‘भविष्यात राज्यास वीज हवी’ म्हणून लाखो वृक्षांच्या कत्तलींचे समर्थन करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी रखडलेल्या प्रकल्पांस गती देऊन अणुऊर्जेचे गाडे रुळांवर आणावे…

कर्जत येथील संभाव्य वीज प्रकल्पावरून सुरू झालेला वाद स्वागतार्ह खराच. पण त्यातून मूळ मुद्द्यास कोणीच हात घालत नसल्याने याप्रकरणी सगळेच आंधळी कोशिंबीर खेळण्यात मग्न असल्याचे दिसते. या संभाव्य वीज प्रकल्पासाठी हजारो झाडे कापली जाणार असल्याने त्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध असणे साहजिक. त्यास प्रकल्प समर्थक आणि सरकार यांच्या वतीने दिले जाणारे प्रत्युत्तर हे तर सध्याच्या ऑर्वेलियन वास्तवाचे प्रतीक. युद्ध म्हणजे शांतता असे सत्ताधार्‍यांस वाटत असल्याचे ऑर्वेल लिहितो. त्या धर्तीवर पर्यावरण विनाश म्हणजेच पर्यावरण रक्षण असा सध्याच्या सरकारचा युक्तिवाद. तो कर्जत येथील प्रकल्पानिमित्ताने पुढे येतो. या जलविद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोड होणार असली तरी त्यामुळे अंतिमत: पर्यावरण रक्षणालाच मदत होईल, असे हे प्रकल्पवादी म्हणतात. सद्य:स्थितीत केंद्र आणि राज्य सरकारचा पर्यावरणीय दृष्टिकोन नक्की काय आहे याचा पुरावा शहरा-शहरांत, जंगलांत रस्त्यांच्या कडेला बेवारस पडलेली लाखो वृक्षांची कलेवरे देतील. म्हणून त्याविषयी नव्याने सांगण्याची गरज नाही. तूर्तास कर्जत प्रकल्पानिमित्ताने गरज आहे ती माहिती-आधारित प्रश्न उपस्थित करण्याची. कोणतेही आंदोलन म्हटले की त्यात माकडउड्या मारणार्‍या माध्यमी अर्धवटरावांस हे झेपणारे नाही. त्याच वेळी राजकीय पक्ष आपापल्या सोयीनुसार यावर भूमिका घेणार. अशा वेळी तथ्याधारित तपशील सादर करणे हे जबाबदार माध्यमांचे काम. त्यासाठी हा आवश्यक तपशील.

महाराष्ट्राची स्थापित वीजक्षमता आजघडीला सुमारे ५५ हजार मेगावॅट आहे. याचा अर्थ इतकी वीज आपण तयार करू शकतो. पण ती तशी होत नाही. याचे कारण जलविद्युत वा अणुऊर्जा वगळल्यास क्षमतेच्या जवळपास अन्य वीज प्रकल्प पोहोचू शकत नाहीत. प्रकल्पांची वीजनिर्मिती क्षमता ‘प्लँट लोड फॅक्टर’ (पीएलएफ) दर्शवतो. त्याद्वारे एखादा प्रकल्प किती वीज तयार करू शकतो हे कळते. हा घटक सरासरी ७०-७५ टक्के इतका धरल्यास एकंदर ५५ हजार मेगावॅट क्षमतेच्या ७०-७५ टक्के वीज तयार होते, असा त्याचा अर्थ. या ५५ हजारांपैकी साधारण २० हजार मेगावॅट वीज स्थापित क्षमता सौर अथवा अन्य कथित पर्यावरण-स्नेही मार्गांनी तयार होणार्‍या विजेची आहे. सौरऊर्जा ही दिवसाच तयार होत असल्याने ती लगेच वापरावी लागते. ती साठवावयाची झाल्यास अजस्र साठवण क्षमता- म्हणजे विजेर्‍या (बॅटर्‍या)- आवश्यक. ते परवडणारे नाही. म्हणून वर्षाचे १० महिने टळटळीत ऊन आपल्याकडे असले तरी त्याचा विजेसाठी तितका उपयोग नाही. सध्या तर आता सौरऊर्जा बास… असे म्हणायची वेळ आलेली आहे. कारण तिला मागणी नाही. महाराष्ट्र सरकारने सौरऊर्जेस उत्तेजन दिल्याने सध्या आपण शेतकर्‍यांस दिवसा वीज देऊ शकतो. एरवी पाण-पंप सुरू करण्यासाठी शेतकर्‍यांस रात्रीबेरात्री शेतावर जावे लागत असे. तसे आता होत नाही. ही बाब खचितच प्रगती निदर्शक. या तुलनेत आपल्या राज्याची विजेची मागणी सुमारे ३५ हजार मेगावॅट इतकी आहे. याचा अर्थ सध्या आपली गरज भागेल इतकी वीज आपण तयार करत आहोत. पण त्यावर अर्थातच विसंबून चालणारे नाही. वाढती लोकसंख्या, अतिवेगाने होणारे नागरीकरण, उद्योग इत्यादींची गरज लक्षात घेता वीजनिर्मिती अधिक लागणार हे निश्चित. आपली सध्याची स्थापित क्षमता आताची गरज भागवणारी असली तरी ती भविष्यास पुरी पडणारी नाही. त्यासाठी नियोजन हवे. ऊर्जानिर्मितीत गुंतवणूक हवी. वीजनिर्मितीत ‘पी हळद आणि हो गोरी’ असे चालत नाही. नियोजनात दीर्घकालीन विचार हवा. हा झाला एक भाग. प्रश्न आहे तो पुढील भागाचा.
आपली ही विजेची वाढती गरज लक्षात घेऊन सरकारने स्वत:चे सुमारे १६०० मेगावॅट क्षमता वाढीचे प्रकल्प विस्तार हाती घेतले. त्याचे काय झाले? त्या स्वत:च्या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सरकार स्वत: प्रयत्न करीत आहे की ते अन्य कोणा राजाश्रयी ‘अ’द्योगपतींच्या हवाली केले? राज्याची एकेकाळची ‘महाराष्ट्र राज्य वीज मंडळ’ (मराविम, ‘एमएसईबी’) कार्यक्षम करण्यासाठी त्याचे २००५ साली तीन तुकडे केले गेले. महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण अशा त्या तीन कंपन्या. यातील वीजनिर्मितीची जबाबदारी महानिर्मिती ‘कंपनी’ची. तिने या काळात आपल्या निर्मितीत किती वाढ केली? ही वाढ ६०० मेगावॅटपेक्षा अधिक नाही. या क्षमता वाढीस कोणी रोखले? माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात ‘एन्रॉन’ आले आणि त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्यांनी त्यास विरोध करून ते गाजवले. ते ठीक. त्या विरोधात एक मुद्दा होता वीज प्रकल्प, वीज खरेदी आदींबाबत सर्व बाबी पारदर्शी पद्धतीने उघड करण्याचा. तेव्हाचे विरोधक आता सत्तेत आहेत. त्या वेळी त्यांनी जी मागणी केली ती पूर्ण करण्यास त्यांना आता कोणती आडकाठी आहे? सुनियोजित पद्धतीने वीज क्षमता वाढवली जात नसल्याने सध्या देशात प्रति युनिट १४.५० ते ४६ रुपये इतक्या प्रचंड महागड्या दराने राज्यांकडून वीज खरेदी सुरू आहे. यातील बहुतांश प्रकल्प हे खासगी आहेत. म्हणजे सरकारांनी स्वत:च्या प्रकल्पांस मारायचे आणि खासगी धन करायची असा त्याचा अर्थ. तो लक्षात घेतल्यास पुढील मुद्द्याची व्यापकता लक्षात येईल.

