Editorial Financial policies Federal reserve Fed Interest price increase economy ysh 95 | Loksatta

अग्रलेख : तुलनेचे तारतम्य!

अमेरिका, इंग्लंड, स्वित्झर्लंड, युरोपातील अन्य देश, आशियातील फिलिपीन्स, थायलंड, मलेशिया आदी अनेक देशांनी गेल्या आठवडय़ात व्याजदरांत मोठी वाढ केली.

अग्रलेख : तुलनेचे तारतम्य!
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

..आजची राजकीय परिस्थिती उत्तमच म्हणायची. पण तीस तशाच आर्थिक धोरणांची साथ आहे किंवा काय यावर तज्ज्ञांचे दुमत आहे आणि ते गैर म्हणता येणार नाही..

अन्य काहींचे वाईट झाले म्हणून आपले चांगले मानण्याचे चातुर्य कौटुंबिक पातळीवर क्वचित कौतुकास्पद ठरू शकते. देशाच्या पातळीवर असा विचार करून चालत नाही..

अमेरिका, इंग्लंड, स्वित्झर्लंड, युरोपातील अन्य देश, आशियातील फिलिपीन्स, थायलंड, मलेशिया आदी अनेक देशांनी गेल्या आठवडय़ात व्याजदरांत मोठी वाढ केली. याची सुरुवात अमेरिकेपासून झाली. त्या देशाच्या ‘फेडरल रिझव्‍‌र्ह’- फेड- ने वर्षांतील पाचवी आणि सलग तिसरी व्याज दरवाढ केली. तीदेखील थेट पाऊण टक्क्यांची. अमेरिका अजूनही जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे.  तेव्हा व्याज दरवाढीने ते मंद झाले की मागील सर्व डब्यांचा वेग आपोआप घटणार, हे ओघाने आलेच. या देशाने केलेली व्याज दरवाढ एकंदर तीन टक्क्यांची आहे. अमेरिकेची री ओढत बँक ऑफ इंग्लंडनेही व्याज दरवाढ केली. युरोपातील देशांस सर्वात मोठा व्याज दरवाढीचा झटका दिला तो स्वित्झर्लंडने. जगातील अत्यंत स्थिर आणि सुस्थितीतील अर्थव्यवस्था असलेला हा देश. युरोपात असूनही युरोपशी फटकून वागणारा. या देशाच्या श्रीमंतीची वेगळी अशी एक मिजास आहे. तरीही अर्थव्यवस्थेच्या धोक्यांची जाणीव या देशाने दिली आणि सणसणीत व्याज दरवाढ केली. या व्याज दरवाढीचे दणके विविध देशांतील भांडवली बाजारांस बसले आणि आपल्या ‘सेन्सेक्स’सह सर्व बाजार गडगडले. आपल्या रुपयाची अवस्था तर नाकातोंडात पाणी गेलेल्या बुडत्या इसमासारखी. एका डॉलरचे मूल्य त्यामुळे ८१ रुपयांच्या लाजिरवाण्या टप्प्यावर गडगडले असून या रुपयास आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेस तरंगते ठेवणे हे आपल्यासमोरील सध्याचे मोठे आव्हान. या सर्व प्रस्तावनेचे कारण म्हणजे या आठवडय़ात होऊ घातलेली रिझव्‍‌र्ह बँकेची बैठक. ही दोन दिवसीय बैठक ३० सप्टेंबरास संपेल आणि अपेक्षेप्रमाणे आपल्याकडेही व्याज दरवाढ होईल. ही दरवाढ किमान अर्धा टक्क्याची असेल असा काहींचा अंदाज. तथापि त्याआधी गेल्या आठवडय़ात या रुपयाचे करायचे काय, यावर आपल्याकडील मोठा गोंधळ दिसून आला, त्याची दखल घेणे आवश्यक ठरते.

