scorecardresearch

अग्रलेख: सणांचे सुतक!

श्रीकृष्ण जन्माच्या आनंदाप्रीत्यर्थ दहीहंडीचा कार्यक्रम राज्यभर सरकारी आशीर्वादाने दणदणाटात साजरा झाला.

dahi--handi
अग्रलेख: सणांचे सुतक! ( संग्रहित छायाचित्र)/ लोकस

समाज म्हणून कोणताही सण एकत्रितपणे साजरा करायचा असेल, तर प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची बूज राखली जायला हवी. ती आपल्याला आहे का हा खरा प्रश्न..

श्रीकृष्ण जन्माच्या आनंदाप्रीत्यर्थ दहीहंडीचा कार्यक्रम राज्यभर सरकारी आशीर्वादाने दणदणाटात साजरा झाला. तो जेवढा झगमगाटी होता, तेवढाच उन्मादीही होता. दिवस मावळल्यानंतरही रस्त्यावरच साजऱ्या होणाऱ्या या कार्यक्रमामुळे वाहतुकीचा प्रचंड गोंधळ झाला, नोकरदारांना घरी परतणे दुरापास्त झाले, त्याहूनही अधिक त्रासदायक ठरले ते या उत्सवानिमित्त शहरभर उभारण्यात आलेल्या ध्वनिवर्धकांच्या भिंतींमधून येणारा अक्राळविक्राळ ध्वनी, त्याच्या बरोबरीने डोळय़ांना त्रास होईल, अशी विद्युत रोषणाई आणि या सगळय़ाच्या जोडीला ढोल-ताशांचा कंठाळी आवाज.. दहीहंडीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळामंडळांमधली जी स्पर्धा होती, ती कोण अधिक उच्छादी ठरतो, याची. भर पावसात गोविंदांचे थरच्या थर त्या हंडीपर्यंत पोहोचण्यातला थरार कुठच्या कुठे पळून जावा, अशी ही पार्श्वभूमी. त्या गोविंदांची ना कुणाला काळजी ना कुणाला कणव. गेली काही वर्षे हे असे उत्सव रस्त्यावर साजरे होताना अधिक आक्रस्ताळे आणि त्यातील भाव-भावना सर्वार्थाने हरवत चालल्या आहेत, याची ही प्रचीतीच होती. या सगळय़ावर कडी म्हणजे अशा उत्सवांसाठी खास आयोजित करण्यात येणारे पारंपरिक मनोरंजनाचे म्हणवून घेणारे भुक्कड कार्यक्रम आणि त्याला आवर्जून उपस्थिती लावणारे टिनपाट तारेतारका. यानिमित्ताने आपल्या मतदारांच्या भेटीला उत्सुक असणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना तर ही एक पर्वणीच. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अनेकांनी दहीहंडीच्या निमित्ताने ठिकठिकाणी हजेरी लावून मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या डोळय़ांचे पारणेच फेडले.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

वास्तविक भारतीय परंपरेत कोणताही सण असा रस्त्यावर येऊन धांगडिधगा घालत साजरा करण्याची रीत नाही. उत्सवाचे उत्सवीपण त्यातील अभिजात आनंदाशी निगडित असते, असायला हवे. सण साजरे करायचे, म्हणजे हजारोंनी थेट रस्त्यावरील चौकात येऊन नृत्य करणे नव्हे. ही आपली परंपराच नाही. मात्र गेल्या काही दशकांत या सणांचे खासगीपण संपुष्टात येत चालले आहे. त्यातील उत्सवी आनंदाची जागा उन्मादाने घेतली आणि सण-उत्सवांचे स्वरूप पार पालटून गेले. मग ती दहीहंडी असो, गणेशोत्सव असो की नवरात्र आणि दिवाळी. सगळे सण रस्त्यावरच साजरे करण्याची ही नवी पद्धत नव्या समाजातील अस्वस्थतेची जाणीव अधिक तीव्र करणारी आहे. जगण्याचे भान असे सुटत चालले की समाज सामूहिक कृतीला प्राधान्य देतो. त्यातून परिसराचे, तेथील आपल्याच बांधवांचे, रुग्णावस्थेत असलेल्या रहिवाशांचे, प्राणिमात्रांचे भान राहात नाही. समूहाच्या अशा कृतीमुळे आपण एकटेच जबाबदार नाही, अशी अपराधीपणाची भावनाही गळून पडते. आणि अशा कृतीला जेव्हा सत्तेकडून आणि समाजातील तथाकथित प्रतिष्ठितांकडूनही समर्थन मिळते, तेव्हा अपराधीपणाच्या जागी विजयोत्सवाचा आनंद निर्माण होऊ लागतो. ही विकृती आहे. सण-उत्सवांचे मूळ हेतूच त्यामुळे पुसट होऊ लागतात. कानठळय़ा बसवणारा उच्छादी आवाज ऐकून केवळ कान बधिर होत नाहीत, तर त्याचा रक्तदाबावरही गंभीर परिणाम होतो. ऐन गर्दीच्या ठिकाणीच, जेव्हा असे कानांचे पडदे फाडणारे आवाज दीर्घ काळ घुमत राहतात, तेव्हा त्याचे त्या गर्दीतील प्रत्येकावरच, परिसरातील निष्पापांच्याही प्रकृतीवर गंभीर परिणाम होत राहतात. कर्णपटलांना किती आवाज सहन होऊ शकतो, याचे शास्त्रीय विवेचन करण्याची ही जागा नव्हे, मात्र सहनशक्तीच्या पलीकडे जाणारे आवाज ही फक्त मानवाचीच नव्हे, तर निसर्गाचीच हानी करणारे असतात. मुंबई-पुण्यात दहीहंडीच्या निमित्ताने आवाजाची पातळी इतकी जास्त होती, की त्यामुळे किती तरी जणांच्या श्रवणशक्तीवर त्याचे विपरीत परिणाम झाले असतील. मात्र यालाच उत्सव म्हणण्याची पद्धत रूढ होत चालल्याने कुणालाही त्याचे काही वाटत नाही.

