग्रेसने तृप्ततेचा ढेकर दिला. आघाडीतले मतभेद विविध राज्यांच्या निवडणुकांत चव्हाट्यावर येऊ लागले. दुसरीकडे ‘सर्वांत मोठा पक्ष’ यंत्रणांचा दट्ट्या दाखवून प्रादेशिक पक्षांचे तुकडे करण्याचे, रेवडीवाटपाचे, मतदार याद्यांतून नावे वगळण्याचे नवनवे विक्रम प्रस्थापित करत होता. ज्या राघव चढ्ढांसारख्यांना तरुणांनी आपला आवाज मानले होते, तेही सत्ताधारी बाकांकडे वळले. परिस्थिती अशी की, विरोधकांना पराजयच प्रिय वाटू लागला आहे की काय, असा प्रश्न पडावा.

‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी अवस्था झाल्यावर स्वत:लाच हातपाय हलवावे लागतात. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ असो वा ‘नॅशनल पॅरासिटिक फ्रंट’ ही सारी त्या हातपाय हलवण्याने माजलेली खळबळ आहे. खळबळ एवढी जोरदार की, ‘समाजमाध्यम धुरंधर पक्षा’पेक्षाही अधिक फॉलोअर्स या नवजात पक्षाने पहिल्या पाच-सहा दिवसांतच उभे केले आहेत. विरोधी पक्षांचे नेते, समाजमाध्यमांतील प्रस्थापित झुरळे, देश-विदेशांतील झुरळ माध्यमे या धडपडीची दखल घेत आहेत.

विरोधी हाकेला घाऊक प्रतिसाद मिळू लागला की ‘बूमर्स’चे सरकार काय करेल याचा अभ्यास या ‘जेन झीं’नी करून ठेवल्याचे दिसते. सत्तेच्या केंद्रीकरणावर भर असलेल्या सरकारला त्यांनी विकेंद्रीकरणाची ताकद दाखवून दिली. विविध शहरांतील, राज्यांतील समर्थकांनी पक्षाच्या नावामध्ये थोडेफार बदल करून अनेक खाती तयार करून ठेवली. एकापाठोपाठ एक खाती ‘बॅन’ वा ‘हॅक’ झाली तरी नवनवी खाती तयार होत राहिली. आज अशी स्थिती आहे की ‘जेन झीं’च्या या तंत्रस्नेही समूहाने जर बूमर नेत्यांची वा त्यांच्या पक्षांची समाजमाध्यमी खाती रिपोर्ट करून बॅन करायचे ठरवले, तर काय होईल, याचा विचार प्रस्थापित पक्षांना सुरू करावा लागेल. रस्त्यावरची आंदोलने उभारणे कठीण, चिरडणे सोपे. पण इथे नेमकी उलट स्थिती आहे. या व्हच्र्युअल आंदोलनांना ना परवानग्या नाकारता येत, ना लाठीचार्ज, अश्रुधुरासारखी अस्त्रे वापरता येत. त्यामुळे सध्या तरी ही झुरळे सरकारी यंत्रणांना ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ या म्हणीची अनुभूती देत आहेत.

असे प्रयोग अनेकदा बालिश म्हणून हसण्यावारी नेले जातात आणि नंतर अंगाशी येतात. याचा अनुभव भारताच्या तब्बल तीन शेजाऱ्यांनी अलीकडेच घेतला आहे. अशाच आंदोलनातून पुढे आलेले रॅपर बालेंद्र शहा आज नेपाळचे पंतप्रधान आहेत. युद्धग्रस्त युक्रेनची आघाडी नेटाने लढवणारे वोलोदिमिर झेलेन्स्की पूर्वी स्टँडअप कॉमेडिअन होते. दूर जाण्याची गरज नाही, आपल्याकडची ‘आम आदमी पार्टी’ अशीच अण्णा हजारेंच्या आंदोलनातून पुढे आली. तमिळनाडूत टीव्हीके फार तर ‘किंगमेकर’ ठरेल, अशा शक्यता वर्तवण्यात येत असताना जोसेफ विजयने अशाच झुरळांच्या पाठबळावर पहिल्याच प्रयत्नात मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली.

लोकशाहीत सत्ताधाऱ्यांकडे विनोद सहन करण्याची क्षमता असणे अपेक्षित. भारतात तर राजे-रजवाड्यांच्या काळातही विदूषक विनोदाच्या आवरणातून राजाला वास्तवाचे भान देत असे. विनोद ही खदखदणार्यास असंतोषाची वाफ बाहेर जाऊ देणारी मोकळी जागा असते, पण आपल्या समाजात गेली काही वर्षे असंतोष दडपला गेला होता. ‘सीजेपी’ ही झाकण उडवून देऊन बाहेर पडलेल्या त्या असंतोषाचीच अभिव्यक्ती आहे. या पक्षाकडे स्वत:चे चिन्ह आहे, कसा का असेना अजेंडा आहे, भरपूर कार्यकर्ते आहेत, अहिंसेचा पुरस्कार करणारे नेतृत्व आणि मुख्य म्हणजे खऱ्या विश्वात अस्तित्व गमावलेला विरोधी पक्षही इथे ‘नॅशनल पॅरासिटिक फ्रंट’च्या रूपाने अस्तित्वात आला आहे. असे असले तरी घरबसल्या पोस्ट करणारे हे फॉलोअर्स कार्यकर्ते होतील का आणि झालेच, तर त्यांचे वर्तन आधीच्या पिढीतल्या कार्यकर्त्यांपेक्षा वेगळे असेल का, हे पाहणे महत्त्वाचे.

या प्रयोगाची संभावना ‘आप’ने सोडलेले पिल्लू, देशविरोधी टूलकिटपासून सोरोस फंडेड गँग वगैरे शब्दांत होऊ लागली आहे. त्यात तथ्य आहे की नाही हे काही काळ गेल्याखेरीज स्पष्ट होणार नाही. कदाचित तोवर या प्रयोगावर पडदा पडला असेल किंवा कदाचित प्रयोग खराखुरा राजकीय मंच दणाणून सोडत असेल. पुढे काय होईल, हे यथावकाश कळेलच, पण सध्या तरी देशातले तरुण तगड्या विरोधकांअभावी राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. इरफान खानच्या ‘मकबूल’ या चित्रपटातील एक वाक्य आहे, ‘शक्ती का संतुलन बहुत जरूरी हैं संसार में, आग के लिए पानी का डर बने रहना चाहिये’. असे संतुलन साधले जाण्याची चिन्हे गेल्या दशकभरात दिसलेली नसताना समाजमाध्यमी का असेना ही झुरळ-झोंबी सुरू असेल, तर त्यातही समाधान मानायला हवे.