एका बाजूने स्वत:च म्हणायचे आता जग मुक्त आहे, कोणीच कोणाशी बांधलेला नाही आणि वर पुन्हा दुसर्या कोणत्या देशास कोण काय देतो यावर टीका करायची, हे कसे?
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेत दोन स्वतंत्र मंचांवर मांडलेले मुद्दे दखलपात्र आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत परराष्ट्रमंत्रीस्तरीय बैठकीत तसेच न्यूयॉर्क येथील मुलाखतीत ते मांडले गेले. जयशंकर हे ‘सरकारी मुत्सद्दी’. त्यांचे वडील के. सुब्रमण्यम हेदेखील सरकारी सेवेत होते आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी हा त्यांच्याही अभ्यासाचा भाग होता. या विषयावर त्यांनी सातत्याने लेखन केले. वाचनीयतेबरोबरच त्यातील अभ्यासपूर्ण विश्लेषणामुळे ते लेख पत्रकारांपासून पंडितांपर्यंत अनेकजण आवर्जून वाचत. आपल्या परराष्ट्र मुत्सद्द्यांच्या एक-दोन पिढ्या के. सुब्रमण्यम यांच्या लेखनावर घडल्या. सुब्रमण्यम यांनी सरकारच्या धोरणात्मक त्रुटींवर भाष्य करण्यास कधी मागेपुढे पाहिले नाही. ते कधी ‘राजकीय’ बनले नाहीत. त्या मानाने त्याच्या चिरंजीवांनी सेवेत असताना भावी सत्ताधार्यांशी संधान बांधण्यात धन्यता मानली. त्यातून त्यांचे ईप्सित साध्य झाले. परराष्ट्र खाते त्यांच्याकडे देण्यात आले. पण तरी आपल्या पंतप्रधानांस ते ‘अगली बार… ट्रम्प सरकार’ अशी हाळी देण्यापासून थांबवू शकले नाहीत. आता ते अमेरिकेने भारताशी संबंध सुधारण्यासाठी काय करायला हवे यावर अमेरिकेच्या भूमीवरूनच भाष्य करतात; हे खचितच मनोरंजक.
त्यांच्या मते अमेरिकेने आपला शेजारी पाकिस्तानला मदत करणे हे भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम करणारे ठरेल. ते खरेच. पण अमेरिकेने कोणत्या कालखंडात पाकिस्तानला मदत केलेली नाही? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कोणत्या भारतीय परराष्ट्रमंत्र्याने अमेरिकेच्या पाक मदतीवर अशी किरकिर केली? हल्ली जगात कोणीही कोणाशी बोलतो आणि मदत घेतो, हे जग पूर्वीसारखे दोन ध्रुवीय राहिलेले नाही, असे जयशंकर स्वत:च नमूद करतात. म्हणजे पूर्वी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन हे दोन ध्रुव होते, आता तसे राहिलेले नाहीत, असे त्यांचे म्हणणे. ते खरे आहे. त्यामुळे एखादा देश या गटातला की त्या, असा प्रश्न आता नाही. प्रत्येक जण प्रत्येकाशी आपापल्या हितसंबंधांसाठी संधान बांधत असतो. हे खरे असेल तर मग अमेरिकेने आपल्याला वाईट वाटेल म्हणून पाकिस्तानला मदत करणारा हात आखडता का घ्यावा? तो तसा घ्यायचा की नाही, हा वेगळा मुद्दा. पण पाकिस्तानला अमेरिका मदत करते म्हणून आपण का किरकिर करायची? या मदतीचा वा अर्थव्यवहाराचा आपला वाटा घटत असेल तर गोष्ट वेगळी. पण तसे होताना दिसत नाही. आणि दुसरा त्यापेक्षाही अधिक व्यापक मुद्दा म्हणजे आपण अजून किती वर्षे स्वत:स पाकिस्तानशी बांधून घेणार? आपली आणि पाकिस्तानची बरोबरी मुळात होतेच कशी? पाक इतका ध्वस्त प्रदेश आहे की त्या देशाने स्वत:स अफगाणिस्तानशी जोडून घ्यावे. असे असताना इतक्या दरिद्री देशाच्या तंगड्यात आपण किती काळ आपले पाय अडकवून ठेवणार?
दुसरा मुद्दा यातील राजनैतिक शहाणपणाचा. कोणी कोणाशी कसे आणि किती संबंध ठेवावेत हे तिसरा कसे काय सांगू शकतो? एका बाजूने स्वत:च म्हणायचे आता जग मुक्त आहे, कोणीच कोणाशी बांधलेला नाही आणि वर पुन्हा दुसर्या कोणत्या देशास कोण काय देतो यावर टीका करायची, हे कसे? हे असे केल्याने उलट आपणच लहान ठरतो आणि पाकिस्तानला मोठे करतो, याचेही भान नसावे? याकडेही एक वेळ दुर्लक्ष करता येईल. पण आपल्याबाबत असे कोणी केले की आपण संतापायचे आणि दुसर्याने मात्र आपल्या हिताचाच विचार करावा असा आग्रह धरायचा, हे कसे चालेल? उदाहरणार्थ आपली रशियाकडून होत असलेली तेल खरेदी. ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांस पसंत नाही. त्यामागील कारणे किती योग्य/अयोग्य, हा मुद्दा वेगळा. पण ट्रम्प यांना आवडत नाही म्हणून आपली रशियन तेल खरेदी आपण कमी करणार नसू तर आपल्याला आवडत नाही म्हणून ट्रम्प यांच्या पाक-मदतीवर नाक मुरडण्याचा आपणास काय अधिकार? आपल्या शेजार्याने दुसर्या शेजार्याशी कसे वागावे हे ठरवण्याचा अधिकार आपणास नसतो. आपण आपल्यापुरते पाहायचे, हे सामान्य व्यवहारज्ञान. मुत्सद्द्यास ते नसेल तर आश्चर्यच. असो. जयशंकर यांचा दुसरा मुद्दा संभाव्य अन्नटंचाईबाबत आहे.
