प्रत्यक्षात या मुलाखतीमुळे सत्ताधारी भाजप आणि त्या पक्षाचे समाजमाध्यमवीर यांस अधिक कानकोंडे व्हावे लागणार आहे..

शरद पवार यांनी ‘एनडीटीव्ही’स गौतम अदानी यांच्याबाबत मुलाखत देणे हे ‘सामना’स शिवसेनेविषयी मुलाखत देण्यासारखेच. एके काळी बाणेदार पत्रकारितेसाठी ओळखली जाणारी ‘एनडीटीव्ही’ वाहिनी अदानी यांच्या हाती गेल्यापासून तिच्यात झालेला बदल लक्षणीय म्हणावा असा. या वाहिनीस पवार यांनी दिलेली मुलाखत सध्या राजकारण पत्रपंडितांत चर्चेचा विषय झाली असून वेळ घालवण्यास अन्य काही बुद्धिगम्य उद्योग नसलेले या क्षेत्रातील अनेक जण आपापल्या मगदुराप्रमाणे मांडणी करून यावर अहमहमिकेने लढताना दिसतात. खुद्द पवार यामुळे अतीव आनंदात असतील. समोरच्या अनेकांस झुंजावयास लावून आपण नामानिराळे राहात या झुंजींची मजा घेणे ही त्यांची जुनी सवय. त्यामुळे या मुलाखतीमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत काहूर निर्माण झाले असले तरी इतका काही राष्ट्रीय चर्चाकाल त्यावर व्यतीत करण्याचे कारण नाही. वास्तविक अशी काही मुलाखत देणे ही पवार यांची गरज होती आणि त्याहूनही ती घेणे ही एनडीटीव्हीची निकड होती. अदानींच्या गोठय़ात बांधले गेल्यापासून या वाहिनीने लक्षात घ्यावे असे काही वृत्तांकन केलेले नाही. तेव्हा दखलपात्रतेच्या निकषावर काही तरी दिलखेचक करणे या वाहिनीसाठी आवश्यक होते. त्यासाठी तिने घरचाच, आणि त्यातही मालकाचाच, विषय निवडला. आणि त्यासाठी शरद पवार यांची रास्त निवड केली. या मुलाखतीत पवार जे बोलले ते बोलले. त्यामुळे कबुतरांच्या घोळक्यात मांजर घुसल्यासारखी अनेकांची प्रतिक्रिया झाली असली तरी त्यांच्या भाष्यामुळे विरोधकांची कमी आणि सत्ताधारी तसेच त्या पक्षाच्या नवनैतिक समर्थकांची अधिक पंचाईत होणार आहे. कशी, हे लक्षात घेताना नरेंद्र मोदी-अमित शहा-चलित भाजप, शरद पवार आणि अदानी या त्रिकोणावर भाष्य करणे आवश्यक.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”
pankaj-udhas
पंकज उधास यांची पत्नी फरीदा यांनी त्यांच्या पहिल्या अल्बमसाठी ‘अशी’ केलेली पैशांची जमवा जमव

याचे कारण अदानी हे अलीकडच्या काळात वादाच्या केंद्रस्थानी येण्याच्या किती तरी आधीपासून ते पवार यांच्या प्रभावशाली व्यक्तींच्या वर्तुळाचे अविभाज्य घटक आहेत. मुंबईत २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात ‘ताज’ हॉटेलात अडकून पडलेल्या अदानी यांना जिवानिशी बाहेर पडण्यास मदत झाली ती पवार यांच्या हस्तक्षेपाची. त्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते आणि दिल्लीत मनमोहन सिंग सरकारात पवार हे मंत्री होते. त्याआधी आणि नंतरही अदानी यांना विदर्भात कोळसा खाण कंत्राट देण्याचा आग्रह पवार यांचा होता आणि त्यासाठी तत्कालीन पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांच्याशी पवार यांनी जाहीर दोन हात केले होते. त्या वेळी पवार यांना धडा शिकवण्याची काँग्रेस नेतृत्वाची खुमखुमी कायम होती. त्यातूनच अदानी यांचे खाण प्रकरण आणि लवासा या दोन प्रकल्पांवर वाद निर्माण केले गेले. पुढे या प्रकल्पांचे काय झाले हा इतिहास ताजा आहे. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकांआधी पवार यांचे अदानी यांच्या माऊंट अबू येथील निवासस्थानचे वास्तव्य हेदेखील मोठाच धुरळा उडवून देणारे ठरले. त्या वेळी पवार आणि अदानी हे दोन दिवस एकत्र होते आणि त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी युती तुटणार अशी अटकळ काही विद्वान पत्रपंडितांनी बांधून तशी वातावरणनिर्मिती केली होती. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. दोन वर्षांपूर्वी पवार, अदानी आणि अमित शहा या तिघांत अहमदाबाद येथे झालेल्या भेटीबाबतही असाच वादंग निर्माण केला गेला. त्याचाही रोख अदानी हे पवार यांचा राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात समेट घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याबाबत सांगितले गेले. ते शुद्ध बिनडोकपणाचे होते. याचे कारण पवार काय वा शहा काय! या मंडळीस राजकीय चर्चा करण्यासाठी अदानींची अजिबात गरज नाही. आणि दुसरे असे की राजकीय पक्षांतील करार-मदारांसाठी अशा उजळ भेटींची आवश्यकता नसते. तेव्हा अशा भेटी, चर्चा यामुळे उडणारा धुरळा हा मतलबी असतो आणि तो अनेकांच्या डोळय़ांत जाऊन त्यांस स्वच्छ दिसू नये असाच विचार त्यामागे असतो. पवार यांच्या ताज्या मुलाखतीबाबतही हेच म्हणता येईल.

