खेळाच्या मैदानातील विजय हे त्या त्या देशाचे राजकीय भाष्यच असते. असे भाष्य करण्याची क्षमता स्पेनने सांघिक साधनेतून मिळवली… 

फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना अर्जेंटिनाने जिंकला असता, तर फुटबॉल किंवा एकूणच जगात ‘न्याय’ या संकल्पनेवरील लोकांचा विश्वास उडाला असता. कारण संपूर्ण सामन्यातील बहुतेक काळ अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी चेंडूऐवजी प्रतिस्पर्धी खेळाडूंना लाथाडण्याचेच काम निगुतीने केले. जवळपास संपूर्ण सामन्यात त्यांना स्पॅनिश गोलच्या दिशेने एकही फटका लगावता आला नाही. तिकडे स्पेनने जवळपास दोन डझन वेळा तरी अर्जेंटिनाच्या गोलवर आक्रमण केले.

इतक्या एकतर्फी सामन्यातही जवळपास १०५ मिनिटे स्पेनला गोल करू दिला नाही इतकेच अर्जेंटिनाचे ‘कर्तृत्व’. अतिशय सुमार, रडीचा खेळ करूनही यदाकदाचित अर्जेंटिना ही स्पर्धा जिंकते, तर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात ‘फिफा’ आणि कॉर्पोरेट विश्वाने लिओनेल मेसीच्या नावाचा जयघोष पुन्हा आरंभला असता. तशी लज्जास्पद वेळ स्पेनने येऊ दिली नाही याबद्दल स्पेनचे विशेष अभिनंदन. कारण स्पेन विरुद्ध अर्जेंटिना हा अंतिम सामना म्हणजे दोन शैलीच नव्हे, तर विचारसरणींमधीलही द्वंद्व होते.

सामना जिंकण्यासाठी ‘प्रयत्न सर्वांचे’, हे स्पेनचे धोरण. तर सामना जिंकण्यासाठी काय वाट्टेल ते, हा अर्जेंटिनाचा खाक्या. फुटबॉल म्हणजे निव्वळ पदलालित्य, चेंडू ढकलण्यावरील हुकमत आणि मोजके वलयांकित खेळाडू इतपत मर्यादित समज असलेल्यांना कदाचित स्पेनच्या खेळातील सौंदर्य समजणार किंवा मानवणार नाही. फुटबॉल हा सांघिक खेळ. कोणा एकाच्या करामतीवर सतत जिंकता येऊ नये अशीच या खेळाची रचना. म्हणून या खेळाची प्रकृती समावेशक आणि पसंती वैश्विक.

स्पेनने हेच करून दाखवले. स्पेन याच प्रकारे खेळतो. त्यांचा या स्पर्धेतील खेळ म्हणजे जणू एखादे अतिशय शिस्तबद्ध आणि देखणे समूहनृत्य. एखादा श्रवणीय, सूर-तालबद्ध ऑपेरा. यात प्रत्येकास स्वत:ची जबाबदारी नेमून दिलेली असते. एकेरी, वैयक्तिक लाभासाठी चौकट किंवा वर्तुळ सोडणे हा विषयच नाही. अन्यथा संपूर्ण रंगाचा बेरंग ठरलेला. स्पेनकडे मेसी नाही, रोनाल्डो नाही नि एम्बापेही नाही. हे तिघेही फुटबॉलमधील जादूगार. यांच्या नावावर मैदाने भरतात, पुरस्कर्ते येतात. पण या तिघांच्याही संघांना या स्पर्धेत स्पेनने अस्मान दाखवले, हा योगायोग नाही! कुकुरेया, रॉड्री, ओयरझबाल, बाएना, ओल्मो, पेड्री, रुइझ, मेरिनो, पोरो, लापोर्ट, कुबार्सी, सिमॉन ही नावे फुटबॉल वर्तुळाच्या बाहेर फारशी परिचित नाहीत. ही नावे गोंदलेले टी-शर्ट, जर्सी घालून फुटबॉलप्रेमी किंवा लहान मुले मिरवत नाहीत.

