अमृतपाल सिंगसारख्या इसमाने पंजाबात बस्तान बसवण्यामागे पाकिस्तानी हात आहे की अमृतपालाच्या वहाणेने ‘आप’चा विंचू मारण्याचे राजकारण, याची चर्चा दीर्घकाळ उरेल..

पंजाबात कोणा अमृतपाल सिंग नामे नव्या ‘भिंद्रनवाले’ने उच्छाद मांडणे आणि त्याच वेळी तिकडे लंडनमध्ये भारतीय दूतावासावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचे औद्धत्य फुटीरतावाद्यांनी दाखवणे यात अजिबात योगायोग नाही. खलिस्तान कल्पनेचे मूळ जनक जगजितसिंग चौहान हे कायम लंडनवासी होते आणि तेथील भारतीयांनी बजबजलेल्या ‘साऊथ हॉल’ भागातील गुरुद्वारात त्यांचे वास्तव्य होते. तेव्हा लंडन आणि खलिस्तानवादी यांचे नाते नवीन नाही. लंडनपाठोपाठ असाच काही प्रकार कॅनडा आदी देशांत झाला तरी आश्चर्य वाटणार नाही. शीख स्थलांतरित प्रचंड संख्येने कॅनडात असतात. दोन वर्षांपूर्वी कृषी सुधारणांच्या मुद्दय़ावर प्रामुख्याने पंजाबमध्ये पेटलेल्या आंदोलनांस कॅनडा, लंडन आदी ठिकाणांहून मोठी रसद मिळाली होती. त्या वेळी केंद्राने या शीख शेतकऱ्यांस अन्याय्य वागणूक दिली असा समज या परदेशस्थ शिखांनी करून घेतला होता. त्यात त्यांचा पूर्ण दोष नसेलही. पण तरी त्यामुळे केंद्र सरकार आणि पंजाबातील शीख समाजातील एक घटक यांच्यात वितुष्ट आले हे नाकारता येणार नाही. त्यात केंद्र सरकारातील काही अतिशहाण्यांनी आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांस देशद्रोहींची साथ असल्याचा आरोप केला. ही चूक होती. याचे कारण एखाद्या मुद्दय़ावर एखाद्या प्रांतात इतके तीव्र जनमत असेल तर त्यास देशविरोधी ठरवणे अंतिमत: धोक्याचे ठरते. एकदा का कोणास इतके दूर लोटले की वास्तवात इतक्या दूरवर असणारे त्यांस जवळ करतात. तेव्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनावर देशद्रोहाचा शिक्का अकारण मारला गेल्यामुळे त्यांतील काही खरोखरच अशा फुटीरतावाद्यांच्या जवळ गेले नसतील असे ठामपणे म्हणता येणार नाही. दोन वर्षांपूर्वी जे काही झाले त्या पार्श्वभूमीवर सध्या जे काही सुरू आहे त्याचा विचार करायला हवा.

dharmarao baba atram
तिसऱ्या आघाडीची चर्चा असतानाच शरद पवार- छगन भुजबळ भेटीवर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे महत्वपूर्ण विधान…
talibani rules afghanistan
संगीत ऐकणे, हुक्का पिणे आणि महिलांच्या सजण्यावरही बंदी; अफगाणिस्तानमध्ये नक्की घडतंय तरी काय?
british pm keir starmer marathi news
विश्लेषण: काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानधार्जिणे… आता भारतमित्र… ब्रिटनमधील मजूर पक्षाचे बदलते रंग!
Keir Starmer
ब्रिटनमध्ये मजूर पक्षाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार… कीर स्टार्मर!
Unnatural abuse, dog, abuse,
श्वानावर अनैसर्गिक अत्याचार, भारतीय न्याय संहितेत कलमाबाबत अस्पष्टता
west bengol
पश्चिम बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला बेदम मारहाण, रस्त्यावरील ‘त्या’ कृत्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही संताप!
Inzamam Ul Haq Statement on Rohit Sharma
“तू आम्हाला शिकवू नकोस”, रोहितच्या ‘डोकं वापरा’ वक्तव्यावर इंझमाम उल हक भडकले; म्हणाले, “त्याला सांगा…”
Devendra Fadnavis statement on Uddhav Thackeray criticism of the budget
अर्थसंकल्पावरील उद्धव ठाकरेंच्या टिकेवर बोलताना फडणवीस म्हणाले…