सध्या ‘एल निनो’ने अनेकांस आपापले अपयश झाकण्यासाठी मोठे कारण दिलेले आहे. जयशंकर त्याचाच आधार घेतात आणि जगास लवकरच भीषण अन्नटंचाईस सामोरे जावे लागेल, अशी भविष्यवाणी वर्तवतात. त्यातही ही अन्नान्नदशा ‘ग्लोबल साउथ’ म्हणवून घेणार्या देशांस अधिक भेडसावेल असे त्यांचे म्हणणे. या कथित ‘ग्लोबल साउथ’ प्रकरणाचा फडशा पाडायला हवा. या शब्दप्रयोगाच्या उगमाचा संबंध हा व्हिएतनाम युद्धाशी आहे. या युद्धानंतर पृथ्वीच्या गोलावरील विषुववृत्ताच्या खालचे, म्हणजे दक्षिण गोलार्धातील, आणि वरचे, म्हणजे उत्तर गोलार्धातील अशी जगाची मांडणी केली गेली. यातून उत्तर गोलार्धातील वरचे देश हे दक्षिण गोलार्धातील देशांच्या तुलनेत अधिक सधन, अधिक विकसित आहेत, हे दाखवून देणे अभिप्रेत आहे. मुळात ही मांडणीच चुकीची आहे. यातून एक तर वसाहतवादाची मानसिकता दिसून येते आणि ही विभागणी भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्याही खरी नाही. तरीही ती आपणाकडून रेटली जाते. याचे कारण इतरांना आपल्याकडे बळेबळे ओढण्याचा आपला प्रयत्न. अलीकडेच दिल्लीत झालेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेत हा ‘ग्लोबल साउथ’ मुद्दा मिरवला गेला. जगाची निम्म्याहून अधिक अर्थव्यवस्था या ‘ग्लोबल साउथ’मध्ये दडलेली आहे, अशी शेखीही मिरवली गेली. पण या ‘निम्म्याहून अधिक’ अर्थव्यवस्थेत जवळपास ८०-९० टक्के वाटा एकट्या चीनचाच आहे. म्हणजे बाकीचे देश तसे कफल्लक. आणि दुसरे असे की आज अमेरिकेस टक्कर देणारा चीन हा या ‘ग्लोबल साउथ’मध्ये गणला जातो. तो कसा? सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती, ब्रुनेई असे अत्यंत धनाढ्य आणि विकसित देश या भागात आहेत. त्यांनाही या ‘विकसनशील’ गटात ओढण्याचा आपला प्रयत्न हास्यास्पद. तेव्हा खरे तर ही ग्लोबल साउथ, ग्लोबल नॉर्थ ही वर्गवारीच कालबाह्य आहे. आता ती सोडून द्यायला हवी.
त्याचे कारण असे की त्यामुळे ‘ग्लोबल साउथ’ देशांच्या कथित सामथ्र्याविषयी उगाच आदराची भावना निर्माण केली जाते. ‘ग्लोबल साउथ’च्या हाती जगाची आर्थिक सूत्रे कशी आहेत वगैरे वल्गना केल्या जातात. त्या अत्यंत पोकळ आहेत. यातील कथित ‘ग्लोबल साउथ’मधील चीन आणि वर उल्लेखलेले काही मोजके देश सोडले तर अन्य हे फक्त विकसित देशांच्या बाजारपेठा आहेत. चीनशी आपली सीमा जोडलेली आहे म्हणून आपण आणि चीन बरोबरी होऊ शकत नाही. ते करणे अज्ञानदर्शक ठरेल. ‘ग्लोबल साउथ’ ही संकल्पना रेटण्यामागे असा प्रयत्न आहे. पूर्वी अलिप्त राष्ट्रांचा गट असे. ते ना अमेरिकावादी होते ना रशियावादी. वास्तविक स्वत:स अलिप्त म्हणवून घेणे ही त्यांची अपरिहार्यता होती कारण या गटातील देश दोघांवरही अवलंबून होते. ज्येष्ठ संपादक गोविंदराव तळवलकरांनी अशा अलिप्त राष्ट्र मेळाव्याचा समाचार घेताना त्यास ‘भिकार्यांचे संमेलन’ असे संबोधले होते. चीन वगळता हे ग्लोबल साऊथ आता तितके नसेल. त्याचे वर्णन ‘याचकांचा यज्ञ’ असे रास्त ठरेल. या गटातील देशांना भीषण अन्नटंचाई भेडसावेल असे भाकीत वर्तवून जयशंकर त्यांचे याचकपण अधोरेखित करतात. अशा याचकांच्या यज्ञास कोणीही भीक घालत नाही.
