उत्तराखंडमध्ये घडणाऱ्या अपघातांसाठी फक्त हवामान बदल या घटकाला दोष देऊन चालणार नाही.. शिखरांवर वाढता मानवी वावर हेही कारण आहे..

प्रशिक्षणादरम्यान हिमस्खलनात जीव गमावलेल्यांची संख्या आता २९ वर गेल्याने ही दुर्घटना मोठी ठरली आहे..

उत्तराखंड येथील हिमस्खलनात अडकलेल्या २९ गिर्यारोहकांचा मृत्यू ही चटका लावणारी घटना असली, तरीही त्याकडे केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून पाहता येणार नाही. गेल्या काही शतकांत घडणाऱ्या पर्यावरणीय बदलांमुळे हिमालयाच्या परिसरात घडणारे हिमस्खलन आणि कडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे, हे कारण पुरेसे मानले जात असले, तरीही त्यामागे त्या परिसरातील मानवाचा वाढता वावर हेही त्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जगातील अनेक शिखरांवर गिर्यारोहणाच्या मोहिमा आखल्या जातात. त्यामध्ये अचानक कडे कोसळून अनेक गिर्यारोहकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यातच, उत्तराखंड येथील घटना ही मोहिमेदरम्यान झालेली नसून प्रशिक्षणाच्या काळात घडली आहे. त्यामुळे तिची चुटपुट अधिक वाढते.

नेहरू माऊंटेनिअिरग इन्स्टिटय़ूट ही भारतातील एक अतिशय प्रतिष्ठित अशी संस्था असून तेथे गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम प्रात्यक्षिकानेच चालवले जातात. गेल्या काही वर्षांत या अभ्यासक्रमांना मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे. त्यामुळे हल्ली तर शंभराहून अधिक युवक त्यामध्ये सहभागी होत असतात. अतिशय काळजीपूर्वक आखल्या गेलेल्या या अभ्यासक्रमातील प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक अचानक झालेल्या हिमस्खलनामुळे हिमखळीत अडकले आणि त्यावर बर्फवृष्टी झाल्याने, त्यांच्यापैकी बहुतेकांना प्राण गमवावे लागले. हिमखळीत अडकलेल्यांना वाचवण्यासाठी वरच्या बाजूस पुढे गेलेल्यांनी आटोकाट प्रयत्न केले, त्यात काही प्रमाणात यशही आले, मात्र अशी मदत अगदी तातडीने म्हणजे पाच-दहा मिनिटांत मिळणे आवश्यक असते. एवढय़ा उंचीवर ती मिळणे दुरापास्त झाले आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडली.

उत्तराखंडमध्ये गिर्यारोहकांना आकर्षित करणाऱ्या शिखरांची रांगच आहे. नंदादेवी, कामेत, अबी गमीन, चौखंबा, त्रिशूल, केदारनाथ, शिविलग, स्वर्गरोहिणी, नीलकंठ अशा पर्वत शिखरांवर आरोहण करण्याचे आव्हान नेहमीच आकर्षित करणारे असते. गिर्यारोहकांना हे आव्हान सहजपणे पेलता येणारे नसते. त्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. भारताच्या संरक्षण खात्याच्या अंतर्गत १९६५ मध्ये स्थापन झालेली नेहरू माऊंटेनिअिरग इन्स्टिटय़ूट ही भारतातील अशी एकमेव प्रशिक्षण संस्था आहे, की जिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक संस्थेची मान्यता आहे. गेल्या काही वर्षांत या संस्थेत येणाऱ्या युवकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. उत्तराखंडमधील अशा पर्वत शिखरांवरील मोहिमाही गेल्या काही दशकांत वाढल्या आहेत.

५००६ मीटर उंचीवरील द्रौपदीचा दांडा-२ या पर्वत शिखराच्या परिसरात मंगळवारी झालेल्या दुर्घटनेत हिमस्खलनात अडकलेल्या गिर्यारोहकांपैकी २९ जणांचा मृत्यू झाला. जे वाचले, त्यांना लगेचच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. आता मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून त्यासाठी भारतीय हवाई दलाचे शर्थीचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत. जगात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गिर्यारोहक मृत पावण्याची घटना आजवर क्वचितच घडलेली आहे. उत्तराखंड राज्यात कडे कोसळणे, हिमस्खलन होणे या घटना नव्या नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांत अशा घटना वारंवार घडत आहेत. अति प्रमाणातील पावसामुळे येणारे पूर, डोंगर उतारावरील खडकांना पडणाऱ्या भेगा, त्यामुळे कोसळणारे कडे, पर्वतांवर अचानकपणे होणारे हिमस्खलन, त्यामुळे निर्माण होणाऱ्या हिमखळय़ा यांचे प्रमाण वाढते आहे, याचे जागतिक वातावरणीय बदल हे एक कारण सांगितले जाते. ते योग्यही आहे. मात्र तेवढेच कारण नाही.

