scorecardresearch

अग्रलेख : सनातनी (धर्म) संकट!

एखाद्याने सनातन धर्माचा स्वीकार करून त्याप्रमाणे जगायचे असे ठरले तर आजच्या काळात त्याने नेमके काय करायचे, हा सांप्रती सामान्य माणसाला पडलेला गंभीर प्रश्न..

udaynidhi stalin
उदयनिधी स्टॅलिन (फोटो – उदयनिधी स्टॅलिन/ट्विटर)

सनातन तत्त्वांचा आग्रह धरला तर आधुनिकतेचे काय करायचे हा मुद्दा उपस्थित होतो. तो सोयीने घ्यायचा आणि सोयीने नाकारायचा ही चलाखी केली तर ती लोकांच्या कधी तरी लक्षात येतेच.

धर्म या गोष्टीने आपल्या समाजाचे काय त्रांगडे करून ठेवले आहे, हे वर्तमान संदर्भात समजून घ्यायचे असेल तर सध्याचा सनातन धर्मावरून सुरू असलेला वाद त्यासाठी पुरेसा आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र, मंत्री आणि अभिनेते असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्याने उठलेले हे वादळ निवडणुकीपर्यंत घुमवले जाणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. पण त्याने निर्माण केलेले प्रश्न मात्र तातडीने उत्तरे मागणारे आहेत. कारण एक बाजू सनातन धर्माची तुलना थेट डेंग्यू, मलेरिया यांच्या डासांशी करत असते आणि दुसरी बाजू त्याची पताका अधिकच फडकावू बघते त्यामुळे बिचाऱ्या तुम्हाआम्हा (अर्थातच हिंदू) अल्पबुद्धिमतांची अवस्था खरे तर फारच कठीण होऊन बसते. आपल्याला डेंग्यू, मलेरिया आणि त्यांचे परिणाम तर नको आहेत, हे उघडच आहे. पण मग सनातन धर्म तरी आपल्याला हवा आहे का? याचेही उत्तर देता येत नाही कारण त्यासाठी सनातन धर्म म्हणजे काय हे तरी आपल्याला कोठे माहीत! हिंदू धर्मात येऊ इच्छिणाऱ्या एखाद्याला या धर्मात यायचे म्हणजे नेमके काय करायचे हे जसे समजू शकत नाही, तसेच हे. हा सनातन धर्म नक्की कोणती तत्त्वे सांगतो आणि त्याचे पालन करायचे म्हणजे नेमके काय करायचे? तो हिंदू धर्माचाच भाग आहे की त्यापेक्षा वेगळा हे शोधण्याचा हा पामर प्रयत्न.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

सनातन या शब्दाचा अर्थ प्राचीन काळापासून चालत आलेला, चिरंतन, अविनाशी असा आहे. आत्मा, पुनर्जन्म या संकल्पना मानत असलेल्या हिंदू धर्माला सनातन धर्म असेही म्हटले जाते. वेदांमध्ये सनातन धर्माचा उल्लेख नसला तरी महाभारतात तो दोन ठिकाणी असल्याचे सांगितले जाते. हिंदू धर्मात सनातन ही संकल्पना पूर्वापार माहीत असली तरी तिची प्रामुख्याने चर्चा सुरू झाली ती १९व्या शतकात. ब्रिटिश राजवटीत आधुनिक शिक्षणाचे वारे वाहू लागले, आधुनिक जगाचा परिचय होऊ लागला, कालबाह्य रूढी परंपरांना प्रश्न विचारले जाऊ लागले, तसे हजारो वर्षे घट्ट रुतलेल्या मुळांना हादरे बसू लागले. आपल्या धर्माचा अभिमान बाळगणारे कट्टरवादी आणि आधुनिकतेचे पुरस्कर्ते यांच्यात संघर्ष होऊ लागला. हे कट्टरवादी म्हणजेच सनातनी. तेव्हापासून सनातनी या शब्दाला सामाजिक-धार्मिक रूढी परंपरांमधील बदलांना विरोध करणारे हा अर्थ चिकटला, तो चिकटलाच. मुख्य म्हणजे तत्कालीन कट्टरवाद्यांनी तो सार्थही ठरवला. कारण स्त्रीशिक्षण, विधवाविवाह यासारख्या अनेक सामाजिक सुधारणांना त्यांचा प्रखर विरोध होता. स्त्रिया शिकल्या तर धर्म बुडेल या विचारांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकले गेले, त्यांना दगड मारले गेले ते याच विचारांमधून. विद्यासाधनेसाठी परदेश-गमन केले म्हणून आनंदीबाई जोशी आणि पती गोपाळराव यांना प्रायश्चित्त घ्यावे लागले ते याच सनातनी विचारांच्या टोकाग्रहातून. पण मग हे सगळे फक्त १९व्या शतकातच कुठे घडले? त्याही आधी हिंदू धर्मामधल्या कर्मकांडांचा आग्रह धरणाऱ्या नाठाळांच्या माथी काठी हाणू पाहणाऱ्या तुकोबांना त्यांच्या काळामधल्या सनातन्यांचाच विरोध होता. संन्यास घेतलेल्या जोडप्याची मुले म्हणून ज्ञानदेवादी भावंडांना विरोध करणारे सनातनीच होते. आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारेही सनातनी धर्माचे पुरस्कर्तेच होते.

