शिक्षण, क्रीडा, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांकडे पाहाणे सोडून आपण उत्तरदेशीयांवर मात करण्यास महत्त्व देत राहिलो. ते जमले नाहीच; पण हाती होते तेही गेले.. बुद्धिबळाच्या विश्वविजेतपदास गवसणी घालण्यापर्यंत पोहोलेला प्रज्ञानंद आणि त्याआधी एक दिवस ‘इस्रो’च्या चंद्रयान मोहिमेचे केवळ गगनच नव्हे तर अवकाशचुंबी यश काही विचारविलसितांस जन्म देते. ते समजून घेण्यासाठी ही नावे पाहा. एस. सोमनाथ, पी. वीरमुथुवेल, एस. उन्नीकृष्णन, मोहन कुमार, एम. संकरन, ए. राजाराजन, के. कल्पना हे सर्व ‘इस्रो’च्या ताज्या चांद्रयान मोहिमेशी संबंधित पदांवरील अधिकारी. आणखी काही अशी नावे. सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्ट), सुंदर पिचाई (गूगल-अल्फाबेट), वसंत नरसिंहन (नोवार्टिस), शंतनु नारायणन (अडोब), अरिवद कृष्णा (आयबीएम), लक्ष्मण नरसिंहन (स्टारबक्स), रंगराजन रघुरामन (व्हीएम वेअर), गणेश मूर्ती (मायक्रोचिप), जयश्री उल्लाळ (अरिस्टा), जॉर्ज कुरियन (नेटअॅप), सुंदरम नागराजन (नॉर्ड), विवेक संकरन (अल्बर्टसन कंपनी) इत्यादी जागतिक महाकंपन्यांचे प्रमुख. याच्या जोडीने टी. चंद्रशेखर (टाटा समूह), राजेश गोपीनाथ (टीसीएस), एस. एन. सुब्रमण्यम (एल अँड टी), टी. व्ही. नरेंद्रन (टाटा स्टील), सी. विजयकुमार (एचसीएल), सुरेश नारायणन (नेस्ले इंडिया), सी. के. वेंकटरमन (टायटन) इत्यादी. शिवाय विश्वनाथन आनंद, पी. हरिकृष्ण, डी. गुकेश, कोनेरू हम्पी, एस. एल. नारायणन, एस. पी. सेथुरमन, कृष्णन् शशिकिरण, हरिका द्रोणवल्ली, वैशाली रमेशबाबू, सावित्री सी, सहिथी वर्षिनी आणि अर्थातच रमेशबाबू प्रज्ञानंद हे बुद्धिबळपटू! हैदराबादेतील पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत तयार झालेले किदम्बी श्रीकांत, पी. व्ही. सिंधू आदी आणखी अनेक उदाहरणे देता येतील. अशा सर्वातील एक समान बाब सहज दिसते. ती म्हणजे यातील एकही नाव मराठी नाही. तथापि त्याहीपेक्षा अधिक बोचरे सत्य म्हणजे हे सर्व आपल्या दक्षिणी राज्यांतील आहेत. या सत्याचा कटू अर्थ लक्षात घेण्याइतके शहाणपण या महाराष्ट्रदेशी अद्याप शिल्लक आहे काय, हा यानिमित्ताने पडणारा प्रश्न. तो पडतो याचे कारण आधुनिक भारताच्या असो वा खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या उभारणीचा वा विस्ताराचा मुद्दा असो. सर्वत्र मोठ्या संख्येने दिसून येतात ते तमिळनाडू, केरळ, आंध्र, तेलंगणा वा कर्नाटकीय. यावर काही मराठी मंडळी दाक्षिणात्यांची कशी ‘लॉबी’ असते वगैरे रडका सूर लावतात. त्यातून तो लावणाऱ्यांचा बावळटपणा तेवढा दिसतो. कारण अशा अनेक क्षेत्रांत उच्च वा मध्यम पदांवर ‘लॉबिइंग’ करण्यासाठी आवश्यक मराठी माणसे मुळात आहेत कुठे? जे स्पर्धेतच