उदारमतवाद खरोखर आचरणातही येऊ लागल्यास काय होते हे ब्रिटनमध्ये ऋषी सुनक, अमेरिकेत उपाध्यक्ष कमला हॅरिस आदींच्या उदाहरणांवरून समजून घेता येईल..

पंतप्रधान म्हणून ब्रिटिश अर्थव्यवस्थेला शिस्त लावण्याचे काम करताना, सुनक यांची धनाढय़ पार्श्वभूमी हा मोठा अडथळा ठरू शकेल..

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
donald trump hush money trial marathi news
विश्लेषण: ट्रम्प यांच्याविरोधातील ‘हश मनी’ खटला काय आहे? ट्रम्प यामुळे अडचणीत येतील का?
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
US statement despite India objection that the legal process should be fair and transparent
‘कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असावी’ ; भारताच्या आक्षेपानंतरही अमेरिकेचे वक्तव्य

‘‘लोकांना सोप्या गोष्टी लवकर कळतात,’’ असे ‘नटसम्राट’मधील अप्पा बेलवलकर लेकीच्या घरचा चाकर विठोबास सुनावतात. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ची प्रेरणा असलेल्या ‘किंग लिअर’चा लेखक शेक्सपियरच्या इंग्लंडातील जनतेस एव्हाना अप्पा बेलवलकराच्या सत्याची प्रचीती आली असावी. त्या देशाच्या पंतप्रधानपदी हुजूर पक्षाचे ऋषी सुनक यांची अखेर निवड झाली. हे अटळ होते. बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर त्या पदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षात मतदान झाले. त्या वेळच्या प्रचारात लिझ ट्रस यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. याचे कारण त्यांनी दाखवलेले करकपातीचे स्वप्न. ‘नटसम्राट’ म्हणतात त्याप्रमाणे लोकांस सोप्या गोष्टी लवकर आणि सहज कळतात. त्यामुळे ही करसवलत अशक्य आहे असे स्पष्ट सांगणाऱ्या सुनक यांच्यापेक्षा करसवलतीचे, इंधनकपातीचे स्वप्न दाखवणाऱ्या लिझ ट्रस यांच्यावर मतदारांनी विश्वास ठेवला. पण या ट्रसबाई आणि हे मतदार दोघेही तोंडघशी पडले. त्या वेळच्या प्रचारसभांत सुनक यांनी ट्रसबाईंच्या आश्वासनांची संभावना ‘परीकथा’ अशी केली होती. ट्रस यांनी ती अव्हेरली आणि आपले स्वप्न सत्यात येणारच येणार असा दावा केला. तो किती पोकळ होता हे अवघ्या ४४ दिवसांतच त्यांच्यावर पदत्यागाची वेळ आली त्यातून दिसले. परिणामी दणदणीत बहुमत असलेल्या हुजूर पक्षावर पुन्हा एकदा नेता निवडायची वेळ आली आणि गेल्या वेळची चूक या पक्षाने सुधारली. पंतप्रधानपदी ऋषी सुनक निवडले गेले.

यानिमित्ताने त्या देशाच्या इतिहासात प्रथमच गौरेतर व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होईल. सुनक केवळ भिन्नवर्णीय नाहीत. तर भिन्नधर्मीयदेखील आहेत. प्रॉटेस्टंट ख्रिश्चन बहुसंख्येने असलेल्या देशाच्या पंतप्रधानपदी सुनक यांच्या रूपाने प्रथमच हिंदूधर्मीय विराजमान होईल. हे शुद्ध त्या देशाचे मोठेपण. संपूर्ण निवडणुकीच्या काळात सुनक यांच्या वर्णाचा ना उल्लेख झाला ना धर्माचा. सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी व्यक्तीशी निकाह लावल्यामुळे तिला पाकिस्तानी, पाक-धार्जिणी ठरवणाऱ्या; पण राजीव गांधी यांच्याशी विवाहानंतर सोनिया गांधी यांस मात्र इटालियन म्हणूनच हिणवणाऱ्या मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश जनतेच्या मानसिक मोठेपणाचा आकार लक्षात यावा. ज्या देशावर ब्रिटिशांनी सुमारे दीडशे वर्षे राज्य केले त्या देशातील स्थलांतरित आणि आश्रिताचा मुलगा थेट पंतप्रधानपदी बसणार याचा कोणताही विषाद त्या देशातील मतदारांनी व्यक्त केला नाही. देश, प्रदेश मोठे का होतात, याचे उत्तर या मानसिकतेत आहे. आता अलीकडच्या आपल्या सांस्कृतिक गळेपडू परंपरेनुसार हा गृहस्थ कसा ‘आपल्यापैकीच’ आहे हे सांगण्यात धन्यता मानली जाईल. याआधीही ‘लोकसत्ता’ने दाखवून दिल्यानुसार असे करणे केवळ बालिश आणि हास्यास्पद म्हणावे लागेल.

