काही राजकीय भाष्यकारांनी अमेरिकी घटनेतील २५ व्या कलमाचा आधार घेत ट्रम्प यांच्या अधिकारांत कपात केली जावी, असे सुचवले आहे.
स्वत:च्या देशाचा प्रमुख आंतरराष्ट्रीय मंचावर जेव्हा टिंगलीचा विषय होतो, तेव्हा त्यास कसे सामोरे जावे? सदरहू प्रश्न अन्य देशांतील कोणा सुबुद्ध नागरिकांस पडला असेल/नसेल, पण जगातील सर्वात श्रीमंत, बलाढ्य अशा अमेरिका देशातील नागरिकांस नक्कीच भेडसावत असेल. अन्य देशांतील नागरिकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून अमेरिकनांस पडलेल्या या प्रश्नाची दखल घ्यावयाची याचे कारण हा प्रश्न जाहीर विचारण्याची हिंमत त्या देशातीलच अनेक संस्था, व्यक्ती यांनी दाखवली असून अशा निर्भयांची संख्या पुढच्या काळात वाढेल अशी चिन्हे दिसतात. म्हणजे; ‘आमच्या अध्यक्षाने माती खाल्ली’ अशी भावना त्याच देशात व्यक्त होत असल्याने त्यावर भाष्य करणे ओघाने आले. ते करण्याआधी टर्कीची राजधानी अंकारा येथे ‘नाटो’ (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) देशांच्या बैठकीत ट्रम्प यांनी काय केले त्याविषयी.
आंतरराष्ट्रीय करार म्हणजे काही घरच्या कार्यातील जेवणावळीतील पदार्थांची यादी नव्हे जी वरचेवर बदलता येईल याचा विसर अमेरिका या जगातील एकमेव महासत्तेच्या प्रमुखांस ‘नाटो’ बैठकीत पडला असावा असे दिसते. या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर झालेला शस्त्रसंधी रद्द करत असल्याचे विधान केले. एखादा करार घडतो अथवा रद्द केला जातो तेव्हा त्यामागे काही एक किमान गांभीर्य असणे अपेक्षित. तथापि ट्रम्प आणि गांभीर्य, पोक्तपणा वगैरेंची जन्मत:च ताटातूट झाली असावी. ‘नाटो’ देश प्रमुखांच्या साक्षीने त्यांनी हा करार रद्द करत असल्याचे विधान केले. ट्रम्प यांची कार्यशैली आणि कर्तृत्व लक्षात घेता तेथे जमलेल्या ‘नाटो’ समूहातील अन्य देशप्रमुखांस या विधानाचा काही धक्का बसला असेल असे वाटत नाही. विवेकाप्रमाणे काही नेत्यांच्या धक्का देण्याच्या क्षमतेचाही वयपरत्वे र्हास होतो. ट्रम्प या अशांचे शिरोमणी. त्यांनी हा करार रद्द केल्याचे विधान केले पण ते लगेच पुढे ‘‘म्हणजे अमेरिका-इराण यांच्यात लगेच पुन्हा युद्ध सुरू होईल असे नाही’’, असेही म्हणाले. पाठोपाठ त्यांनी आपणास इराणी नेतृत्वाची किती घृणा आहे हेही सांगितले आणि आज मध्यरात्री इराणवर भीषण हल्ला होईल ही ‘सुवार्ता’ही दिली. ट्रम्प यांच्या अन्य अनेक विधानांप्रमाणे ती खोटी ठरली. परंतु त्यांच्या या विधानानंतर इराण आणि अमेरिका यांची पुन्हा एकदा जुंपली आणि जगभरातील बाजार मटकन बसले, रुपया गडगडला आणि तेल महागले. तेव्हा अशा व्यक्तीचे आता करायचे तरी काय असा प्रश्न जगभरात अनेकांस पडला असणार. अर्थात असा प्रश्न ज्यांच्याबाबत पडू शकतो असे ट्रम्प एकटे नाहीत. तरीही इतरांकडे दुर्लक्ष करून ट्रम्प यांची दखल घ्यावी लागते कारण ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे हे इराणविषयक विधान म्हणजे या विषयावरील आणखी एक कोलांटउडी. आता त्यांच्या अन्य अधिक धक्कादायक विधानांविषयी. ती अधिक काळजी वाढवणारी आहेत.
उदाहरणार्थ त्यांनी केलेला ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ जपान’ हा उल्लेख. जपान या देशाचा आणि इस्लामी प्रजासत्ताकाचा संबंध काय? ट्रम्प यांच्या मनास असे काही शिवले नाही. त्यांनी जपान या आपल्या मित्रदेशास इस्लामी गटात ढकलून दिले. इतकेच नाही. तर ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ जपान’ने अमेरिकी विमानवाहू जहाजांवर १११ क्षेपणास्त्रे डागली असेही ट्रम्प म्हणाले. त्यांना अभिप्रेत होते इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण. त्यातील देशाच्या जागी इराण काढून त्यांनी तेथे जपान ठेवले. असे होऊनही ट्रम्प यांस आपण चुकलो याची जाणीवही झाली नाही. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘‘तुम्हांस रशियाचे व्लादिमीर पुतिन यांना काही विचारायचे आहे काय’’, अशी पृच्छा केली. एरवी यात काही गैर वाटले नसते. पण अंकारा येथे ते वाटले कारण पुतिन हजरच नव्हते. कसे असणार? ही ‘नाटो’ची बैठक होती. यात पंचाईत अशी की पुतिन यांच्याविषयी भाष्य करताना ते बोट दाखवत होते वोलोदमीर झेलेन्स्की यांच्याकडे. रशियाचे व्लादिमीर पुतिन आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी वोलोदमीर झेलेन्स्की यांच्यात ट्रम्प यांची गल्लत झाली. त्यांच्या ती लक्षात आली आणि ‘‘मी फोन करून पुतिन यांना विचारीन असे मला म्हणायचे होते…’’ अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तो अगदीच केविलवाणा ठरला.
