अमेरिकेशी करार हा काही जीवनमरणाचा प्रश्न नाही हे खरे आणि रशियन तेल आपल्याला हवेच. पण स्पष्टतेचा अभाव आपली असमर्थता दर्शवणारा ठरतो…

भारत आणि अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापार कराराचा विषय ‘अगदी संपल्यात जमा’ (ऑल्मोस्ट डन ॲण्ड डस्टेड) असे आपण जाहीर केल्यानंतर आठवडाभराने अमेरिका जर ‘चर्चा सुरू आहे पण करार व्हायलाच हवा असे नाही’ (डील अनाऊन्समेंट नॉट इमिनंट) तर त्याचा अर्थ नक्की काढायचा कसा? कराराचा मुद्दा निकालात निघाल्याची घोषणा आपले व्यापारमंत्री पीयूष गोयल यांनी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राजधानी दिल्लीत केली. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली आणि त्यानंतर करारावर अंतिम हात फिरवण्यासाठी वा त्यास मूर्त स्वरूप देण्यासाठी गोयल हे अमेरिकेत गेले. तेथे ‘जी२०’ देशगटाच्या व्यापारमंत्र्यांच्या परिषदेत ते सहभागी झाले. या परिषदेनिमित्ताने त्यांची अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर ग्रीर यांनी हे विधान केले. भारत-अमेरिका यांच्यातील चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे… त्याची परिणती म्हणून उभयतांत करार व्हायलाच हवा असे काही नाही, हे त्यांचे वक्तव्य वास्तव स्पष्ट करण्याऐवजी ते अधिकच झाकते. अशा वेळी या कराराचे भिजत घोंगडे नक्की कोठे अडले आहे हे सांगण्याची जबाबदारी भारताने घ्यावी. कारण या कराराच्या प्रक्रियेस दीड वर्ष होऊन गेले. ती पुढे सरकतच नसेल तर अडचण आहे कोठे हे जनतेस समजायला हवे. अमेरिकी व्यापारमंत्र्याच्या या ताज्या विधानाच्या पार्श्वभूमीवर या करार प्रक्रियेचा आढावा आवश्यक ठरतो.

या प्रक्रियेच्या सुरुवातीची घोषणा झाली २०२५ सालच्या फेब्रुवारी महिन्यात. तीनुसार त्या वर्षाच्या ऑक्टोबरपर्यंत किमान स्वीकारार्ह व्यापार कराराची चौकट निश्चित केली जाणे अपेक्षित होते. ते झाले नाही. त्यानंतर उभयतांत आयातशुल्कादी मुद्द्यांवर ‘लघु करार’ (मिनी डील) व्हावा असे प्रयत्न झाले. ते फसले. नंतर यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात पुन्हा एकदा कराराच्या आणाभाका झाल्या आणि काही किमान मुद्द्यांवर एकमत तयार करून ‘व्यापक व्यापार करार’ प्रत्यक्षात येण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्याचे ठरले. ती चर्चा सुरू राहिली; पण ‘काही किमान’ मुद्द्यांवर एकमत काही होऊ शकले नाही. तरीही ट्रम्प यांनी आपल्या सवयीशी इमान राखत उभयतांतील कथित कराराची घोषणा परस्पर करूनही टाकली. त्याआधीच्या आठवड्यात आपले वाणिज्यमंत्री गोयल यांनी ‘‘पुढील चार-पाच दिवसांत कराराचा मसुदा प्रसृत होईल’’ अशी घोषणा केली होती. नंतर ट्रम्प यांनी हे विधान केल्याने उभय देशांत सर्व काही आलबेल असल्याचे चित्र निर्माण झाले.

