शहरी आणि ग्रामीण भारतीय बससारख्या सामूहिक संसाधनांपेक्षा स्कूटर/ बाइकलाच पसंती का देतात, हा प्रश्न धोरणकर्त्यांना पडत कसा नाही?

‘गरिबांकडेही स्वत:च्या गाड्या असलेला देश विकसित नसतो… जिथे श्रीमंतसुद्धा सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर सर्रास करतात, तो देश विकसित’ या विधानाचे महत्त्व ते कोणी केलेले आहे यावरच ठरेल, इतके ते कच्चे आहे का? सार्वजनिक वाहतूक भरवशाची असणे म्हणजे विकास, असे सूत्र मांडणारे हे विधान कुणा नोबेल विजेत्या अर्थशास्त्रज्ञाचे किंवा चर्चिल ते ओबामा यांपैकी कुणा ब्रिटिश/ अमेरिकी नेत्याचे असते, तर त्याची लोकप्रियता अधिक असती हे खरे. पण डाव्या क्रांतीच्या आकर्षणापायी अर्थशास्त्रातली पीएच.डी. तरुणपणीच अर्धवट सोडलेले कोलंबियाचे माजी राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांचे ते विधान आहे, एवढ्याने त्याचे महत्त्व कमी होईल? या विधानाच्या दुसर्‍या भागाचा पडताळा सिंगापूर, न्यू यॉर्क, झुरिच, हाँगकाँग आदी विकसित शहरांमधली सार्वजनिक वाहतूक अनुभवताना येतो; तर पहिल्या भागाचा खरेपणा पुणे, मुजफ्फरनगर, डोंबिवली, काकिनाडा यापैकी कुठल्याही ठिकाणच्या चौकाचौकातून उसळणार्‍या स्कूटर/ मोटरसायकली चुकवताना पटतो. या खरेपणावर आता भारत सरकारच्याच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी खात्यानेही ‘शहरांमधला प्रवास’ या ताज्या सर्वेक्षणातून शिक्कामोर्तब केले आहे. हा प्रवास तुलनेने स्वस्त अशा सार्वजनिक बस सेवेने कमी, तर स्वत:च्या वाहनांनी किंवा रिक्षाने करण्याकडे कल अधिक, हाच ढोबळ निष्कर्ष ताज्या सर्वेक्षणातूनही निघतो. ‘हे आम्हाला माहीतच आहे- त्यासाठी सर्वेक्षण कशाला हवे’ असे वाचक म्हणू शकतात. पण सर्वेक्षणाचे महत्त्व हे की, ‘कामावर जातानाचे तुमचे हाल आम्हाला माहीत नाहीत’ – असे म्हणण्याची सोय आता सरकारला उरलेली नाही. ही नमुना पाहणी १४ हजार २७४ खेड्यांत आणि १० हजार ३७७ शहरी विभागांत जून २०२५ ते जुलै २०२६ असे सुमारे वर्षभर सुरू होती, तीत २० लाख उत्तरदात्यांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे ती प्रातिनिधिक. या पाहणीतून दोन महत्त्वाच्या बाबी उघड झाल्या.

