आंतरराष्ट्रीय संबंधात सर्व जण फक्त आपापला स्वार्थ पाहतात. आपले ऐकले जाणारच नसेल तर ते सुनावण्याची गरज आणि उपयोग काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण रशियाकडून खनिज तेल खरेदी केले म्हणून अमेरिकेने कधी किरकिर केल्याचे आढळत नाही. अमेरिकेशी संबंध सुधारण्याच्या आपल्या प्रयत्नांबाबत पुतिन यांनी कधी तोंड वाकडे केल्याचे दिसत नाही..

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे तीर्थरूप कृष्णस्वामी सुब्रमण्यम हे उच्च दर्जाचे लेखक, सरकारी सेवक आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासक गणले जात. आजची आंतरराष्ट्रीय अभ्यासकांची ताजी फळी घडवण्यात आणि अनेकांस या विषयाची गोडी लावण्यात सुब्रमण्यम यांच्या लिखाणाचा मोठा वाटा आहे. परराष्ट्र संबंध आणि संरक्षण या क्षेत्रांचा अभ्यास करणाऱ्या दिल्लीतील संस्थेत त्यांच्या नावाने एक व्याख्यानमालादेखील चालवली जाते. अशा तऱ्हेने जयशंकर यांस मुत्सद्देगिरीचे बाळकडू जन्मत:च मिळाले. पुढे त्यांची स्वत:ची कारकीर्दही वाखाणण्याजोगीच. महत्त्वाच्या देशांत राजदूत, आंतरराष्ट्रीय संस्था/ संघटनांचा कार्यानुभव आदींमुळे जयशंकर हे आंतरराष्ट्रीय संबंध, मुत्सद्देगिरी इत्यादी विषयांत अधिकारी गणले जातात. त्याचमुळे त्यांच्या अमेरिका दौऱ्यातील काही विधानांचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहात नाही. ही विधाने खरे तर पट्टीच्या राजकारण्यास सुयोग्य ठरावीत. ती त्यांनी कोणत्याही राजनैतिक वा अधिकृत मंचावर केलेली नाहीत. अमेरिकास्थित भारतीयांसमोर बोलताना केलेली जयशंकर यांची ही विधाने आहेत. समाजमाध्यमांतील उच्छृंखलांनी जयशंकर यांच्या विधानाचे जोरदार स्वागत केल्याने ती अधिक डोळय़ात भरतात. काही वर्गातून झालेले कौतुक हे आनंदापेक्षा काळजी वाढवणारे ठरते. म्हणून जयशंकर यांच्या या विधानावर भाष्य आवश्यक.

