सत्ताधार्यांस जाब विचारणे या निसर्गदत्त कर्तव्याचा विसर विरोधकांस पडला की काय, या स्थितीत सुधारणा होण्याची धुगधुगी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने दिसली…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालाची तपपूर्ती दणक्यात साजरी होत असताना पूर्वसंध्येस विरोधी पक्षीय ‘इंडिया’ आघाडीची बैठक भरावी हा करुण योगायोग. त्या कारुण्यास ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल फुटीची वेदनादायी साथ मिळाल्याने ही बैठक म्हणजे लो-बजेट कृष्ण-धवल आर्ट फिल्म ठरली. पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांना आणि तमिळनाडूत एमके स्टालिन यांना सत्ता राखण्यात यश आले असते तर हे दोघेही या बैठकीत घोड्यावरून आले असते. तसे न झाल्याने ममता बॅनर्जी यांना या बैठकीत टाचा घासत यावे लागले आणि स्टालिन हे काँग्रेसवर रुसलेले असल्याने दिल्लीत फिरकलेही नाहीत. आज पश्चिम बंगालात जे ममतांचे होत आहे त्याचा पूर्वानुभव असलेले उद्धव ठाकरे या बैठकीत दूरस्थ सहभागी झाले आणि इंडिया आघाडीचा दुसरा महाराष्ट्री घटक असलेल्या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यातूनच या बैठकीत सहभागी होणार्यांना ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ सुनावल्या. त्याचा अर्थ हवा तसा काढण्याची शक्यता त्यांनी सर्व संबंधितासाठी नेहमीप्रमाणे खुली ठेवली. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे मात्र या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी झाल्या. तसेच कोणत्याच राज्यात कसलेच काम नसल्याने डावेदेखील सदेह सहभागी झाले. या बैठकीस नाही नाही म्हणता २३ पक्षांनी हजेरी लावली. अशा बैठकांत भरीव काही ठरणे अपेक्षित नसते. येथेही तसेच झाले. तरीही या बैठकीची दखल घेणे आवश्यक. त्यामागील प्रमुख कारणे दोन.
पहिले विरोधी पक्षांच्या अस्तित्वाबाबत. गेल्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताच्या आत रोखण्यात विरोधकांस यश आल्यानंतर त्यांचे बस्तान अधिक चांगले बसेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात झाले उलटेच. लोकसभा निवडणुकीत ‘चारसो पार’चा अतिआत्मविश्वास दाखवणारा भाजप निकालातील चपराकीने भानावर आला आणि नंतरच्या सर्व विधानसभा निवडणुका जिंकता झाला. लोकसभा निवडणुकीत भाजपस रोखण्याच्या मर्यादित यशाने विरोधक हुरळून जात असताना मर्यादित अपयशाने भाजप खचला तर नाहीच; उलट अधिक जोमाने कामास लागला. हे विधानसभा पराभव इंडिया आघाडीसाठी इशारा होते. ते समजण्यात हे राज्या-राज्यांतील ‘इंडिया’ सुभेदार सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे त्यांचा पुरता मुखभंग होत गेला. महाराष्ट्र, तमिळनाडू वा पश्चिम बंगाल आदी राज्यांत भाजप यशस्वी होणार नाही असेच विरोधक मानून चालले. गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘चारसो पार’चा दावा करताना भाजप स्वत:विषयी जितका भ्रमात राहिला तितकेच विरोधी पक्ष विविध विधानसभा निवडणुकांत निवांत राहिले. महाराष्ट्रात निवडणुकांआधी मुख्यमंत्रीपदावरून जाहीर भांडणारे शिवसेना-काँग्रेसचे बोलघेवडे ते पश्चिम बंगालात स्वत:स शहाणे समजणारे भद्रलोकी बाबूमोशाय अशा सर्वांनाच भाजपने त्यांची जागा दाखवून दिली. सतत २४ तास राजकारण करणारा, कष्ट घेणारा भाजप आणि निवडणुकांपुरते आपापल्या बिळांतून बाहेर येणारे हे विरोधी नेते यांच्यातील संघर्षात कोण जिंकेल याचे उत्तर देण्यास राजकीय पांडित्याची गरज नाही. अशा तर्हेने लोकसभा निवडणुकांनंतर दोन वर्षांत सगळ्या विरोधी नेत्यांची संस्थाने खालसा झाली आणि अखेर या सर्वांस एकत्र यावे लागले. या बैठकीची दखल घेण्याचे हे एक कारण.
