उष्णतावाढीचे इशारे मिळतात, पण परिणामांच्या तीव्रतेचे अंदाज बांधता येत नाहीत आणि त्यामुळे भविष्यात प्रगत यंत्रणाही कमी पडू शकते, हा युरोपसाठीचा धडा.
हवा बदलते. ती कशी बदलते हे जंतरमंतरवरच्या आंदोलनाने अगदी एवढ्यातच दाखवून दिले असले तरी ‘त्या हवे’चा ‘या हवे’शी तसा काही संबंध नाही. आपल्याला बोलायचे आहे ते ‘हवापाण्याच्या गोष्टीं’मधल्या हवेबद्दल. बदल हा स्थायीभाव असलेल्या आजच्या जगात तर हरघडी ती म्हणजे हवा लहरीपणाच दाखवते. ऊन, वारा, पाऊस, थंडी कशाचीच खात्री नाही आणि हे चौघे कधी वेड्यासारखे वागून धुडगूस घालतील, याची शाश्वती नाही. दुष्काळाची तयारी करावी, तर पुराचे नियोजन करण्याची वेळ येते, उन्हाचे दिवस पावसाळी होतात, पावसाळ्याची सुरुवात उष्म्याच्या घातकतेचा अनुभव देते आणि थंडी अनेकदा नावालाही पडत नाही, तर कधी अचानक पांघरूणही पुरत नाही. हवामान बदल म्हणतात तो हाच का, याचे उत्तर काही हवामानतज्ज्ञ ठामपणे ‘हो’ असे देतात; काही जुने दाखले देऊन, ‘निष्कर्षापूर्वी थोडे थांबा’ म्हणतात. दरम्यान, हवा बदलते, बदलतच राहते…
नमनाला घातलेले हे परिच्छेदभर शब्द हवेच्या बाबतीत जगात दोन ठिकाणी घडणार्या घटनांतून निर्माण होत असलेल्या अचंब्यामुळे. त्यात जितकी अनाकलनीयता आहे, तितकीच अनिश्चितताही – एकूण जगाच्याच भविष्याविषयीची. पहिली आहे युरोपातील. युरोपातले अनेक भाग सध्या शब्दश: जळत आहेत. तिथे उन्हाळा सुरू आहे. अजून बराच बाकी असला, तरी यंदा वणव्यांनी पहिल्याच टप्प्यात हाहाकार म्हणावा, अशी स्थिती आणली आहे. त्यात सर्वाधिक होरपळ होत असलेले देश फ्रान्स आणि स्पेन. तुर्कीये, पोर्तुगालमध्येही धग आहे आणि गेल्या दोन-तीन दिवसांत ग्रीस, ब्रिटनलाही झळ पोहोचू लागली आहे. पश्चिम युरोपात यंदाच्या हिवाळ्यात आणि वसंत ऋतूत पाऊस अधिक पडला. त्यामुळे जंगलात मोठ्या प्रमाणात गवत, झाडेझुडपे वाढली. ती उन्हाळ्याच्या सुरुवातीला वाळली आणि त्यांनी वणवे वेगाने पसरविण्यास हातभारच लावला. फ्रान्स गेल्या आठेक दिवसांपासून वणवे विझविण्यासाठी झगडतो आहे. आता कुठे परिस्थिती नियंत्रणात येते आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मते, फ्रान्समध्ये अशी आग दुसर्या महायुद्धानंतर कदाचित प्रथमच पाहायला मिळत असावी. या देशाच्या बोर्दो शहरानजीकच्या भागाची सर्वाधिक हानी झाली आहे. गेल्या २२ जुलैपासून तेथे वणवे झपाट्याने पसरले. वने, शेते अक्षरश: खाक झाली. भस्मसात झालेल्या भागाचे क्षेत्रफळ ४२० चौरस किलोमीटर, म्हणजे पॅरिस शहराच्या चौपट आहे. या वणव्यांच्या धगीमुळे तब्बल दोन लाख लोकांना स्थलांतरित करावे लागले. ज्वाळा बोर्दो या शहरापासून (होय, हेच ते वाईन उत्पादनासाठी जागतिक पातळीवरील उत्तम दर्जाची द्राक्षे आणि द्राक्षमळे यासाठी प्रसिद्ध असलेले शहर) १५ किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचल्या होत्या. पण, अखेर आगीवर नियंत्रण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला, असे आता म्हटले जाते. कारण, या परिसरात फ्रान्सची संवेदनशील औद्योगिक क्षेत्रे आहेत, ज्यात बॅलिस्टिक क्षेपणास्रे निर्मिती, रॉकेट उत्पादन आणि घातक रसायनांवरील प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे.
