आपणच बळी असल्याचा कांगावा करतानाच इतरांचे अव्याहत बळी घेत राहायचे ही इस्रायली लबाडी. अध्यक्षांच्या राजकारणापलीकडील अमेरिकेस आता तरी ती लक्षात येईल…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इतका जाहीर अपमान त्यांच्या कडव्या प्रतिस्पध्र्यांनीही आतापर्यंत कधी केलेला नाही. ते पुण्य इस्रायलचे पंतप्रधान नरसंहारी नेतान्याहू यांच्या नावे नोंदले जाईल. नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा पट्टीसाठीचा शांतता प्रस्ताव जाहीरपणे फेटाळला. पश्चिम आशियात आणि त्यातही इस्रायल-गाझा पट्ट्यात शांतता नांदावी यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एक मार्गदर्शक गट स्थापन केला असून त्यातर्फे असा १५ कलमी शांतता प्रस्ताव इस्रायलला सादर केला गेला. नरसंहारी नेतान्याहू यांनी तो फेटाळला आणि वर ‘‘शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आम्ही काय करावे याची प्रवचने कोणी देऊ नयेत’’, असे विधान करून अमेरिकेचा- त्यातही विशेषत: ट्रम्प यांचा- पाणउतारा केला.
आपण ज्या देशाच्या जिवावर टिकून आहोत त्या अमेरिकेस कोलवण्याइतके धैर्य नरसंहारी नेतान्याहू दाखवत असतील तर अमेरिकी नेतृत्वाचे पाणी इस्रायलने किती जोखले आहे ते दिसते. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी अमेरिकी लोकप्रतिनिधींनी इस्रायलच्या ‘मोसाद’ या गुप्तहेर संघटनेच्या वाढत्या कारवायांविषयी आवाज उठवला होता. ‘मोसाद’ आता अमेरिकी यंत्रणा, अधिकारी यांच्यावरच पाळत ठेवत असावी आणि त्यांच्यावर हेरगिरी करत असावी अशी तक्रार या लोकप्रतिनिधींनी केली होती. त्याचा संबंध नरसंहारी नेतान्याहू यांच्या या वाढत्या आत्मविश्वासाशी निश्चितच असणार. यावरून; ट्रम्प यांस मुठीत ठेवण्यासाठी आवश्यक ऐवज इस्रायली गुप्तहेर यंत्रणांनी गोळा केला असेल; याची खात्री बाळगता येते. जे झाले ते केवळ अमेरिका-इस्रायल यांच्या संबंधांसाठीच नव्हे; तर संपूर्ण पश्चिम आशिया आणि जागतिक शांततेसाठी महत्त्वाचे असल्याने त्यावर भाष्य आवश्यक ठरते.
याचे कारण ट्रम्प आणि नरसंहारी नेतान्याहू या दोघांसाठी हे निवडणूक वर्ष आहे. इस्रायलमध्ये येत्या ऑक्टोबरात निवडणुका होतील तर अमेरिकी मध्यावधी निवडणुका त्यानंतरच्या महिन्यात. या दोन्ही नेत्यांसाठी या निवडणुका सर्वार्थाने निर्णायक ठरतील. त्यातही या निवडणुकांचे महत्त्व नरसंहारी नेतान्याहू यांच्यासाठी अधिक. कारण या निवडणुकीत त्यांचा पराजय झाला तर या नरसंहारी नेत्यास थेट तुरुंगाची हवा खावी लागू शकते. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली नखशिखान्त अडकलेल्या या इस्रायली पंतप्रधानास देश सतत युद्धग्रस्त हवा आहे.
कारण अशा युद्धजन्य परिस्थितीत नैमित्तिक विषय मागे पडतात, देशप्रेमाच्या भावनेस हात घालता येतो आणि सर्व पापे झाकता येतात. तिकडे अमेरिकेत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा या मध्यावधी निवडणुकांत पराभव झाला तर अध्यक्षपदाचा उर्वरित काळ या विद्यमान अध्यक्षास पंगू होऊन व्यतीत करावा लागणार. हे झाले या दोन नेत्यांस भेडसावत असलेल्या परिस्थितीतील साम्य. ते तसे असले तरी या दोहोंचे हितसंबंध मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत. म्हणजे आपण अमेरिकेच्या दबावासमोर कसे झुकलो नाही आणि शत्रूविरोधात किती ठाम भूमिका घेतली हे आपल्या देशातील मतदारांसमोर नरसंहारी नेतान्याहू दाखवू इच्छितात तर ट्रम्प यांची इच्छा याच्या बरोबर उलटी. पश्चिम आशियात आपण कशी शांतता निर्माण केली, इराणला नमवले, रशियाला झुकवले आणि इस्रायलला शांत केले हे दाखवण्यात ट्रम्प यांचे हित. त्यामुळे या दोन्ही निवडणूकग्रस्त नेत्यांमुळे पश्चिम आशियाचे संकट अधिकच गडद होण्याची शक्यता अधिक. ट्रम्प यांच्यासाठी आगामी निवडणुकांत अमेरिकेतील यहुदींचा पाठिंबा निर्णायक ठरेल.