नाहीत; त्यांच्याविरोधात ‘लॉबिइंग’ करण्याची गरजच काय? कितीही कटू असले तरी हे सत्य महाराष्ट्रास स्वीकारावे लागेल. त्यास पर्याय नाही आणि हे सत्य अमान्य असेल तर स्वत:च्या अंगणातील वाळूत मान खुपसून बसलेल्या आत्ममग्न मराठी माणसाकडे ढुंकूनही न पाहता आसपासचे जग हे असेच पुढे जात राहील. गेल्या काही दशकांत आपण आपल्या हाताने महाराष्ट्राची जी काही माती करून ठेवलेली आहे त्याचा परिपाक म्हणजे सध्याचे हे भयानक वास्तव. याउलट दक्षिणेतील राज्यांनी आपल्या शिक्षणव्यवस्था, त्यांचा दर्जा यात जराही तडजोड न करता आपली मार्गक्रमणा सुरूच ठेवली. त्याचा परिणाम म्हणजे आज देशातील, विश्वातील अनेक बड्या संस्था, कंपन्या यांच्या मुख्याधिकारी आदी उच्चपदांवर असलेली ही दाक्षिणात्यांची उपस्थिती. त्याच वेळी ‘सिटी बँक’ या जागतिक वित्तसंस्थेचे माजी प्रमुख विक्रम पंडित, बोइंगचे दिनेश केसकर अशी एक-दोन नावे वगळता महाराष्ट्राने अभिमानाने मिरवावीत अशी व्यक्तिमत्त्वे आहेतच कोठे? हे असे का झाले? महाराष्ट्रावर अशी वेळ का आली? शिक्षण हे या दोन्ही प्रश्नांचे उत्तर. आपल्या प्रत्येक शिक्षणमंत्र्याने शिक्षणाचा बट्ट्याबोळ करण्यात आपापला कमीअधिक हातभार लावला, हे अमान्य करता येणार नाही. याउलट दक्षिणेतील राज्ये अस्मितेच्या दोन्ही बाजूंनी प्रगल्भ होत गेली. म्हणजे या राज्यांनी आपापली भाषिक - आणि म्हणून सांस्कृतिक - अस्मिता तर टिकवलीच; पण त्याचबरोबर आपल्या पुढच्या पिढीस इंग्रजी वाघिणीच्या दुधावर पोसून त्यांस बौद्धिकदृष्ट्या सशक्त केले. इंग्रजीची बोंब म्हणून आपले मराठीवादी; तसे दक्षिणी राज्यांतील नेत्यांबाबत झाले नाही. आपले नेते याबाबत इतके मिळमिळीत की हिंदी भाषक वाहिन्यांच्या वार्ताहरांनी ‘हिंदी में बोलिये’ असे फर्मावताच ते लगेच आपल्या मराठीपेक्षा, काहींच्या बाबत तर मराठीइतक्याच, भयंकर हिंदी भाषेत बोलू लागतात. हे हिंदी भाषक पत्रकार ‘हिंदी में बोलो’ असा आदेश तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिनादी नेत्यांस देऊ शकतात काय? यामुळे आपली पंचाईत अशी की ना आपण धड शुद्ध मराठी राहिलो ना इंग्रजी वा हिंदीवर उत्तम प्रभुत्व मिळवू शकलो. हे एक आव्हान पेलणे आपणास झेपत नसताना त्याच वेळी दक्षिणी राज्यांनी दोन आव्हाने लीलया पेलली. एक म्हणजे त्यांनी स्थानिक अस्मिता जपल्या आणि त्याच वेळी आपल्या पुढच्या पिढ्यांस वैश्विकतेच्या पातळीवरील उल्लेखनीय कामगिरीसाठी सक्षम बनवले. