रंग निसर्गाचे, ते काही मानवाला निर्माण करता येत नाहीत.. मग रंगावर एखाद्याच गटाने मालकीहक्क सांगून त्याच्या  वापराबद्दल आक्षेप घेण्याचे राजकारण का करावे?

आपल्या देशात भावना हे प्रकरण बहुधा सतत कुणाकडून तरी दुखावून घेण्यासाठीच जन्माला येत असावे. यावेळी ती जबाबदारी  एका अर्धवस्त्राच्या म्हणजे बिकिनीच्या रंगाने घेतली आहे. पठाण हा एका प्रथितयश निर्मात्याचा आगामी चित्रपट. त्यातील बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने घातलेल्या काही अर्धवस्त्रांपैकी एकाचा रंग भगवा असल्यामुळे काहींच्या भावना दुखावल्या आहेत म्हणे. असे काही झाले की आजच्या काळात पाळायचे सगळे रीतीरिवाज यथासांग पार पाडले जातात. त्यानुसारच सारे काही घडते आहे. म्हणजे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम दास यांनी हे गाणे सुधारले नाही तर त्यांच्या राज्यात हा सिनेमा प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही असे जाहीर केले आहे.  मग माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडे या गाण्याच्या विरोधात वेगवेगळ्या लोकांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यानंतरचा पुढचा विधी म्हणजे समाज माध्यमांवरून बहिष्काराचा व समर्थनाचा ‘ट्रेण्ड’. तोही सध्या जोरदार सुरू आहे. भावना दुखावल्या जाण्यास हल्ली जसे फार काही लागत नाही तसेच स्वत:ला हसवून घेण्यासाठी फार दूर कुठे कॉमेडी शोमध्ये किंवा स्टॅण्डअप कॉमेडियनकडे जाण्याची गरज पडत नाही. त्यानुसार भगव्यावर या पद्धतीने आक्षेप घेतला गेल्यावर बॉलिवूडमधल्या आजवरच्या कोणकोणत्या चित्रपटांमधल्या कोणकोणत्या गाण्यांमध्ये नायिकांनी याच रंगाचे कपडे परिधान करून नृत्ये केली आहेत याचे सचित्र संदर्भ समाजमाध्यमांमधून फिरत आहेत. अशा चित्रपटांची, दृश्यांची यादी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी कमी नाही हे विशेष. त्याबरोबरच भगव्या रंगाचे लंगोट लावून फिरणाऱ्या बाबाबुवांचीही छायाचित्रांचेही संदर्भ दिले जात आहेत. तेव्हा चालले ते आता का चालणार नाही या मुद्दय़ाबरोबरच बिकिनी चालत नसेल तर लंगोट कसा काय बुवा चालतो, हा समाजमाध्यमी युक्तिवाद  बिनतोड ठरतो आहे.

nashik bjp marathi news, bjp dindori lok sabha election 2024
कोणता समाज, घटक नाराज आहे ? दिंडोरी लोकसभेसाठी भाजप निरीक्षकांकडून चाचपणी
state Chief Electoral Officer, warns, religion, campaigning, action, lok sabha election, code of conduct
निवडणूक आचारसंहिता काळात धर्माच्या मुद्यावर प्रचार झाल्यास कारवाई, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा इशारा
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Jaya Prada
अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांना फरार का घोषित करण्यात आलं? नेमकं हे प्रकरण काय?