शतकभरापूर्वी अनेक सिंधी-पंजाबी वा गुजराती-मारवाडी कुटुंबे व्यवसायसंधीच्या शोधात आफ्रिकेत गेली. तेथे त्यांचा उत्तम जम बसला. तथापि १९६० आणि नंतरच्या दशकभरात आफ्रिकेतील अनेक देशांतील चिघळलेल्या परिस्थितीमुळे अथवा त्या- त्या देशांतून हाकलून दिल्यामुळे या भारतीयांस परागंदा व्हावे लागले. खरे तर तोपर्यंत ब्रिटिशांचे जोखड दूर होऊन भारत स्वतंत्र झालेला होता. तरीही या गुजराती, मारवाडी, पंजाबी आदींनी भारतात येण्याचे टाळले आणि भारतावर राज्य केलेल्या ब्रिटनमध्ये आसरा शोधण्याचा प्रयत्न केला. उदारमतवादी ब्रिटननेही त्यांना आपले म्हटले. सुनक कुटुंबीय अशांतील एक. लंडनच्या साऊथ हॉल, वेम्ब्ले आदी उपनगरांत या असंख्य स्थलांतरितांनी छोटे-मोठे उद्योग करून उदरनिर्वाह केला. या परिसरांत आजही गौरेतर बहुसंख्येने दिसून येतात. अशाच कुटुंबात वाढलेल्या ऋषी सुनक यांनी पुढे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर बाजी मारली. आता त्या देशाचे सर्वोच्च सत्तापदही त्यांस मिळेल. हे सारे बरेच काही शिकवून जाणारे आहे. उदारमतवाद हा केवळ ‘वसुधैव कुटुंबकम्’ यासारख्या वचनांपुरताच मर्यादित न राहता आचरणातही येऊ लागल्यास काय होते हे ब्रिटनमध्ये सुनक, अमेरिकेत उपाध्यक्ष कमला हॅरिस आदींच्या उदाहरणांवरून समजून घेता येईल. आताही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुनक यांच्या पंतप्रधानपदी निवडले जाण्यास अनेक भारतीय संदर्भ जोडले जातील. काही सांस्कृतिक महाजन ‘‘ब्रिटिशांची आपण कशी जिरवली’’, ‘‘काव्यात्म न्याय’’ इत्यादी वचनांद्वारे आपला ‘मोठेपणा’ मिरवण्याचा प्रयत्न करतील.

