दिल्ली राज्य, पंजाब राज्य आणि दिल्ली महापालिका हे तीन प्रांत म्हणजे देश नाही, हे खरे. पण या प्रांतांत तरी भाजपचा ‘डबल इंजिना’दी युक्तिवाद चालला नाही..

.. भ्रष्टाचाराचे आरोप किंवा मुस्लीमधार्जिणेपणाचे वहीम, ‘रेवडी’चा मुद्दा किंवा मुद्देसूद टीकेऐवजी निव्वळ हिणवणे, यांचे प्रयोग ‘आप’वर चालत नसल्याने भाजपला १५ वर्षांची सत्ता गमवावी लागली..

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
loksabha election 2024 Priority is given to local issues in the campaign in Marathwada
मराठवाड्यातील प्रचारात स्थानिक मुद्द्यांनाच प्राधान्य
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

तसे पाहू गेल्यास केवळ एका शहराच्या महापालिकेची ही निवडणूक. पण काय काय नाही केले गेले गेल्या काही महिन्यांत? केंद्र सरकारी यंत्रणांनी ‘आम आदमी पक्षा’च्या नेत्यांवर छापे घातले. त्यांचे नवनवे भ्रष्टाचार शोधून काढले आणि ते या नेत्यांमुळेच झाल्याचे आरोप केले. त्या आरोपांसाठी ‘आप’च्या मंत्र्यांना तुरुंगात डांबले. तुरुंगातले छायाचित्रण माध्यमांना पुरवले गेले. हवेच्या प्रदूषणासाठीही ‘आप’ला दोष दिला. इतकेच काय पण दिल्ली महापालिकेच्या निवडणुका लांबवून गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकांबरोबर आयोजित केल्या. दोन डझनांहून अधिक केंद्रीय मंत्री, अनेक मुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात उतरले. आणि इतकी उरस्फोड केल्यानंतरही सर्वसामथ्र्यवान केंद्र सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे सुमारे दोन कोटी वस्तीच्या राजधानी दिल्लीने पाठच फिरवली. परिणामी राजधानी दिल्ली हे राज्य आणि दिल्ली महापालिका या दोन्हींतून भाजपचे उच्चाटन झाले. गेली जवळपास १५ वर्षे दिल्ली महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता होती. ‘आप’ने ती उद्ध्वस्त केली. दिल्ली या राज्यातून ‘आप’ला उखडून टाकण्यासाठी भाजप गेली १० वर्षे जंग जंग पछाडतो आहे. त्यात यश येणे राहिले दूर. उलट भाजपच्या जे हातात होते, तेही धुपले गेले. वास्तविक एका शहराच्या महापालिकेची ही निवडणूक. तिची दखल एरवी घ्यावीही लागली नसती. पण आता या निवडणुकीचा निकाल हा राष्ट्रीय चर्चेचा विषय होतो. म्हणून या निकालावर भाष्य करणे आवश्यक.

कारण संसद असो, एखादे राज्य असो किंवा येडशी बुद्रुक वा झुमरीतलैय्याची ग्राम-शहर निवडणूक असो. ती इरेस पेटूनच लढायला हवी आणि नुसती लढायलाच नाही तर जिंकायलाही हवीच हवी, ही भाजपची ‘सर्व काही माझे’ ही ईष्र्या. याआधी हैदराबाद महापालिका निवडणुकीत ती दिसली, ताज्या दिल्ली महापालिका निवडणुकीतही ती दिसून आली आणि काही महिन्यांनी (तरी) होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांतही ती दिसेल. त्यातही दिल्ली महापालिका निवडणूक ही भाजपने अधिक प्रतिष्ठेची केली. याचे कारण त्या पक्षासाठी ‘आप’ ही नवी आणि मोठी डोकेदुखी ठरू लागला आहे. कानाशी गुणगुणणारा एखादाच डास शांत झोपेच्या आड येतो तद्वत ‘आप’ने भाजपसाठी उच्छाद मांडला आहे. या पक्षास धर्माच्या आधारे कोपऱ्यात गाठून मुस्लीमधार्जिणा वगैरे ठरवता येत नाही. कारण त्या पक्षाचा प्रमुख जाहीरपणे ‘हनुमान चालीसा’ मुखोद्गत असल्याचे सिद्ध करून भाजप नेत्यांना अडचणीत आणतो. अरविंद केजरीवालांचा शहरी श्रावणबाळ ज्येष्ठ नागरिकांच्या अयोध्या तीर्थाटनाची व्यवस्था करतो. अन्य परंपरागत पक्षांप्रमाणे या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करता येत नाहीत. केले तरी ते चिकटत नाहीत. आणि हे भ्रष्टाचार प्रकरण जास्त ताणताही येत नाही. कारण इतक्या साऱ्या अन्य पक्षीय गणंगांना पावन करून घेतल्यावर कोणत्या तोंडाने ‘आप’ला भ्रष्ट म्हणायचे हा तसा प्रश्नच. राहता राहिला ‘रेवडी’चा मुद्दा. ‘आप’कडून त्याचे सढळ वाटप होते; हे खरेच. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल भाजपलाही याबाबत हात आखडता घेऊन चालत नाही. इतरांची ती रेवडी आणि आपली मात्र समाजकल्याण योजना असे भाजपचे म्हणणे असले तरी ते तर्काच्या मुद्दय़ावर टिकत नाही. त्यामुळे वाटेल त्या मार्गाने, वाटेल ते प्रयत्न केले तरी दिल्ली शहरातील मतदारांनी भाजपस वाटेल त्या नाही; तर स्वत:ला हव्या त्या उमेदवारालाच मत दिले. या निकालाचे अनेक अर्थ.