पण ते किती फसवे होते हे दीड वर्षानंतर ग्रीर यांच्या नि:संदिग्ध प्रतिपादनातून स्पष्ट होते. त्यावेळच्या जाहीर तपशिलानुसार भारतीय उत्पादनांवर अमेरिकेत आकारला जाणारा आयात कर आता १८ टक्के इतका होणे अपेक्षित होते. त्यानुसार गोयल यांनी तर पुढे जाऊन कोणकोणत्या भारतीय उत्पादकांस याचा फायदा होईल याचा तपशील सादर केला. मोटारींचे/ विमानांचे सुटे भाग, चहा, औषधे, हिरे निर्यातदार आदी अनेक क्षेत्रांतील उद्योगांस या करारामुळे व्यापक व्यापारसंधी निर्माण होणे अपेक्षित होते. त्या बदल्यात भारताकडून काय काय सवलती अमेरिकी उत्पादनांस दिल्या जातील, हे स्पष्ट केले गेले. भारतीय शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करून आपण सोयाबीन, सोया तेल, मका, मक्यापासून बनवलेले इथेनॉल वगैरेंच्या शुल्क मुक्त वा अल्पशुल्क आयातीस होकार दिला नाही. पण अमेरिकेत मक्यापासून इथेनॉल बनवले गेल्यानंतर उरलेल्या चिपाडांचे पशुखाद्य भारतात येऊ देण्याचे ठरले. अमेरिकी पशुखाद्यांत प्रथिनांचे प्रमाण आपल्या पशुखाद्यापेक्षा अधिक असते. कारण आपले पशुखाद्य सोयाबीन वा सरकी यांच्यातील तेल काढून घेतल्यानंतर उरलेल्या कडब्यापासून बनते. तर अमेरिकेचे मक्याच्या चिपाडापासून. त्यामुळे आपल्या पशूंस चांगल्या दर्जाचे अमेरिकी पशुखाद्य मिळण्याची सोय झाली. पण पुढे काहीच घडले नाही. अर्थात त्यामुळे आपले सोयाबीन उत्पादक आनंदले असतील. आधीच सोयाबीनच्या दरांचा मुद्दा. त्यात त्याची पशुखाद्य बनवण्याची उपयुक्तताही कमी झाली तर उत्पादकांची अधिकच पंचाईत. ती होणे तूर्त टळले. ट्रम्प यांनी ‘जाहीर केलेल्या’ करारानुसार युरोपप्रमाणे अमेरिकी वाइनही आता भारतात अधिक मुबलक आणि अधिक स्वस्त उपलब्ध अपेक्षित होते. तेही झाले नाही. हे सर्व मुद्दे तसे पाहू गेल्यास किरकोळ. भारत-अमेरिका यांच्यातील संभाव्य व्यापार करारात खरी अडचण आहे ती रशियन तेलाचे आपण काय करणार, ही. आपण रशियन तेल खरेदी करत राहिल्यास भारतीय उत्पादनांवर १०० टक्के आयातशुल्क आकारण्याचा इशारा ट्रम्प यांनी नुकताच दिला. आपणास दररोज ५५-५८ लाख बॅरल्स खनिज तेल लागते. त्यातील ८२-८५ टक्के इतके तेल आपण आयात करतो. कारण ते आपल्या देशात पिकत नाही. त्यातही या परदेशी तेलापैकी ३५ टक्के तेल आपण रशियाकडून घेतो. ती खरेदी पूर्ण बंद करणे आपणास परवडणार नाही, हे उघड आहे. पण ‘रशियन तेल आम्ही खरेदी करणारच’ असे नि:संदिग्धपणे आपण स्पष्ट केलेले नाही. अमेरिका-भारत यांच्यातील संभाव्य व्यापार करारावर भाष्य करताना ट्रम्प यांनी परस्पर ‘‘भारत यापुढे रशियन तेल खरेदी करणार नाही’’ असे विधान केले होते. आता पुन्हा १०० टक्के आयातशुल्काचा इशारा त्यांनी दिला. म्हणजे या ‘तेलकट’ प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. गेल्या वेळी ट्रम्प यांनी भारताकडून रशियन तेल खरेदी बंद होते किंवा काय हे तपासण्यासाठी एका समितीची घोषणाही केली होती. ते अपमानास्पद होते. त्याउप्पर भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यास भारतास दिलेल्या आयात करार सवलतींचा फेरविचार करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता.

या करारासंदर्भात भारत पुढील पाच वर्षांत अमेरिकेकडून ५०,००० कोटी डॉलर किमतीच्या उत्पादनांची खरेदी करेल; अशीही घोषणा केली होती. तसे करावयाचे तर वर्षाला १०,००० डॉलरची खरेदी आपणास अमेरिकेकडून करावी लागेल. सध्या वर्षभरात आपण जेमतेम ४१०० डॉलर किमतीच्या वस्तू अमेरिकेकडून घेतो. ट्रम्प म्हणतात तसे करावयाचे तर वर्षाला दुपटीपेक्षा रकमेची खरेदी अमेरिकेकडून करावी लागणार. हे आपण कसे करणार; ही बाब अद्यापही अस्पष्टच आहे. ते सर्व या कराराच्या अंतरिम मसुद्यात होते, असा युक्तिवाद यावर करता येईल. ते ठीक. पण अंतरिमचे रूपांतर अंतिम मसुद्यात होताना यात नक्की बदल काय होणार हे तरी एव्हाना स्पष्ट व्हायला हवे. पण कोणत्याच मुद्द्यावर कसलीच स्पष्टता नाही. ना अमेरिका काही सांगते ना आपण काही त्यावर भाष्य करतो.

असे असताना हा करार आता झाल्यातच जमा आहे, असे सांगणार आणि अमेरिकी प्रतिनिधी म्हणणार करार होईलच असे नाही. हे गोंधळ वाढवणारे आहे. हा गोंधळ केवळ वृत्ताबाबतचा नाही. तर बाजारपेठेचाही आहे. तो अधिक गंभीर. तेव्हा अधिक वेळ न दवडता भारताने तरी हा नक्की कोणत्या मुद्द्यावर अडलेला आहे, हे सांगायला हवे. अमेरिकेशी करार हा काही जीवनमरणाचा प्रश्न नाही. तेव्हा त्याची इतकी तमा बाळगण्याचे कारण नाही. नक्की काय अडले आहे आणि कोठे हे जरी कळले तरी पर्यायाचा विचार आणि कृती करता येईल. त्या अभावी नुसतीच संदिग्धता आपली असमर्थता दर्शवते. ती शोभणारी नाही.