असे सगळे वाद कोण आणि का उकरून काढतात, त्यामागची गणिते काय असतात, हे आता सगळ्यांनाच माहीत झाले आहे. तमाम भारतीयांना मनोरंजनाच्या एका माळेत सहजपणे ओवून घेणारे बॉलिवूड हे तर अशा मंडळींसाठी अगदीच सोपे लक्ष्य. एवढय़ा मोठय़ा देशात देव- देवता, प्रथा परंपरा, ऐतिहासिक व्यक्ती, एखादा शब्द, भाषा असे काहीही आक्षेप घेण्यासाठी कोणत्याही चित्रपटातून सहज सापडू शकते. मग संबंधितांची देशभर फुकट प्रसिद्धी. ही आक्षेपवाहू मंडळी टाळण्यासाठीच बहुधा बॉलिवूडचे बरेच चित्रपट बुद्धिमत्तेचा लसावि काढून निर्माण केले जात असावेत. असो. तर मुद्दा भगव्या उर्फ केशरी रंगाचा. हिंदू धर्मियांच्या दृष्टीने त्यागाचे प्रतीक असलेल्या या रंगाला आपल्या राष्ट्रध्वजातही विशेष स्थान आहे. पण म्हणून त्याच्यावर कुणाचाही हक्क कसा काय असू शकतो? भगवे कपडे घालून वावरणाऱ्याला समाजात वेगळेच आदराचे स्थान मिळते, पण त्याबरोबरच काही भगवी कफनीधारी बाबाबुवांचा कारभार चारचौघांत सांगण्यासारखा नसतो. आपल्या या कर्तृत्वापायी सरकारी पाहुणचार घ्यावा  लागलेल्या बाबा-बुवा मंडळींमध्ये कितीतरी एकेकाळी बडे प्रस्थ असलेली मंडळी आहेत. भगवी कफनी घालून कृष्णकृत्ये करणाऱ्या या मंडळींमुळे धर्माचा अपमान होऊन कधी, कुठे कुणाच्या भावना दुखावल्याचे ऐकिवात नाही. मग चित्रपटातील एखाद्या गाण्यातील काही सेकंदांच्या दृश्यासाठी हा एवढा आटापिटा का? त्या गाण्यामध्ये अक्षयकुमार, रणबीर कपूर किंवा भावी अक्षयकुमार मानला जाणारा कार्तिक आर्यन असता तर असा विरोध केला गेला असता का? त्यामुळे या विरोधामागील गणित समजण्यास तसे अगदीच सोपे आहे. ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटाला ज्या कारणाने विरोध झाला त्या विरोधाच्या वळणाने जाणारे तर ते आहेच; शिवाय आर्थिक उलाढाल, जगभर असलेली बाजारपेठ, धर्मनिरपेक्षता, सर्जनशीलता या सगळ्या पातळ्यांवर सातत्याने नवनव्या पताका फडकावणाऱ्या बॉलीवूडच्या अर्थकारणावर आपला ताबा रहावा यासाठी दिल्या जाणाऱ्या धडकांचा हा भाग नसेलच असे नाही. 