‘पवार यांच्या अदानीबाबतच्या भूमिकेमुळे विरोधी ऐक्यास सुरुंग’, ‘पवार यांनी काँग्रेसची साथ सोडली’, ‘विरोधी आघाडीस निर्मितीआधीच तडा’ आदी प्रकारच्या बातम्या/चर्चा/विश्लेषणे यांचा धबाबा मुलाखतीनंतर सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात या मुलाखतीमुळे सत्ताधारी भाजप आणि त्या पक्षाचे समाजमाध्यमवीर यांस अधिक कानकोंडे व्हावे लागणार आहे. याचे कारण असे की ही मुलाखत अदानी या संवेदनशील मुद्दय़ावर पवार आणि देशाचे सर्वसामथ्र्यवान, सार्वजनिक जीवनातील नैतिकतेचे आदर्श जे की पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोहोंस एकाच तागडीत बसवते. एरवी उठता-बसता पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप वगैरे करणाऱ्या नवनैतिक नवमध्यमवर्गीयांची यामुळे एकच अडचण होणार. ‘पाहा.. पवार कसे अदानी यांस वाचवू पाहतात’ असे कुत्सित स्वरांत या मुलाखतीनंतर म्हणण्याची सोय नाही कारण असे म्हणू पाहणाऱ्यांच्या आदर्शाचे मेरुमणीही तेच करू पाहतात. आणि उलट बाजूने पवार यांचे साफ चुकले असे म्हणावे तर तसे केल्यास अदानीविरोधात चौकशीची मागणी न्याय्य ठरवण्याचे आणि त्यातून आपल्या सर्वोच्च नेत्याविरोधात मत व्यक्त करण्याचे धर्मसंकट. त्यामुळे पवार यांनी ही मुलाखत देऊन आणि त्यातही अदानीप्रकरणी संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची मागणी अनावश्यक ठरवून या अशा अध्र्याकच्च्या नवनैतिकतावाद्यांस अधिक अडचणीत आणले आहे. पंतप्रधान मोदी यांसही अदानीप्रकरणी संयुक्त संसदीय चौकशी नको आहे आणि पवार यांचेही म्हणणे तेच आहे हे सत्य अनेकांच्या पचनशक्तीवर परिणाम करणारे ठरते. या प्रसंगाची तुलना पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर मोदी यांनी बारामतीस दिलेल्या भेटीशी होऊ शकते किंवा काय हे पाहायला हवे. अलीकडेच अदानी यांनीही बारामतीचा दौरा केला त्या वेळी पुढच्या पिढीचे रोहित पवार यांनी त्यांच्या वाहनाचे सारथ्य केले याचेही स्मरण छातीतील जळजळ वाढवणारे ठरू शकेल.

राहता राहिला मुद्दा विरोधी ऐक्याचा. त्याचा आणि अदानी संबंधांत पवार यांच्या भूमिकेचा काडीमात्रही संबंध नाही. या मुलाखतीतील पवार-भाष्य हे राष्ट्रवादीच्या भाजपविषयक भूमिकेतील सौहार्द सूचक आहे असे सुचवणारे एक तर काँग्रेसी आहेत; किंवा भाजप-स्नेही आशावादी. काँग्रेसमधील गांधी परिवार निष्ठावानांचा हा जुना उद्योग. महाराष्ट्रात पवार यांचे पाय कापणे, बंगालात ममता बॅनर्जीची कोंडी करणे आदी उद्योगांमुळे काँग्रेसने स्वहस्ते स्वपक्षीय नेतृत्व संपवले. बरे इतके करून नवे नेतृत्व दिले असते तर ते एक वेळ क्षम्य ठरले असते. पण नवे काही देता येत नाही आणि जुने मात्र संपवण्याचा सोस असे काँग्रेसचे झाले. त्यामुळे त्या पक्षाची ही अशी दशा झाली. तथापि इतकी टेंगळे कपाळावर आल्यामुळे का असेना आता तरी तो पक्ष शहाणा झालेला दिसतो. पवार यांच्या वक्तव्यावर त्या पक्षातील ज्येष्ठांनी काही तीव्र भाष्य केलेले नाही. एके काळी पवार यांच्याविरोधात उभे ठाकणारे जयराम रमेश यांच्यासारखेही या मुलाखतीनंतर सावध पवित्रा घेतात हे त्या शहाणपणाचे लक्षण. तेव्हा पवार यांच्या या वक्तव्यामुळे अदानी हा मुद्दा अजिबात दूर होणारा नाही. उलट पवार यांची ही अदानी-अदा सत्ताधाऱ्यांच्या पवार यांच्यावरील हल्ल्याची धार बोथट करणारीच ठरेल.