अमेरिकेने अलीकडेच पाकिस्तानला ‘एफ-१६’ विमाने देण्याचा निर्णय जाहीर केला. अमेरिका दौऱ्यात जयशंकर यांनी याबाबत नाराजी दर्शवली, ती योग्यच. त्याआधी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात नापसंती व्यक्त केली होती. जयशंकर यांनी या भूमिकेचाच पुनरुच्चार केला. त्यात अयोग्य काहीही नाही. आक्षेपाची अस्पष्ट रेषा उमटते ती त्यांच्या भाषेबद्दल. पाकिस्तानला ही विमाने दहशतवादाविरोधात उपयोगी पडावीत म्हणून दिल्याचे लटके समर्थन अमेरिकेने केले आहे. त्या संदर्भात विचारले असता, जयशंकर बाणेदारपणे उद्गारले : ‘‘हे असे बोलून तुम्ही कोणालाही मूर्ख बनवू शकत नाही’’. वास्तविक आंतरराष्ट्रीय संबंधात कोणीच कोणास मूर्ख बनवत नाही. सर्व जण फक्त आपापला स्वार्थ पाहतात, हे चिरंतन सत्य. तेव्हा त्या सत्यास जागत अमेरिकेने ही विमाने पाकिस्तानला का दिली, याचा विचार जयशंकर यांनी केला असेलच. त्या देशाचा माजी पंतप्रधान इम्रान खान हा अमेरिकाविरोधाने बेफाम झालेला आणि विद्यमान पाक सरकार अस्थिर. अशा परिस्थितीत पाकिस्तान हा इम्रान खान यांस मिळू लागलेल्या जनपाठिंब्यामुळे अमेरिकाविरोधी जाळय़ात सापडण्याची दाट शक्यता आहे. हे अमेरिकाविरोधी जाळे म्हणजे चीनचा सापळा. तेव्हा विद्यमान पाक सरकार हे चीनकडे आकृष्ट होऊ नये यासाठी त्या देशास गुंतवून ठेवणे अमेरिकेसाठी आवश्यक आहे. ही विमाने हा त्याच गुंतवणुकीचा भाग. वास्तविक अमेरिकेने अशा तऱ्हेने पाकला आपल्या कह्यात नाही तरी स्वत:च्या बाजूस ठेवणे हे आपल्यासाठी जास्त चांगले आहे. कारण इम्रान खान यांचा पाकिस्तान आणि चीन हे संयुग ही आपली खरी डोकेदुखी. म्हणून अमेरिकेने पाकिस्तानला ही विमाने देऊन आपला भार एका अर्थी हलका केला. तेव्हा अमेरिकावासी भारतीयांस बरे वाटावे यासाठी जयशंकर यांनी त्या सगळय़ाची अशी संभावना करण्याची गरज नव्हती.

दुसरे असे की आंतरराष्ट्रीय संबंधांत प्रत्येकास आपापले हितसंबंध जपावेच लागतात. आपणही तेच करतो आणि तेच योग्यदेखील आहे. म्हणजे रशियाकडून खनिज तेल खरेदी केले म्हणून अमेरिकेने आपल्यावर निर्बंध घालू नयेत यासाठी आपले प्रयत्न असतात आणि रशियाची लष्करी साधनसामग्री आपल्याला मिळावी यासाठीही आपला आग्रह असतो. पण आपण असे करतो म्हणून अमेरिकेने कधी अशी किरकिर केल्याचे आढळत नाही. इतकेच काय अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा आपला प्रयत्न आहे म्हणून रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी कधी तोंड वाकडे केल्याचे दिसत नाही. अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांस ‘ही युद्ध वेळ नव्हे’ असे सुनावले. त्यावरही पुतिन यांनी काही टीकात्मक भाष्य केले नाही. महासत्ता कधी अशी किरकिर करीत नाहीत. महासत्ता होऊ पाहणाऱ्यानेही ती सवय अंगी बाणवून घ्यायला हवी.

जयशंकर यांचे दुसरे दखलपात्र भाष्य हे अमेरिकी माध्यमांविषयी आहे. राजधानी वॉशिंग्टन येथे अमेरिकावासी भारतीयांसमोर बोलताना त्यांनी अमेरिकी माध्यमांवर टीका केली. त्यात अजिबात काही गैर नाही. भारताच्या विषयावर पाश्चात्त्य विकसित देशांत एक प्रकारचा आकस असल्याची भावना त्यांच्या माध्यमांमुळे होते हे बरीक खरेच. पण त्याविरोधात आपल्या परराष़्ट्रमंत्र्यांनी असा सूर लावावा का हा प्रश्न. एक तर अमेरिकी माध्यमे त्यांच्या अध्यक्षांसही मोजत नाहीत. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिडून काही माध्यमांवर ‘व्हाइट हाऊस’ बंदी घातली तर या माध्यमांनी त्यांना ‘गेलात उडत’ असे सुनावत अध्यक्षीय प्रासादात पाऊल टाकले नाही. माध्यमांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकून त्यांचा गळा घोटण्याचीही सोय अमेरिकी राजकारण्यांस नाही. असे असताना ही माध्यमे भारताविरोधात भूमिका घेतात म्हणून जयशंकर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय अभ्यासकाने असा चिरका सूर लावायची काहीच गरज नाही. जयशंकर यांचा रोख ‘वॉशिंग्टन पोस्ट’वर होता. तसे त्यांनी सूचितही केले. ‘अ‍ॅमेझॉन’चा मालक जेफ बेझोस यांच्या मालकीचे हे वृत्तपत्र. ट्रम्प यांनीही ‘पोस्ट’विरोधात बेझोस यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. त्यावर बेझोस यांनी ‘मी ‘पोस्ट’च्या संपादकीय धोरणांत लक्ष घालत नाही’ असे बाणेदार उत्तर दिले होते. तेव्हा ही माध्यमे जयशंकर यांना भीक घालतील याची काडीचीही शक्यता नाही. आपले ऐकले जाणारच नसेल तर ते सुनावण्याची गरज आणि उपयोग काय? त्यातून उगाच आपली वृत्ती दिसते. 

