इथले जगणे प्रत्येकाला आपापल्या परीनेच जगावे लागणार, पण ते सुंदर करणे आपल्या हाती आहे- त्यासाठीच्या समविचारीपणाचे आवाहन बशीर बद्र यांच्या शायरीने केले…
कलावंत जातो, कवी जातो, म्हणजे काय होते? तारे एरवीही तुटतच असतात, पण कवी जातो तेव्हा बहुधा दूरची एखादी नदी आटते. पाण्याच्या ओढीने तिच्याकडे येणारे पशुपक्षी गोंधळतात, तिच्या काठचे गवत कोळपू लागते, मग झुडपे माना टाकतात. मोठ्या झाडांना त्या उदासीतही भान येते : आता भूजलाचाच आधार शोधायचा, मुळे आणखी विस्तारावी लागणार. असेच सारे परिणाम कवी/ कलावंत गेल्यानंतर होत असतात. त्यांनी आपल्याच जगाबद्दलचा जो विचार आपल्याला दिला, त्याचा प्रवाह नाहीसा झाल्यावर करायचे काय, हे आपले आपण ठरवावे लागते- मोठ्या झाडासारखे. बशीर बद्र यांचे जाणे आणखी वेगळे. गेली सुमारे आठ वर्षे ते व्यक्तच होत नव्हते. वृद्धत्वासह आलेल्या अवमनस्कतेमुळे (डिमेन्शिया) प्रवाह आधीच आटला होता. मात्र १८ हजार शेरांचे संचित उरले होते. ते आता- त्यांच्या देहावसानानंतरही उरेलच. पण मधल्या आठ वर्षांत हे संचित इतके वापरून झाले आहे की इथून पुढे ते कोण जपणार आणि कसे, अशी चिंता अनाठायी ठरू नये. बशीर बद्र ‘मुसाफिर है हम भी मुसाफिर हो तुम भी किसी मोड़ पर फिर मुलाकात होगी’ हा शेर विविध आर्थिक/ सामाजिक वर्गांत वापरला गेल्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत; भारत आणि पाकिस्तानच्याही राजकारण्यांनी बशीर बद्र यांच्या शेरांचा वापर कसा केला हे अनेकांनी, अनेकांना सांगून झाले आहे. आता उरलो आहोत बशीर बद्र यांच्याभोवती जिवंतपणीच वलय देणार्या या आख्यायिका जाणणारे आपण. आणि त्या वलयाच्या पलीकडे गेलेल्या बशीर बद्र यांचे शेर, त्यांच्या गज़ल. आपल्याला शोधावे लागणार आहे या गज़लचे ‘भूजल’.
त्यासाठी बशीर बद्र काय होते याबरोबरच काय नव्हते हेही आकळून घ्यावे लागेल. तेव्हा प्रथम ते काय नव्हते याबद्दल. गालिब-मीर, ज़ौक किंवा नजीर अकबराबादी या एकोणिसाव्या शतकापर्यंत होऊन गेलेल्या शायरांचा जमाना निराळा होता, याचे भान विसाव्या शतकातल्या अनेकांप्रमाणेच बशीर बद्र यांनाही होते. पण ते अनेक- ज्यांपैकी अलामा इक्बालसारखे स्वप्नाळू; फैज अहमद फैज, साहिर लुधियानवी, कैफी आझमी, जाँनिसार अख़्तर हे ‘तरक्कीपसंद’; तर कमर जलालाबादींसारखे प्रेमार्त शायर लोकांपर्यंत पोहोचले- हे सारेच ‘जुने’ शायर आहेत आणि आपण नवे, हे बद्र यांना उमगले. दुष्यंतकुमार, निदा फाज़ली, शहरयार आणि गुलज़ार हे त्यांचे थेट समकालीन. सर्वांचा जन्म १९३० च्या दशकातला आणि भाषेवर प्रेम करू लागण्याच्या वयात स्वातंत्र्याचा जल्लोष/ फाळणीचा विषाद चौघांनीही पाहिलेला. फाजली आणि शहरयार अंतर्मुख, ‘आपुलाचि वाद आपणासी’ या पंथातले; तर दुष्यंतकुमार थेट लोकांशी बोलणारे, परिस्थितीवर भाष्य करणारे. या तिघांच्या मधले बशीर बद्र. आणि गुलजार? ‘मै डॉ. बशीर बद्र का बहुत बडा फैन हूं।’ अशी कबुलीच गुलज़ार देतात, कारण ‘त्यांची ़गज़ल आजची आहे- त्यांच्या गज़लच्या पहिल्या दोनेक शेरांमधून विषय उभा राहतो’! यात बद्र यांचे ‘डॉक्टर’ असणेही महत्त्वाचे; कारण वडिलांचा अकाली मृत्यू, मग कॉलेज सोडून नोकरी आणि संसारही सुरू, नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा ‘एमए’पर्यंत शिकल्यावर, स्वातंत्र्योत्तर उर्दू ़गज़लच्या अभ्यासावरच मिळवलेली पीएच.डी. हे सारे त्या डॉक्टरकीमागे आहे. अभ्यास आहेच पण परिस्थितीशी झगडणेही आहे. त्या संघर्षाची प्रेरणा पुन्हा शायर असण्यातच शोधावी लागते. मी शायर, म्हणून माझ्या काळाच्या कोणत्या टोकावर मी उभा आहे हे मला माहीत हवे, या बौद्धिक गरजेपायी त्यांचा अभ्यास झाला. भव्यतेचे वा उदात्ततेचे आकर्षण वाजिद अली शाहपर्यंत शोभते, पुढे त्याचे आधारच विरळ होतात आणि ते स्वप्नाळू ठरते; किंवा शायराने दुनियेतल्या तमाम गरिबांचा कैवार घेण्याचा कितीही आव आणला तरी मूलभूत भावना सर्वांनाच असतात आणि समोरची ‘शमा’, तीवर झेपावणारे ‘परवाने’ याकडे दुर्लक्ष करून कुणाला शायर होता येत नसते, अशा दुखण्यांचे नेमके निदान या डॉक्टरसाहेबांनी केले असणार.
