लैंगिक शोषण व खुनाचा आरोप असलेल्यास ज्या राज्यात मंत्रिमंडळात स्थान दिले जाते, तेथे डॉक्टरवर हात उचलला म्हणून कसली शिक्षा होणार आणि ती कोण करणार?
रमेश सुकर्या म्हात्रे नामे व्यक्तीची अक्कल किती, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता काय या मुद्द्यांशी जनसामान्यांस काहीही देणेघेणे असण्याची शक्यता नाही. ते किती यत्ता शिकलेत, सुसंस्कृतता कशाशी खातात इत्यादी प्रश्नांचीही उठाठेव कोणी करण्याचे कारण नाही. ही टिनपाट व्यक्ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक आहे याचीही दखल घेण्याचे कोणास कारण नाही. तथापि या नगर‘सेवक’ म्हणवणार्या इसमाने मंगळवारी रात्री डॉक्टरांवर हात उचलला आणि परिचारिकेसही मारहाण करण्यास मागेपुढे पाहिले नाही. म्हणून त्यांच्या कृत्याची दखल आणि समाचार घेणे आवश्यक. हा इसम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा. त्या पक्षाचे गावगल्लीतले नेतेही उठता-बसता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत असतात. महाराजांच्या कर्तव्यकठोरतेचा इतिहास या गणंगांना किती माहिती आहे असा प्रश्न पडावा असे या सर्वांचे वर्तन. बदअंमल केला म्हणून रांझ्याच्या पाटलाचा डावा हात आणि उजवा पाय तोडण्याची शिक्षा छत्रपतींनी त्यास केली होती असे कादंबरीतील का असेना ‘सेवक’ म्हणवून घेणार्या या पुंडांच्या कानावरून गेले असण्याचीही शक्यता धूसर. रमेश सुकर्या म्हात्रे या ‘सेवक’ म्हणवून घेणार्याचे कृत्य रांझे पाटलाच्या बदअंमलाच्या जवळ जाणारे आहे. तेव्हा छत्रपतींनी या उद्दामास काय शासन केले असते याचा अंदाज बांधणे अवघड नाही. पण आताचे राज्य ना ‘स्वराज्य’ ना ते चालवणारे छत्रपती. तेव्हा छत्रपतींची प्रजाहितदक्षता वगैरे मुद्द्यांचा आठव आता निरुपयोगी. मुद्दा रमेश सुकर्या म्हात्रे याच्या कृत्याचा.
डॉक्टरांवर, महिला परिचारिकेवर हात उचलण्याची हिंमत या इसमास होते कारण आपल्या समाजाच्या सामुदायिक नेभळटपणाची पूर्ण खात्री त्याला आणि अशा अन्यांस आहे म्हणून. नियमांचा आदर न करणारा, नियमभंगांत पौरुष मानणारा हा निवडक नैतिक समाज निष्क्रिय निलाजरा झालेला आहे याची केवळ जाणीव नव्हे; तर तसा विश्वास आपल्या राज्यकर्त्यांस आहे. त्यांच्या या विश्वासास तडा जाऊ न देण्याचे व्रत या समाजाने घेतलेले असल्याने हे असे प्रकार घडू लागले आहेत आणि ते अधिकच घडणार. यामागील सामाजिक वृत्तीचा समाचार ‘लोकसत्ता’ने गेल्या आठवड्यात (३ जुलै) ‘हीच ‘आपली’ लायकी’ या शीर्षकाच्या संपादकीयात घेतला. त्यातील विवेचन किती खरे होते याची जाणीव रमेश सुकर्या म्हात्रे या इसमाने आपल्या कृत्यातून लगेच करून दिली. तो शिंदे सेनेचा आहे हा केवळ योगायोग. याआधी काँग्रेसचे अविनाश पांडे, भाजपचे नितेश राणे, नक्की कोणाचे हे माहीत नसलेले बच्चू कडू, शिंदे सेनेचेच संतोष बांगर, पत्रकारांवर हात उचलण्याचे शौर्यकृत्य नावावर असलेले शेकापचे जयंत पाटील आदी अनेकांच्या अशा बदअंमलाच्या तपशिलाचे डोंगर आहेत. हे इतकेच नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वास्तव्याने विकासाच्या गर्तेत सापडलेल्या ठाणे शहरात भर दिवसा भर चौकात एका महिला पोलीस कर्मचार्यावर अशाच कोणा गावगुंडाने हात टाकला आणि याच शहरात अलीकडे एका मुजोर टॅक्सीचालकाने ज्येष्ठ नागरिकास मारहाण केली. काही वर्षांपूर्वी मुंबईत निघालेल्या मोच्र्यातही असाच प्रकार घडला होता आणि निदर्शकांनी महिला पोलिसांच्या प्रतिष्ठेस हात घातला होता. ते निदर्शक हे विशिष्ट धर्मीय असल्यामुळे निवडक नैतिकांस कंठ फुटून त्यांना कायदा-सुव्यवस्था असे काही असते याचे स्मरण झाले. तथापि राणे बंधू हे या निवडक नैतिकांच्याच पक्षात. पण त्यांच्या गैरकृत्यांबाबत या नैतिकांच्या तोंडास चिकटा बसत असावा. या अशा निवडक नैतिकांमुळे समाजविघातकांची भीड अधिकाधिक चेपू लागली आहे याची जाणीव त्यांना नसली तरी इतरांस असायला हवी.