स्पेनच्या लमिने यमालचे नाव तेवढे सुपरिचित. तसे पाहायला गेल्यास स्पेनचा तो एकमेव वलयांकित फुटबॉलपटू. अवघ्या १९व्या वर्षी त्याला युरो स्पर्धेपाठोपाठ आता विश्वचषक जिंकण्याचे भाग्य लाभले. पण यमालच्या वाट्याला एकच गोल आला. तो वलयांकित म्हणून त्याला देव्हार्‍यात बसवले गेले नाही किंवा फिरून-फिरून गोल करू देण्याची संधीही दिली गेली नाही. त्याला नेमून दिलेल्या चौकटीतच तो अखेरपर्यंत खेळला. आणि जगज्जेताही बनला. स्पेनच्या विजयाने फुटबॉलच्या सांघिक मूल्याला भक्कम केले. म्हणून आधीच्या कित्येक विश्वविजयांपेक्षा या विजयाचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते. कारण एक आणि एकाच खेळाडूवर झोत टाकत राहण्याची खोड स्पेनने अप्रतिम संघभावनेतून जिरवली.

त्याची नितांत गरज होती. कारण ज्या प्रकारे अर्जेंटिनाचा संघ अंतिम सामना खेळला, त्यातून सर्वाधिक शोभा त्यांच्या फुटबॉल संस्कृतीची आणि त्यांचा देव लिओनेल मेसीची झाली. संस्कृती, देव्हार्‍यांच्या कोंदणात खेळाला घुसवण्याचा प्रयत्न केल्यास, त्याचा ओंगळवाणा आविष्कार काय असू शकतो याची प्रचीती म्हणजे अर्जेंटिनाचा खेळ. संपूर्ण स्पर्धेत त्यांचे नियोजन आणि वर्तन, सलग दुसरे जगज्जेतेपद मेसी आणि अर्जेंटिनाचेच, या प्रकारचे राहिले. यात उन्माद होता नि अज्ञानही. कदाचित हे दोन्ही अवगुण एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात. चार वर्षांपूर्वी अप्रतिम वैयक्तिक खेळ आणि त्याच्या जोडीला शिस्तबद्ध सांघिक खेळ या दोहोंच्या जोरावर अर्जेंटिना जगज्जेते बनले. या स्पर्धेतील अर्जेंटिनाचा खेळ मात्र बेडौल, बेताल आणि अखेरीस बेमुर्वतखोरीचा नि रडीचा बनला.

कौशल्याच्या जोरावर समोरच्या संघाला जिंकता येत नाही, तर गल्लीतील गुंडागत एकेकट्याला गाठून शारीरिक इजा पोहोचवून खच्चीकरण करण्याचा डाव अर्जेंटिना खेळू पाहत होता. हे क्षुद्र मार्ग इंग्लंडविरुद्ध उपान्त्य फेरीत यशस्वी ठरले, पण स्पेनसारख्या अधिक भक्कम आणि सुनियोजित संघासमोर फसले. अशा प्रकारे शारीरिक खेळ करणे ही अर्जेंटिनाची खासियत. त्यामुळेच चार जगज्जेतेपदे पटकावूनही या लॅटिन अमेरिकी देशास ब्राझीलची प्रतिष्ठा मिळू शकली नाही. असेच खेळत राहिल्यास ती संभवतही नाही. आणि ही पहिलीच वेळ नाही. अर्जेंटिनाने दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली १९८६ मध्ये विश्वचषक जिंकला. त्या वेळी अंतिम सामन्यात सुंदर, प्रवाही खेळ करून त्यांनी जर्मनीस नेस्तनाबूत केले होते. परंतु पुढच्याच १९९० मधील विश्वचषक स्पर्धेतला अंतिम सामना याच दोन संघांत झाला, त्या वेळी अर्जेंटिनाचा खेळ अत्यंत रडीचा आणि धसमुसळा झाला. तर जर्मनीने सुनियोजित, सूत्रबद्ध खेळाचा आविष्कार घडवला नि ते जगज्जेते ठरले.

यंदाही असेच घडले. गेल्या खेपेस म्हणजे २०२२ मधील स्पर्धेत अर्जेंटिनाचा, मेसीचा खेळ प्रेक्षणीय झाला. या वेळी मात्र त्यातील लय पार बिघडली. तसाही अर्जेंटिनाचा संघ खिलाडूवृत्तीसाठी कधीच ओळखला जात नाही. मात्र यंदा आपल्या खेळातून अरेरावीचे दर्शन घडवत अर्जेंटिनाने फुटबॉललाच घृणास्पद बनवण्याचा प्रयत्न केला. मेसीने हे बदलण्याचा प्रयत्न केला नाही, तशी त्याची इच्छाही दिसली नाही.