तो करताना अमृतपाल सिंग नावाची ही विषवल्ली प्रथम खुडणे आवश्यक. हा इसम स्वत:स जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा अनुयायी मानतो. त्याचे वागणे-बोलणे, गळय़ात काडतुसांचा पट्टा घालून हिंडणे इत्यादी हे भिंद्रनवालेसारखेच. तथापि या दोहोंतील मुख्य फरक असा की भिंद्रनवाले आकंठ आणि आजन्म धर्मवादी होता तर हा त्याबाबत भुरटेपणाच्या जवळ जाणारा. म्हणजे असे की या शिखाची दाढी आणि शीख दिसणे हे अलीकडचे आहे. शिकून नोकरीधंद्यासाठी दुबईत असताना तेथील वास्तव्यात हा इसम शीख धर्मास पवित्र प्रतीके मिरवत नव्हता. तेथे असताना पंजाबातील तरुणांच्या अस्वस्थतेस ठिणगी लावता येईल असे वाटल्याने याने भिंद्रनवाले यांचा अवतार धारण केला. पण मुळात हा तोतया. त्यास शीख धर्माची संथा दिली गेली गेल्या वर्षी सप्टेंबरात. म्हणजे आपण मोठे धर्माभिमानी असल्याचे जरी तो दाखवत असला तरी त्याचे धर्मप्रेम अलीकडचे आणि वरवरचे आहे. शेतकरी आंदोलनाच्या काळात दिल्लीत लाल किल्ल्यावर खलिस्तान ध्वज फडकावणारा कलाकार दीप सिद्धू हे त्याचे प्रेरणास्थान. नंतर हा सिद्धू आकस्मिकपणे रस्ता अपघातात मारला गेला. त्यावर त्याचा बळी सरकारने घेतला अशी वदंता होती. तिचे निराकरण झाले नसले तरी तसे मानणाऱ्यांत आणि या संशयाचा प्रसार करणाऱ्यांत अमृतपाल आघाडीवर होता. पुढे त्याने दीप सिद्धूची ‘वारिस पंजाब दे’ ही संघटनाच ताब्यात घेतली. या संघटनेने वास्तविक फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पंजाबातील एका पोलीस ठाण्यावर हल्ला करून आपण आणि आपली संघटना काय करू शकते याची चुणूक दाखवून दिली होती. त्याच वेळी याच्या मुसक्या आवळणे आवश्यक होते. ते झाले नाही. त्या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. आज आता ती अंगाशी येत आहे. त्या वेळी पोलिसांस नमते घ्यायला लावण्यात आलेल्या यशामुळे हा अमृतपाल शेफारला असावा. आपण खरोखरच भिंद्रनवाले यांचे वंशज असल्याचे त्यामुळे त्यास अधिक प्रबळपणे वाटू लागले असणार. तेव्हा या नव्या भिंद्रनवालेस जेरबंद करण्याची मोहीम हाती घेण्याइतके बळ पोलिसांनी एकवटले हे बरे झाले. पण ही पोलीस कारवाई त्याने तूर्त चुकवल्याचे दिसते.