तेव्हा लक्षात येते ते असे की सनातनी धर्म नसतो; तर ती वृत्ती असते. स्टॅलिन पुत्रास हे अभिप्रेत आहे किंवा काय हा प्रश्न ठेवला तरी आणखी काही प्रश्न उरतात. सगळय़ात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सनातन धर्म आणि हिंदू धर्म यांचे एकमेकांशी नाते काय?  हिंदू धर्मीय आणि सनातन धर्मीय एकच की वेगवेगळे? ते एकच आहेत असे सनातन धर्माच्या पुरस्कर्त्यांचे म्हणणे असेल आणि उर्वरित हिंदूंना ते मान्य नसेल तर काय? आणि ते वेगवेगळे आहेत असे सनातन धर्मीयांचे म्हणणे असेल तर हे वेगळेपण नेमके काय आहे? हा सनातन धर्म नेमके काय सांगतो? तो जातीव्यवस्था मानतो का? जातीव्यवस्थेने माणसामाणसांमध्ये जे भेदभाव निर्माण केले आहेत, शतकानुशतके काही समूहांवर जो अन्याय केला आहे, त्याबद्दल त्याच्या निर्मूलनाबद्दल सनातन धर्म काय म्हणतो? या अन्यायाच्या निर्मूलनासाठी आरक्षणाची व्यवस्था निर्माण केली. तिच्यावरूनही आज तिढा निर्माण झाला आहे. सनातन धर्म आरक्षणाचे समर्थन करतो की त्याला विरोध करतो? स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य ही मूल्ये आधुनिक समाजाची अपरिहार्य तत्त्वे. स्त्रियांनी शिकावे, आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करावे, अर्थार्जन करून स्वतंत्र राहावे हे सनातन धर्मीयांना मान्य आहे का, की त्यांना स्त्रियांनी डोक्यावर पदर घेऊन, चूल-मूल करावे, पतीनिधनानंतर केशवपन करावे, शक्य असेल तर सती जावे ही त्यांची भूमिका आहे? सनातन धर्म हा प्राचीन काळापासून चालत आलेला धर्म आहे आणि त्याला जराही धक्का लागता कामा नये, त्याची जराही चिकित्सा होता कामा नये, त्याच्यावर कोणीही टीका करता कामा नये, अशीच जर भूमिका असेल तर काळाची सगळी चाके उलट फिरवायला हवीत, असे त्यांचे म्हणणे आहे का? एकेकाळच्या हिंदू धर्मात सप्तसिंधुबंदी सांगितलेली होती. म्हणजे समुद्र ओलांडायला बंदी. आजच्या सनातन हिंदू धर्मीयानेदेखील तेच करणे अपेक्षित आहे का? तसे असेल तर वेगवेगळय़ा देशांमध्ये जाऊन काम करणाऱ्या हिंदूधर्माभिमान्यांनी परत भारतात यावे काय? मग त्यांच्याकडून भिक्षेत पडणारे ‘डॉलर्स’ आता त्यागावेत काय? यापुढे हिंदू तरुणांनी गुरुगृही जाऊन शिक्षण घ्यायचे का? पुराण काळात आजच्यासारखी दुचाकी, चारचाकी वाहने नव्हती. मोबाइल नव्हते. मोबाइलचे एक बटण दाबले की गरमागरम तयार खाद्यपदार्थाची पुडकी घरी घेऊन येणारे डिलिव्हरी बॉय नव्हते. सिनेमानाटकादी मनोरंजन नव्हते.  आज एका क्लिकसरशी घरी येणारे तयार खाद्यपदार्थ महत्त्वाचे मानायचे की ते घेऊन येणाऱ्याची जात महत्त्वाची मानायची? सनातन तत्त्वांचा आग्रह धरला तर आधुनिकतेचे काय करायचे हा मुद्दा उपस्थित होतो. तो सोयीने घ्यायचा आणि सोयीने नाकारायचा ही चलाखी केली तर ती लोकांच्या कधी तरी लक्षात येतेच.

या सगळय़ाच्या पलीकडे नेणारा प्रश्न म्हणजे समजा, की एखाद्याने सनातन धर्माचा स्वीकार करून त्याप्रमाणे जगायचे असे ठरले तर त्याने नेमके काय करायचे आहे? सनातन धर्माच्या पुरस्कर्त्यांच्या या मार्गदर्शनाची अशा व्यक्तीलाच नव्हे, सगळय़ा समाजाला खरोखरच गरज आहे. आम्ही अमुकतमुक करतो म्हणजे उदाहरणार्थ आम्ही चातुर्मास पाळतो, उपवास करतो, गणपती बसवतो, दिवाळी – दसरा साजरे करतो म्हणून आम्ही हिंदू हे जसे सामान्य माणसाला सांगता येते, तसेच अमुकतमुक दहा गोष्टी करणारी व्यक्ती सनातन धर्मीय आणि अमुकतमुक दहा गोष्टी सनातनी धर्माला मान्य नाहीत, हे या धर्माच्या पुरस्कर्त्यांनी जाहीरपणे सांगण्याची खरोखर गरज आहे. कारण आपण सनातन धर्मीय आहोत की नुसतेच हिंदू धर्मीय, हे कसे ठरवायचे हा सांप्रती सामान्य माणसाला पडलेला गंभीर प्रश्न. सनातनी वादात हिरिरीने उतरलेल्यांस, यात सत्ताधीश तर आलेच, या प्रश्नाचे उत्तर निश्चितच ठावकी असेल. ते देऊन या मान्यवरांनी सामान्य हिंदूंची या धर्मसंकटातून सुटका करावी ही भाद्रपद मासारंभाच्या सुमुहूर्तावर विनंती. इत्यलम.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2023 at 00:35 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×