गतकाळातील दृश्य-साधनांचा वापर आजच्या नजरेने करण्याची, तसेच स्वत:सकट इतरांनाही प्रश्न विचारत राहण्याची वृत्ती विवान सुंदरम यांनी जपली.. 

आपण कार्यकर्ता नसून कलावंत आहोत, ही मर्यादा त्यांनी नेहमीच मान्य केली. ‘नागरिक-कलावंत’ ही त्यांची भूमिका राहिली..

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
supreme court
विश्लेषण : जामीन देताना राजकीय कार्यक्रमात सहभागी न होण्याची अट सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, नेमके प्रकरण काय?

व्यक्तित्व आणि कर्तृत्व समजून न घेताच आपल्या सोयीसाठी एखाद्या व्यक्तीवर शिक्का मारणे कसे चूक ठरते, याचा धडा मार्चच्या अखेरच्या आठवडय़ाने सर्वानाच दिला. ज्यांना तो मिळाला नसेल, त्यांना १ एप्रिल या मूढदिनाच्या शुभेच्छा पुढल्या वर्षभरासाठी देऊन ठेवणे बरे. ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू असतात, ज्यांचे कार्य एकाच छापाचे आणि एकाच क्षेत्रापुरते मर्यादित नसते, अशांकडे पाहाताना तर कोणत्याही शिक्क्याचा मोह आवरणेच उत्तम. हे लक्षात ठेवून ज्याकडे पाहावे, असे गेल्याच आठवडय़ात दिवंगत झालेले व्यक्तित्व म्हणजे दृश्यकलावंत विवान सुंदरम.  चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार किंवा तयार दृश्यघटकांची मांडणी करून त्यातून कलात्मक परिणाम साधणारे मांडणशिल्पकार यापैकी एक काही न म्हणता विवान यांना दृश्यकलावंत का म्हणावे, याची कारणे त्यांच्या कलेतूनच समजून घेता येतात. त्यापैकी काही उदाहरणांची उजळणी येथे आवश्यक.

पहिले उदाहरण ‘४०९ रामकिंकर्स’ या तशा अलीकडल्या (२०१५) मांडणशिल्पाचे. रामकिंकर बैज हे शांतिनिकेतनातले शिल्पकार-चित्रकार. आपल्याच मस्तीत जगणारे आणि बंगाली भद्रलोकांशी संबंधित नसून मूळचे संथाळ असल्याने ‘सुजाता’, ‘संथाळ कुटुंब’, ‘गिरणीच्या भोंग्यानंतर लगबगीने कामावर जाणारे मजूर’ अशा शिल्पांतून, कोरीव तपशिलांमध्ये न जाताही मानवी आशय पोहोचवणारे. रामकिंकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दुर्लक्षित स्टुडिओतले अवशेष विवान यांनी रीतसर मिळवले. रामकिंकर हे खऱ्या अर्थाने ‘भारतीय आधुनिकतेचे जनक’ होते आणि त्यांचे श्रेय त्यांना मिळाले नाही, याची जिवंत खूण म्हणजे हे भग्नावशेष, असा निव्वळ भावनिक नव्हे तर विचारपूर्वक निष्कर्ष विवान यांनी काढला. हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अवशेषांना प्रतिसाद म्हणून रामकिंकर यांच्या जीवनावरील नाटकाचे नेपथ्य म्हणून हे अवशेष प्रदर्शनरूपाने मांडावेत, असे विवान यांनी ठरवले. अनेक नाटय़-चळवळय़ा लोकांशी मैत्री असल्यामुळे योग्य साथ मिळवून विवान यांनी हे साध्यही केले. विवान सुंदरम यांचे वडील कल्याण सुंदरम, तर आई इंदिरा ही माहेरची शेरगिल! अमृता शेरगिल ही विवान यांच्या जन्माच्या दीड वर्षे आधी मरण पावलेली सख्खी मावशी.. तिला भारतीय आधुनिक कलेची जन्मदात्री म्हणण्याचा प्रघात आहेच. पण विवान यांनी ते श्रेय रामकिंकरांना दिले. अर्थात, भारतीय कलेतिहासात एक मिथक ठरलेल्या अमृता यांचे व्यक्तित्व कसे होते, हे तपासण्याचा एक मोठाच साधनस्रोत विवान यांच्याकडे होता- शेरगिल घराण्याचे सर्वच्या सर्व फोटोग्राफ! अमृता आणि इंदिरा शेरगिल यांचे वडील उमरावसिंह यांनी युरोपात राहताना फोटोग्राफीचा छंद जोपासला. युरोपातील घरातले- हंगेरियन पत्नी आन्त्वानेत आणि पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोघी मुली यांचे- फोटो टिपतानाही कलादृष्टी दाखवली आणि स्वत:च्या शरीर-मनाबद्दल कुतूहल असलेल्या अमृताने एरवीही कधी कुणालाच फोटोसाठी नकार दिला नाही. या छायाचित्रांचा ठेवा केवळ आपला कौटुंबिक नसून, विश्वनागरिक होऊ पाहणाऱ्या एका भारतीय कुटुंबाची आणि त्यातील एका मनस्वी चित्रकर्तीची ही अधुरी कहाणी आहे.. ती या अधुरेपणासह लोकांपर्यंत पोहोचण्यातच तिचे सार्थक आहे हे विवान यांनी ओळखले. यातून ‘री-टेक ऑन अमृता’ हे छायाचित्रे एकमेकांस जोडून केलेले प्रदर्शन २००१ मध्ये साकारले.

