फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजनात अमेरिकी अध्यक्षांनी, तिथल्या स्थलांतर-नियंत्रण वा अन्य तपास यंत्रणांनी कितीही नकारात्मकता आणली तरी, हा खेळ ‘जगाचा’च…

अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडात आजपासून प्रारंभ होत असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पूर्वसंध्येला जे जे काही घडते आहे, त्यातील काहीही उत्तम नाही, उदात्त नाही आणि उन्नत तर अजिबात नाही. युद्धग्रस्त, विखुरलेल्या, गोंधळलेल्या, कावलेल्या, संशयी, विदग्ध जगावर फुटबॉलचा हा सुंदर खेळ स्पर्धा प्रत्यक्ष सुरू झाल्यावर तरी सहवेदनेची, संवादाची, सौहार्दाची सुखद फुंकर मारू शकेल? या स्पर्धेस पात्र ठरलेल्या ४८ देशांच्या संघांपैकी १० आफ्रिका खंडातले, ८ आशिया खंडातले आणि ६ दक्षिण अमेरिकन. जगाच्या नकाशात पटकन दाखवताही येणार नाहीत, असे कुरासाओ, केप व्हर्ड हे देशही या विश्वचषकात खेळणार आहेत. यादीत युरोपियन संघांची संख्या नेहमीप्रमाणे जास्त. स्पर्धेत एकूण १०४ सामने खेळवले जातील, ७८ अमेरिकेत आणि कॅनडा, मेक्सिकोत प्रत्येकी १३. म्हणजे असे इतके सगळे विविध देश प्रामुख्याने खेळणार आहेत त्या अमेरिकेत, ज्या अमेरिकेला सध्या यातील बर्‍याच देशांबद्दल असूया, अनेकांबद्दल घृणा आणि काहींबद्दल थेट द्वेष-मत्सर वाटतो. एरवी फुटबॉल विश्वचषक म्हटल्यावर जो माहोल तयार होतो, तो या वेळी फारसा तयार झालेला नाही, त्याचे हे एक मूलभूत कारण. यजमानांनी पाहुण्यांचे स्वागत करायचे असते, हा संकेत विसरून, येईल त्याच्याकडे संशयाने पाहायला सुरुवात केली की काय होते, त्याचे उदाहरण म्हणून या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पूर्वपीठिकेची इतिहासात नोंद होईल.

अगदी ताजे उदाहरण सोमालियाच्या पंचाला अमेरिकेत प्रवेश नाकारण्याचे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची आयोजक संस्था ‘फिफा’ने ओमर अब्दुलकादिर अर्तन यांना गेल्याच वर्षी आफ्रिका खंडातील सर्वोत्तम पंच ठरवल्यानंतर, विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतले पहिले सोमालियन पंच म्हणून इतिहास त्यांची नोंद घेणार होता. पण डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या स्थलांतर धोरणानुसार, अर्तन हे अमेरिकेत प्रवासबंदी असलेल्या १२ देशांपैकी एक – सोमालियाचे. केवळ म्हणून, इतर काहीही स्पष्टीकरण न देता त्यांना परत पाठवण्यात आले. इराकचा आघाडीचा खेळाडू अयमेन हुसेनला शिकागो विमानतळावर उतरताच आधी सात तास चौकशीला सामारे जावे लागले. त्यांच्या छायाचित्रकाराची तर थेट परतपाठवणीच झाली. उझबेकिस्तानचा संघ न्यूयॉर्कमधील ज्या शिबिरात सराव करतो आहे, तेथे अमली पदार्थांचा शोध घेणारे श्वानपथक येऊन धडकले आणि त्यांनी सर्व सामान हुंगून पाहिले. सेनेगलचा संघ टेक्सासमधील सॅन ॲन्टोनियोत उतरतो न उतरतो, तो सर्व खेळाडूंच्या सामानाची कसून तपासणी सुरू झाली.

इराणच्या संघावर तर कडक निर्बंध. मुळात आधी त्यांचे अमेरिकेत येणेच अनिश्चित. नंतर यायची परवानगी मिळाली. पण तीही अमेरिकन अध्यक्षांच्या कडवट प्रतिक्रियेने सुरुवात होणारी. ‘स्वागत आहे त्यांचे. पण त्यांचा जीव आणि सुरक्षितता धोक्यात घालून त्यांनी येथे खरेच यावे का?’ असे विश्वचषक भरवणार्‍या अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प विचारतात. पण इराण चिवट. त्यांनी उत्तर दिले, ‘जागतिक स्पर्धेत सहभागी होणार्‍या संघाला सुरक्षा पुरवण्याची क्षमता नाही आणि तरी जे यजमानपदाचा मान तर मिरवतात त्यांनाच खरेतर या स्पर्धेतून बाहेर काढायला हवे’. इराणचा संघ स्पर्धेच्या जेमतेम दहा दिवस आधी पोहोचला. त्यातही खेळाडूंसह असलेल्या सहकारी वर्गापैकी अनेकांना व्हिसा नाकारलाच गेला. त्यावर ट्रम्प प्रशासनाचे उर्मट उत्तर असे, ‘इराणी संघाला हे (स्पर्धेचे) निमित्त पुढे करून अमेरिकेत अतिरेकी घुसवण्याची संधी आम्ही देणार नाही’. इराणी संघ अमेरिकेत जे सामने खेळणार आहे, ते खेळण्यासाठी तो ज्या दिवशी येईल, त्याच दिवशी अमेरिकेतून परत जाईल, असाही फतवा अमेरिकी प्रशासनाने काढला आहेच.

