‘स्टारलिंक’ शंभरांहून अधिक देशांतील ४६ लाख ग्राहक वापरत असूनही आपण त्यापासून दूर; याची कारणे बाजारपेठेबाहेरची अधिक…

‘स्टारलिंक’ रखडल्याबद्दल इलॉन मस्क याने मुकेश अंबानी यांस पंतप्रधान संबोधणे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दीर्घकालीन भांडवल गुंतवणूक कराचा फेरविचार केला जाईल असे म्हणणे, लगेच भांडवली बाजाराने उसळी घेणे आणि या ‘आनंदी’ वातावरणात अंबानी यांच्या ‘जिओ’ची समभाग विक्री जाहीर होणे यांचा काहीही संबंध नाही असे मानण्यासाठी फार मोठी विचारशून्यता किंवा तितकीच बौद्धिक अप्रामाणिकता अंगी हवी. ती अंगी नसलेल्यांसाठी प्रस्तुत विश्लेषण. भारतात काही उद्योगपतींसाठी आपल्या ‘स्टारलिंक’ प्रकल्पास मंजुरी दिली जात नाही, हा मस्क याचा आरोप. त्यावर १५ ऑक्टोबरच्या ‘‘मस्क’वाल इलॉन’ या संपादकीयाने भाष्य केले. आज त्याचा उत्तरार्ध.

आज सर्व देशभक्त तसेच सरकारप्रेमी मस्क यांनी केलेल्या विधानावर संताप व्यक्त करत आहेत. त्याने भारताचा अपमान केला असे त्यांस वाटते. तथापि मस्क याच्या भारतप्रवेशाच्या घोषणेचे जाहीर स्वागत सर्वप्रथम माहिती-प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीच केले होते, ही बाब कशी विसरणार? मस्कच्या ‘स्टारलिंक’ कंपनीशी ‘एअरटेल’, ‘जिओ’ कंपन्यांनी केलेल्या कराराचे स्वागत करणारा ‘ट्वीट’ या वैष्णव यांनी केला. त्यास चांगलीच प्रसिद्धी मिळाली आणि मग या वैष्णव यांस लक्षात आले ‘आपण ज्या सरकारचा भाग आहोत त्या सरकारने तर ‘स्टारलिंक’च्या भारत प्रवेशाला अजून परवानगी दिलेलीच नाही’. त्यांनी मग हा ट्वीट डिलीट केला. ही घटना गेल्या वर्षीची. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मर्जी राखण्याचा जिवापाड प्रयत्न आपले सरकार करत होते ही बाब सूचक. या प्रयत्नांनंतरही ट्रम्प यांस जिंकणे आपणास जमत नाही, हे सत्य दिसून येणे आणि मस्क याने भारतावर तोफ डागणे ही यातील दुसरी सूचक बाब. ‘स्टारलिंक’ प्रकल्पाद्वारे तब्बल ४२ हजार लहान- लहान दळणवळण उपग्रह अवकाशात सोडले जाणार असून पृथ्वीभोवती ५४७ किमी परिघात त्यांचे एक कडे आकारास येईल. गेल्या सहा वर्षांत यातील सात हजार उपग्रह कार्यरत झालेले आहेत आणि सध्या शंभरांहून अधिक देशांतील ४६ लाख ग्राहक ही ‘स्टारलिंक’ इंटरनेट सेवा वापरतात. मग यात सहभागी होण्यात आपली अडचण काय?