आणि दुसरे कारण म्हणजे बौद्धिक चापल्य, शहाणपण हरवत चाललेला सत्ताधारी भाजप. हे वास्तव पाहिल्यास विरोधी पक्षीयांस एकत्र येण्यासाठी आताइतका चांगला मुहूर्त नाही. भाजप हा राजकीयदृष्ट्या आज अजेय भासत असेल. पण हे वास्तव निवडणुकीच्या राजकारणापुरतेच मर्यादित. एरवी आपल्या सत्तेची तपपूर्ती करणारा हा पक्ष आर्थिक, आंतरराष्ट्रीय इत्यादी आव्हानांस सामोरे जाण्यात कल्पनाशून्यता दाखवू लागला आहे. एखादी तरुणपणी व्यायाम केलेली व्यक्ती उत्तरायुष्यात शारीरिकदृष्ट्या ठणठणीत दिसावी पण बौद्धिक, मानसिक पातळीवर दुर्बल होत जावी तसे भाजपचे आजचे वास्तव. आज कोणत्याही आंतरराष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत भारत नाही. गेल्या वर्षी काश्मीर हल्ल्यानंतर पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटे पाडण्याचा आपला प्रयत्न त्या देशाने अधिक चातुर्य दाखवून उलटवला. आज अमेरिकेस आपल्यापेक्षा पाकिस्तान अधिक जवळचा वाटतो यामागे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा लहरीपणा असेलही; पण आज पाकिस्तान आपला दुसरा प्रतिस्पर्धी चीनलाही जवळचा आहे. ताज्या युद्धात इराणला दुखावून आपण आपला एक समर्थक गमावलेला आहे, आर्थिक आघाडीवर रुपयाची लक्तरे दररोज समोर येत आहेत आणि बेरोजगारांची वाढती संख्या असहायता अनुभवते आहे. न्यायिक वा अन्य कोणत्याही स्वायत्त यंत्रणेविषयी बरे बोलावे अशी परिस्थिती नाही. आणि नेमक्या अशा वेळी ‘सत्ताधार्यांस पर्याय नाही’ अशी स्थिती असेल तर हे वास्तव लोकशाहीसाठी पोषक नाही. अशा परिस्थितीत सत्ताधार्यांस सळो की पळो करून सोडण्यासाठी तगडा विरोधी पक्ष हवा. तसे वाटून हे विरोधक ‘इंडिया’ आघाडीच्या निमित्ताने एकत्र आले म्हणून ही घटना दखलपात्र.
याचा अर्थ भाजप आता पराभवाच्या वाटेवर आहे असा अजिबात नाही. विवेकशक्ती पूर्णांशाने गमावलेल्यांखेरीज असे कोणी मानणार नाही. पण ही परिस्थिती सत्ताधार्यांची धोरणशून्यता अधिकाधिक उघडी पाडण्यासाठी आदर्श आहे हेदेखील कोणी अमान्य करणार नाही. अशा वेळी सत्ताधार्यांस जाब विचारणे हे आपले निसर्गदत्त कर्तव्य आहे याचा विसर विरोधकांस पडला असावा असे त्यांचे वर्तन. त्यात सुधारणा होण्याची धुगधुगी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने दिसून आली. त्याची गरज होती. ती पूर्ण झाल्यानंतर आता या आघाडीस एक पथ्य पाळावे लागेल.
ते म्हणजे पर्यायी कार्यक्रम देणे. केवळ सत्ताधारी अकार्यक्षम आणि नाकर्ते आहेत हे इतकेच भांडवल कोणत्याही विरोधकांस पर्याय ठरण्यासाठी पुरेसे नसते. आपल्याकडे पर्यायी कार्यक्रम आहे याची खात्री विरोधकांनी नागरिकांच्या मनात निर्माण करायची असते. हे कसे करायचे असते याचा विसर विरोधकांस पडला असेल तर त्यांनी २०१२ पासून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे वर्तन अभ्यासावे. भ्रष्टाचारापासून ते घसरत्या रुपयापर्यंत आणि धगधगत्या काश्मीरपासून खदखदत्या ईशान्येपर्यंत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे आहे असे वातावरण मोदी यांनी त्यावेळी एकहाती निर्माण केले. त्याहीवेळी त्यांच्या पक्षाचे संपूर्ण सहकार्य त्यांस होते असे नाही. तरीही मोदी यांनी आपले घोडे दामटले. त्यावेळी त्यांनी जे जे दावे केले त्यातील एकही त्यांना पूर्ण करता आलेला नाही असे आता जरी अनेकांस वाटत असले तरी त्यावेळी त्यांच्याबाबत विश्वास निर्माण झाला, हे नाकारता येणार नाही. स्वत:विषयी विश्वास निर्माण करण्यात मोदी यांना त्यावेळी आलेले यश जनतेच्या मनात काँग्रेसविषयी अविश्वास निर्माण होण्यास कारणीभूत ठरले.
सबब यापुढे इंडिया आघाडीने विद्यमान सत्ताधारी कसे चुकत आहेत इतकेच सांगू नये. ते जनता जाणते आणि अनुभवते आहेच. या सत्याच्या पलीकडे जात आपली धोरणे विद्यमान सत्ताधीशांच्या धोरण धरसोडीस पर्याय आहेत असा विश्वास मतदारांच्या मनात निर्माण करण्यास इंडिया आघाडीने यापुढे प्राधान्य द्यावे. वातावरणात ‘चारसो पार’ भरून राहिलेले असतानाही मतदारांनी विद्यमान सत्ताधीशांस साधे बहुमतही दिले नाही, हे महत्त्वाचे सत्य विरोधकांनी विसरू नये. नकारात्मकता आणि निराशा झटकून विरोधकांनी कामाला लागावे. ‘‘एकही सिंहगड सापडायचा नाहीं, कीं ज्यावर घोरपड लावायला द्रोणागिरीचा कडा नाहीं’’, असे राम गणेशांच्या ‘राजसंन्यासा’तील जिवाजीपंत म्हणतो. हा कडा शोधण्याचे कौशल्य विरोधकांस विकसित करावे लागेल. ते मुळीच अशक्य नाही.
