इ. स.पूर्व २७०० पासून आज एकविसाव्या शतकातही चिनी उपचार पद्धती ताठ मानेने उभी आहे; कारण ती विज्ञानाच्या कसोटीस घाबरली नाही..

..भारतीय उपचार पद्धतीस आज सर्वात मोठा धोका आपल्या प्राचीन ज्ञानावर आपापली दुकानदारी चालवणाऱ्या कुडमुडय़ांपासून आहे..

सरसंघचालक मोहनराव भागवत यांचे मन:पूर्वक अभिनंदन. ते प्रामुख्याने दोन कारणांसाठी. एक म्हणजे भारतीय औषध कंपन्यांनी स्वत:चे काही संशोधन वाढवून नवनवी औषधे विकसित करावीत, असे त्यांनी सांगितले. आणि तसे सांगताना सरसंघचालकांनी या ‘प्राचीन’ भारतीय औषध कंपन्यांस चिनी मात्रेचे चार वळसे चाटवले. भारतीय ‘प्राचीन’ औषधशास्त्र, त्यातही विशेषत: आयुर्वेद, आदी विषयांसंदर्भात आपल्याकडे भलतेच हुळहुळे हळवेपण आहे. पण चीनकडे पाहा, असे सांगून सरसंघचालकांनी या प्राचीन औषधाभिमानींस जरा खडे बोल सुनावले. एक प्रकारे हे या विषयावर ‘लोकसत्ता’ वारंवार घेत असलेल्या भूमिकेचेच समर्थन. म्हणूनही सरसंघचालकांचे विधान स्वागतार्ह ठरते. चीनने आपल्या प्राचीन औषध कलेचा उत्तम विकास केला आणि त्यातून त्यांची स्वत:ची एक विश्वासार्ह बाजारपेठ तयार झाली. चीनचे मोठेपण हे की आपले प्राचीन औषधशास्त्र विकसित करताना त्यांनी स्वत:स अद्ययावत ठेवले आणि आधुनिक विज्ञानाचा खुलेपणाने स्वीकार करून अ‍ॅलोपथी औषध निर्मितीतही प्रचंड आघाडी घेतली. इतकी की आज अमेरिका असो की भारत वा युरोप. सर्वत्र औषध निर्मितीत चीनची मक्तेदारी आहे. तेव्हा विजेच्या माळा, शोभेच्या फुटकळ वस्तू आदींबाबत चीनवर बहिष्काराची भाषा करणारे औषधाबाबत असे करू धजत नाहीत. कारण चिनी औषधांवर बहिष्कार म्हणजे पृथ्वीवरील अवतारकार्य संपण्याची हमी, हे वास्तव या बहिष्कारोत्सुक चतुरांस समजते. असो. चीनकडे पाहा असे आता थेट सरसंघचालकांनीच सुनावले असल्यामुळे या विषयाकडे पुरेशा गांभीर्याने पाहायला हवे. 

तसे केल्यास ढळढळीतपणे समोर येणारी बाब म्हणजे चिनी औषध निर्मिती, उपचार पद्धत यांचा चीननेच केलेला विकास. इसवी सनपूर्व २७०० पासून चिनी औषध निर्मितीशास्त्राच्या शास्त्रशुद्ध नोंदी केल्या गेल्या आणि पुढच्या पिढीने मागच्या पिढीच्या या नोंदींच्या आधारे संशोधन पुढे सुरू ठेवले. इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात लिहिला गेलेला ‘ह्युआंगदी नेजिंग’ हा ग्रंथ आजही चिनी उपचार पद्धतीसाठी संदर्भग्रंथ म्हणून मानला जातो. तो सिद्ध करण्यात तत्कालीन चिनी सम्राट सहभागी होता, ही बाब विशेष उल्लेखनीय. ‘यिन’ आणि ‘यांग’ ही अनुक्रमे निष्क्रिय आणि सक्रिय बलतत्त्वे आहेत आणि त्यांचे योग्य संतुलन राखणे म्हणजे आरोग्य असे यात मांडले गेले. इसवी सनपूर्व १५०० ते १००० या काळातील सुश्रुतसंहिता, चरकसंहिता यांतून सिद्ध झालेल्या आयुर्वेदात वात, पित्त, कफ या त्रिदोषांच्या संतुलनाचा विचार असतो; तसेच हे. हे संतुलन बिघडणे म्हणजे अनारोग्य. तेव्हा या संतुलनाच्या पुनस्र्थापनेचा प्रयत्न म्हणजे उपचार असा यामागील विचार. शरीरात काही विशिष्ट बिंदूंवर दाब देणाऱ्या अ‍ॅक्युप्रेशर वा अ‍ॅक्युपंक्चर या उपचार पद्धतीचे मूळही याच चिनी प्राचीन शास्त्रांत आढळते. या सगळय़ाचे दस्तावेजीकरण चीनमध्ये इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर झाले आणि पंधराव्या शतकात ली शिझेन याने ते सूचिबद्ध करून प्रकाशित केले. त्यात पारंपरिक चिनी ज्ञानावर आधारित विविध विकारांवरील सुमारे १९०० औषधे आणि ११ हजारांहून अधिक विविध औषध पर्यायांच्या नोंदी आहेत. या औषधशास्त्रात आयुर्वेदाप्रमाणे श्वासास महत्त्व असून शरीरातील विविध १२ वाहिन्यांतून हा श्वास १२ महत्त्वाच्या अवयवांस प्राणवायू पुरवतो असे ते शास्त्र मानते. इसवी सनापूर्वीही चिनी सम्राट अन्य राज्यांशी औषधे, रसायने या संदर्भात पत्रव्यवहार करीत होते वा ज्ञानाच्या अद्ययावतीकरणासाठी इतरांच्या संपर्कात होते. आपल्याप्रमाणे चीनही भौगोलिकदृष्टय़ा दुभंगलेला होता आणि वेळोवेळी चिनी सम्राटांच्या साम्राज्यासही आव्हाने मिळत होती. चिनी उपचार पद्धतीत या राजेरजवाडय़ांचे स्थान अनन्यसाधारण आहे हे समजून घेण्यासाठी हा सर्व तपशील महत्त्वाचा. 

