जागतिक दर्जाचे संशोधन आणि वैद्यकीय क्षेत्रातही जटिल शस्त्रक्रियांपर्यंतची प्रगती करणारे आपण, गोवरसारख्या रोगापासून लहानग्यांचे जीव वाचवू शकत नाही?

सार्वजनिक आरोग्यावर किमान अडीच-तीन टक्क्यांपेक्षा अधिक खर्च आपण केलेला नाही, शिवाय आपल्या दरडोई आरोग्य खर्चातही गेल्या आठ वर्षांत फार काही वाढ झालेली नाही..

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Mathisha Pathirana taking an amazing catch of David Warner
CSK vs DC : मथीशा पाथिरानाने वॉर्नरचा घेतला एका हाताने अप्रतिम झेल, धोनीसह संपूर्ण स्टेडियम झाले चकीत, पाहा VIDEO
delivery boy slept on his bike,
“थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral
Vijaypat Singhania and his son Gautam Singhania
गौतम सिंघानिया आणि तुमच्यातला वाद मिटला?, विजयपत सिंघानिया म्हणाले, “इच्छा नसतानाही..”

गेले काही महिने वा आठवडय़ांत आपणास छळलेल्या आजारसाथी पाहा. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आणि आता गोवर. करोनाच्या जागतिक साथीतून बाहेर पडून जरा कोठे उसंत घेत असताना हे आजार आपल्या समोर उभे ठाकले. अर्थात करोनाच्या तुलनेत या सर्वाची तीव्रता अगदीच नगण्य म्हणावी अशी. सर्व उद्ध्वस्त करणारे चक्रीवादळ आणि घरातल्या पंख्याने सुटलेला वारा, असा हा फरक. तथापि या उदाहरणात ‘वारा’ हा समान गुण असतो. त्याची तीव्रता तितकी भिन्न. त्याप्रमाणे या सर्व साथींत सार्वजनिक आरोग्य वा आरोग्याची हेळसांड हाच प्रमुख मुद्दा आहे. त्यातील तीव्रता काय ती भिन्न. एके काळी पटकी, प्लेग आदी भिकार आजारांच्या साथीत आपल्याकडे हजारोंनी प्राण गेले. गेल्या शतकात स्पॅनिश फ्लूने आपणास छळले. अलीकडच्या काळात इतकी महासाथ म्हणजे करोनाचीच. तिचा अपवाद वगळता आपल्याकडे इतकी व्यापक साथ सुदैवाने आलेली नाही. पण तरीही स्थानिक पातळीवर लहानमोठय़ा आजारांच्या साथी आपणास भेडसावत असतात. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी साथींच्या बातम्या गेल्या काही दिवसांत आल्या. त्याच मालिकेत आता गोवर हा धुडगूस घालताना दिसतो. वास्तविक या आजाराचे आपण निर्मूलन करू शकतो, असा आपला दावा. पोलिओ, देवी यांच्याप्रमाणेच गोवर, कांजण्या, गालगुंड हेही आपल्याकडून कायमचे गेले असा आपला समज. गोवराच्या या वाढत्या प्रसाराने तो पार धुळीस मिळतो. हे सर्व आजार आणि त्यांच्या साथी काय दर्शवतात?

आपले तिसऱ्या जगातले ‘असणे’ यांतून दिसते. ही वास्तवाची जाणीव निराश करणारी म्हणायची. एका बाजूला संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ संशोधन, स्कंदपेशी (स्टेम सेल) इत्यादी इत्यादी गहनगूढ विषयांवर आपण बरेच काही करतो. त्यावर संशोधन होते आणि त्या संदर्भात संशोधन करणाऱ्या अनेक जागतिक कंपन्यांतही भारतीय संशोधक महत्त्वाची भूमिका बजावतात. पण त्याच वेळी अत्यंत पायाभूत म्हणता येईल अशा शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य या क्षेत्रांवर मात्र आपल्याकडे हवे तितके लक्ष दिले जात नाही, असा याचा अर्थ. गावात जगातील सर्वात भव्य राजवाडा असावा, मॉल असावेत पण किमान दर्जाचे रस्ते नसावेत आणि घरोघरी पोहोचलेल्या नळांस पाणी नसावे तसेच हे. शिक्षण आणि आरोग्य या दोन्हींत आपल्याकडे अत्यंत मोठा विरोधाभास दिसतो. तो असा की अनेक भारतीय उच्च, अत्युच्च शिक्षित आहेत, आरोग्यातील अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही भारतात होऊ लागल्या आहेत. पण त्याच वेळी प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य या दोन्हींकडे आपले दुर्लक्ष झाले आणि ते तसेच सुरू आहे. वास्तविक करोना-काळात अनेक तज्ज्ञांनी करोनेतर आजारांबाबत इशारे दिले होते. त्या काळात सर्व भर आणि साधनसंपत्ती फक्त करोना नियंत्रणार्थ वळवली गेली. ते योग्यही होते. पण त्याच वेळी ज्या अन्य नियमित लसीकरण मोहिमा राबवणे आवश्यक होते त्याकडे आपल्या व्यवस्थांनी सपशेल काणाडोळा केला. गोवरची साथ त्याची आठवण करून देते.