तिच्या अभावामुळेच रमेश सुकर्या म्हात्रे या इसमाची डॉक्टरवर हात टाकण्याची हिंमत झाली. याआधीही केईएम रुग्णालयासह अन्यत्रही असे प्रकार घडलेले आहेत. पण डोंबिवलीत जे घडले ते आपण सामाजिक सभ्यता किती ओवाळून टाकलेली आहे हे दाखवून देणारे ठरते. डॉक्टरांवर हात उचलला, परिचारिकेस मारले तरी आपणास काहीही होणार नाही, याची खात्री या रमेश सुकर्या म्हात्रे नामे इसमास आहे. एका महिलेचे लैंगिक शोषण आणि खून केल्याचा आरोप असलेल्या इसमास ज्या राज्यात मंत्रिमंडळात निर्लज्जपणे स्थान दिले जाते त्या राज्यात डॉक्टरवर हात उचलला म्हणून कसली शिक्षा होणार आणि ती कोण करणार? या अशा आरोपांसाठी ज्याच्याविरोधात ज्यांनी निदर्शने केली तेच आता सत्तेवर आहेत आणि ज्याविरोधात निदर्शने केली ते मंत्रीपदी आहेत. त्या वेळी सदरहू मंत्र्याविरोधात आगपाखड करणार्या हिंदुत्ववादी रणरागिण्या महिला नेत्या आता हाती बांगड्या भरल्यागत गप्प आहेत. खरे तर शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी रमेश सुकर्या म्हात्रे नामे इसमास आपल्या पक्षातून हाकलून द्यायला हवे. तसे केले तर यंत्रणांना त्याविरोधात निर्भयपणे कारवाई करता येईल. पण ‘ऑपरेशन टायगर’ वगैरे घडवणार्या एकनाथ शिंदे यांनी या आपल्या ग्रामसिंहावर काही कारवाई केली नाही. कदाचित कोणाकोणावर कारवाई करायची असाही प्रश्न त्यांना पडला असणार. राज्याच्या राजकारणातील बहुतांश गणंग त्यांच्याच पक्षात आहेत. अशा सर्वांना ते नारळ देऊ लागले तर पक्ष रिकामा व्हायचा. या शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत हे डॉक्टर असल्याची वदंता आहे. त्यांच्या वैद्यकीय कौशल्यापेक्षा राजकीय कुशलतेचाच अनुभव अनेकांस असण्याची शक्यता अधिक. आपण जी पदवी मिळवलेली आहे असे श्रीकांत सांगतात ती धारण करणार्या कोणावर त्यांच्याच हाताखालील एखादी व्यक्ती हात उचलत असेल तर स्वत:च्या पदवीच्या इभ्रतीसाठी तरी श्रीकांत यांनी या रमेश सुकर्या म्हात्रेवर कारवाईचा आग्रह धरायला हवा आणि तो तडीस जाईल याची खबरदारी घ्यायला हवी.
आणि तशी ती घेतली जात नसेल तर ती जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर येते. शिंदे हे त्यांच्या सरकारात उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पक्षाने डॉक्टरवर हात उगारला असेल तर त्या डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहणे हे मुख्यमंत्री या नात्याने फडणवीस यांचे कर्तव्य आहे. ज्यास मारहाण झाली ते डॉक्टर सरकारी सेवेत आहेत आणि मुख्यमंत्री त्या सरकारचे प्रमुख. आपली जबाबदारी ते झटकू शकत नाहीत. जे झाले त्यासाठी या रमेश सुकर्या म्हात्रेविरोधात केवळ गुन्हा दाखल होऊन त्यास अटक होणे पुरेसे नाही. त्याचे नगरसेवकपद रद्दबातल होईल याची खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. निवडणूक आयोग वा तत्सम सरकारी यंत्रणा त्यांच्या पक्षाच्या शब्दाबाहेर नसतात हे अनेकदा देशाने अनुभवलेले आहे. तेव्हा या रमेश सुकर्या म्हात्रेचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यास तो कोणी अडवू शकणार नाही. हे असे करण्याची धमक आपल्या अंगी आहे हे त्यांनी दाखवून द्यावे. त्यासाठी रमेश सुकर्या म्हात्रे याने स्वहस्ते ही सुवर्णसंधी मुख्यमंत्र्यांस दिली आहे. ती त्यांनी वाया घालवू नये.
सरतेशेवटी महत्त्वाचा मुद्दा नागरिकांचा. नागरिकांची निष्क्रियता आणि जे सक्रिय आहेत त्यांची निवडक नैतिकता यामुळे रमेश सुकर्या म्हात्रे यासारख्यांचे फावते. या निवडक नैतिकतेचा त्याग नागरिकांनी वेळीच केला नाही तर जे डोंबिवलीतील डॉक्टरबाबत घडले ते उद्या तुमच्या-आमच्या घरातील कोणा सदस्यांबाबतही घडणार हे निश्चित. या मुजोरांना जाब विचारण्याची हीच संधी आहे. फडणवीस, या मंडळींस हा माज येतो कोठून? कोण त्यांना पाठीशी घालते?
