कोणत्याही महिलेस तिच्या पतीच्या निधनानंतर जाहीरपणे बोल लावणे, हे अयोग्य. पण सदर महिला जर सुनेत्रा अजितदादा पवार असेल तर त्यांची कृती कोणत्याही दृष्टिकोनातून विचार केला तरी टीकायोग्यच ठरते. सुनेत्राताई यांचे सार्वजनिक आयुष्य आतापर्यंत अजिबात दखलपात्र नव्हते. लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर पतीच्या राजकीय गंड शमनार्थ त्या राज्यसभा सदस्य झाल्या. हे भारतीय परंपरेनुसार झाले म्हणायचे. तथापि त्यांच्या राज्यसभेतील कामगिरीबाबतही नोंद घ्यावे असे अजिबात काही नाही.

पतीने फर्मावले आणि ‘आदर्श’ (?) भारतीय स्त्री या नात्याने त्यांनी तो आदेश शिरसावंद्य मानला, इतकेच ते. जे झाले ते त्यांचे पती अजितदादा आणि सुनेत्राताई यांच्यातील परस्पर साहचर्य आणि समंजसपणा यांचा प्रश्न. त्यात इतरांस नाक खुपसण्याचे काही कारण नव्हते. या सारासार विवेकातून ‘लोकसत्ता’ने त्यांच्या कोणत्याच कृतीवर बरी अथवा वाईट अशी टीका आतापर्यंत कधी केली नाही. परंतु आता त्यांनी जे केले ते सर्वथा अक्षम्य आणि शोकात्म ठरते. तेव्हा त्यांच्याबाबत संपादकीय नोंद घेण्याची सुरुवात कठोर टीकेने करावी लागणे हे दुर्दैवी; परंतु अपरिहार्य. त्यास इलाज नाही. 

कोणा कडव्या शत्रूसही येऊ नये असे मरण अजितदादा यांच्या वाट्यास आले. त्यानंतर कुटुंबीयांकडून हिंदू संस्कृतीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. दोन सुपुत्रांनी धर्मसंस्कारांस जागत अजितदादांस मंत्रोच्चारात अग्नी दिला. त्याचे प्रदर्शन अनेकांचे हृदय हेलावणारे होते आणि या सर्व थेट प्रक्षेपित प्रसंगात सुनेत्राताईंचे वर्तन धीरोदात्त म्हणावे असेच होते. अत्यंत कर्तबगार पतीच्या अकाली निधनाने कोणत्याही स्त्रीस जी काही सहानुभूती मिळणे गरजेचे होते ती त्यांच्या बाजूने पुरेपूर वळली. याच धर्मसंस्कृती आणि परंपरेचा भाग म्हणून नंतरचे १२ दिवस सुतक पाळणे अपेक्षित असते आणि उदकशांतीपश्चात आप्तेष्ट, सुहृद यांच्या भोजनाने सुतक समाप्ती होते. हा सर्व तपशील नमूद करण्याची एरवी गरजही भासली नसती. पण तो येथे नमूद करावा लागला याचे कारण अजितदादांवरील अंत्यसंस्कार धर्मपरंपरेनुसार करणारे त्याच धर्मपरंपरेस अस्थिविसर्जनानंतर लगेच कशी तिलांजली देतात हे कळावे म्हणून.

अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतरचा सुतक-काल संपेपर्यंतही सुनेत्राताईंस थांबता येऊ नये? यातून आपली कमालीची सत्तातुरता दिसून येते इतकेही त्यांना कळू नये? उपमुख्यमंत्रीपद ही काही एक-दोन दिवसात गायब होईल, अशी गोष्ट नव्हे. या पदासाठी किमान सभ्यता संकेत पाळण्यासाठी आणि सुसंस्कारित प्रतिमेसाठी अजितदादांच्या तेराव्यापर्यंत त्या थांबल्या असत्या तर त्या या पदास मुकल्या असत्या काय? आपल्या या वर्तनामुळे अजितदादांच्या निधनानंतर मिळालेल्या सहानुभूतीचे रूपांतर टीकेत  होऊ शकते याचीही जाणीव त्यांना असू नये? ती तशी नसेल तर राजकारणी आणि त्यापेक्षा व्यक्ती म्हणून त्या किती परस्वाधीन आहेत हेच यातून सिद्ध होत नाही काय?