या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाच्या प्रसार आणि प्रचारासाठी आपल्या राजेरजवाडय़ांनी काय केले हे विचारणे ओघाने येते. ‘‘आपल्याकडे काय बुवा इंग्रजांची सत्ता होती. त्यांनी आपले ज्ञान मारून टाकले’’, असा चतुर युक्तिवाद एक वर्ग सातत्याने करतो. स्वत:च्या मर्यादांची जबाबदारी स्वत:वर न घेण्याच्या आपल्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाचाच हा एक पैलू. (त्यातूनच सत्ता मिळाल्याची दशकपूर्ती जवळ आल्यावरही पूर्वसुरींच्या चुकांकडे बोट दाखवले जाते!) यास अंगचोरी म्हणतात. ती दाखवून द्यायला हवी. म्हणजे असे की आपल्यावर जरी इंग्रजांचे राज्य होते तरी देशात जवळपास ३५० हून अधिक संस्थाने होती आणि त्यातील बरीचशी स्वातंत्र्य दिनापर्यंत जिवंत होती. महत्त्वाचा मुद्दा असा की यातील बहुतांश हिंदू होती आणि तरीही त्यांचा भारतात समाविष्ट होण्यास विरोध होता. यापैकी किती एतद्देशीय राजे-महाराजांनी स्थानिक उपचार पद्धतीचे संशोधन-संगोपन यांस महत्त्व दिले? यातील अनेक राजे-महाराजांच्या वनौषधींची रुची फक्त आपले पौरुषत्व लांबवण्यापुरतीच मर्यादित राहिली; हेही सत्य. चिनी सम्राटांप्रमाणे आपल्या किती राजघराण्यांनी स्थानिक दस्तावेजीकरणाकडे लक्ष दिले? चिनी उपचार पद्धतीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे आधुनिक काळातही चीनने आपल्या प्राचीन औषधांचा बटवा कोणा बोगस बाबा-बापूंच्या हाती अजिबात दिला नाही. त्यामुळे प्राचीन जडी-बुटींचा दावा करत कोणाही दाढीधारी उपटसुंभास स्वत:च्या तुंबडय़ा भरण्याची आणि कर वाचवण्याची लबाड संधी त्या देशात मिळाली नाही. आज एकविसाव्या शतकातही चिनी उपचार पद्धती ताठ मानेने उभी आहे.  

कारण ती कधीही विज्ञानाच्या कसोटीस घाबरली नाही. आपल्या आयुर्वेदीय चलाखीप्रमाणे चिनी उपचारशास्त्र ‘प्रॉडक्ट पेटंट’ की ‘प्रोसेस पेटंट’ या कृत्रिम वादात अडकून पडले नाही. त्यामुळे त्यांची आत्मवंचना टळली. तसेच ‘गणपती हे प्लास्टिक सर्जरीचे जगातील पहिले उदाहरण’ अशा छापाची वक्तव्ये करणारी नेतेमंडळी चीनला लाभली नाहीत आणि गायीच्या शेणात किरणोत्सर्ग रोखण्याची क्षमता असते असा उच्चदर्जाचा बिनडोक युक्तिवाद करणारेही त्या देशात निपजले नाहीत. त्यामुळे सरसंघचालक म्हणतात तसे भारतीय औषध उत्पादकांनी चीनकडून खरोखरच शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्याची सुरुवात संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर येथून करणे इष्ट. त्या शहरातील राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संस्थेस गायीसकट सर्व प्राण्यांच्या मलमूत्राचे पृथक्करण करून गोमातेच्या मलमूत्रात खरोखरच काही विशेष गुण असतात किंवा काय याचा शोध घेण्यास सांगितले जावे. त्या संस्थेची तशी तयारीही होती, असे म्हणतात. तसे झाल्यास ते प्राचीन भारतीय औषधशास्त्रासाठी उपयुक्त संशोधन ठरेल. त्यामुळे चीनप्रमाणे भारतीय प्राचीन उपचार पद्धतीचे पुनरुज्जीवन करावयाचे असेल तर अशा मूलभूत विषयांवरील संशोधनाची गरज आहे. तसे केल्याने आयुर्वेदाचे दुकान मांडून बसलेले अनेक बडवे दूर होतील, हा आणखी एक फायदा. भारतीय उपचार पद्धतीस आज सर्वात मोठा धोका प्राचीन ज्ञानावर आपली दुकानदारी चालवणाऱ्या या कुडमुडय़ांपासून आहे. त्यांना आवरणे ही काळाची गरज.

सरसंघचालकांकडूनच ती व्यक्त झाल्याने तीस अधिक महत्त्व प्राप्त होते. विद्यमान शासन प्रणालीत सरसंघचालकांच्या शब्दास अनन्यसाधारण वजन आहे. त्यांची विनंती ही आज्ञेसमान मानली जाते. त्यामुळे भारतीय प्राचीन औषध क्षेत्राने चीनकडून धडा घेत अधिकाधिक संशोधन करावे ही त्यांची सूचना गांभीर्याने घेतली जाईल ही अपेक्षा. कोणा पाश्चात्त्यवाद्याने नव्हे; तर साक्षात सरसंघचालकांनीच चाटवलेले हे चिनी मात्रेचे चाटण सर्वसंबंधितांकडून गोड मानून घेतले जाईल, ही अपेक्षा.