या निदानाची, त्यामागच्या भानाची आणि त्याहीमागच्या मानी कविमनाची साक्ष त्यांच्या शेरांमधून, गज़लांमधून मिळते. जगजीत सिंगच्या आवाजातले बशीर बद्र तलम आहेत. ‘मुझ से बिछड़ के ़खुश रहते हो।’मध्ये तर ते प्रेमविव्हल भासतात. पण याही गज़लचा मक्ता- अखेरचा शेर- ‘तुम तन्हा दुनिया से लडोगे। बच्चों सी बाते कर रहे हो।।’ अशा साध्या शब्दांत वास्तवाचे भान देणारा आहे. बद्र यांच्या शेरांत प्रेमातला दुरावा आहे. ती हुरहूर हीच त्यांच्या ़गज़लचा प्राण. पण बर्याचदा तो दुरावा दोघा प्रेमिकांपैकी कुणी तरी निवडलेला आहे- प्रेमात किंवा दुराव्यातही फार ईश्वरी वा सैतानी हात नाहीत. कारण मुळात, अलौकिकाचे फाजील आकर्षण बद्र यांना नाही. ते लौकिकच. म्हणून लोकांचे कवी. त्यांच्या मते अलौकिक म्हणजे फक्त कला- शायरी, ़गज़ल. ‘मुझे खुदा ने ़गज़ल का दयार बख्शा है। ये सल्तनत मै मुहब्बत के नाम करता हूं।।’ ही त्यांची प्रेमाविषयीची भूमिका. प्रेम व्यक्त असो वा अव्यक्त, ते असणे बद्र यांच्यासाठी महत्त्वाचे. ‘यूं ही कोई बेवफा नही होता’ हा त्यांच्या सल्तनतीतला न्याय. उर्दू शायरांची परंपराच आपापली नैतिक भूमिका शोधून काढण्याची. चारचौघांनी मान्य केलेल्या नैतिकतेपेक्षा निराळे काही असू शकते आणि ते काय हे मी सांगतो ऐका- हा गालिबपासून अनेकांचा पवित्रा. त्याला बरेचसे लोक बंडखोरी म्हणतात; पण हे सारे बंडखोर प्रेमाच्या बाबतीत ‘मऊ मेणाहूनी’ असतात, ते ईश्वरनिंदा करत नाहीत- उलट उमर खय्यामपासूनच्या मार्गाने जात इथल्या दुनियेतच देवत्व- ़खुदाई- शोधतात. ‘उस की आँखे मुझे मीरा का भजन लगती है’ असे म्हणणारे बद्रही याच मार्गावरले. पण त्यांची नैतिक भूमिका स्वतंत्र भारताला आणि त्या भोवतीच्या जगाला शोभणारी. ‘मै ये दुनिया मिटाना चाहता हूँ। नया सब कुछ बनाना चाहता हूँ।।’ या ओळी बद्र यांनी लिहिणे धक्कादायकच, पण तो धक्का दुसर्या शेरातच निवळू लागतो आणि ‘मेरे अन्दर कोई ज़ालिम छुपा है। मै चिडियाघर बनाना चाहता हूँ।।’ हा मक्ता तर, क्रांतीच्या मक्तेदारांना लाजेने माना खाली घालायला लावतो. हे इथले जगणे प्रत्येकाला आपापल्या परीनेच जगावे लागणार, पण ते सुंदर करणे आपल्या हाती आहे- त्यासाठी मात्र काहीएक समविचारीपणा हवा आणि ते आवाहन माझ्या शायरीत आहे, एवढीच त्यांची भूमिका. त्यामुळेच मेरठचे घर, त्यातली पुस्तके/ हस्तलिखिते जळाल्यावरही ते कुणाला तळतळाट देत नाहीत. ‘जे तुम्ही जाळून टाकलेत, ते उभारण्यासाठी जीव तोडावा लागतो हो…’ एवढेच सुनावतात. आपण संत नव्हे, कवीच आहोत आणि कवी म्हणूनच हे सांगतो आहोत, ही नैतिक जाणीव त्यामागे असते. बद्र यांच्याच ‘मीर- कबीर- बशीर इसी मकतब के है। आ दिल के मकतब में अपना नाम लिखा।।’ या ओळींमधल्या ‘मकतब’चा अर्थ ‘प्राथमिक शाळा’ असा होतो हे माहीत झाल्यावर त्या जाणिवेचे असणे लख्खपणे लक्षात येते.
या जाणिवेचा प्रवाह बशीर बद्र यांच्या जाण्याने आटला. अभिजातपणाचा सांधा आधुनिकतेशी भिडवू पाहणार्या पिढीचा शायर आपण गमावला. ‘आज हम सब एक बेहतर जिंदगी की दौड में। कैसे कैसे ख्वाब कब्रों में सुलाने आये है।।’ ही अस्वस्थता ‘बद्र’ हे उपनाव घेतलेल्या डॉ. सय्यद मुहम्मद बशीर यांनी दिली. ‘बद्र’ म्हणजे चंद्र. तोही पुनवेचा. तो हवा, तर आटलेला प्रवाह वाहता करून, त्यात या चंद्राचे बिंब पाहावे लागेल!