स्पर्धेतील सर्वोत्तम फुटबॉलपटू, सर्वोत्तम युवा फुटबॉलपटू, सर्वोत्तम गोलरक्षक हे तिन्ही पुरस्कार स्पेनने पटकावले. दोन वर्षांपूर्वी युरो चषक जिंकला, आणि आता विश्वचषक. यावरून त्यांच्या सातत्याची, रियाझाची कल्पना यावी. तरी मने जिंकणारा तेवढा एकच संघ नव्हता. केप व्हर्डेसारख्या साडेपाच लाख म्हणजे मुंबईच्या एखाद्या उपनगराइतकी लोकसंख्या असलेल्या देशाने सर्वांची वाहवा मिळवली. त्यांनी स्पेनला एकही गोल करू दिला नाही, अर्जेंटिनाला जवळपास दोन तास रोखून धरले. इजिप्त, मोरोक्को, काँगो, सेनेगल या देशांनी आफ्रिकेचा ध्वज डौलाने फडकवत ठेवला.

इराणसारख्या देशाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वाभिमान प्रफुल्लित ठेवला आणि खेळाच्या मैदानावरही दुश्मनी निभावू पाहणार्‍या अमेरिकी व्यवस्थेला शिरजोर होऊ दिले नाही. या देशांची कामगिरी आणि त्यावर स्पेनने चढवलेला कळस हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फान्टिनो यांच्या कारनाम्यांना मिळालेले सणसणीत प्रत्युत्तर ठरले. म्हणून पारितोषिक वितरण समारंभात विजेत्या स्पॅनिश संघाच्या मंचावर ट्रम्पबाबा केविलवाणे वाटले. त्यांचे होयबा नि ‘फिफा’चे अध्यक्ष इन्फान्टिनो यांनी अमेरिकी खेळाडूवर लाल कार्डाच्या नियमास बगल देऊन केलेली मेहेरबानी बेल्जियमच्या संघाने मैदानावर हास्यास्पद ठरवली.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत फुटबॉलचा खेळ आणि खेळभावनेला असे अनेक आघाड्यांवर लढावे लागले नि प्रत्येक टप्प्यावरील त्यांचे विजय सच्च्या फुटबॉलप्रेमींसाठी विलक्षण समाधानकारक ठरले. अर्जेंटिनातील विद्यमान उजव्या विचारसरणीचे सरकार, अध्यक्ष जेवियर मिलेई हे ट्रम्प यांस अंमळ जवळचे. तर स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ हे कडवे ट्रम्प टीकाकार. त्यांच्याविरोधात ट्रम्प यांचे जाहीर फूत्कार चांगलेच गाजले. त्या स्पेनने फुटबॉलच्या मैदानावर फिफा आणि ट्रम्प प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अर्जेंटिनाला गारद केले. म्हणून या विजयाची खुमारी कणभर अधिक. स्पेन या एवढ्याशा युरोपीय देशाने ट्रम्प यांना जशी त्यांची जागा दाखवून दिली तसे अन्य कोणाही बड्या वा स्वत:स बड्या मानणार्‍या देशास जमलेले नाही.

खेळाच्या मैदानावर राजकारण नसते असे म्हणणारे भाबडे तरी असतात अथवा लबाड. खेळाच्या मैदानातील विजय हे त्या त्या देशाचे राजकीय भाष्यच असते. म्हणून इंग्लंडला हरवल्यावर अर्जेंटिनाचे खेळाडू फॉकलंडचा मुद्दा उचलतात आणि अन्य अनेक सामन्यांत पॅलेस्टिनी झेंडे फडकतात. असे मैदानी भाष्य करण्याची क्षमता मिळवणे हे एका दिवसाचे काम नाही. त्यासाठी साधना लागते. ती स्पेनने दाखवली. म्हणून त्यांचे विशेष अभिनंदन. स्पॅनिश फुटबॉल शैली ‘टिकी टाका’ या कौतुकनावाने ओळखली जाते. त्या शैलीने खेळणारा स्पॅनिश संघ टीकाकार ट्रम्प यांच्या साक्षीने बगलबच्च्या अर्जेंटिनास धूळ चारताना पाहणे यापरता आनंद नाही. त्या आनंदाचा नाद म्हणजे ‘टिकी टाका ट्रम्प ट्रम्प’!