युद्धसमाप्ती, तैवान, ‘चिप्स’साठी दुर्मीळ खनिजे, ‘एआय’वर नियंत्रण… यापैकी एकही विषय अमेरिकी अध्यक्षांनी चिनी अध्यक्षांपुढे धसास लावला नाही…
आत्ममग्न नेत्यांस मिरवणे आवडते. त्यात आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असेल तर उत्तम. आणि ज्यास जागतिक पातळीवर मुत्सद्दी म्हणून मिरवावयाचे असेल त्यास देखावा हा धर्मच. हे सर्व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांस लागू होते. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची ताजी अमेरिकाभेट ट्रम्प यांनी या देखावा दर्शनासाठी पुरेपूर वापरली. ते त्यांच्या शैलीनुसार आणि त्यांच्या विषयीच्या अपेक्षेनुसार झालेले असले तरी जिनपिंग यांस बरेच काही दाखवताना आपले बरेच काही उघडे पडते आहे याचे भान ट्रम्प यांस राहिले नाही. ट्रम्प जे दाखवू इच्छित होते ते सर्वांनीच पाहिले. पण ट्रम्प यांस काय झाकता आले नाही याची चर्चा प्रस्तुत संपादकीयात.
जिनपिंग अमेरिकेच्या भूमीवर पाऊल ठेवते झाले तेव्हा संयुक्त राष्ट्राचे महाअधिवेशन सुरू होते. देशोदेशीचे प्रमुख या अधिवेशनात सहभागी होण्यास संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात जमत असताना जिनपिंग हे न्यूयॉर्कला फिरकलेदेखील नाहीत. ते थेट वॉशिंग्टन येथे गेले. असे करून त्यांनी संयुक्त राष्ट्राचे महत्त्व कमी केलेच; आपण या संघटनेच्या वर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याआधी ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हजेरी लावून आपल्या शैलीनुसार अद्वातद्वा भाषण केले. जिनपिंग यांनी तसे केले नाही. काही प्रसंग असे असतात की ज्यात काहींच्या उपस्थितीपेक्षाही अन्य काहींची अनुपस्थिती अधिक लक्षणीय असते. जिनपिंग यांनी असा एक प्रसंग या कृतीतून घडवला. वास्तविक गेल्या काही वर्षांत चीनने संयुक्त राष्ट्रासाठी आपले आर्थिक योगदान वाढवलेले आहे. तरीही जिनपिंग तेथे फिरकले नाहीत. दुसरा मुद्दा ट्रम्प आणि माध्यम संबंधांचा. जिनपिंग अमेरिकेत येत असताना ‘सीएनएन’ आदी वृत्तवाहिन्यांवर ट्रम्प यांनी ‘व्हाइट हाउस’ प्रवेशबंदीची घोषणा केली. ती करून माध्यम स्वातंत्र्याबाबत जिनपिंग यांच्याशी त्यांनी बरोबरी साधली. तथापि स्थानिक न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे ट्रम्प यांना काही काळासाठी का असेना; पण हा माध्यमबंदीचा निर्णय स्थगित करावा लागला. ट्रम्प यांचा ‘सीएनएन’वर जुना राग. या वृत्तवाहिनीचे निर्भीड सत्यकथा प्रदर्शन ट्रम्प यांस मंजूर नाही. त्यामुळे या आणि अशा माध्यमांस देशद्रोही ठरवण्याचा ते सातत्याने प्रयत्न करतात. ‘मी म्हणजेच देश’ असा ज्या नेत्यांचा समज असतो त्यांच्याकडून अन्य काही अपेक्षा ठेवणे व्यर्थ. त्यामुळे ट्रम्प यांचे वर्तन अपेक्षापूर्ती करणारे असले तरी जिनपिंग यांच्या अमेरिकाभेटीत ते दिसून आल्याने अमेरिकेचा एक नैतिक अधिकार ट्रम्प यांनी गमावला. अमेरिकेस जगास लोकशाही मूल्यांवर प्रवचन देणे आवडते. त्यातूनच एके काळी उत्तर कोरिया, चीन आदी देशांतील दडपशाहीवर अमेरिकी अध्यक्ष बोलत. ट्रम्प यांनी अमेरिकेचा हा नैतिक अधिकार गमावला.
जग सध्या रशिया-युक्रेन, इराण-अमेरिका आदी युद्धांनी त्रस्त आहे. ही युद्धे थांबवण्यासाठी अमेरिका— विशेषत: ट्रम्प— प्रयत्नशील आहेत. या त्यांच्या प्रयत्नांना साग्रसंगीत खीळ घालण्याचा राजरोस उद्योग चीनकडून सुरू आहे. चीन हा युक्रेनविरोधात रशियाचा राखणदार आणि अमेरिकेविरोधात इराणचा इमानदार साथी. जिनपिंग यांच्या अमेरिका दौर्यात अपेक्षा ही होती की ट्रम्प या युद्धाचा मुद्दा चर्चेत काढतील आणि युद्ध समाप्ती जरी नाही तरी निदान शस्त्रसंधीच्या प्रयत्नांस गती येईल. पण ट्रम्प यांनी या युद्धात चीनच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करणे बाजूलाच राहिले; उलट एक शब्दही काढला नाही. जिनपिंग अमेरिकेत येण्याआधीच ट्रम्प यांनी रशियास मदत करणार्या देशांस १०० टक्के आयातशुल्काची शिक्षा करण्याचा निर्णय जाहीर केला. ही शिक्षा सहन करावी लागेल असे दोन संभाव्य देश म्हणजे चीन आणि भारत. पण जिनपिंग यांनी या संभाव्य शिक्षेच्या मुद्द्यास एका पैचीही किंमत दिली नाही. चिनी अध्यक्ष आपल्या देशात असताना ट्रम्प यांनी याबाबत काही भूमिका घेणे अपेक्षित होते. पण यांनी हा मुद्दा टाळला. त्यामागील वास्तव केवळ इराण वा युक्रेन यांच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे आहे असे नाही. ट्रम्प यांच्या या मौनामागे चीनचे तैवान अंग आहे. शेजारी तैवानचे स्वातंत्र्य चीनला मंजूर नाही. तंत्रदृष्ट्या सामर्थ्यवान, जागतिक बाजारपेठेचे महत्त्वाचे अंग असलेला हा देश गिळंकृत करणे हे चीनचे सुप्त ध्येय आहे. हे रोखणे केवळ आणि केवळ अमेरिकेच्या हाती आहे. पण या महत्त्वाच्या मुद्द्यावर मूग गिळून ट्रम्प यांनी आपल्या सामथ्र्याच्या मर्यादाच उघड्या पाडल्या.
