काहींच्या डोळय़ांवरचा ‘इंडिया’चा चष्मा राष्ट्रपतींनीच काढून फेकल्यामुळे आपण आता ‘भारता’कडे उघडय़ा डोळय़ांनी पाहात प्रगतीची नवनवी शिखरे गाठणार आहोत..
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वत:स ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे संबोधण्यास सुरुवात केल्याने बाकी कोणास नाही तरी महान अभिनेते मनोजकुमार, जनरल सॉ माँग आणि रिसेप तय्यीप एर्दोगान या महानुभावांस निश्चितच आनंद होईल. चित्रपटात आदर्श, सज्जन, स्वप्नवादी अशा व्यक्तिरेखेसाठी ‘भारत’ हे नाव मनोजकुमार यांस योग्य वाटले. तेव्हापासून भारत याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. अशा तऱ्हेने चांगुलपणाची ओळख भारत या नावाने करून देण्यास त्यांनी सुरुवात केली. आपल्या राष्ट्रपतींनी आणि अर्थातच केंद्र सरकारातील अनेकांनी लहानपणी मनोजकुमार यांचे चित्रपट मोठय़ा प्रमाणावर पाहिले असणार. त्याशिवाय का ते इतके संस्कारी झाले? त्यामुळेच तेव्हापासून या मंडळींच्या डोक्यात इंडियाचे नाव भारत असे असावे असे घोळत असणार. खरे तर या सर्वानी राज कपूर यांचे चित्रपट पाहिले असते तर त्या सर्वास हा ‘भारत’चा टप्पा ओलांडून थेट ‘हिंदूस्थान’वर उडी घेता आली असती. तसे करायचे तर कदाचित मध्ये ‘मैली गंगा’ ओलांडावी लागली असती. म्हणून ते टाळले असेल. असो. मनोजकुमार यांच्याखेरीज सॉ माँग आणि एर्दोगान हेही या नामांतराने आनंदित होतील. कारण या दोन महानुभावांनी आपापल्या देशांचे असेच नामांतर केले. आर्थिक आघाडीवरील अनेक आव्हानांनी त्रासलेल्या ब्रह्मदेशाचे नामांतर माँग यांनी म्यानमार असे केले आणि भयानक चलनवाढ, गर्तेत गेलेले देशी चलन, बिकट अर्थव्यवस्था आदींनी जर्जर झालेल्या टर्कीस एर्दोगान यांनी टर्कीये असे नाव दिले. तेव्हापासून या देशांस ऊर्जितावस्था आली. इंडियास आता ‘भारत’चे देशी टोपडे चढवण्याच्या महान निर्णयामुळे आपणही आता माँग आणि एर्दोगान यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकतो. ‘इंडिया’स असे ‘भारत’ केले नसते तर हा मान मिळाला नसता.
आपले हे नामांतर झाल्याने अमेरिकादी पाश्चात्त्य देशांस बधिरत्व येण्याची शक्यता आहे. कारण ब्रह्मदेशचे म्यानमार, टर्कीचे टर्कीये आणि इंडियाचे भारत झाल्याने अनेक पाश्चात्त्य देशांतील नागरिक आपणही प्रगतीचा हाच मार्ग चोखाळावा, अशी मागणी करू लागले आहेत. परिणामी ‘जी २०’ परिषदेस येणारे एकापेक्षा एक बडे नेते आपल्या प्रगतीने थक्क होऊन आपापल्या मायदेशी परतायलाच नको असे म्हणण्याची शक्यता आहे. या बडय़ा देशांतील राजकारण्यांस, जे की बायडेन, सुनक वगैरे नावांनी ओळखले जातात ते, त्यांच्यासमवेत येणारे उद्योगपतींस, व्यावसायिकांस ‘भारत’ देशाचे नागरिकत्व देण्यासाठी आपले परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली एक खास कक्षही ‘जी२०’ परिषद मंडपात उभारला जाणार आहे. हे असे काही होणार याचीच कुणकुण लागल्याने चीनचे क्षी जिनिपग आणि रशियाचे व्लादिमिर पुतिन यांनी ‘भारता’त येण्याचे टाळले, असे कळते. या आपल्या ‘भारतीकरणा’मुळे वर्षांनुवर्षे ड्वाईशलँड असूनही जर्मनी वा निप्पॉन असा उल्लेख असूनही जपान असे म्हणवून घेणाऱ्या देशांतही नागरिकांच्या भावनेचा उद्रेक झाला असून आपलेही नामकरण करा, यासाठी त्या देशांतील नागरिकांनी भोकाड पसरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. हे झाले परदेशातील वर्तमान. आता देशाविषयी.
इंडियास आता ‘भारत’ करण्याच्या अतिशय दूरगामी, विचारी आणि द्रष्टय़ा निर्णयामुळे लवकरच आता सर्वोच्च न्यायालयास ‘सुप्रीम कोर्ट ऑफ भारत’, ‘आयआयटी’स ‘भारत इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’, ‘बीसीसीआय’ला ‘बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ भारत’, ‘इस्रो’स ‘भारत स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ या नव्या नावांनी ओळखले जाईल. याच्या जोडीने अन्य काही संस्थांचेदेखील नामकरण नव्याने केले जाईल. जसे की ‘भारतीय तेल’ हे ‘इंडियन ऑइल’साठी नवे नाव असेल तर ‘हवाई भारत’ हे नाव यापुढे ‘एअर इंडिया’स दिले जाईल तर ‘कोल इंडिया’ ही सरकारी मालकीची कंपनी लवकरच ‘कोळसा भारत’ असे नवे नाव लावेल. त्याचप्रमाणे ‘सेबी’च्या नावातील ‘आय’च्या जागी आता ‘बी’ येईल. अशा तऱ्हेने ही यादी वाचकही आपापल्या कल्पनाविस्तारामुळे हवी तितकी वाढवू शकतात. त्या सगळय़ाचा अर्थ तोच असेल. यापुढे ‘इंडिया’ बंद. फक्त ‘भारत’. आपणास अलीकडच्या काळात या नव्या भारतात काय काय, कशी कशी प्रगती सुरू आहे याचे दाखले वारंवार दिले जात होतेच. पण हे अनेकांस दिसत नव्हते. याचे कारण त्यांच्या डोळय़ांवरचा तो ‘इंडिया’चा चष्मा. आता आपल्या दयाळू राष्ट्रपतींनीच तो काढून फेकल्यामुळे आपणास ‘भारता’कडे उघडय़ा डोळय़ांनी पाहावेच लागेल. तसे पाहण्यास सुरुवात केल्यामुळे आपण प्रगतीचे नवनवे शिखर गाठत राहणार आहोत.