त्यापैकी पहिली म्हणजे महिलांना सोसावा लागणारा त्रास. ग्रामीण/ शहरी, चारचाकी मोटारवाले आणि दुचाकीवाले अशा गटांच्या या पाहणीतून उघड झाले की, भारताच्या शहराशहरांत निम्म्याहून अधिक- ५७ टक्के- पुरुष आणि २५ टक्के महिला कामावर जाण्यासाठी आपापल्या दुचाक्यांवरच विश्वास ठेवतात. ग्रामीण भागातल्या पुरुषांमध्ये रिक्षाचा (४.७ टक्के) आणि बसचा (४.४ टक्के) वापर करण्याच्या प्रमाणात फार फरक नाही, तसा शहरी पुरुषांतही (रिक्षा ७.५ टक्के तर बस ६.९ टक्के) फारसा नाही. पण महिलांमध्ये मात्र बसने जाण्याचे प्रमाण ग्रामीण भागात ९.९ टक्के, शहरांत २१.७ टक्के; तर रिक्षाने जाणार्‍या महिला अनुक्रमे १५.८ आणि ६.५ टक्के इतका फरक दिसतो. बहुतेक ठिकाणी शेअर रिक्षा सुरू झाल्याचा आणि पुरुषांच्या बस/रिक्षा प्रमाणात फरक नसल्याचा काही संबंध आहे का, हा प्रश्नच या सर्वेक्षणात नव्हता. पण किमान काही शहरी महिलांच्या मनात तो नक्की असेल. असाच दुसरा- सर्वेक्षणात नसलेला पण अनेकांच्या मनात असलेला प्रश्न म्हणजे महिलांचा कल बसकडे असण्यात कर्नाटक, केरळ, तमिळनाडूसारख्या राज्यांत ‘महिलांना मोफत प्रवास’ आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांतल्या काही शहरांत ‘महिलांना निम्मे प्रवासभाडे’ या सवलतींचा वाटा किती? हे असे न विचारले गेलेले प्रश्न प्रत्येक सर्वेक्षणात असतातच. त्यामुळे काही वेळा आकडे प्रथमदर्शनी चक्रावणारे भासतात. उदाहरणार्थ, शहरांमध्ये स्वत:च्या मोटारीने कामावर जाणार्‍यांत मात्र महिलांचे प्रमाण (६.८ टक्के) पुरुषांच्या ५.५ टक्के या प्रमाणापेक्षा किंचित अधिक आहे. याहीमागे ‘सुरक्षितते’चाच विचार असेल की ही आर्थिक विषमता म्हणावी? रेल्वेने कामावर जाणार्‍या पुरुष आणि महिलांमध्ये- ग्रामीण असोत की शहरी- फरक फक्त ०.१ टक्क्याचा आहे. पण महिलांसाठीचे राखीव डबे किती वाढले? तेव्हा कामावर जाण्यातून दिसणारी लिंगभाव विषमता हा या सर्वेक्षणातून उघड होणारा एक भाग.

दुसरी बाब फक्त ग्रामीण आणि शहरी दरीपुरती मर्यादित नाही. ती आर्थिक विषमता कशी छुपीच राहते याविषयीची आहे. कामावर जाण्यासाठी कोणतेही वाहन न वापरणारे, किंवा फार तर सायकलने कामावर जाणारे स्त्रीपुरुष २८ टक्के आहेत. या चालत कामावर जाणार्‍यांची वर्गवारी पुन्हा ग्रामीण/शहरी, पुरुष/महिला अशी केली तर, ग्रामीण भागात ६४.८ टक्के महिला आणि ३४.२ टक्के पुरुष चालत कामाला जातात, ते एक वेळ समजण्याजोगे. पण शहरांमध्येही हे प्रमाण २१ टक्के महिला आणि ११.६ टक्के पुरुष असे आहे. हे अगदी मुंबईसारख्या- लोकल गाडीस लोंबकळणार्‍या शहरालाही लागू होते. कोण असतात हे, कामावर चालतसुद्धा जाता येणारे लोक? पिठाची गिरणीवाले, चहावाले, कामाच्याच ठिकाणी राहणारे सुरक्षारक्षक? की ड्रायव्हर, कचरावेचक, घरकामगार? की खासगी प्रॅक्टिस करणारे सीए, वकील, डॉक्टर? यातले सगळेच असतील- पण यात कुणाचे प्रमाण किती असेल? कामावर चालत जाणे ही दरवेळी सुखद गोष्ट असते की त्यात तीन-चार किलोमीटरची तंगडतोडही असते? स्कूटर/ मोटरसायकलादी दुचाक्यांवरून एकंदर देशभरातले जे ४२.६ टक्के लोक कामावर जातात, त्यांतल्या किती जणांना हप्ते सहज परवडतात? हे चालणारे, दुचाकीवाले जर बसने जाण्याचा पर्याय परवडणारा आणि सोयीस्कर असता, तर ते नसते का बसने गेले?

