अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान नरसंहारी नेतान्याहू आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन अशा तिघांशीही दोस्ताना असला आणि त्यांचा निवडणुकीत पाठिंबा मिळवला, काही निवडक उद्योगपतींनाच सरकारी कंत्राटे मिळतील असेच निर्णय राबवले, निवडणूक प्रक्रियेत स्वत:ला सोयीचे बदल घडवले, न्यायव्यवस्थेस आपल्या अंगठ्याखाली आणले, समाजमाध्यमात जल्पकांच्या टोळ्या पोसल्या आणि संपूर्ण देशात स्वत:ची दहशत निर्माण केली तरीही या सगळ्या-सगळ्याची कसलीही तमा न बाळगता हंगेरियन नागरिकांनी निवडणुकीत पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान यांना धूळ चारली. लोकशाहीतील सळसळ जिवंत ठेवण्याचे आणि जगातील अन्य लोकशाही देशांस त्यातून प्रेरणा देण्याचे सांप्रतकाली असाध्य वाटणारे काम साध्य करून दाखवल्याबद्दल हंगेरियन नागरिकांचे अभिनंदन करावे तितके थोडे. या निकालामुळे ओर्बान यांची तब्बल १६ वर्षांची धर्मवादी, वंशवादी, प्रतिगामी राजवट संपुष्टात येईल. हंगेरी देश तो केवढा. तरीही या निवडणुकीकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले होते. याचे कारण युरोपातील सहिष्णू, सभ्य आणि सुसंस्कृत समाजजीवन नासवण्याचे पाप या ओर्बान यांनी आपल्या राजकीय विचारधारेद्वारे गेले दीड दशक सातत्याने केले. त्यामुळे त्यांचा पराभव होणे ही जगभरातील समस्त लोकशाहीप्रेमींसाठी काळाची गरज होती. ओर्बान राजकीयदृष्ट्या टोकाचे उजवे होते इतकाच त्यांच्याबाबतचा आक्षेपाचा मुद्दा नाही. किंबहुना ते राजकीय विचारधारेच्या उजवीकडे होते की डावीकडे हा मुद्दाच नाही. तर ते माणूस म्हणून अत्यंत असहिष्णू आणि हुकूमशाही प्रवृत्तीचे होते हे त्यांच्या हीनतेचे – आणि त्यामुळे त्यांच्या पराभवाची गरज निर्माण होण्याचे – खरे कारण. जवळपास आठ दशकांपूर्वी एका अशा टोकाच्या उजव्या, असहिष्णू राज्यकर्त्याने युरोपीय भूमीतून विनाशाची बीजे रोवली. त्याच्या पापाच्या पाऊलखुणा अजूनही पूर्णपणे मिटलेल्या नाहीत. ओर्बान ही त्यातील एक. म्हणून त्यांचा पराभव होणे गरजेचे होते. तसा तो झाला. म्हणून त्याची दखल घेणे गरजेचे.

पूर्णपणे लोकशाही मार्गांनी निवडून आल्यावर लोकशाहीचा गळा आवळणे सुरू करायचे या सध्या देशोदेशी दिसून येत असलेल्या प्रारूपाचे ओर्बान हे खंदे पाईक. ते २०१० साली सत्तेवर आले आणि लगेच निवडणूक प्रक्रियेतील सोयीस्कर बदलांपासून ते माध्यमांच्या गळचेपीपर्यंत सर्व उद्योगांस त्यांनी सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी जुळवून घेतले ते रशियातील पुतिन यांच्याशी. असहिष्णुतेसाठी कुख्यात पुतिन हे ओर्बान यांचे पाठीराखे बनले. पुढे अमेरिकेत ट्रम्प यांचा उदय झाल्यावर ओर्बान हे ट्रम्प यांचेही भक्त बनले. ट्रम्प यांना युरोपात कोणा समविचारीची गरज होती आणि ओर्बान यांस अमेरिकेच्या दणकट आर्थिक पाठिंब्याची निकड होती. या दोन्ही गरजा एकमेकांनी एकमेकांच्या भागवल्या. त्यात पुन्हा धर्म, राष्ट्रवाद इत्यादी मुद्द्यांवर ट्रम्प आणि ओर्बान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटावेत इतके एकास-एक पूरक. दोघांसही लोकशाहीपेक्षा अधिक आकर्षण हुकूमशाहीचे. त्यामुळे ओर्बान हे ट्रम्प यांचे युरोपातील हस्तक बनले. मुद्दा युक्रेनचा असो की इस्रायलला वेसण घालण्याचा. ओर्बान यांनी नेहमीच ट्रम्प यांची तळी उचलली. आताच्या निवडणुकांतही ट्रम्प यांचा ओर्बान यांना ‘सक्रिय’ पाठिंबा होता. इतका की अखेरच्या टप्प्यात ट्रम्प यांनी आपले उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांना ओर्बान यांच्या प्रचारात उतरवले. व्हान्स यांनी हंगेरीतील निवडणुकीत जोरदार प्रचार केला आणि युरोपला पुन्हा एकदा महान करण्यासाठी ओर्बान यांच्या निवडीची निकड व्यक्त केली. मतदारांनी त्यास केराची टोपली दाखवली. याचा अर्थ हंगेरी या कोटभर लोकसंख्याही नसलेल्या देशातील निवडणूक निकालाची एक थप्पड अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुखी रंगेल. आणि दुसरी नरसंहारी नेतान्याहू यांच्या. युरोपीय महासंघाने नेतान्याहू यांच्याविरोधात जेव्हा जेव्हा कारवाईची भाषा केली तेव्हा प्रत्येक वेळी ओर्बान यांनी मोडता घातला आणि युरोपीय महासंघाचे निर्णय एकमतानेच होत असल्याने नेमका अशा वेळी नकाराधिकार वापरून नरसंहारी नेतान्याहू यांस वाचवले. या निवडणुकीत त्या कृतज्ञतेची परतफेड करण्यासाठी नेतान्याहू यांनी अप्रत्यक्षपणे ओर्बान यांचा प्रचार केला. नरसंहारी नेतान्याहूंचे चिरंजीव प्रत्यक्ष प्रचारात हंगेरीत मुक्काम ठोकून होते, असे म्हणतात. युरोपीय महासंघातर्फे इस्रायलविरोधात निंदाव्यंजक ठराव मांडण्याचा मुद्दा असो वा त्याविरोधात निर्बंधांचा प्रस्ताव असो. या सगळ्यास ओर्बान यांच्याकडून खोडा घातला गेला. जेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नरसंहारी नेतान्याहूंविरोधात अटक आदेश काढले त्या वेळी हंगेरी या एकमेव युरोपीय देशाने त्यास विरोध केला आणि या न्यायव्यवस्थेतून हंगेरी बाहेर पडला. ओर्बान यांचा पराभव हंगेरीच्या आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेतील पुनरागमनाचा प्रारंभ सूचित करतो. आजमितीस फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी आणि इतकेच काय स्पेनसारखे देशही नरसंहारी नेतान्याहूंच्या विरोधात ठामपणे उभे राहत असताना हंगेरीतील ओर्बान यांचा अडथळा दूर होणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