स्पेनमध्येही तीव्रता काही कमी नाही. एक जुलैपासून लागलेल्या वणव्यांमध्ये माद्रिद शहरानजीकचा १५७० चौरस किलोमीटर प्रदेश जळून खाक झाला. हा प्रदेश माद्रिद शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या दुप्पट भरतो. त्यातच आता उष्णतेच्या आणखी लाटांचा अंदाज. फ्रान्समध्ये जरा कुठे वणव्यांवर नियंत्रण मिळते आहे, तर तापमान ४१ ते ४२ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आल्याने पुन्हा वणव्यांसाठी सज्ज राहण्याचे आव्हान. पूर्व इंग्लंडमध्ये उन्हाळी सुटीला गेलेल्या अनेकांना वणव्यांमुळे नुकतेच हलवावे लागले. सुमारे २५० एकर जमीन ज्वाळांत लपेटून घेतलेला हा वणवा आण्विक ऊर्जा प्रकल्पापासून चार मैल अंतरावर येऊन ठेपला. ग्रीसमध्येही वणव्याने थैमान घातल्याने क्रेट बेटावरील हजारो जणांना स्थलांतरित करावे लागले. इथे वार्याचा वेग इतका होता, की त्यामुळे आग तर झपाट्याने पसरलीच, पण त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आलेल्या विमानांना हवेत झेपावणेही कठीण झाले.
यंदाचे वणवे भीषण आहेत, असे म्हणण्यामागे आणखी एक घटना कारणीभूत ठरली, ती म्हणजे या वणव्यांच्या धुरांच्या लोटाने फ्रान्समधील बोर्दो शहरानजीक वातावरणात तयार केलेला ढगांचा भला मोठा पडदा. एक प्रकारे हे आगीचे वादळ. ही अतिशय दुर्मीळ हवामान घटना. वणव्याची उष्णता आगीच्या वरील हवेत धूर, राख आणि वाफ निर्माण करते. ती वातावरणाच्या वरच्या स्तरात गेली, की थंड होऊन तिचे ढग तयार होतात. आग शक्तिमान असेल आणि वातावरण अस्थिर असेल, तर हा ढग गडगडाटी पावसाळी ढगात रूपांतरित होऊ शकतो. त्या ढगांच्या घर्षणातून निर्माण होणार्या विजा आणखी आगी लावू शकतात, पाऊसही पाडू शकतात. परिस्थिती किती टोकाला गेली होती, हे कळावे, यासाठी हा दाखला.
वणव्यांचा मुकाबला करण्यासाठी फ्रान्सने चक्क विशेष विमानांचा वापर केला. ही विमाने एखाद्या तलावातून किंवा समुद्रातून ६ हजार लिटर इतके पाणी शोषून ते आगीवर फवारतात. ही सर्व प्रक्रिया ते १२ सेकंदांत करू शकतात. फ्रान्ससारख्या प्रगत देशात आपत्ती व्यवस्थापनासाठी अशी अत्याधुनिक साधने आहेत, म्हणून प्रसंग आटोक्यात येऊ शकतो. हे अविकसित वा आपल्यासारख्या विकसनशील देशात घडले, तर काय अनावस्था प्रसंग ओढवेल, याची कल्पनाही करता येणार नाही. अर्थात, हे म्हणत असताना फ्रान्समधील दुसरे एक उदाहरणही बोलके ठरावे. ज्या झिरोंड प्रांतात वणवे भडकले, तेथे अग्निशमन दलाचे २५०० जवान, १५०० लष्करी कर्मचारी आणि १२०० पोलीस आगीवर नियंत्रण मिळवू पाहत होते, पण ते पुरेसे पडले नाहीत. ही कामगिरी करताना त्यातील चार जणांचा मृत्यू झाला. ग्रीसमध्येही असेच घडले. तेथेही दोघांचा मृत्यू झाला. थोडक्यात, हवामानाचा लहरीपणा प्रगत देशांची आधुनिक साधने, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानालाही न जुमानणारा ठरू शकतो, हेही वास्तव.