तसे झाल्यास करणाऱ्यांचे लघुरूप तेवढे त्यातून दिसेल. ऋषी सुनक अवघ्या ४२ वर्षांचे आहेत. त्यांची व्यावसायिक कारकीर्द लखलखीत आहे. ‘हार्ड वर्क’ करून हार्वर्डसारख्या विद्यापीठातून त्यांनी शिक्षण प्राप्त केले आहे आणि जगास अनेक पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, अर्थमंत्री, स्थानिक प्रशासक, बँकर्स पुरवणाऱ्या ‘गोल्डमॅन सॅक’सारख्या राजकीयदृष्टय़ा सजग वित्तसंस्थेतील सेवेचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर बोरिस जॉन्सन यांनी चाळिशीही न गाठलेल्या सुनक यांस आपले अर्थमंत्री नेमले. पाठोपाठ करोना आला. त्या वेळी अत्यंत नावीन्यपूर्ण उपाययोजना करून सुनक यांनी ब्रिटिश अर्थव्यवस्था सचेत राखली. रोजगार गेलेल्यांस किमान रोजगार, हॉटेलातील बिलांवर सूट इत्यादी उपायांनी त्यांनी अर्थव्यवस्थेत मागणी कायम राहील याची खबरदारी घेतली. या अशा स्वस्त पैशाची जनतेस सवय लागते. ब्रिटिश जनतेसही ती लागली. पण करोनाकाळातील दौलतजादा करोना ओसरल्यावर थांबवण्याचे शहाणपण सुनक यांनी दाखवले आणि पैसाप्रवाहाची धार कमी केली. यामुळे लोक रागावले. कटू सत्य आणि कडवट आर्थिक उपाय कोणालाच नको असतात. त्यामुळे सुनक हे टीकेचे धनी ठरू लागले. जॉन्सन यांस पायउतार व्हावे लागणे आणि सुनक आर्थिक निर्बंधांसाठी रागाचा विषय ठरू लागणे एकाच वेळी झाल्याने नेतृत्वाच्या शर्यतीत ते मागे पडणे साहजिक. तसेच झाले. त्यांच्या पक्षाच्या प्रतिनिधींनीच त्यांना नाकारले.

त्या चुकीचे परिमार्जन सोमवारी त्यांच्या निवडीने झाले, असे म्हणता येईल. पण मधल्यामध्ये ब्रिटिश अर्थव्यवस्थेने चांगल्या गटांगळय़ा खाल्ल्या आणि जगात छी-थू करवून घेतली. आर्थिक पाचपोच नसलेली व्यक्ती सर्वोच्चपदी विराजमान झाली की असेच होणार. जे झाले ते झाले. पण ते तसे होताना सुनक यांची परिस्थिती अधिकच बिकट करून गेले. पंतप्रधानपदी त्यांच्या निवडीच्या वृत्तानेच पौंड सुधारू लागला हे खरे असले तरी ब्रिटिश अर्थव्यवस्थेसाठी यापलीकडे जाऊन बरेच काही करावे लागणार आहे. ते करताना सुनक यांची धनाढय़ पार्श्वभूमी हा त्यांच्यापुढील सर्वात मोठा अडथळा असेल. ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण-सुधा मूर्ती यांची कन्या ही सुनक यांची पत्नी. ‘इन्फोसिस’च्या मोठय़ा समभागधारकांत त्यांची गणना होते. त्यात सुनक यांनी अलीकडेपर्यंत राखलेले अमेरिकी नागरिकत्व, इंग्लंडात दोन-तीन ठिकाणी, अमेरिकेतील कॅलिफोर्निया आदी स्थळी असलेली निवासस्थाने हे सारे राजकारणी म्हणून टीकेस निमंत्रण देणारे. सुनक यांस या टीकेचा सामना करावा लागेल. इतकी धनाढय़ व्यक्ती आपणास काटकसरीचा सल्ला कसा काय देते, असा प्रश्न सामान्य नागरिकांस पडेल आणि ते रास्तच असेल.

गर्तेतील अर्थव्यवस्था बाहेर काढून दाखवण्यात सुनक यांस यश आले तर या प्रश्नाचे उत्तर आपोआप त्यांच्या कर्तबगारीतून दिले जाईल. अन्यथा; ‘या धनाढय़ास गरिबाच्या व्यथा काय कळणार’ छापाचा सूर त्या देशातही उमटेल. सुनक ही परिस्थिती कशी हाताळतात, हे पाहणे म्हणून महत्त्वाचे. दरम्यान आपण आपल्या‘नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ’ शोधू नये, या वचनास स्मरावे. त्यानुसार ‘कुळा’पेक्षा कर्तृत्वाचे कौतुक करण्याची सवय बिंबवता आली तर बरे.