जसे की ‘इंडिया’ म्हटल्यामुळे आर्थिक आव्हाने जाणवत होती; ती ‘भारता’त गायब होतील. कारण ‘इंडिया’ म्हणून तुलना व्हायची ती अमेरिकादी असंस्कारी, दुराचारी अशा पाश्चात्त्य देशांशी. यापुढे तसे होणार नाही. कारण आपण आता ‘भारत’ असू. त्यामुळे आपली बरोबरी होईल ती अशीच आत्मसन्मानयुक्त देशी नावे असलेल्या म्यानमार, श्रीलंका, तुर्कीये यांच्याशी. पाश्चात्त्य देशांचे नावच आता निघणार नाही. त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रश्नच यापुढे उद्भवणार नाही. एकदा का आपण ‘भारत’ म्हणून त्या देशांच्या स्पर्धेत नाही हे समस्त ‘इंडिया’च्या नागरिकांस कळले की आपली त्यांच्याशी तुलना होण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे आपण किती मागे आहोत हे कोणास कळण्याचीही शक्यता नाही. म्हणजेच झाली की आपली प्रगती! तीच बाब रस्ते, आरोग्य वगैरेंच्या बाबत. म्हणजे भारत म्हणून आपले रस्ते प्राचीनकालीन, सिंधुसंस्कृतीकालीन भूप्रदेशापेक्षा नक्कीच बरे असतील. तेव्हा कोठे होती अशी काही महामार्ग कंत्राटांची वगैरे व्यवस्था! त्यामुळे त्यांच्यापेक्षा सध्याच्या भारतातील रस्ते नक्कीच गतिमान असतील. म्हणजे त्या आघाडीवरही आपण पुढे. प्राचीनकाली आपले देशी वैद्यकशास्त्र फार म्हणजे फार प्रगत होते. अर्थात तरीही आपल्या देशात राजयक्ष्मा, पटकी, हगवण इत्यादींनी माणसे मोठय़ा संख्येने मरत हे खरे. पण प्लास्टिक सर्जरी जगास याच ‘भारता’ने दिली. पण आधुनिक वैद्यकाच्या मागे जाणाऱ्या ‘इंडिया’स त्याची काही चाडच नाही. आता तसे होणार नाही. इंडियाच गायब झाल्याने उरेल तो फक्त भारत आणि भारताची प्रगती. वाईटापेक्षा अधिक वाईटाशी तुलना केली की बरेदेखील उत्तम भासू शकते. म्हणजे आपण उंच आहोत हे जगास कळावे असे वाटत असेल तर आपल्या आसपास सतत बुटकी प्रजा असेल याची व्यवस्था केली की काम फत्ते! ते आता ‘इंडिया’ जाऊन ‘भारत’ आल्याने होईल.
हा इतका महान निर्णय विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीमुळे घेतला असे नतद्रष्ट अरिवद केजरीवाल म्हणतात. त्यांस सांगावयास हवे की बा अरिवदा.. स्पर्धा, निवडणूक वगैरे चिंता तुम्हा पामरांस! जो स्पर्धेआधीच पहिला आलेला आहे, निवडणुकीआधीच प्रचंड बहुमत मिळवत आहे त्यास कसली ती चिंता विरोधकांची!! त्यामुळे विरोधक, त्यांची ‘इंडिया’ आघाडी आणि ‘भारत’ यांचा काडीमात्रही संबंध नाही. याचा कोणताही विचार न करता केजरीवाल विचारतात, आम्ही इंडियाचे नाव ‘भारत’ केल्यास काय कराल? याचे उत्तर सोपे आहे. इतके सोपे प्रश्न सत्ताधीशांस फक्त ‘रिपब्लिका’तील अक्षयकुमारच विचारू शकतात. विरोधकांनी त्यांच्या आघाडीचे नाव ‘भारत’ केले तर ‘भारत’चे नाव ‘हिंदूस्थान’ असे केले जाईल, हे याचे उत्तर. त्यावर मात करण्यासाठी विरोधकांसही आपल्या आघाडीत ‘हिंदू’ आणावे लागेल. मग झालेच की हिंदूस्थानचे स्वप्न साकार! मग कशाला हवी सत्ताधारी आणि विरोधक ही दरी. सगळेच एका बाजूला.
आता राष्ट्राचे नाव बदललेच आहे तर राष्ट्रगीतही बदलावे. आता ते ‘मेरे देश की धरती..’, असे करता येईल. त्यामुळे मनोजकुमार ‘भारत’ अधिक आनंदतील. फक्त त्यातील गांधी-नेहरू उल्लेख काढले की झाले. येत्या प्रजासत्ताक दिनापासून हा बदल होण्यास हरकत नसावी.