याचे कारण असे की अर्थतज्ज्ञ आणि सरकारी धोरणकर्ते यांतील एका गटाचे मत बुडत्या रुपयास असेच बुडू द्यावे असे आहे तर दुसऱ्यास मात्र त्यास हात देऊन वाचवावे; असे वाटते. पहिला मार्ग निवडल्यास घसरत्या रुपयाची गडगडती किंमत पाहून लाज वाटते आणि त्यावरून होणाऱ्या राजकारणाची काळजी वाटते. एकेकाळी हा रुपया तत्कालीन राज्यकर्त्यांच्या पौरुषत्वाशी जोडण्याचा प्रमाद विद्यमान राज्यकर्त्यांनी केला. त्यामुळे आता रुपया असाच गडगडू दिला तर ती विशेषणे आपणास लागण्याची भीती राज्यकर्त्यांस नसेलच असे नाही. तेव्हा मग रुपयास हात देऊन तरते ठेवण्याचा मार्ग रिझव्‍‌र्ह बँकेस निवडावा लागतो. हे ‘हात देणे’ म्हणजे परकीय चलनाच्या गंगाजळीतील डॉलर्स रिकामे करणे. रिझव्‍‌र्ह बँक तेच करताना दिसते. त्यामुळे गेल्या एकाच आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेस रुपया तरता ठेवण्यासाठी ५०० कोटींहून अधिक रकमेचे डॉलर्स फुंकावे लागले. सध्याचे वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून म्हणजे १ एप्रिलपासून आजतागायत रिझव्‍‌र्ह बँकेने ६००० कोटींहून अधिक डॉलर्स खर्चले. याचा अर्थ असा की आपली परकीय चलनाची गंगाजळी यामुळे ५४,५६५ कोटी डॉलर्स  इतकी उरली असून हा गेल्या काही महिन्यांतील नीचांक. हे डॉलर्स मोठय़ा प्रमाणात खर्च झाले तर चालू खात्यातील तूट वाढते. आयात आणि निर्यात यांच्या मूल्यातील तफावत म्हणजे चालू खात्यातील तूट.

ती प्रमाणाबाहेर वाढल्यास अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा ताण येतो. वास्तविक सध्याचा काळ स्वस्त तेल दरांचा. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलांचे दर ८० डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास स्थिर आहेत. त्यामुळे आपल्या खजिन्यावर दुहेरी ताण नाही. या खजिन्यातून डॉलर्स रिते होणे आणि तेलासाठी आणखी डॉलर्स खर्च करावे लागणे हा दुहेरी ताण आपण २०१२ साली अनुभवला. या अशा ताणाचे राजकीय परिणाम काय होतात हेही आपण पाहिले. त्या तुलनेत आजची राजकीय परिस्थिती उत्तमच म्हणायची. पण या परिस्थितीस तशाच आर्थिक धोरणांची साथ आहे किंवा काय यावर तज्ज्ञांचे दुमत आहे आणि ते गैर म्हणता येणार नाही. विकसित देशांत त्या त्या देशांतील मध्यवर्ती बँका आर्थिक निकषांवर निर्णय घेतात. आपल्या रिझव्‍‌र्ह बँकेस मात्र अर्थकारणाच्या राजकीय परिणामांचा विचार करावा लागतो. हे सर्वपक्षीय सत्ताधीशां-बाबतचे सत्य. त्याचमुळे आपली रिझव्‍‌र्ह बँक वाढत्या चलनवाढीसाठी मुक्तपणे व्याज दरवाढ करू शकलेली नाही. व्याजदर वाढवले की अर्थगतीस आळा बसतो. कारण पैसा महाग होतो. म्हणून आपल्याकडे कोणत्याही पक्षाचे सरकार असो; त्यास रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर वाढवू नयेत; असेच वाटत असते. एका बाजूने व्याजदर वाढवायचे नाहीत आणि दुसरीकडे रुपयाचे मूल्यही बरे दिसेल असे राखायचे. म्हणजे त्यासाठी डॉलर्स खर्च करायचे. हा ताण फार काळ सहन करता येत नाही. म्हणूनच आता रिझव्‍‌र्ह बँकेस या आठवडय़ात व्याजदरात वाढ करण्यावाचून पर्याय नाही. इतके दिवस ही व्याज दरवाढ टाळण्याचा परिणाम असा की त्यामुळे अमेरिकेतील व्याजदर आणि भारतातील व्याजदर यांतील तफावत जवळपास दीड टक्क्याने घटली. अमेरिकी फेडने नोव्हेंबरात येऊ घातलेल्या निवडणुकांची पर्वा न करता चलनवाढ रोखण्यासाठी सलग व्याजदर वाढते ठेवले. आपली रिझव्‍‌र्ह बँक ते टाळत राहिली. त्यामुळे या दोन देशांच्या व्याजदरांतील तफावत कमी झाली असून त्याचा मोठा फटका आपल्या अर्थव्यवस्थेस बसण्याचा धोका संभवतो. रुपयाही घसरता आणि व्याजदरही कमी!

आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मते अन्य अनेक देशांच्या तुलनेत रुपयाची अवस्था बरीच बरी आहे. शनिवारी पुण्यात बोलताना त्यांनी अन्य चलनांचे कसे बंबाळे वाजले आणि ‘त्या मानाने’ रुपयाचे कसे बरे चालले आहे, हे कवतिकभरल्या शब्दांत सांगितले. त्याबाबत दोन मुद्दे. एक म्हणजे अर्थमंत्री या नात्याने त्यांनी तसे म्हणायलाच हवे. ‘रुपयाचे बारा वाजले’, असे फक्त वानप्रस्थाश्रमाकडे निघालेला अर्थमंत्रीच म्हणू शकेल. सीतारामन यांच्याबाबत तसे काही म्हणता येईल असे दिसत नाही. दुसरा मुद्दा अधिक गंभीर. तो म्हणजे त्यांनी तुलनेसाठी निवडलेले नमुने. तुलनेची पंचाईत अशी की ती करायची झाल्यास एकाच मुद्दय़ावर निवड करून चालत नाही. अनेक घटकांचा विचार करावा लागतो. त्यांनी तो तसा केलेला नाही. त्यामुळे त्यांस रुपयापेक्षा वाईट अवस्था असलेली चलनेच फक्त दिसली. यातही तपशिलाचा भाग असा की चलनाचे मूल्य घसरूनही अर्थव्यवस्था चांगल्या असलेली उदाहरणेही आहेत. त्याचे काय? अन्य काहींचे अथवा अनेकांचे वाईट झाले म्हणून आपले चांगले मानण्याचे चातुर्य कौटुंबिक पातळीवर क्वचित कौतुकास्पद ठरू शकते. देशाच्या पातळीवर असा विचार करून चालत नाही. ही मनोवृत्ती प्रगतीस मारक.

म्हणून आपल्यापेक्षा सुमार जसे माहीत असावे लागतात तसे आपल्यापेक्षाही उत्तम कामगिरी करणाऱ्यांकडेही नजर असावी लागते. स्पर्धा ही आपल्यापेक्षा उत्तम असलेल्याशी करायची असते. आपले सर्व काही झकास आहे, असे मानणे स्वान्तसुखाय असते. पण त्यातून प्रगती खुंटते. आपल्यापेक्षा जे उत्तम आहेत ते का आहेत आणि आपण त्या अवस्थेस जाण्यासाठी काय करायला हवे, याचे भान प्रगतीसाठी आवश्यक. त्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक, अर्थतज्ज्ञ यांना सरकारने मुक्त वाव द्यावा आणि त्यांना त्यांचे काम करू द्यावे. म्हणून तुलनेचे तारतम्य हवे. त्याची आज अधिक गरज आहे.

मराठीतील सर्व संपादकीय ( Editorial ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अग्रलेख : हिजाबची इराणी उठाठेव !

संबंधित बातम्या

अग्रलेख : झेमिन ते जिनपिंग..
अग्रलेख: ‘मुव्याक’चे मिरवणे!
अग्रलेख : उद्योग हवे आहेत!
अग्रलेख : हे गेले, ते आले…
अग्रलेख : वरून कीर्तन; आतून..

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs BAN: “भारतात परतल्यानंतर तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी देणार होता का?”,पूर्व पाकिस्तानी क्रिकेटपटूने रोहितला फटकारले
“ज्यांनी महापरिनिर्वाण दिनाला कधी बॅनर लावले नाहीत, ते…”; वंचित-ठाकरे गट बैठकीवरून दिपक केसरकरांची खोचक टीका
विश्लेषण: ट्विटरने बायडेन यांच्याशी संबंधित बातमी दडपली? मस्क यांच्याकडून ‘Twitter Files’द्वारे खुलासा, जाणून घ्या नेमकं प्रकरण
“हीच अभिनेत्री माझी जागा घेण्यास पात्र” ‘द कपिल शर्मा शो’दरम्यान अर्चना पूरण सिंग यांचा खुलासा
पुणे : डांबरीकरणाच्या कामामुळे कात्रज घाटात एकेरी वाहतूक