या घटना पाहिल्यास लक्षात येईल, की यजमानांना पाहुणे आलेले फारसे आवडलेले नाही. नकारात्मकता एवढ्यावरच संपत नाही. महागडी तिकिटे, व्हिसा विलंब आणि सार्वजनिक वाहतुकीच्या गगनाला भिडलेल्या किमती यामुळे सामने प्रत्यक्ष स्टेडियममध्ये पाहू इच्छिणार्‍यांची गळचेपीच झाल्याची स्थिती आहे. त्यात स्पर्धेच्या पूर्वसंध्येलाच अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षात नव्याने उडू पाहत असलेल्या भडक्याची भर. तिकिटे काढून सामने पाहायला येणार्‍यांनाही सुरक्षिततेच्या नावाखाली काय काय आणि कशाकशाला सामोरे जावे लागणार, हे कल्पनातीत आहे. सहयजमान कॅनडा आणि मेक्सिकोत होणारे सगळे सामने गट सामने आहेत. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला खर्‍या अर्थाने रंग चढत जातो, तो बाद फेरीतील सामन्यांपासून. ते सर्व सामने अमेरिकेतच होणार आहेत.

नाही म्हणायला अमेरिकेतील काही सजग आवाज या सगळ्या विरोधाभासावर बोट ठेवून आता लोकांनी ही स्पर्धा उचलून धरावी, अशी आशा बाळगताना दिसतात. फुटबॉलचे निस्सीम चाहते न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी त्यापैकी एक. ‘जे काही सुरू आहे, ते म्हणजे ही स्पर्धा ज्या सामीलकीचे प्रतीक आहे, त्यालाच मिळालेला अभिशाप वाटतो,’ हे त्यांचे विधान म्हणूनच महत्त्वाचे. अमेरिका ज्या अनेकानेक स्थलांतरितांच्या योगदानामुळे प्रगत झाली, त्यांचा हा प्रातिनिधिक आवाज. सध्याच्या ट्रम्पशासित अमेरिकेचे स्थलांतरितांना नाकारणे या स्पर्धेच्या यजमानपदातही प्रतिबिंबित होत आहे, हा या म्हणण्याचा अर्थ. वास्तविक फुटबॉलला मोठे केले, ते देशोदेशीच्या संघांतून खेळणार्‍या स्थलांतरितांनी. अगदी या स्पर्धेत युरोपीय संघांमधून खेळणार्‍या काहींची उदाहरणे. स्पेनचा सर्वोत्तम खेळाडू लमिन यमालचे वडील मोरोक्कन, तर आई इक्वेटोरियल गिनीची. फ्रान्सचा नायक किलियन एम्बाप्पेचे वडील कॅमेरूनचे, आई अल्जीरियन वंशाची. जर्मनीचा तारा जमाल मुसियालाचे वडील नायजेरियन, तर आई पोलिश वंशाची. स्वित्झर्लंडचा प्रसिद्ध खेळाडू ग्रानित झाहकाचे पालक कोसोवोतून स्वित्झर्लंडमध्ये स्थलांतरित अल्बानियन वंशाचे. इंग्लंडच्या जुड बेलिंंगहॅमची आई केनियन, तर वडील आयरिश आणि बुकायो साकाच्या कुटुंबाची मुळे नायजेरियात. हे सर्व स्थलांतरित वा त्यांचे वंशज असले, तरी आपापल्या देशाकडून खेळताना राष्ट्रीय भावनेने, संघ जिंकावा म्हणून खेळतात आणि त्यांचा देशही त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. झोहरान ममदानी म्हणतात त्याप्रमाणे, ‘स्थलांतरितांशिवाय फुटबॉलचे अस्तित्वच नाही. खेळाडू, प्रशिक्षक, स्टेडियममध्ये काम करणारे आणि स्टेडियम भरून प्रोत्साहन देणारे बहुतांश सर्व हेच. खुद्द अमेरिकेच्या सध्याच्या फुटबॉल संघातही सहा स्थलांतरित आहेत.’

जगावर हुकूमत गाजवण्यासाठी, आपली सत्ता टिकवण्यासाठी शासक भांडत राहतातच, लोकांना एकमेकांशी झुंजवत राहतातच. जगातील २०० हून अधिक देश खेळतात, असा फुटबॉल नावाचा खेळ मात्र सामन्यांतील हार-जीत या पलीकडे जाऊन खेळ जिंकणे साजरे करायला शिकवण्याचे निमित्त ठरणारा. सध्याच्या स्पर्धेच्या सुरुवातीपासून एक आडाखा चर्चेत आहे, तो म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात सामना होऊ शकतो का? हे दोन्ही संघ आपापल्या गटात दुसरे येऊन ३२ संघांच्या बाद फेरीत पात्र ठरले, तर आमने-सामने येऊ शकतात, तेही अमेरिकेत. विशेष म्हणजे, अमेरिकी स्वातंत्र्याचे २५०वे वर्ष साजरे करण्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे ३ जुलैला हा सामना होऊ शकतो! फुटबॉल चाहत्यांना हे व्हावे, असे वाटले, तर गैर नाही.

नेतृत्व बेताल झाले म्हणून नागरिकांचा तोल जातोच असे नाही, हे सिद्ध करून दाखवण्याची संधी अमेरिकनांना हा सामना झाला तर मिळेल. माणसे जोडणार्‍या फुटबॉल नावाच्या ‘ब्यूटिफुल गेम’च्या उत्सव आयोजनाची संधी मिळालेल्या देशाने त्याचे खुल्या दिलाने स्वागत केलेले चाहत्यांना पाहायचे आहे. तसे झाले, तर तेवढेच आसमंतात भरून राहिलेल्या सकल असुंदरातील सुंदर.