गोवर, कांजण्या, गालगुंड इत्यादी हे दरिद्री विश्वाचे आजार. गेली ६०-७० वर्षे सरकारी पातळीवर सातत्याने त्याविरोधात लसीकरण मोहिमा राबवल्या गेल्याने आपण त्यांच्यावर विजय मिळवला. असेच कौतुकास्पद उदाहरण पोलिओचे. ज्या वेळी लसकुपींवर उच्चपदस्थांची छायाचित्रे छापण्याची पद्धत नव्हती, त्या वेळी आपल्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, ‘आशा’, ‘अंगणवाडी ताई’ इत्यादी कर्मचाऱ्यांनी अगदी घरोघरी जाऊन विविध आजारांविरोधात लसीकरण मोहिमा राबवल्या. त्याही आधी, ‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’ यासारख्या घोषणांतून या आणि अशा आजारांबाबत आपल्याकडे मोठी जागृती झाली. तथापि त्या वेळी जे घडले त्याचा पुढचा टप्पा आपण गाठू शकलो असे म्हणता येणार नाही. याचे कारण त्यासाठी आवश्यक साधन-संपत्तीची आवश्यकता. आपल्याकडे शिक्षण क्षेत्रासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दोन-अडीच टक्क्यांवर अडकलेली तरतूद आपण कधी तरी ओलांडू हे जसे स्वप्न तसेच सार्वजनिक आरोग्यावरही किमान अडीच-तीन टक्क्यांपेक्षा अधिक खर्च करू शकू हे दिवास्वप्न. याचप्रमाणे आपल्या दरडोई आरोग्य खर्चातही गेल्या आठ वर्षांत फार काही वाढ झालेली नाही. केंद्र सरकारच्याच आरोग्य खात्याने प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार २०१३-१४ साली जो दरडोई आरोग्य खर्च ३१७४ रुपये इतका होता तो २०१८-१९ साली जेमतेम ३३१४ रु. इतका झाला. या संदर्भात एक साधा हिशेब असा की देशाची अर्थव्यवस्था जर किमान सहा-सात टक्क्यांनी वाढत असेल तर शिक्षण आणि आरोग्य या अत्यंत पायाभूत विषयांवरील खर्चातही त्या प्रमाणात वाढ व्हायला हवी. तशी ती होत नाही आणि हे अशा काही साथींचा फटका बसल्याखेरीज आपल्या व्यापक समाजमनास कळतही नाही.

यात लाजिरवाणा भाग असा की अत्यंत क्षुद्र असे आजार आपल्याकडे जीवघेणे ठरतात. गोवर हा त्यातील एक. वेळच्या वेळी होणाऱ्या लसीकरणाने हे आजार पूर्ण टाळता तरी येतात अथवा त्यांचा जीवघेणा दंश निष्प्रभ करून टाकता येतो. पण करोनोत्तर काळात या साध्या सत्याकडे दुर्लक्ष झाल्याने गोवरसारख्या दुर्लक्ष कराव्या अशा आजाराचे साथीत रूपांतर होताना दिसते. डेंग्यू, चिकुनगुनिया वा मलेरिया हे तर डासांमुळे पसरणारे आजार. पावसाळा संपला की हमखास आपल्याकडे त्यांची साथ येते. यामागील कार्यकारण भाव लक्षात येणे अवघड नाही. पण डासांची निर्मिती थांबवण्याइतकी स्वच्छता आपण पाळू शकत नाही. अशा परिस्थितीत इतके स्वच्छ राहणे ज्यांना परवडते ते आपापल्या आरोग्याची काळजी घेतात. म्हणजे याबाबतही शिक्षणासारखीच परिस्थिती. त्या क्षेत्रातही पुरेशा तरतुदीची बोंब असल्याने जनसामान्यांसाठी शिक्षण व्यवस्था रसातळास गेलेली. तीकडे दुर्लक्ष करून धनवानांच्या मुला/बाळांस पंचतारांकित शिक्षण मिळू शकते. त्याचप्रमाणे सधन मंडळी आपापल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात. आरोग्यदायी वातावरणात राहतात आणि आरोग्यदायी अन्न खातात. पण देशाचे आरोग्य (दुर्दैवाने) अशा भाग्यवानांच्या सौष्ठवपूर्ण देहाकारावर मोजले जात नाही. दारिद्रय़रेषेखालील नागरिकांच्या तंदुरुस्तीसाठी काय आणि किती केले जाते यावर त्या त्या देशाची प्रकृती मोजली जाते. तेथेच नेमके आपले आरोग्याचे घोडे पेंड खायला जाते.

जागतिक व्यासपीठांवरील सहवासाने आपले अमेरिकादी देशांशी मैत्र जुळले असेल. निदान तसे वाटत असेल. पण तरीही तो देश आपल्या महाप्रचंड अर्थव्यवस्थेतील तब्बल १९ टक्के इतकी रक्कम सार्वजनिक आरोग्यावर खर्च करतो आणि जर्मनी, फ्रान्स, कॅनडा आदी देशही अशीच घसघशीत रक्कम आरोग्यास देतात याकडे दुर्लक्ष करता येत नाही. गोवरची पसरती साथ आपणास या कटू फरकाची जाणीव करून देते. सध्या गोवरग्रस्तांतील अनेक बालके फक्त सहा ते नऊ महिन्यांची आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार सहा महिन्यांवरच्या सर्व बालकांना गोवर प्रतिबंधक लस द्यायला हवी. आपल्याकडे मात्र ती नऊ महिन्यांच्या पुढील बालकांना दिली जाते. या साथीचा प्रसार वेग लक्षात घेता यात तातडीने बदल व्हायला हवा आणि आगामी लाट टाळण्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम हाती घ्यायला हवी. एरवी स्वत:च जगाचे लसकेंद्र म्हणवून घेण्याचा काय फायदा? जागतिक स्तरावर मोठे होण्याच्या नादात आपण घरच्या आघाडीवर रोगग्रस्त राहून चालणारे नाही. त्यासाठी ही गोवर गफलत टाळायला हवी.