दिवसेंदिवस शहरे अधिक बकाल होत चाललेली असताना, अशा सार्वजनिक उत्सवांसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नसते. त्यासाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे आहे त्या व्यवस्थेवरच अधिकाधिक ताण येत राहतो. ती व्यवस्था कोलमडून जाते, तरी त्याचे कुणाला सोयरसुतक राहात नाही. रस्ते बंद होतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प होते. खासगी वाहने थिजल्यासारखी एकाच जागी वाट मिळण्याची प्रतीक्षा करीत राहतात. आणि हे सारे कसे आपल्यामुळेच घडते आहे, याचा एक प्रकारचा विकृत आनंद तेथील गर्दीत सहभागी झालेल्यांच्या चेहऱ्यावर विलसायला लागतो. सामान्यांची गैरसोय अशा वेळी कुणाच्या गावीही नसते. आपण या समाजाचे एक घटक आहोत आणि आपल्या कृतीमुळे अन्यांना कमालीचा त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेण्याचीही गरज जेव्हा वाटेनाशी होते, तेव्हा आपली बुद्धी आपणच गहाण टाकलेली असते. त्यामुळे एकमेकात जी चढाओढ असते, ती कोण अधिक हुल्लडबाजी करतो याची. हे चित्र निव्वळ अधोगतीचेच. सण आनंद निर्माण करणारे हवेत. तो आनंद मनाला स्पर्श करणारा असतो. मनातही न मावणारा हर्ष माणसाला प्रफुल्लित करतो. मात्र तो स्वीकारण्यासाठी तशीच मनोवृत्तीही हवी. गेल्या काही दशकांत परंपरेचे उच्चाटन होत, सण आणि उत्सव रस्त्यावर साजरे होऊ लागले. गणेशोत्सव असो की नवरात्र प्रत्येक उत्सवात हा उच्छाद मोठय़ा प्रमाणात वाढतच चालला आहे. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर अधिक मोठे मांडव उभे करायचे. त्यासाठी कोणतेही परवाने न घेता, सुरक्षेचा विचारही न करता, वीजजोड घ्यायचे, मांडवाच्या भक्कमपणाकडे दुर्लक्ष करून त्यांचे आकार वाढवत न्यायचे, अधिक दिखाऊपणासाठी मांडवाच्या परिसरातील जागा आपल्याच मालकीची असल्याचे समजून तेथे जाहिरातींचे फलक उभे करून, त्यातून उत्पन्न साधायचे, असे अनेक नवे पायंडे आता सर्वमान्य होऊ लागले आहेत. गणेशोत्सवाचे दहा दिवस असायला हवेत तेच मांडव आता नवरात्र संपेपर्यंत ठाण मांडून उभे असतात. या सगळय़ा कृतीला सत्ताधाऱ्यांपासून प्रत्येक राजकीय पक्षाचा पुरेपूर पाठिंबा मिळतो. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस या यंत्रणा हतबल होत हे सारे उघडय़ा डोळय़ांनी पाहात राहतात.

समाज म्हणून कोणताही सण एकत्रितपणे साजरा करायचा असेल, तर प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची बूज राखली जायला हवी. धडधाकट माणसांप्रमाणेच वृद्ध, रुग्ण, बालके, गर्भवती महिला यांची काळजी घेण्याची गरजही वाटू नये, शांतता हीच ज्या प्राणिमात्रांची एकमेव आवश्यकता असते, त्याची जराही जाणीव असू नये, हे निर्ढावलेपणाचे आणि मन निबर झाल्याचे लक्षण आहे. या सगळय़ास मिळणारा सरकारी आशीर्वाद उद्विग्न करतो. आता तर सणवार म्हटले की सभ्य बायाबापडय़ा घराबाहेर पडायलाच नको, असे म्हणतात. सण हे अशी सुतकी भीती घेऊन येणे सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्यांस शोभणारे नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-09-2023 at 03:37 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×