या दोन कलाकृतींतून विवान यांची इतिहासाकडे तटस्थपणे पाहण्याची दृष्टी दिसतेच, पण गतकाळातील दृश्य-साधनांचा वापर आजच्या नजरेने करण्याची कलाकाराची वृत्ती हे त्या कलाकृतींचे मर्म आहे. विवान १९६१ ते ६५ या काळात बडोदे येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या दृश्यकला विभागात शिकले आणि बापकमाईवर नव्हे, तर शिष्यवृत्ती मिळवून लंडनच्या स्लेड स्कूलमध्ये गेले. याच कलाशाळेत एके काळी द. ग. गोडसे, माधवराव सातवळेकर हेही शिकले होते. पण वयाच्या २२ व्या वर्षी विवान तेथे पोहोचले तोवर वातावरण पार बदलले होते. ब्रिटिश पॉप-कलेचे अध्वर्यू आर. बी. किटाय हे स्लेडमध्ये शिकवत होते. कलेत पुन्हा बंडाचे वारे वाहात होते. अर्थात त्याआधी १९६२-६३ मध्ये बडोद्यातही, ‘ग्रुप १८९०’ या आजी-माजी कलाविद्यार्थ्यांच्या गटाच्या स्थापनेतून बडोद्याच्या कला विभागाचे प्रमुख व प्रख्यात चित्रकार ना. श्री. बेन्द्रे यांच्याविरुद्ध एक प्रकारे बंडच उभे राहात होते; पण त्या अल्पजीवी गटात विवान नव्हते. १९६८ हे वर्ष विवान यांचे ब्रिटनमधले अखेरचे, पण त्याच वर्षी युरोपभर सुरू झालेल्या विद्यार्थी उठावांचे वारे लंडनमध्ये आणण्यात विवान यांचाही सहभाग होता. त्यांनी लंडनमध्ये चित्रकार-कलावंतांसाठी एक ‘कम्यून’देखील स्थापन केले होते. तो स्वप्नाळू संघर्ष सोडून मायदेशी आल्यावरही चित्रकारांचे संघटन करण्याचा ध्यास त्यांनी राखला. के. जी. सुब्रमणियन यांच्या अध्यक्षतेखाली ऐन आणीबाणीच्या कालखंडात शिमल्यानजीक कसौली येथे एक निवासी कलासंकुल- आर्ट रेसिडेन्सी- उभारण्यात विवान आणि त्यांच्या सहचरी, कलासमीक्षक गीता कपूर यांचा मोठा वाटा होता. मराठीभाषक चित्रकारांपैकी सुधीर पटवर्धन यांचा सन्माननीय अपवाद वगळता या कसौली केंद्रात कोणी आले नसेल, पण देशभरातील अनेक चित्रकारांना कसौलीच्या वास्तव्यात अन्य कलावंतांशी झालेल्या चर्चाचे महत्त्व आजही वाटते. कसौलीत वस्त्रकलेचीही सह-कार्यशिबिरे होत असत, हे उल्लेखनीय.

