समाजाला हादरवणाऱ्या हत्येच्या नंतरही स्त्रीला सक्षम करण्याची चर्चा पुढे जात नाही आणि ती ‘लिव्ह इन की लग्न’ याभोवतीच फिरते, याला काय म्हणावे?

तिचे निर्णय ती घेईल, त्या निर्णयांची जबाबदारी घेईल, तेव्हा तिची स्वप्ने तिची स्वत:ची असतील..

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

वसईतील तरुणीच्या दिल्लीत झालेल्या अत्यंत घृणास्पद, हिणकस हत्या प्रकरणासंदर्भात समाजमाध्यमांतून तसेच एरवी सुरू असलेली चर्चा अखेर दोन वळणांवर गेली. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लिव्ह इन’. यापैकी ‘लव्ह जिहाद’ ही संज्ञा त्या तरुणीने धर्म सोडल्याचे किंवा तिच्या खुन्याचे इस्लामी गटांशी संबंध असल्याचे स्पष्ट झालेले नसूनही कशी  लागू पडणार, हा प्रश्न कुणाला पडतच नाही हे या चर्चाखोरांच्या बौद्धिक पातळीचे लक्षण, म्हणून त्याविषयी न बोलणे बरे. पण या निमित्ताने ‘लिव्ह इन नको- लग्नच करा’ अशा ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यांचे वर्णन करण्यासाठी भंपक यापलीकडे दुसरा शब्द असू शकत नाही.  सोन्याचा मुलामा दिलेली, अतिशय सद्गुणी अशी लग्नव्यवस्था फार चांगली आणि तिच्यातून बाहेर भरकटून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा मुली जो काही खटाटोप करत आहेत, तो नस्ता वाह्यतपणा, ते म्हणजे भारतीय संस्कृतीचे अध:पतन असे जे काही चित्र रंगवून दाखवले जात आहे, त्याबद्दल मात्र आवर्जून बोलणे गरजेचे आहे. जात, धर्म, प्रथा, परंपरा, संस्कृती, आपले-तुपले हे सगळे मुलामे बाजूला करून स्वच्छ नजरेने आजच्या पिढीच्या वागण्याकडे, जगण्याकडे पाहिले-  मुळात तसे पाहता आले-  तर दिसणारे चित्र बरेच वेगळे आहे. आजच्या पिढीच्या प्रतिनिधींना स्वत:लाही कदाचित त्याचे विश्लेषण करता येणार नाही, समजणारही नाही, पण खलील जिब्रान म्हणतो तशी ती ज्या काळाची अपत्ये आहेत, ती त्यानुसारच वागणार. हजार -दोन हजार वर्षांपूर्वी कुणीतरी ठरवलेल्या रीतीभाती त्यांच्यावर कशा लादता येतील? ‘नववधूस उपदेश’ या  कवितेतल्यासारखे परंपरांचे ओझे त्यांच्या खांद्यावर लादण्यात अर्थ तरी काय आहे?

श्रद्धा हत्या प्रकरणात ही तरुण मुलगी तर जिवानिशी गेली, पण म्हणून तिने स्वीकारलेली लिव्ह इन रिलेशनशिप ही जगण्याची पद्धतच वाईट ठरवण्याचा खटाटोप हा एकूण जगण्याकडेच काळ्या- पांढऱ्या रंगात बघण्याचा प्रकार आहे. जगण्याला असलेल्या या दोन्हींच्या मधल्या छटा जगण्याविषयी बरेच काही सांगत असतात.

याचे कारण असे की लग्नव्यवस्था सांगितली जाते तितकी आदर्श, परिपूर्ण नाही. ती स्त्री-पुरुष दोघांचेही शोषणच करते, पण त्यातही स्त्रीचे जास्त शोषण करते, ही समाजशास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध झालेली बाब. स्त्रीमधल्या ऊर्मी, ऊर्जा, सर्जनशीलता मारून टाकण्यास, तिला घरदार, चूलमूल या जबाबदाऱ्यांमध्ये जखडण्यास, तिचे परावलंबित्व वाढवण्यास, तिचा कणाच मोडण्यास ही व्यवस्था कारणीभूत ठरू शकते. असे होण्यास प्रत्येक स्त्रीची हरकत नसलेही, पण जिची असते तिला पर्याय हवे असतात. ती पुरुषाची, त्याच्या सहवासाची, साथसोबतीची, त्याच्याबरोबरच्या सहजीवनाची गरज नाकारत नाही, पण त्याबरोबरच तिला चौकट नाकारण्याची, नाही तर तिची हवी तेव्हा मोडतोड करण्याची मुभा हवी असते. वेगळी वाट चोखाळणाऱ्यांपुढे अधिक गुंतागुंती असतात, त्यांचा मार्ग अधिक खडतर असतो, पण त्यांना तो चालून बघायचाच असतो. आज तसे करून पाहणारी अनेक जोडपी समाजात दिसतात. नव्या काळाच्या या धडका, नव्या परिस्थितीचा हा रेटा फार काळ नाकारला जाऊ शकत नाही, हे त्यांच्याकडे पाहून लक्षात घ्यायला हवे.

लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या व्यवस्थेला आज आपण विरोध केला नाही, तर उद्या यच्चयावत सगळ्या मुली तोच मार्ग धरतील, आणि मग भारतीय संस्कृती, कुटुंबव्यवस्था बुडून समाज पार रसातळाला जाईल या भावनेतून खरे तर कुणीही जिवाचा आकांत करून घेण्याची गरज नाही. कारण लग्न, संसार, नवरा, मुलंबाळ थोडक्यात चूलमूल ही काही कुणाही स्त्रीच्या जीवनाची इतिकर्तव्यता असू शकत नाही. असूही नये. पण शतकानुशतके  तोच रोमँटिसिझम वाटावा अशा पद्धतीने स्त्रियांच्या मनांवर बिंबवले गेले आहे. त्यामुळे ‘स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’, ‘जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’, ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते’, अशा बाष्कळ वचनवजा उद्धरणांमधून स्त्रीत्व, बाईपण ही काहीतरी वेगळी संकल्पना असते आणि स्त्रीने ती पुढे न्यायची असते असे ठसवले जाते. पण तीच स्त्री ही त्याआधी अनंतकाळची माणूस असते त्याचे काय? स्त्रीत्व, बाईपण या सगळ्या तिच्यावर लादलेल्या संकल्पना. तिने शालीन असावे,  प्रश्न विचारू नयेत, उत्तरे मागू नयेत, कुटुंबाला हवी तेवढी मुले जन्माला घालावीत, नवरा म्हणत असेल तर नोकरी करावी, तो म्हणत असेल तर घरी बसावे, समाज म्हणतो म्हणून कुंकू लावावे, समाज म्हणतो तेव्हा ते पुसावे अशा गोष्टी तिच्या बाईपणामध्ये येतात. परंपरा पुढे नेण्यासाठी, समाजपुरुषाने घालून दिलेली घडी विस्कटली जाऊ नये यासाठी तिचे हे बाईपण अपरंपार उपयोगी पडणारे. समाजव्यवहार सुरळीत चालण्यासाठी काहीएक व्यवस्था हवी हे मान्य. पण शंभरातल्या एकीला ते सगळे नाकारून आपल्याला हवे तसे जगण्याची मुभा हवी असेल तर ती त्या व्यवस्थेत मिळते का, हा खरा प्रश्न आहे.

ती मिळत नाही, हे एखादे वाईट उदाहरण पुढे आले म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपवर ज्या पद्धतीने टीका होते आहे, त्यातून दिसते आहे.  अशी टीका होते कारण कुणा स्त्रीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहावे की लग्न करावे हा प्रश्न तिचा एकटीचा किंवा तिच्या कुटुंबाचा नाही, असे आपला समाज मानतो. पण मग लग्नसंस्थेतील नात्यात तिला मारहाण होते, तिचा छळ होतो तेव्हा ते रोखायला हाच समाज जातो का?

मुलीचे लग्न होणे ही पालकांचीही इतिकर्तव्यता मानली जाते, कारण ते झाले की आपली जबाबदारी संपली असे पालकांसह अनेकांना वाटते. कशी संपते त्यांची जबाबदारी? त्यांनी या जगात आणलेला एक जीव स्वत:च्या जिवावर, समर्थपणे जगावा ही त्यांची जबाबदारी नाही का? मुलगी जळून मेली तरी चालेल पण जात, धर्म, संस्कृती बुडता कामा नये, हा कुठला पीळ आहे? उलट या गोष्टींचे काहीही होवो, पण मी माझ्या मुलीला शारीरिकदृष्टय़ा इतके कणखर करेन की तिचा केस वाकडा करायची कुणाची हिंमत होणार नाही, असे पालकांना का वाटत नाही? मी माझ्या मुलीला मानसिकदृष्टय़ा इतके तयार करेन की कुणालाही तिला गृहीत धरता येणार नाही, असा विचार का केला जात नाही? मी माझ्या मुलीला शिकवूनसवरून, आर्थिकदृष्टय़ा इतके समर्थ करेन की तिला कुणावर अवलंबून राहायची गरज पडणार नाही, असा दृष्टिकोन पालक का बाळगत नाहीत? तिने सगळे काही करायचे ते लग्न करण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी, असे का? नाही तिला करावेसे वाटले लग्न आणि तिने नाही केले तर असे काय बिघडणार आहे? केले आणि नाही पटले म्हणून नाही टिकवले लग्न, झाला घटस्फोट तर असे काय आकाश कोसळणार आहे? राहिली ती तिच्या आवडत्या माणसाबरोबर लग्नाशिवाय तर पृथ्वी फिरायची थोडीच थांबणार आहे? नाही एखादीने घातले मूल जन्माला तर जग थोडेच बुडणार आहे? झाल्या तिच्या हातून चुका म्हणून सूर्य उगवायचा थोडाच राहणार आहे?

पण तिला हवे तसे ती जगली तर तिचे जग मात्र बदलणार आहे. ते अधिक खमके असणार आहे. तीदेखील अधिक खंबीर असणार आहे. तशी असेल तेव्हा तिचे निर्णय ती घेईल, त्या निर्णयांची जबाबदारी घेईल. स्वत:चे आयुष्य स्वत: घडवेल. तिची स्वप्ने तिची स्वत:ची असतील. त्या स्वप्नांना पंखही तिचे स्वत:चेच असतील. तिला अशी भरारी घेऊ द्या. एखादे चुकीचे प्रकरण घडले म्हणजे सगळे जग चुकीचे आणि वाईट नसते. ते कसे असते ते ओळखण्याची दृष्टी तिला द्या. त्यासाठी लग्नसंस्था, प्रथा- परंपरा यांच्याकडे बघण्याचा अर्धवट स्वप्नाळूपणा आधी सोडावा लागेल. त्यापलीकडचा सूर्य अधिक प्रखर आणि तेजस्वी आहे, हे आपल्या लेकींना सांगावे लागेल.