ओर्बान यांच्या पराभवातील काव्यात्म न्याय म्हणजे ज्यांनी त्यांस हरवले त्याची पार्श्वभूमी. पीटर माग्यार हे ओर्बान यांस पराभूत करणारे विरोधी पक्षीय नेते एके काळचे ओर्बान यांचेच सहकारी. ओर्बान यांच्या भ्रष्टाचारास कंटाळून त्यांनी दोन वर्षांपूर्वी स्वत:ची वेगळी चूल मांडली. ओर्बान यांचा भ्रष्टाचार म्हणजे काही विशिष्ट उद्योगपतींचेच भले होईल अशी धोरणे. त्यांचा ‘टिसा’ हा पक्ष डावा नाही. म्हणजे ओर्बान यांच्या उजव्या पक्षास डाव्या विचारसरणीधारी पक्षाने हरवले असे झालेले नाही. माग्यार यांचा पक्षही उजवाच; पण मध्यबिंदूस जवळचा. ओर्बान यांच्यासारखा टोकाचा उजवा नव्हे. अमेरिकेत ज्याप्रमाणे बर्नी सँडर्स उजवीकडच्यांतील डावे मानले जातात त्याप्रमाणे माग्यार यांची भूमिका. ते कडवे युरोपवादी. उदारमतवादी पाश्चात्त्य देशांप्रमाणे हंगेरीस काहीएक मूल्यांसाठी उत्तरदायी बनवणे हे त्यांचे ध्येय आहे. याचा अर्थ पुन्हा स्पष्ट करण्याची गरज नसावी. ट्रम्प यांच्या हडेलहप्पीनंतर युरोपीय संघात एक प्रकारचा दुभंग तयार झाला. त्यास ओर्बान यांनी सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा अस्त हा पुन्हा एकदा युरोपसाठी संजीवनी ठरू शकतो. यावर; ‘एकट्या ओर्बान यांस काय दोष देता, ते कसे काय इतका दुष्परिणाम करू शकतील’, अशा छापाची प्रतिक्रिया येणारच नाही असे नाही. या अशा प्रतिक्रियावाद्यांस सांगावयास हवे की खोलीभर पसरलेल्या आंब्याच्या अढीस नासवण्यासाठी एक नासका आंबा पुरेसा असतो. ओर्बान हे युरोपचा असा नासका आंबा होते. हंगेरीतील नागरिकांनी स्वहस्ते हा नासका आंबा मतपेटीद्वारे दूर केला. म्हणून ही बाब समजून घेणे महत्त्वाचे.

या निवडणुकीत ओर्बानविरोधी मत इतके निर्णायक आहे की त्यांच्या विरोधकांना दोनतृतीयांश बहुमत मिळाले. तेही मतदान जवळपास ८० टक्के इतके विक्रमी झालेले असताना. याचा अर्थ तेथील सुशिक्षित जनता ओर्बान यांच्या हाती श्रीफळ देण्यासाठी अत्यंत आतुर होती. मध्य युरोपातील हा लहानसा देश ऑस्ट्रिया, स्लोवाकिया ते स्लोवेनिया अशा अनेक देशांस खेटलेला असून पूर्व आणि पश्चिम युरोपमधील एक महत्त्वाचा दुवा आहे. एके काळी साम्यवादी प्रभावाखाली असलेला हंगेरी आज जगातील प्रगत देशांत गणला जातो. या इतक्याशा देशाने एक डझनापेक्षा अधिक नोबेल विजेते दिले. दशकभरापूर्वी ज्याच्यात्याच्या हाती दिसत असे त्या ‘रुबिक क्यूब’चा जन्म हंगेरीतील. हे ‘रुबिक क्यूब’चे कोडे सोडवण्यासाठी बुद्धी वापरावीच लागते. अजेय मानल्या जाणार्‍या ओर्बान यांस पराभूत करून हंगेरियन नागरिकांनी लोकशाहीचा रुबिक क्यूब कसा सोडवता येतो हे दाखवून दिले. जगभरातील सच्च्या लोकशाहीवाद्यांत हंगेरीच्या या निकालाने आनंद पसरला आहे त्यामागील कारण हे.