त्याबाबत दोन मुद्दे. एक या सेवेचे दर कसे निश्चित करावेत आणि या सेवेसाठीच्या कंपनलहरी (स्पेक्ट्रम) दूरसंचार कंपन्यांस कशा उपलब्ध करून द्याव्यात. यातील पहिल्या मुद्द्यावर समजावून सांगावे असे काही नाही. खरी पंचाईत आहे ती दुसर्‍या मुद्द्याबाबत. ही सेवा देण्यास उत्सुक कंपन्यांचे म्हणणे सरकारने या सेवेसाठी कंपन-कंत्राटे (स्पेक्ट्रम) लिलावाद्वारे द्यावीत तर सरकारचे मत ती ‘प्रशासकीय दराने’ (ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रायसिंग) दिली जावीत. या दुसर्‍या पद्धतीत सरकार स्वत:च एक दर निश्चित करते आणि तो ज्यास मान्य असेल त्या कंपन्यांस दूरसंचार सेवेची कंत्राटे दिली जातात. यात गोम अशी की मनमोहन सिंग सरकारने याच पद्धतीने कंत्राटे दिली त्यावर विद्यमान सत्ताधीशांनी गैरव्यवहाराची बोंब ठोकली. सिंग सरकारच्या काळात तत्कालीन दूरसंचारमंत्री राजा यांनी ‘२-जी’ परवाने कंत्राटांचा लिलाव न करता प्रशासकीय पद्धतीने ती दिली. तसे न करता जर लिलाव केला असता तर केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख ७६ हजार कोटी रु. जमा झाले असते. ते मिळाले नाहीत. म्हणून एक लाख ७६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असे तर्कट तत्कालीन नियंत्रक व महालेखापाल (कॅग) विनोद राय यांनी लावले आणि विरोधी पक्षीय भाजपने त्याविरोधात आकाशपाताळ एक केले. प्रेमभंगामुळे विवाहात परिणती न झालेल्या तरुण/ तरुणीने माझी पितृत्व/ मातृत्वाची संधी हुकली; सबब जोडीदाराने नुकसानभरपाई द्यावी ही मागणी करण्यासारखे हे अजब तर्कट. पण त्यावेळी सर्वांनी ते गांभीर्याने घेतले. तथापि नंतर सर्वोच्च न्यायालयामुळे असा काही भ्रष्टाचार झालाच नव्हता हे उघड झाले. त्यावेळी ‘२जी’ चा हा कथित घोटाळा झाला. सध्या प्रश्न आहे तो ‘५जी’, ‘६जी’ यांचा. ‘‘लिलाव केल्यास कंपन्या अधिकाधिक रकमेची बोली लावतील आणि सरकारचा महसूल वाढेल’’, असा भाजपचा विरोधी पक्षात असतानाचा युक्तिवाद होता. सिंग सरकारने ते केले नाही. म्हणून भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या सुनावणीसाठी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे आरोप खोटा ठरला पण ‘यापुढे सरकारी मालकीची साधनसंपत्ती लिलावाच्या मार्गानेच विका’ अशा अर्थाचा दंडक सर्वोच्च न्यायालयाने त्यात घालून दिला.

तथापि आता तोच दंडक विद्यमान सत्ताधार्‍यांच्या मार्गात आडवा येताना दिसतो. नव्या ‘५जी’साठी लिलावापेक्षा थेट प्रशासकीय कंपन विक्री करणे बरे, असे आताच्या सरकारला वाटते. पण ‘२जी’साठी मनमोहन सिंग सरकारने हाच तर मार्ग निवडला होता. त्यावेळी त्यास विरोध आणि भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍यांस आता तोच मार्ग निवडावा लागणार, ही पंचाईत. त्यावेळी खासगी कंपन्यांस ‘सिंग सरकारचा ‘तो’ मार्ग योग्य वाटला कारण त्याने दिरंगाई टळली. त्यावेळी त्या मार्गाचे कौतुक करणार्‍या कंपन्यांस आता तो मार्ग नकोसा आहे. आता त्यांना लिलाव हवा. कारण आता त्यांची तिजोरी ओसंडून वाहाते आहे. सिंग सरकारच्या काळात ‘एअरटेल’च्या सुनील मित्तल यांचा लिलावास विरोध होता आणि तशी मागणी करणार्‍या रतन टाटांवर जाहीर टीका त्यांनी केली होती. ‘पैसे जास्त झाले असतील तर टाटांनी पंतप्रधान मदत निधीस ते द्यावेत’ हे मित्तल यांचे त्यावेळचे विधान. आज तेच मित्तल ‘स्टारलिंक’ला देशात परवानगीही मिळालेली नसताना भारत सेवेसाठी करार करतात आणि त्यांची री मुकेश अंबानी ओढतात. दूरसंचार क्षेत्राचे नियामक प्राधिकरण (टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया- ‘ट्राय’) याबाबत आधी धोरण आणि नंतर दर निश्चिती करेल आणि त्यानंतर ही कंपनी-कंत्राटे निर्धारित पैसे भरणार्‍यांस दिली जातील; असे सरकार म्हणते. भारतात जवळपास ९० कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. या बाजारपेठेचे महत्त्व ट्रम्प आणि मस्क जाणतात. तेव्हा ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी त्यांच्याकडून अधिकाधिक प्रयत्न होणे साहजिक. हे झाले साधे बाजारपेठीय मुद्दे.