पहिला म्हणजे केंद्रातील सत्ताधारी पक्षाने प्रत्येक निवडणूक इतकी महत्त्वाची करावी का? त्या पक्षाकडे स्थानिक पातळीवर एकापेक्षा एक हिरे-मोती असतील तर या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असणे पूर्णपणे योग्य. पण आसाम असो की गुजरात किंवा अगदी दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक. त्या पक्षाकडे एकच एक हुकमी एक्का. तो किती पणाला लावणार? दिल्ली महापालिका क्षेत्राचा विचार केल्यास एके काळी भाजपकडे मदनलाल खुराणा, साहेबसिंग वर्मा, सुषमा स्वराज इत्यादी नेत्यांची सणसणीत फौज होती. यांस हे मनोज तिवारी, गौतम गंभीर आदी तोंडाळ पर्याय असू शकत नाहीत. आज दिल्लीत भाजपस चेहरा नाही. हे सत्य अनेक अन्य प्रांतांबाबतही तितकेच लागू पडते. म्हणजे काँग्रेसने ‘एक पक्ष, एक कुटुंब’ या धोरणाने आपल्या ठिकठिकाणच्या स्थानिक नेतृत्वास करपवले. त्याप्रमाणे आता भाजपचेही होते किंवा काय, हा प्रश्न विचारता येईल. असो. दुसरा मुद्दा विरोधकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा. या विरोधी पक्षीयांच्या अस्तित्वाची गरज नाही, असे त्या पक्षास वाटू शकते. पण मतदारांस ते मान्य असेलच असे नाही. ‘आप’ला किती तऱ्हेने या निवडणुकीत भाजपने हिणवले! ‘आप’ पक्षावर टीका करावी असे मुद्दे उदंड आहेत. पण टीका म्हणजे हिणवणे नव्हे. असे करणे म्हणजे एका अर्थी मतदारांच्या निर्णयक्षमतेस हिणवणे. तसे केल्याची शिक्षा दिल्लीकरांनी भाजपस दिली. हे असे केल्याचा उलट दुष्परिणामच भाजपस सहन करावा लागण्याची शक्यता अधिक. कारण ज्यांस जमेल तितके हिणवले, ज्याचा अधिकाधिक दुस्वास केला त्यालाच मतदारांनी आपले मानले. म्हणजे मग भाजपच्या इतक्या उरस्फोडीचे काय मोल राहिले?

तिसरा मुद्दा हिंदी पट्टय़ाचा. दिल्ली राज्य, दिल्ली शहर आणि पंजाब राज्य येथे आता ‘आप’ची राजवट प्रस्थापित झालेली आहे. ‘‘आप’ने आम्हास कधीही हरवलेले नाही, काँग्रेसला हरवले’, असा भाजपचा चतुर युक्तिवाद. दिल्ली शहर, पंजाब राज्य याबाबत तो खरा ठरलाही. पण आजच्या निकालाने दिल्ली महापालिका निवडणुकीने तो खोटा ठरवला. हे तीन प्रांत म्हणजे देश नाही, हे खरे. पण या प्रांतांत तरी भाजपचा ‘डबल इंजिना’दी युक्तिवाद चालला नाही, हेही तितकेच खरे. या तीन ठिकाणी मिळून लोकसभेच्या २० जागा आहेत. ‘आप’च्या आजच्या विजयाने दिल्लीतील सात जागांसाठीची निवडणूक यापुढे गृहीत धरता येणार नाही. मतदार सुज्ञ असतात, ते राज्यासाठी-केंद्रासाठी मतदानात वेगवेगळा विचार करतात वगैरे युक्तिवाद योग्यच. पण प्रतिपक्षाच्या स्थानिक विजयामुळे राष्ट्रीय पातळीवर अधिक प्रयत्न करावे लागतात, हे नाकारता येणार नाही. म्हणजे भाजपस या ठिकाणी यापुढे अधिक जोर लावावा लागेल. या निवडणुकीचा चौथा मुद्दा काँग्रेस संदर्भातील. दिल्ली महापालिकेत काँग्रेसच्या वाटय़ास एक अंकी नगरसेवक असतील असे दिसते. जवळपास २० ठिकाणी त्या पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला. मतदारांनी काँग्रेसपेक्षा ‘आप’ला आपले मानले. हा काँग्रेससाठी धडा आहे. ‘भारत जोडो’ वगैरे ठीक. ते हवेच. पण स्थानिक पातळीवरही मतदार जोडो अभियान अथकपणे राबवावे लागते. हे प्रयत्न कसे करायचे असतात हे कालचा ‘आप’ दाखवून देतो. त्या तुलनेत काँग्रेस मात्र आपले मांद्य सोडण्यास तयार नाही, असे दिसते. कालसुसंगत राहावयाचे असेल तर काँग्रेसला ते सोडावे लागेल. जितके लवकर, तितके बरे!

विजय हा विजय असतो हे सत्य अबाधित असले तरी इतक्याशा या विजयाधारे देशपातळीवरील चित्र रंगवण्याचा हुच्चपणा करण्याचे कारण नाही. तो चॅनेलीय चर्चात योग्य. पण असे छोटय़ा छोटय़ा विजयांचे तुकडे लहान-मोठी गोधडी विणण्यास उपयोगी पडतात, हे नाकारता येणारे नाही. वाढती बेरोजगारी, आर्थिक आव्हाने, शेतीसंकटे या आणि अशा मूलभूत मुद्दय़ांस हात न घालता गोरक्षण, धर्मवाद, ‘जी२०’चे यजमानपद अशा भावनिक मुद्दय़ांवरच यापुढेही राजकारण चालणार असेल तर अन्य मतदारांसमोर दिल्ली महापालिका मतदारांनी घातलेली ‘आप’ की कसम’ असेल. या निकालाचा हा अर्थ आहे.