माणसाच्या आयुष्यात अशी वेळ येते; पण आपण रस्ता चुकलो असे प्रामाणिकपणे मान्यच न केल्यास चकवा लागल्याप्रमाणे गरगर फिरावे लागते…

‘मी युद्ध जिंकलेले आहे’ आणि ‘मी युद्ध लवकरच जिंकेन’, ‘मला या युद्धात कोणाच्याही मदतीची गरज नाही’ आणि ‘मला जिंकण्यासाठी मदत न करणार्‍यांस मी विसरणार नाही’, ‘इराण माझ्यासमोर क्षमायाचना करतो’ आणि ‘इराणला अजूनही क्षमायाचनेची गरज वाटत नाही’, ‘इराणची मारगिरी ताकद संपली आहे’ आणि ‘इराण अजूनही भेदक मारा करू शकतो’, ‘होर्मुझची सामुद्रधुनी मी इराणकडून सोडवल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही’ आणि ‘होर्मुझची सामुद्रधुनी मुक्त करण्याचा आग्रह मी धरणार नाही’, ‘राजवट बदलाखेरीज इराणला मुक्ती नाही’ आणि ‘राजवट बदल ही आमची मागणी नाही’ अशी पूर्णपणे परस्परविरोधी वक्तव्ये एकाच वेळी करणारे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षीच्या हल्ल्यात ज्या इराणी अणुभट्ट्या ‘नष्ट’ केल्या त्या उद्ध्वस्त करण्यासाठी पुन्हा छेडलेल्या युद्धास एक महिना पूर्ण झाला. हे युद्ध दोन-चार आठवड्यांत संपवू असा विश्वास जाहीरपणे व्यक्त करणार्‍या ट्रम्प यांना आता ते संपवण्यासाठी आणखी दोन-चार आठवडे हवे आहेत. तशी ‘सुवार्ता’ त्यांनी स्वत:च अमेरिकी देशबांधवांस आज दिली. वास्तविक ती देण्याआधी ३६ तास आपण अमेरिकी नागरिकांस विशेष संबोधन करणार आहोत या त्यांच्या घोषणेमुळे ट्रम्प आता काय बोलणार याकडे सारे जग कानात प्राण एकवटून लक्ष ठेवून होते. शहाण्यांची निराशा करण्याचा आपला परिपाठ ट्रम्प यांनी आजही सोडला नाही. आपल्या जेमतेम १८ मिनिटांच्या भाषणात त्यांनी गेले ३२ दिवस चाललेल्या युद्धाबाबत ना नवीन काही सांगितले, ना काही वेगळा मुद्दा मांडला. त्यामुळे त्यांच्या संबोधनानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढले आणि भांडवली बाजाराने आपले घसरणे अव्याहत सुरूच ठेवले. तेव्हा त्यांच्या या विशेष संबोधनाचे नक्की प्रयोजन काय?

या प्रश्नाचे उत्तर या युद्धाचेच नक्की प्रयोजन काय या प्रश्नाच्या न मिळालेल्या उत्तरात आहे. जे युद्ध इराणमधील राजवट बदलासाठी लादले गेले त्या युद्धात राजवट बदल हा मुद्दा नाही, असे ट्रम्प म्हणतात. पण लगेच पुढे जाऊन ‘अपेक्षित राजवट बदल झाला’, असेही ते घोषित करतात. मग प्रश्न असा की हा राजवट बदल झाला असेल तर मग युद्ध सुरू ठेवण्याची गरजच काय? ही नवी (?) राजवट समंजस आहे, असेही प्रशस्तिपत्र ते देतात. आणि लगेच पुढे ते ‘आम्हास अपेक्षित आहे ते झाले नाही तर इराणला आम्ही अश्मयुगात पाठवू’ असा इशारा देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्या मते ‘इराणची जागा तेथेच आहे’. तसे असेल तर मुदलात अश्मयुगकालीन एका य:कश्चित देशाविरोधात महिन्याहून अधिक काळ रक्त आटवण्याची गरज जगातील या एकमेव महासत्तेस का वाटावी? जो देश, तेथील नागरिक मुळात अश्मयुगातच आहेत याची खात्री असताना ट्रम्प पुन्हा त्यांना त्याच अश्मयुगात कसे काय बरे पाठवणार? या युद्धात आपली फत्ते झाल्याचे त्यांनी सांगितले. ते छान. मग तरीही आणखी दोन-चार आठवडे त्यांना हे युद्ध संपवण्यास का हवेत? इराणी नेतृत्व दाती तृण धरून आपणास शरणागत आले आहे, असे ट्रम्प म्हणाले. हे तर फारच छान. पण हा त्यांचा आशावाद व्यक्त होण्यापूर्वी इराणने अमेरिकी तळ आणि इस्रायलवर बॉम्बफेक केली. ट्रम्प यांचे भाषण सुरू असताना बहारीन आदी पश्चिम आशियातील अमेरिकी बगलबच्च्यांस लक्ष्य केले. आणि भाषण संपल्यावर पुन्हा एकदा इस्रायलवर बॉम्बफेक करून इराणने अमेरिकी अध्यक्षांस मानवंदना दिली. हे सर्व काय दर्शवते?