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. याचे कारण महाराष्ट्रीय नेते मंडळी ज्या वेळी उत्तरदेशी नेत्यांच्या चरणसेवा करण्यात वा त्यांच्याशी दोन हात करण्यात मशगूल होती त्या वेळी या उत्तरेचा प्रभाव जराही न घेण्याचा कणखरपणा दक्षिणी नेत्यांनी आणि त्या राज्यांतील जनतेने दाखवला. म्हणूनच आज एकही क्षेत्र असे नाही की ज्यात दक्षिणींचे प्राबल्य नाही. हे प्राबल्य म्हणजे नुसती भाऊगर्दी नाही. तर त्या त्या क्षेत्रातील सर्वोच्चपदी आज दक्षिणी आहेत. मनोरंजन क्षेत्र हे त्याचे ताजे उदाहरण. आज मल्याळम्, तमिळ भाषक चित्रपटांचे यश हे ‘बॉलीवूड’शी नव्हे तर थेट ‘हॉलीवूड’शी स्पर्धा करते. गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय पुरस्कारांत मराठी चित्रपट, कलाकार किती याकडे नजर जरी टाकली तरी हा मुद्दा स्पष्ट होईल. ‘श्यामची आई’ हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पहिला मराठी चित्रपट. त्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान ज्यांच्या नावे आहे ते दादासाहेब फाळके मराठी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई ही चित्रपटविश्वाची राजधानी. तथापि यात मराठी चेहरे किती आणि ते यशाच्या कोणत्या शिखरावर आहेत? या सगळ्याचा अर्थ इतकाच की शिक्षण, क्रीडा, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांत महाराष्ट्राचा ऊर्ध्वदिशेचा प्रवास कधीच खंडित झालेला आहे. बाळ गंगाधर हयात होते तोपर्यंत पुणे ही देशाची राजकीय राजधानी होती आणि बाबासाहेब आंबेडकर, चिंतामणराव देशमुख आदी महानुभावांमुळे आर्थिक आघाडीचे नेतृत्वही या राज्याकडे होते. शिक्षणाच्या सपाटीकरणामुळे या पुण्याईची धूप होत गेली. ‘विद्येविना मती गेली’असे सांगणाऱ्या जोतिबास आपण महात्मा जरूर केले. पण शिक्षणाकडे काही द्यावे तितके लक्ष आपण दिले नाही. पोकळ मर्दुमकीने पिचक्या मनगटांच्या मुठी मिशांवर फिरवत मिरवणारे आपल्याकडे मुबलक. पण महाराष्ट्राच्या बाहेर काही त्यांना कोणी विचारले नाही. राजकीय दांडगाई करणारे उत्तरदेशी आणि संयतपणे आपापल्या क्षेत्रात माना खाली घालून उद्याचा विचार करत कार्यरत दक्षिणी यांत आपण उत्तरदेशीयांवर मात करण्यास महत्त्व देत राहिलो. ते जमले नाहीच; पण हाती होते तेही गेले. दक्षिणी राज्यांचे आजचे देदीप्यमान यश महाराष्ट्राची ही अवनती दाखवून देते. आपल्या राजकीय नेतृत्वाने याला पाड, त्याला फोड, पलीकडच्यास झोपव आणि अलीकडच्यास थोपव इत्यादी खेळ जरूर खेळावेत. पण उद्याच्या महाराष्ट्राचाही विचार करावा. नुसतेच राजकारण करण्यात काय हशील? संयुक्त महाराष्ट्र स्थापनेनंतरच्या पहिल्या मराठीवादी आंदोलनाच्या काळात ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ ही दाक्षिणात्यांच्या विरोधातील घोषणा खूप गाजली. काळाच्या ओघात लुंगी तर हटली नाहीच, पण मराठी धोतर फेडावे लागते की काय, अशी परिस्थिती झाली. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर उद्या पुंगी कोणाची वाजेल सांगण्यास भविष्यवेत्त्याची गरज नाही.