याचे कारण ट्रम्प यांनी आपले पूर्वसुरी डेमॉक्रटिक पक्षाचे जो बायडेन यांच्यावर सतत केलेली अश्लाघ्य टीका. बायडेन कसे सतत पेंगत असतात आणि त्यांच्या डोक्यात काही शिरत नसते असे ट्रम्प यांचे म्हणणे. ‘पेंगुळलेला जो’ असे आपल्याच माजी अध्यक्षाचे वर्णन करण्यात ट्रम्प यांस काही गैर वाटले नव्हते. आता तीच आणि तशीच वेळ त्यांच्यावर येताना दिसते. ‘द लिंकन प्रोजेक्ट’ या अमेरिकी संस्थेने ट्रम्प यांच्या या विस्मरणावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आणि त्यांच्या ‘मेंदूचा आता चिखल झालाय’ (हिज ब्रेन इज मुश) अशी टीका केली आहे. काही राजकीय भाष्यकारांनी ट्रम्प यांच्या अधिकारांत कपात केली जावी अशी मागणी करताना अमेरिकी घटनेतील २५ व्या कलमाचा आधार घेत हे केले जावे, असे सुचवले आहे. या कलमानुसार ‘‘बौद्धिक वा शारीरिकदृष्ट्या अपंगत्व’’ आलेल्या अध्यक्षाचा कार्यभार उपाध्यक्षाहाती सोपवता येतो. एकुणातच ट्रम्प आणि त्यांची बौद्धिक क्षमता (की तिचा अभाव?) हा मुद्दा अमेरिकेत तापू लागला असून त्यावरील चर्चेतून तेथील प्रामाणिक लोकशाही व्यवस्थेचा परिचय होतो. इतिहासात ट्रम्प यांच्याच पक्षाचे जॉर्ज बुश यांची शब्दघसरण हा चर्चेचा आणि टिंगलीचा विषय होता. ‘एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन’ म्हणजे ‘एपेक’च्या कार्यक्रमात हजेरी लावताना भाषणात सतत ‘ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज’ म्हणजे ‘ओपेक’ असा उल्लेख करणे, पॅलेस्टाईन माहीत नसणे इत्यादी अनेक भूलचुका बुश यांच्या नावे नोंदल्या गेल्या आहेत. ‘द इकॉनॉमिस्ट’सारख्या भारदस्त आणि नेमस्त साप्ताहिकास बुश यांच्या या जाहीर कार्यक्रमातील डुलक्यांचे विशेष संकलन करावेसे वाटले यावरून त्या चुका किती गंभीर होत्या हे लक्षात यावे. पुढील काही दिवसांत वा महिन्यांत त्यात ट्रम्प यांच्या या अशा हास्यास्पद चुकांची भर पडू शकेल. ते ठीक. पण अशी व्यक्ती एकमेव महासत्तेच्या प्रमुखपदी आहे हे वास्तव झोप उडवणारे ठरते.
म्हणून इराण बेचिराख करीन असा इशारा दिल्यानंतर अवघ्या काही तासांत घूमजाव करत त्यांच्याशी तह करणे, तो केल्यानंतर पुन्हा युद्धाचे इशारे देणे, ते देताना असभ्य शब्दांचा वापर, दुसर्या एका सार्वभौम देशाची पंतप्रधान महिला छायाचित्रासाठी आपल्या मागे कशी लागली असे उगाचच ठोकून देणे इत्यादी वर्तनामुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्याबाबत चिंता व्यक्त होणे नैसर्गिक. ‘सीएनएन’सारख्या वृत्तवाहिनीने ट्रम्प यांनी अवघ्या काही तासांत किती वेळा भूमिका बदलली आणि ती परस्परविरोधी कशी होती, याची वृत्तफीतच मध्यंतरी सादर केली. ट्रम्प खरे तर ८० वर्षांचे(च) आहेत आणि त्यांची शारीर प्रकृती उत्तम आहे. त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या अनेकांचे शहाणपण अजिबात सरकले नसल्याची उदाहरणेही आहेत. ट्रम्प यात नाहीत. परदेशी भूमीवर आपल्या देशप्रमुखाचे हसे होणे कोणालाही वेदनादायकच वाटेल. या वेदना अमेरिकनांसाठी अधिक. तो देश महासत्ता आहे. सर्वोच्च सत्तापदावरील व्यक्ती वावदूक झाली की वानप्रस्थास धाडणेच योग्य.