प्रश्न आहे तो बाजारपेठेशी संबंध नसलेल्या मुद्द्यांत. या क्षेत्रात मस्क यांच्यासारख्या परदेशी गुंतवणूकदारास येऊ दिले तर अडचणीच्या प्रसंगी ही कंपनी आपले ऐकणार नाही, ही यातील महत्त्वाची काळजी. आणि आपल्या देशात तर असे अडचणीचे प्रसंग दिवसागणिक नसले तरी आठवड्यागणिक तरी येतात. मग सरकार इंटरनेट-बंदी जारी करते. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या ताज्या आंदोलनात ही इंटरनेट बंदी दिल्लीकरांनी अनुभवली. अशी बंदी घालण्याची सोय मस्क यांची कंपनी देईलच असे नाही. आपले बहुतेक उद्योगपती आज्ञाधारकतेचे आदर्श. मस्क यांच्याबाबत ही हमी नाही. दुसरा मुद्दा या कंपनीच्या क्षमतेचा. आज आपले वास्तव असे की भारतीयांचे दरडोई उत्पन्न अमेरिकी नागरिकापेक्षा कैकपट कमी असेल. पण भारतीयांची ‘विदा-क्षुधा’ (डेटा कंझम्प्शन) सामान्य अमेरिकी नागरिकाच्या कित्येक पट अधिक आहे. हा आपल्या मोफत धोरणांचा परिणाम. त्यामुळे आपल्या दूरसंचार कंपन्यांकडे ग्राहक रग्गड. पण कमाईची बोंब. त्या तुलनेत मस्कसारख्यांचे ग्राहक कमी असतील. पण उत्पन्न आपल्या कंपन्यांच्या पाचपट तरी अधिक. परिणामी त्याची गुंतवणूक क्षमता आपल्या कंपन्यांपेक्षा अधिक. ती घेऊन तो भारतात आल्यास आपल्या आज्ञाधारकांवर सहजी मात करेल. ते आपणास परवडणारे नाही. तिसरा मुद्दा भारत सरकारच्या आम्ही मक्तेदारी होऊ देत नाही या दाव्याचा. या दाव्याइतकी लोणकढी दुसरी सापडणे कठीण. सरकारच्या म्हणण्यात तथ्य असते तर भारतात ‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ यांचे प्राण कंठाशी न येते. आताही ‘५जी’च्या स्पर्धेत ना ‘बीएसएनएल’ आहे ना ‘एमटीएनएल’. तंत्रज्ञान क्षमता असूनही या कंपन्या या शर्यतीत का नाहीत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

याचा अर्थ इतकाच की इलॉन मस्क याच्या नावे आपण कितीही बोटे मोडली तरी सत्य लपणारे नाही. आज्ञाधारक मक्तेदार ही आपल्या सरकारांची खरी गरज आहे. त्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार मस्क यांस नसला तरी त्याचा प्रतिवाद करण्यासाठी आवश्यक नैतिकता आपल्या धोरणांतही नाही.
(उत्तरार्ध)