एकीकडे युरोपात हे घडते आहे, तर आपल्या देशात ‘एल निनो’चा यंदा मोठा फटका बसेल, असा इशारा असताना देशातील अनेक भागांत पूरस्थिती असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांत झळकल्या. गुजरातमधील उंबरगाव येथे २४ तासांत १०६४ मिलिमीटर इतका पडलेला पाऊस या ‘एल निनो’ वर्षातीलच आहे! सरत्या आठवड्यातच हे घडले. या पावसाने २४ तासांत पडलेल्या पावसाचे गेल्या सव्वाशे वर्षांतील सर्व विक्रम एका फटक्यात तोडले. कोरड्या गेलेल्या जूननंतर जुलैमध्येही सरासरीच्या ९४ टक्के किंवा त्याहून कमी पाऊस पडण्याचा अंदाज होता. पण, जुलै संपताना देशातील पावसाच्या आकडेवारीने सरासरी गाठल्याचे दाखवले. तेही कसे, तर पूर्व, ईशान्य आणि दक्षिणेकडील काही भागांत पावसाची हजेरी कमी भरली. पण, इतर भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने एकूण सरासरी सामान्य, असे.
हवामानाचे अंदाज बांधायला जगाचे हवामानाविषयीचे ज्ञान आणि विज्ञान कमी पडत आहे. युरोपात उन्हाळ्याची तीव्रता खर्या अर्थाने वाढणारा जुलै महिना उगविण्यापूर्वी वणव्यांनी हाहाकार मांडला, ही त्याचीच परिणती. उष्णतावाढीचे इशारे मिळतात, पण परिणामांच्या तीव्रतेचे अंदाज बांधता येत नाहीत आणि त्यामुळे भविष्यात प्रगत यंत्रणाही कमी पडू शकते, हा युरोपसाठीचा धडा. भारताला शिकावा लागेल, असा धडा काय असेल, तर एकटा ‘एल निनो’ भारतातील मान्सूनमधील पावसाचे वर्तन सांगण्यास अपुरा आहे, हा. जागतिक तापमानवाढ, अधिक तापणारे समुद्रांचे पृष्ठभाग आणि सातत्याने बदलणारी वातावरणीय चक्राकार स्थिती यांमुळे मान्सूनचा अंदाज बांधणे अधिकाधिक अवघड होऊ लागले आहे. एकूण किती पाऊस पडेल, हे एक वेळ सांगता आले, तरी कुठे, केव्हा, किती तीव्रतेने पाऊस पडेल, ही अजूनही अनिश्चित घटना ठरते. पुढील तीन तासांत तुमच्या भागांत जोरदार पाऊस कोसळेल, असे संदेश भ्रमणध्वनींवर आल्यानंतर तीन तास कोरडे गेल्याचे अनुभव हेच सांगतात. पिवळा, नारिंगी, लाल इशार्यांचा बेभरवशीपणाही याकडेच निर्देश करतो. आणि, कोणताही इशारा नसताना पूर येण्याचे प्रसंग अंदाजांचे अपुरेपण ठळकपणे अधोरेखित करतात. असे का होते आहे, याचे सध्या तरी एकच उत्तर आहे, हवा बदलते आहे!