मागील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात तेथे झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. डोंगरांवरून खाली वाहत येणाऱ्या पाण्याच्या शक्तिशाली प्रवाहामुळे तेथे नव्याने उभारण्यात येत असलेले हायड्रोपॉवर वीजनिर्मिती प्रकल्पही धोक्यात आले. उंच डोंगरांवर असे प्रकल्प उभारण्याने, तेथील डोंगराळ जमीन विस्कळीत होते, त्याचा परिणाम कडे कोसळण्यात होतो. वरून येणाऱ्या बर्फामुळे उतारावरील जमिनीत मोठाले खड्डे पडतात. या खड्डय़ांमध्ये अनेक वेळा बर्फ साठून राहते. अशा हिमखळय़ांत अडकलेल्या कुणालाही बाहेर काढणे जिकिरीचे आणि धोक्याचेही असते. याच भागातील पाच हजार मीटर उंचीवरील नंदादेवी शिखराच्या परिसरात मागील वर्षी खडक आणि बर्फ यांच्यातील घर्षणामुळे कडे कोसळून दोन हजार मीटर खाली असलेल्या नदीत पडले. त्यामुळे नदीचे पात्र फुगले. या परिसरात डोंगरावर वीजनिर्मितीचे अनेक प्रकल्प उभे राहत असून त्याचाही परिणाम हिमस्खलन होण्यात असू शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या परिसरातील वाढती वर्दळ हे महत्त्वाचे कारण असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे. केदारनाथ मंदिराच्या परिसरात यापूर्वी झालेली दुर्घटना अंगावर शहारे आणणारी होती. आजही तेथे कडे कोसळण्याच्या घटना घडतच आहेत. अगदी गेल्या महिनाभराच्या काळातही अशा दोन घटना घडल्याची नोंद करण्यात आली आहे. बर्फाचे कडे कोसळण्याने नद्यांना मोठा पूर येतो. काही ठिकाणी डोंगराच्या उतारावर असे कडे तरंगत्या अवस्थेत असतात आणि ते कधीही खाली कोसळू शकतात, असे उपग्रहीय छायाचित्रांवरून स्पष्ट होत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वत विकास केंद्राने २०१९ मध्ये हिंदूकुश हिमालय परिसरात केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे, की गेल्या ५० वर्षांत या परिसरात होत असलेल्या वातावरणीय बदलांचे परिणाम आता दृश्य स्वरूपात दिसू लागले आहेत. हवामानाची पातळी उंचावत राहिल्याने हिमनग वितळण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे गंगा, ब्रह्मपुत्र नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होते आणि त्याचे परिणाम परिसरातील जनजीवनावर होतात. गेल्या काही वर्षांमध्ये या नद्यांच्या परिसरात झालेल्या बांधकामांमुळे पात्रे अरुंद होत आहेत. पूरस्थिती निर्माण होण्यास त्यामुळे मदत होते. गिर्यारोहकांना पर्वतांची शिखरे सर करताना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी आव्हानात्मक असतात. प्राणवायूची कमतरता, क्षणोक्षणी बदलणारे हवामान, हिमवर्षांव आणि त्याच्या जोडीला हिमस्खलनामुळे कडे कोसळण्याच्या घटना, अशा दुर्धर स्थितीत जिद्द कायम टिकवत वर वर जात राहणे, हे एक प्रकारचे दिव्य असते.

गेल्या काही दशकांत भारतातच नव्हे, तर जगातही गिर्यारोहणाचे आकर्षण वाढत आहे. त्यांना उत्तराखंडच्या परिसरातील पर्वतशिखरे कायम खुणावत असतात. व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन हे साहस करण्यासाठी आता अनेक राज्यांमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही उभ्या राहत आहेत. एव्हरेस्टसारख्या सर्वात उंच शिखरावर पोहोचण्याची कामना बाळगून त्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्यांना मदत करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळेच द्रौपदीचा दांडा-२च्या शिखर परिसरात घडलेली घटना कमालीची क्लेशदायक आहे. ऐन तारुण्यात एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी भारतातील पहिली महिला कविता कंसवाल यांचे या दुर्घटनेतील निधन अधिक दु:खद आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी निसर्गावर ठपका ठेवण्यापेक्षा, अशा धोकादायक परिसरातील सर्व प्रकारची वर्दळ, बांधकामे आणि प्रकल्प कमी होण्याची आवश्यकता आहे. हिमशिखरांची साद पर्यटकांना भुलवत असते आणि गिर्यारोहकांना तर ही साद स्वस्थ बसू देत नाही हे खरेच, पण हिमालयासारख्या कमी वयाच्या, तरुण आणि लहरी पर्वतावर आधीच पर्यावरणीय बदलांचा ताण आलेला असताना आपण त्यावर किती राबता ठेवायचा, याचा काहीएक मुलाहिजा राखण्याची गरज आहे.