आधुनिक तंत्रज्ञानात अत्यावश्यक असलेले दुर्मीळ खनिज घटक चीनच्या भूमीत आढळतात. अतिजलद संगणक, कृत्रिम प्रज्ञा अशा गुंतागुंतीच्या तंत्रप्रक्रियांतील संगणकीय ‘चिप्स’ बनवण्यासाठी ही स्कँडियम, सेरियम, होल्मियम अशी १७ संयुगे आवश्यक असतात. त्यातील बहुतांश चिनी मातीत आढळतात. त्यामुळे त्यावर एक प्रकारे चीनची मक्तेदारी आहे. यांचा पुरवठा रोखून चीन अन्य देशांच्या नाड्या आवळू पहातो. जिनपिंग यांच्या ताज्या अमेरिका भेटीत ट्रम्प हा मुद्दा धसास लावतील ही अपेक्षा होती. ती अन्य काही मुद्द्यांप्रमाणे व्यर्थ ठरली. हा मुद्दा ट्रम्प यांनी रेटला नाही. उलट चीनने अमेरिकी धान्योत्पादनांस, दुग्धजन्य पदार्थांस बाजारपेठ खुली करावी अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली. नेहमीप्रमाणे जिनपिंग यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यावर काही भाष्य केले नाही. त्याचवेळी अमेरिकेने चिनी उत्पादनांस अधिक मुक्तद्वार द्यावे वगैरे काहीही मागण्या ट्रम्प यांच्याकडे केल्या नाहीत. चीनला त्याची गरज नाही. कारण अमेरिकी असो वा युरोपीय असो वा भारतीय. सर्वच बाजारपेठांत चिनी उत्पादने ठासून भरलेली असतात. त्यामुळे या मुद्द्यावर बचावात्मक वाटेल असा पवित्रा घेण्याची वेळ ट्रम्प यांच्यावर आली. बोलघेवडे ट्रम्प वचावचा करत असताना जिनपिंग यांनी मात्र मुत्सद्दीमौन पाळण्याचा शहाणपणा दाखवला.
पुढील मुद्दा जिनपिंग यांच्या सन्मानार्थ ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या बड्या खान्याचा. ॲपल, ॲमेझॉन, ए्व्हिहडिया आदी बलाढ्य कंपन्यांचे प्रमुख या मेजवानीस उपस्थित होते. या अनौपचारिक चर्चेत कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) वाढत्या आव्हानावर चर्चा होईल अशी अपेक्षा होती. या मुद्द्यावर अमेरिका आणि चीन अशी स्पर्धा सुरू आहे. पण ट्रम्प यांनी त्या मुद्द्यास काही हात घातला नाही. या बड्या खान्यातील भाषणात ट्रम्प बोलून बोलले कशाबद्दल? तर ‘व्हाइट हाउस’चा एक कक्ष पाडून तेथे ते उभारत असलेल्या नव्या ‘बॉलरूम’ विषयी ! तेवढेच बोलून थांबतील तर ते ट्रम्प कसले ! त्यांनी उपस्थित मान्यवरांना या नव्याने आकारास येत असलेल्या कक्षास भेट देण्याची विनंती केली. ‘‘या कक्षाचे दर्शन घेणारे तुम्ही पहिले असाल’’, हे ट्रम्प यांचे उद्गार. ते ऐकून प्रबुद्ध अमेरिकनांस धन्य धन्य झाले असेल. त्याहीपेक्षा इतिहासाची बदललेली पावले दिसून त्यांना चिंता वाटली असेल. इतिहासाचा हा बदलता प्रवास जिनपिंग यांनी दाखवून दिला. आपल्या भाषणात त्यांनी एक लाख अमेरिकी विद्यार्थ्यांना चीनमधे येऊन चिनी प्रगती जाणून घेण्याचे निमंत्रण दिले. ही बाब धक्कादायक अशासाठी की साधारण साडेतीन दशकांपूर्वी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांनी त्यावेळी एक लाख चिनी विद्यार्थ्यांना अमेरिकेत येऊन ‘मोकळा श्वास’ घेण्याचा आनंद कसा असतो ते अनुभवण्याचे आवाहन केले होते. आज चीनचे अध्यक्ष अमेरिकी विद्यार्थ्यांस असे निमंत्रण देतात. हा निमंत्रणाचा नेम बदलत्या जगाचे वास्तव दाखवून देतो. त्याची नोंद आपणासाठीही आवश्यक.