या कार्यक्रमात जयशंकर यांनी उपस्थित भारतीयांना अमेरिकेत भारतविरोधी प्रचारकर्त्यांस ‘जाब’ विचारण्याचा सल्ला दिला. त्यांच्या काही विधानांचे श्रोतृवृंदाने टाळय़ा वाजवून स्वागत केले. भारतावर परदेशांतून कसा अन्याय होतो, असा हा सूर. त्याचा परदेशस्थ भारतीयांस आनंद झाला. आता या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे. जयशंकर यांच्यासमोरच्या श्रोतृवृंदातील बरेच जण आता अमेरिकेचे नागरिक असतील आणि जे नसतील ते नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असतील. प्रतीक्षेत असणाऱ्यांना हे नागरिकत्व लवकरात लवकर मिळावे यासाठीच पडद्यामागे प्रयत्न होत असतील. याबाबत मुद्दा असा की एकदा का अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले की या परदेशस्थ भारतीयांच्या निष्ठा कोठे असायला हव्यात? या प्रश्नाच्या रास्त उत्तरासाठी भारताचे नागरिकत्व घेतलेल्या परदेशी नागरिकांच्या निष्ठांबाबत हा प्रश्न विचारता येईल. या अशा भारतीय परदेशस्थांच्या.. म्हणजे सोनिया गांधी वा तत्सम.. निष्ठा भारताला वाहिलेल्या असाव्यात की त्यांच्या मातृदेशास? या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे. म्हणजे मग अमेरिकावासी भारतीयांनीदेखील आपण ज्या देशाचे पारपत्र धारण करतो त्याच्याशी प्रामाणिक राहायला हवे. अशांतील पहिल्या पिढीच्या स्थलांतरितांस मातृभूमीविषयी म्हणजे भारताविषयी ममत्व वाटणे साहजिक. पण म्हणून त्यांनी हे प्रेम किती व्यक्त करावे यास काही नैतिक मर्यादा येतात. यास एक पर्याय आहे. तो म्हणजे या मंडळींस अमेरिकेतील वास्तव्य फारच खुपत असेल तर त्यांनी सरळ येथे यावे आणि प्राणभावे मातृभूमीची सेवा करावी. अमेरिकेत राहून भारताविषयी गळा काढू नये.

पेशाने मुत्सद्दी असलेली व्यक्ती राजकारणी बनल्यावर राजकारणात मुत्सद्दीपणा येणे योग्य की मुत्सद्देगिरीत राजकारणाचा शिरकाव होणे रास्त हा प्रश्न जयशंकर यांच्या या दौऱ्यामुळे पडतो. जनप्रिय राजकारण करण्यासाठी बरेच आहेत. मुत्सद्याने लोकप्रियतेची आस बाळगू नये. जयशंकर यांनी मुत्सद्देगिरी सांभाळणे चांगले. त्याची देशास अधिक गरज आहे.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Editorial politician international russia oil jaishankar foreign relation ysh
First published on: 29-09-2022 at 00:02 IST