असे प्रयत्न करावेत, अशी कुणाचीतरी महत्त्वाकांक्षा असू शकते.  कुठल्याही महत्त्वाकांक्षेला या विश्वाचे अंगणही अपुरे पडू शकते. त्याबाबत कुणी हरकत घेण्याचे कारणही नाही. पण हरकत आहे ती आपल्या हेतूंसाठी कोण, कशाचा वापर करणार या गोष्टीला. सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तानंतर आकाशच नाही तर अवघा आसमंत केशरी रंगात न्हाऊन निघालेला असतो. शहराबाहेर एखाद्या डोंगरमाथ्यावर, एखाद्या नदीकाठी किंवा एखाद्या शेतात बसून हा अनुभव घेणारा त्या क्षणी तनामनाने केशरी झालेला असतो. रोज सकाळ संध्याकाळ चालणाऱ्या सृष्टीच्या या सोहळ्याचा एखाद्या दिवसाचा अनुभवदेखील पुढचे कित्येक दिवस ताजेतवाने करून जातो. रंग अशाच पद्धतीने आपल्याला आपलेसे करून टाकतात. अथांग आकाशाची निळाई असो की गर्द रानाची हिरवाई, रक्ताचा लालभडक रंग असो की मोहरीच्या शेताचा पिवळाधम्मक रंग असो.. कितीतरी रंग, त्यांच्या कितीतरी छटा.. माणसाच्या मनावर त्यांचे किती गारुड आहे ते वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे रंग ही वेगळी अभ्यासशाखाच आहे. ती सांगते की ऊर्जा देणारा लाल रंग आणि चालना देणारा पिवळा रंग यांच्या संयोगामधून तयार होणारा केशरी रंग हा चैतन्याचा, आशावादाचा नवाच रंग घेऊन येतो. त्यामुळे तो डोळ्यांना सुखावणारा ठरतो. प्रत्येक रंगाची अशी स्वत:ची एक परिभाषा आहे. उत्क्रांती प्रक्रियेतून विकसित होत गेलेल्या मानवी संस्कृतीचे आणि रंगांचे स्थलकालसापेक्ष नाते आहे. अश्मकालीन माणसाने रंगवलेल्या भीमबेटकाच्या गुंफांमधील चित्रांमधून ते दिसते आणि तहानभूक हरवून अ‍ॅक्रिलिकच्या खडूने चित्र रंगवत बसलेल्या एखाद्या चिमुरडीच्या चित्रांमधूनही ते दिसते. वाळवंटी प्रदेशात वापरले जाणारे गडद रंगाचे कपडे तिथल्या हवामानाशी जोडलेल्या संस्कृतीबद्दल सांगतात. स्वीत्र्झलड भले काश्मीरइतकेच सुंदर असेल पण काश्मीरमधल्या लोकांच्या जगण्यामधल्या रंगांचा उत्सव अधिक वेधक आहे, असे निरीक्षण मांडले जाते. हत्तीचा करडा रंग असो की क्षणोक्षणी रंग बदलणारा सरडा असो, रंग ही निसर्गाची सुंदर निर्मिती आहे. माणूस ती नम्रपणे स्वीकारू शकतो, लेवू शकतो, पण तशी निर्मिती करू शकत नाही. गोरा, काळा या माणसाच्या मनाने निर्माण केलेल्या कातडीच्या छटांनी जगात किती बेरंग केला आहे, ते वेगळे सांगायची गरज नाही. या निर्मितीमध्ये माणसाच्या बाबतीत निसर्गाने एक गंमतही करून ठेवली आहे. स्त्रियांच्या डोळ्यांना दिसतात आणि त्या वर्णन करू शकतात, त्या किरमिजी, डाळिंबी, हळदी, तपकिरी, बदामी अशा छटा पुरुषांना दिसतच नाहीत म्हणे..

रंगांनी माणसाचे सगळे जीवन इतके व्यापले आहे की त्यांचे वेगळे अस्तित्व कधीकधी लक्षातही येत नाही. असे असेल तर मग कोणताही रंग कुठल्याही एखाद्या धर्माचा, पंथाचा, पक्षाचा, विचारांचा कसा असू शकेल? निसर्ग रंगांची मुक्तपणे उधळण करत असेल तर ते आपल्या गटातटांत वाटून घेण्याचा अधिकार माणसाला कसा असू शकतो? भगवा, केशरी हा रंग पहाटेच्या आकाशाचाही आहे, सूर्याच्या तप्त गोळ्याचाही आहे, मे महिन्यामधल्या मधुर हापूस आंब्याचाही आहे, एखाद्या बाबा-महाराजाच्या कफनीचाही आहे आणि एखाद्या नटीच्या बिकिनीचाही आहे. कोलकात्यात नुकतेच कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्या सोहळ्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गायक अरिजित सिंग याला ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ हे गाणे गायची विनंती केली आणि त्याने ते गायलेदेखील. केशरी रंग सगळ्यांचाच आहे, याचे आणखी वेगळे राजकीय उदाहरण काय द्यायचे?  तेव्हा रंगावर मालकीहक्क सांगून  व्यर्थ बेरंग करणाऱ्यांची चर्चा समाजमाध्यमांतच बरी.