नरसंहारी नेतान्याहू यांची भीड चेपलेली दिसते ती यामुळे. अमेरिकावासी यहुदी आणि त्यांची कारस्थाने हा नरसंहारी नेतान्याहू यांचा मोठा आधार. हे अमेरिकावासी यहुदी वित्त, मनोरंजन, माध्यमे आणि अर्थातच राजकारण अशा विविधांगी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर असून विविध संघटनांद्वारे ते स्थानिक अमेरिकी यंत्रणांवर इस्रायलच्या बाजूने दबाव गट म्हणून काम करत असतात. या स्थानिक यहुदी गटांस कह्यात, नियंत्रणाखाली ठेवण्यात किती यश येते यावर अमेरिकी अध्यक्षांचे यशापयश मोजले जाते. अमेरिकेतील हे स्थानिक यहुदी गट इतके प्रभावशाली आहेत की अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याही संतापाचा कडेलोट त्यामुळे झाला होता.
या अमेरिकी यहुदींच्या पाठिंब्यावर आडमुठेपणा करणार्या नरसंहारी नेतान्याहू यांस उद्देशून क्लिंटन यांनी संतापून ‘‘हू इज सुपरपॉवर हिअर’’ अशी विचारणा केली होती. त्यांच्यानंतर या यहुदींना वेसण घालण्यात लक्षणीय यश आले ते फक्त बराक ओबामा यांना. त्यांच्या काळातही इस्रायली पंतप्रधानाने दांडगाई करण्याचा प्रयत्न केला. पण ओबामा यांनी त्यास भीक घातली नाही. त्याच काळात उपाध्यक्ष जो बायडेन इस्रायलच्या दौर्यावर असताना नरसंहारी नेतान्याहू यांनी इस्रायली फौजा गाझा पट्टीत घुसवल्या होत्या आणि आपल्या विस्तारवादी धोरणाची प्रचीती दिली होती. त्यांच्यानंतर इस्रायलला वेसण घालण्यात ट्रम्प यांस कसे अपयश आले, ते सार्या जगाने पाहिले. केवळ या नरसंहारी नेत्याच्या हट्टापोटी ट्रम्प यांनी अमेरिकेस इराणविरोधात युद्धात लोटले. त्यातून आपली मान सोडवणे ट्रम्प यांस अजूनही शक्य झालेले नाही. त्या युद्धात इस्रायल राहिला नामानिराळा; आता उलट अमेरिकाच अधिक अडकली. हा मुद्दा ट्रम्प यांच्यासाठी निवडणुकीत डोकेदुखी ठरणार, हे उघड.
ही डोकेदुखी किती सहन करायची असा प्रश्न ट्रम्प यांस पडलेला असणार. याचे कारण ट्रम्प यांचे उपाध्यक्ष आणि आगामी अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ठरण्याची शक्यता असलेले जे. डी. व्हान्स यांनी इस्रायलविरोधात घेतलेली ठाम भूमिका. इस्रायल अमेरिकवासी यहुदींना हाताशी धरून जनमत आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा जाहीर आरोप व्हान्स यांनी अलीकडेच केला आणि स्वत:ला हवे तितका काळ इस्रायल युद्ध सुरू ठेवू शकत नाही, अशी भूमिका घेतली.
नरसंहारी नेतान्याहू यांच्या या युद्धखोरीमुळे त्याआधी ट्रम्प यांचाही संयम सुटला आणि ‘माझ्यासारखा तुमचा समर्थक रक्षक आहे; म्हणून तुम्ही टिकून आहात’ असे म्हणण्याची वेळ ट्रम्प यांच्यावर आली. तथापि उपाध्यक्ष व्हान्स आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्या या इस्रायलविरोधी भूमिकांत फरक आहे. तो असा की नोव्हेंबरात रिपब्लिकनांस पराभव पत्करावा लागला तर त्याचे बालंट उपाध्यक्ष व्हान्स यांच्यावर नव्हे; तर अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर येईल. त्यामुळे तेही नरसंहारी नेतान्याहू यांच्या युद्धखोरीस विटलेले असले तरी व्हान्स यांस असलेली मुभा त्यांना नाही. त्यांची अवस्था धरले तर चावते आणि सोडले तर पळते, अशी. त्याचाच पुरेपूर फायदा नरसंहारी नेतान्याहू उठवताना दिसतात.
गाझा पट्ट्यात ‘हमास’चे पुरते नि:शस्त्रीकरण झाल्याखेरीज शस्त्रसंधी नाही, शांतता करार नाही, अशी भूमिका ते घेतात. आंधळ्या इस्रायलभक्तांस त्यात गैर काय, असा प्रश्न पडेल. यात गैर हे की हमास नि:शस्त्र झाली आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार इस्रायल स्वत:कडेच ठेवणार; हे. त्यासाठी कोणतीही तटस्थ यंत्रणा या नरसंहारी नेत्यांस मान्य नाही. हे म्हणजे स्वत:वरील आरोपांचा युक्तिवाद स्वत:च करायचा आणि त्यावरील निर्णयही स्वत:च द्यायचा, असे. इस्रायलचे वर्तन- त्यातही हा नरसंहारी नेता पंतप्रधान झाल्यापासून- असेच राहिलेले आहे. आपणच बळी असल्याचा कांगावा करतानाच इतरांचे अव्याहत बळी घेत राहायचे ही इस्रायली लबाडी. अध्यक्षांच्या राजकारणापलीकडील अमेरिकेस आता तरी ती लक्षात येईल. डेमॉक्रॅटिक पक्षाने इस्रायली भस्मासुराविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहेच. रिपब्लिकनांसही त्याचे भय वाटले तरच निवडणूकग्रस्तांनी चालवलेला हा नरसंहार टळेल.