ट्रम्प कसे पूर्णपणे रस्ता चुकले आहेत याचेच दर्शन या उलटसुलट विधानांतून होते. सामान्य माणसाच्याही आयुष्यात अशी वेळ येते. अशा वेळी आपण रस्ता चुकलो असे प्रामाणिकपणे मान्य करणे आणि कोणा सज्जनास रास्त मार्ग विचारणे यातच शहाणपण असते. तसे न केल्यास चकवा लागल्याप्रमाणे गरगर फिरावे लागते आणि कालांतराने आपण होतो तेथेच आहोत हे लक्षात येते. ट्रम्प यांचे नेमके हेच झालेले आहे. यात खास ट्रम्प यांनाच शोभून दिसतो असा मस्तवालपणा की आपण रस्ता चुकलो हे त्यांस अजूनही मान्य नाही. आणि त्यांच्यापेक्षा शहाणी व्यक्ती समस्त विश्वात नसल्याने कोणास योग्य मार्ग त्यांनी विचारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एके काळच्या मित्रदेशांपैकी इंग्लंडने झिडकारले, स्पेनसारख्या इवल्या देशाने तर थेट फटकारले, जर्मनीने ठोकरले, फ्रान्सने लाथाडले तरी ट्रम्प यांस शहाणपण येताना दिसत नाही. आपल्या या आडमुठ्या मूर्खपणामुळे आपण प्रत्यक्षात चीन आणि रशिया या आपल्या मोठ्या स्पर्धक देशांची धन करत आहोत हे लक्षात घेण्याइतका किमान मुत्सद्दीपणाही त्यांच्या ठायी नाही. तरीही जे झाले तितक्याने पुरती शोभा झाली नाही म्हणून की काय ट्रम्प अजूनही इराणला बेचिराख करण्याची धमकी देत आहेत आणि त्या देशाचे वीजनिर्मिती प्रकल्प, जलशुद्धीकरण यंत्रणा, खारे पाणी गोडे करणारे प्रकल्प हे उद्ध्वस्त करण्याची भाषा करत आहेत. कोणत्याही युद्धात नागर जीवनावर हल्ला करणे, अश्रापांचे जीव घेणे हा मानवतेवर हल्ला मानला जातो आणि अशांना युद्धगुन्हेगार ठरवून खटला भरला जातो. हे करणार कोण हा प्रश्न असला तरी ट्रम्प यांच्याविरोधात हे सारे होऊ शकते. तसे झाल्यास आपला अध्यक्ष युद्धगुन्हेगार आहे हे मान्य करण्याची वेळ जगातील एकमेव महासत्तेवर येईल. त्यास त्याच देशातील नागरिक जबाबदार आहेत. केवळ भावनेवर विचार करणार्‍या, विवेकास रजा देणार्‍या नागरिकांची भरताड वाढली की हे असेच होते. अमेरिका ते आता भोगते आहे. यात सार्‍या जगास एक धडा आहे.

केवळ विद्यमान सत्ताधीश नकोसा नामर्द वाटणे हे सत्ताबदलाचे कारण नागरिकांस वाटता नये. अशा क्षणिक भावनेतून झालेल्या सत्ताबदलानंतर सत्तेवर आलेला आधीच्या सत्ताधार्‍यापेक्षा वाईट निपजू शकतो. अमेरिकनांस आता याची जाणीव होत असेल. ट्रम्प यांचे पूर्वसुरी डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्या अध्यक्षपद काळातील लोकप्रियतेच्या नीचतम पातळीच्याही खाली ट्रम्प यांच्या लोकप्रियतेचा निर्देशांक घसरताना दिसतो. म्हणजे एके काळी ट्रम्प यांना डोक्यावर घेणारेच आता त्यांना पायदळी तुडवतात की काय, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्या दिशेने अमेरिकेचे समाजमन जाताना दिसते. ट्रम्प यांनी प्रचारात आणि त्याहीआधी बायडेन यांची असभ्य निर्भर्त्सना केली आणि बराक ओबामा यांचा कमालीचा द्वेष केला. अगदी अलीकडेपर्यंत त्यांनी बायडेन आणि ओबामा यांचा जाहीर पाणउतारा करण्यास मागेपुढे पाहिले नाही. हा त्यांचा वावदूक वाह्यातपणा ट्रम्प समर्थकांनी केवळ गोड मानून घेतला; इतकेच नव्हे तर या असभ्यतेस ते ट्रम्प यांची मर्दुमकी मानत राहिले.

ही विवेकशून्यता आता अमेरिकेच्या अंगाशी येणार. ट्रम्प यांच्या साहसवादातून चीन आणि रशिया अधिक प्रबळ होण्यापेक्षा वेगळे काही घडणार नाही. कारण स्वत:च्या अंगावरची महासत्तापदाची वस्त्रे पुरती फेडल्याखेरीज ट्रम्प काही शांत होणार नाहीत, असे दिसते. शहाण्यांच्या शांततेपेक्षा मूढांची मर्दुमकी नेहमीच अधिक दिलखेचक भासते हे खरे. पण अंतिमत: मंदगतीने का असेना; पण शहाणाच विजयी ठरतो. स्वत:चा मोठेपणा मिरवण्यात मशगूल अमेरिकनांस आता तरी या सत्याची जाणीव व्हावी.