ते अशासाठी की, कला-संस्कृतीच्या क्षेत्रात विश्वदृष्टी आणि भारतीयता, एतद्देशीयता हे जणू एकमेकांच्या विरुद्ध मानावेत, हा अपसमज खोडण्याचे काम विवान शांतपणे,  कोणत्याही अभिनिवेशाविना करतच होते हे स्पष्ट व्हावे. समदृष्टीची आस त्यांना होती. अमेरिकेतील ‘आर्ट इन्स्टिटय़ूट ऑफ शिकागो’ येथे विवान यांचे कलाविषयक व्याख्यान ठेवण्यात आले ती तारीख होती ११ सप्टेंबर २००९. अमेरिकेतील ‘९/११’सह मुंबईच्या ‘२६/११’चा उल्लेख भाषणाच्या सुरुवातीस विवान यांनी केलाच, पण असल्या हल्ल्यांमागे जी असहिष्णुता आहे तिच्याशी कलावंतांनी लढायचे आहे, हे या व्याख्यानाचे एक सूत्र होते आणि त्यासाठी स्वामी विवेकानंदांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी विश्व धर्म संसदेत केलेल्या प्रसिद्ध भाषणाच्या गाभ्याचा आधार विवान यांनी घेतला होता. ते भाषण जेथे झाले, तीच इमारत म्हणजे आजची ‘आर्ट इन्स्टिटय़ूट ऑफ शिकागो’! दिल्लीकर आणि दिल्लीप्रेमी असलेले विवान, दिल्लीत आंतरराष्ट्रीय द्वैवार्षिकी (बिएनाले) महाप्रदर्शन सुरू करण्यासाठी आग्रही होते. पण दिल्लीकरांना चर्चेतच रस असून केरळमध्ये, कोची येथील तरुण चित्रकार बिएनालेची जुळवाजुळव करताहेत, हे लक्षात येताच विवान यांनी कोची बिएनालेला तन-मन आणि धनानेही मदत केली. कसौली कलानिवासानंतर ‘आर्ट्स अ‍ॅण्ड आयडियाज’ हे नियतकालिक प्रकाशित करून त्यात लिखाण, पुढे ‘सहमत’ ही नक्षलवाद टाळून सफदर हाश्मींच्या कलामार्गाने जाणारी संस्था स्थापण्यात पुढाकार, असेही संघटनकार्य विवान यांनी केले. या सर्व काळात कलाकृतींमध्ये खंड नव्हता. लोकांपर्यंत कला पोहोचवण्यासाठी कधी चिंचपोकळीचे गोदाम, तर कधी कोलकात्याच्या ‘व्हिक्टोरिया मेमोरियल’चा दरबार हॉल अशा जागांचा वापर ते करत राहिले.

स्वत:सकट इतरांना प्रश्न विचारण्याची विवान यांची वृत्ती काही जणांना मारक वाटली तरी अनेकांना ती प्रेरकच ठरली. हे प्रश्न त्यांनी व्यवस्थेलाही विचारले. त्यासाठी डाव्या पक्षांना सहकार्यही केले. पण आपण कार्यकर्ता नसून कलावंत आहोत, ही मर्यादा नेहमीच मान्य केली. ‘नागरिक-कलावंत’ ही त्यांची भूमिका राहिली. हे भारतीय कलाविचारात नव्हते, पण समतावादी लोकशाही प्रजासत्ताकाची आधुनिक घडीही भारताला नवीच होती. त्या नव्या कलाविचाराची धावपट्टी अनेकांना विवान यांच्या साहचर्यामुळे मिळाली. विवान सुंदरम यांच्या निधनामुळे, वैचारिक झेप घेऊ देणारा हा ‘विवानतळ’ नाहीसा झाला आहे.