वास्तविक प्रश्न फक्त पती आणि पत्नी यांच्यातील संबंध आणि व्यवहार यांच्यापुरताच मर्यादित असता तर पती-पश्चात पत्नी काय करते याची उठाठेव अन्यांस करण्याचे कारण नव्हते. पण ही बाब तशी नाही. सुनेत्राताईंचे पती महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी होते, बरे-वाईट जे काही असेल ते राजकारण करत ते या पदी पोहोचले होते आणि त्या पदास ते आपल्या परीने न्याय देत होते. परंतु सुनेत्राताईंचे काय? आणि त्याहीपेक्षा हे पद जणू एखाद्या कुटुंबाची खासगी मालमत्ता आहे असे वाटून त्यांना ते बहाल करणार्‍यांचे काय? या प्रश्नावर आतापर्यंत असे कधी झाले नाही काय इत्यादी प्रश्न उपस्थित केले जातील. राजीव गांधी यांची पंतप्रधानपदावर वर्णी लावणे आणि राजीव गांधींच्या हत्येनंतर पत्नी सोनिया गांधी यांचे राजकारणात केंद्रस्थानी येणे याचे दाखले दिले जातील. ते येथे अयोग्य. इंदिरापश्चात लगेच राजीव पंतप्रधानपदी आरूढ झाले कारण घटनेनुसार ते पद रिक्त ठेवता येत नाही. उपमुख्यमंत्रीपदाचे तसे नाही. दुसरे उदाहरणही अयोग्य.

राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी सोनिया या पक्षाध्यक्ष झाल्या; पण त्यांनी सत्तापद घेतले नाही. कुजबुज आघाडीच्या मते तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यास विरोध केला. ही कुजबुज आघाडी खरी असे मानले तरी ते असत्य ठरते. कारण काँग्रेस पक्ष त्याच्या संसदीय नेतेपदी जर सोनिया गांधी यांची निवड करता तर राष्ट्रपती त्यांना रोखू शकले नसते. दुसरे उदाहरण लालूप्रसाद यादव यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेले मुख्यमंत्रीपद पत्नी राबडीदेवींस दिले जाणे. तेही येथे काही प्रमाणात गैरलागू ठरते. याचे कारण लालूप्रसाद हे त्या वेळीही हयात होते आणि अयोग्य असेल पण राबडीदेवींमागून मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हलवत होते.

याबाबत दुसरा मुद्दा असा की महाराष्ट्र हा बिहार आहे काय? अजितदादांच्या राष्ट्रवादीने सुनेत्राताईंस उपमुख्यमंत्रीपदी बसवून महाराष्ट्रास नि:संशय बिहारच्या पातळीवर खचितच उतरवले. तिसरे या प्रकारचे उदाहरण तमिळनाडूचे अण्णा द्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांचे. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपदी त्यांची पत्नी जानकी यांना बसवले गेले आणि शेजारील आंध्र प्रदेशमध्ये तेलगु देसमचे सर्वेसर्वा एन. टी. रामाराव यांनीही तेच केले. पुढे त्या प्रयोगांचे आणि त्यांच्या पक्षांचे काय झाले, हा इतिहास सर्व जाणतात. अजितदादांची राष्ट्रवादी त्याच दिशेने निघालेली असू शकते.

केवळ दोनपाच जणांचा आणि अजितदादांच्या सुपुत्रांचा (?) स्वार्थ पुरवण्यासाठी सुनेत्राताईंस उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याचा घाट घालण्यात आला आणि सुनेत्राताईदेखील कोणतीही स्वतंत्र विचारक्षमता न दर्शवता त्यास बळी पडल्या. यासाठी आता काही जण सत्ता नियंत्रक भाजपस दोष देतील. पण हे म्हणजे स्वत:चा मुलगा व्यसनाधीन झाल्यावर त्याच्या मित्रांस जबाबदार धरणार्‍या पालकांसारखे झाले. आताही सत्तामोहास बळी पडण्याची घाई सुनेत्राताईंनी केली नसती तर कोणीही त्यांना या पदावर बसवले नसते. बरे, या पदाची अभिलाषा असणे काही गैर आहे असे नाही. पण त्यासाठी पतीच्या चितेचा अग्नी शांत होईपर्यंत तरी सुनेत्राताईंनी धीर धरला असता तरी त्यांची कृती इतकी वेदनादायक ठरती ना. या पदाची शपथ घेताना याचे भान त्यांनी बाळगले असते तर ते त्यांच्या आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्याही आतापर्यंतच्या वाटचालीस शोभून दिसले असते. सुनेत्राताई… ही संधी तुम्ही घालवलीत… तुम्ही चुकलात!