सार्वजनिक बस सेवा परवडणारी असेल तर सोयीस्करपणे उपलब्ध नसते आणि हल्ली विशेषत: मुंबई परिसरात ज्या शहरांतर्गत खासगी बस सेवांचे प्रस्थ वाढू लागले आहे त्या सोयीस्कर असल्या तरी परवडणार्‍या नसतात. ही कसरत फक्त प्रवाशांनाच नव्हे तर धोरणकर्त्यांनाही करावीच लागते. यातूनच शहरोशहरीच्या बस सेवांचे खासगीकरण होते आहे. काही प्रमाणात ते अटळही आहे. मुंबईत ‘बेस्ट’ उपक्रमाने भाडेतत्त्वावर बस गाड्या दिल्याच पण ‘चलो बस’सारखी अधिक आरामदायी सेवाही सुरू केली, त्याला एरवी जे स्वत:च्या मोटारीने किंवा बाइकनेच कामावर गेले असते अशा तरुणवर्गाचाही प्रतिसाद मिळतो. दुसरीकडे ओला, रॅपिडो यांसारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांनी रिक्षा/ टॅक्सीपेक्षा अधिक परवडणारी ‘बाइक सेवा’ दामटली आहे. शहरांतर्गत खासगी बस सेवा किंवा खासगी रिक्षा/ टॅक्सी/ बाइक सेवा ही चैन असल्याचा आक्षेप कुणी घेत नाही, कारण तितपत आराम ही काही चैन नव्हे- ती गरजही आहे हे बहुतेकांना मान्य असते. प्रश्न येतो तो परवडण्याचा. यावर निमशहरी भागात शोधला गेलेला मार्ग म्हणजे खासगीच, पण मळकट, जुनाट बसगाड्यांमधून अर्धशिक्षित, अननुभवी वाहक/ चालकांकरवी होणारी वाहतूक. दिल्ली/ कोलकात्यासारख्या शहरांत ही असली खासगी बस वाहतूकच मोठा आधार मानली जाई. मग दिल्लीत मेट्रोजाळे वाढले. शॉपिंगला निघालेले उच्च मध्यमवर्गीय कुटुंब आणि घिटोरनी वा रिठालासारख्या अडनिड्या ठिकाणी जाणारा मजूर हे दिल्ली मेट्रोच्या एकाच डब्यात दिसू लागले. पण म्हणून सर्व शहरांचे मेट्रोकरण करणे हा पर्याय रास्त ठरू शकत नाही. भारतात कमी पल्ल्याच्या किंवा अंतर्गत बस सेवांना प्रतिसाद का नाही, हा या सर्वेक्षणातून आपसूक येणारा प्रश्न धोरणकर्त्यांना पडेलच याची खात्री नाही.

भारतातल्या सार्वजनिक वाहतूक सेवांवर मानवी स्वभावदोषांचाही परिणाम होतोच. ‘पब्लिक’वर आपलीच सत्ता असल्याचा थाटात वावरणारे वाहक/ चालक किंवा आपले सगळे सहप्रवासी जणू आज पहिल्यांदाच प्रवास करताहेत आणि आपण त्यांना सुनवायला हवे अशा टेचातले अनेक प्रवासी. केवळ लोकसंख्येमुळे नव्हे तर सर्वांना एकाच वेळी एकाच दिशेने जायचे असल्यामुळे होणारी गर्दी. ‘बसने कशाला, रिक्षाने या’ असे काळजीने सांगणारे किंवा ‘उबर करून आलो’ याचा अभिमान बाळगणारे कुटुंबीय. सार्वजनिक वाहतूक सेवा हे एक सामूहिक संसाधन आहे, या जाणिवेची कायम अनुपस्थिती… आणि अर्थातच पडद्यामागे कायम असणारी जातजाणीव! तिच्यामुळेच तर प्रवासाची जात पहिली जाते. बस आपल्या तोलामोलाची नाही, म्हणून गाडीसाठी हप्ते भरले जातात… मग गाड्यांचीही जात समजू लागते आणि प्रवासाची जातव्यवस्था सुरूच राहते. या प्रवासाच्या जातींमधले पोटभेद दाखवण्याचे काम तेवढे ताज्या सर्वेक्षणाने केले, बाकी आपण विकसित होणारच आहोत की!