यामुळे पंजाबातील स्थिती किती नाजूक आहे याची जाणीव होते. पंजाबातील सध्याचे सरकार आम आदमी पक्ष- ‘आप’चे. हे सरकार नवखे आणि नवथर आहे. मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांच्याबाबत आश्वासक वाटावे असे अद्याप तरी घडलेले नाही. केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि ‘आप’ यांच्यातील संबंध कसे आहेत हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तुरुंगात डांबले गेल्यापासून अधिकाधिक समोर येत आहे. दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या मार्फत मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांच्या ‘आप’ सरकारच्या पायात पाय घालण्याचा केंद्रातील भाजपचा प्रयत्नही एव्हाना लपून राहिलेला नाही. असे असताना पंजाबात या अमृतपालाच्या वहाणेने ‘आप’चा विंचू परस्पर मारला जात असेल तर पाहावे असे हे राजकारण नसेलच असे नाही. पण तसे असेल तर ते केवळ दुर्दैवीच नव्हे तर धोकादायकही ठरेल. पंजाब हे सीमावर्ती राज्य. त्यात
स्फोटक. त्यात स्थानिक पातळीवर राजकीय कुरघोडीच्या नादात भलत्याच कोणाकडे दुर्लक्ष केल्यास काय होते याचा धडा जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या रूपाने आपण अनुभवलेला आहे. त्याची जबर किंमत देशाने चुकवली. त्या काळी पंजाब काँग्रेसचे नेते प्रतापसिंग केराँ आणि इंदिरा गांधी यांचे केंद्रीय नेतृत्व यांतील बेबनावातून भिंद्रनवाले यांचा भस्मासुर उभा राहिला. पुढे त्याने काय केले आणि त्यास नष्ट करण्यासाठी देशास काय करावे लागले याचा इतिहास ताजा आहे.

त्या इतिहासाची पुनरुक्ती देशास परवडणारी नाही. त्याबाबत साशंकता निर्माण होते याचे कारण त्या वेळेप्रमाणे आताही पाकिस्तान या देशाची असलेली अवस्था. आजचा पाकिस्तान तर सत्तर-ऐंशीच्या दशकातील पाकिस्तानपेक्षा अधिक विकल आणि घायाळ आहे. स्वत:स स्वत:चे काही बरे करता येत नसेल तर ज्यांचे बरे चालले आहे त्यांचे बुरे करणे हा क्षुद्रपणा व्यक्तीप्रमाणेच राष्ट्रातही असू शकतो. पाकिस्तान हे त्याचे उदाहरण. तेव्हा आता या अमृतपालाचे पालनपोषण पाकिस्तान करत असेल यात तिळमात्र शंका नाही. त्यास पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा ‘आयएसआय’नेच सर्व सामग्रीसह पंजाबात पाठवले असा संशय व्यक्त केला जातोच आहे. तो खराच असणार. अशा वेळी खरे तर केंद्राने अधिक खबरदारी घेऊन पंजाबच्या सीमा आणि अन्यत्र अधिक खबरदारी घ्यायला हवी. एरवी राजकीय विरोधकांच्या बीमोडासाठी हिरिरीने मैदानात उतरणाऱ्या केंद्रीय यंत्रणांस अमृतपालाचा छडा लावण्यासाठी कंबर कसून कामास लावणे अधिक गरजचे आहे. ‘आप’ची नालायकी सिद्ध करण्याचे अनेक प्रसंग येतील आणि तसे ते न आल्यास ‘आप’ स्वत:च तशी संधी उपलब्ध करून देईल. त्यासाठी अमृतपालाच्या असण्याची काहीही गरज नाही.

दुसरे असे की काही राज्यांत भारतापासून फुटून निघण्याची भावना मुळात रुजतेच का, याचाही विचार कधी आपण करायला हवा. प्रगतीच्या पुरेशा संधींचा अभाव तसेच मध्यवर्ती सत्तेपासून दूर गेल्याची अथवा नाकारले जात असल्याची भावना बऱ्याचदा फुटीरतेच्या मुळाशी असते. तेव्हा पंजाबात हे असे वारंवार का होते, याचा शोध घेऊन त्या दृष्टीने राजकीय पक्षनिरपेक्ष उपाययोजना करायला हवी. हे दीर्घकालीन झाले. तूर्त गरज आहे ती अमृतकालातच उगवलेल्या या अमृतपालाची विषवल्ली समूळ नष्ट करण्याची.