हा मुद्दा अणुऊर्जेचा. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००८ साली अमेरिकेशी अणुकरार केला. ती अमेरिकेसमोरची शरणागती अशी टीका तत्कालीन विरोधी पक्षीय आणि आताच्या सत्ताधीशांनी त्या वेळी केली. पुढे २०१४ साली स्वत: सत्तेवर आल्यावर ‘वस्तू-सेवा कर’ (जीएसटी) मुद्द्याप्रमाणे अणुकराराचेही झाले आणि अमेरिकेबरोबरचा तोच करार पुढे रेटण्याचा निर्धार विद्यमान सत्ताधीशांनी केला. ते ठीक. पण प्रत्यक्षात गेल्या १२ वर्षांत अणुऊर्जा क्षमतेत गुंजभरही वाढ झालेली नाही, ती का? महाराष्ट्रातील जैतापूर येथे सणसणीत १०,३८० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प स्थापण्याच्या आणाभाका झाल्या होत्या. प्रत्यक्षात काहीही झाले नाही. महाराष्ट्रास आणि त्यातही विद्यमान सत्ताधार्‍यांस विजेची इतकी आस असेल तर अत्यंत पर्यावरणस्नेही अशा अणुऊर्जा विस्ताराचे काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीत, ते कसे? ते सोडून अचानक अशा प्रकल्पांसाठी अट्टहास केला जात असेल तर तो आगामी ‘डेटा-सेंटर’च्या गरजपूर्तीसाठी नाही, यावर कोण विश्वास ठेवणार? कर्जत येथील प्रस्तावित प्रकल्प ‘वीज साठवण’ उद्देशाने होत असल्याचे सरकार सांगते. त्यासाठी दोन तलाव खणले जातील. एक डोंगराच्या पायाशी. दुसरा वर. जेव्हा वीज अधिक असेल- म्हणजे दिवसाची सौर वगैरे- तेव्हा ती वीज वापरून खालच्या तळ्यातील पाणी वर चढवले जाईल आणि जेव्हा गरज असेल तेव्हा- म्हणजे सायंकाळी- वरच्या तळ्यातील पाणी खाली सोडून त्यावर रोहित्रे चालवून वीजनिर्मिती केली जाईल. हे म्हणजे नंतर फोडणीची पोळी खिलवता यावी म्हणून भुकेलेल्यांस आता उपाशी ठेवायचे आणि ताज्या पोळ्या शिळ्या करायच्या, असे.

हा विनोद म्हणून ठीक. पण त्यासाठी जेव्हा हजारो-लाखो झाडांचा बळी दिला जाणार असेल तर ती पर्यावरणाची क्रूर चेष्टाच ठरते. पश्चिम घाट म्हणून ओळखल्या जाणार्‍या सह्यद्रीच्या चढउतारांवर असे आणखी २५-३० प्रकल्प येणार असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे समर्थन करण्याऐवजी अन्य रखडलेल्या घरच्या प्रकल्पांस गती द्यावी आणि आपले वजन वापरून अणुऊर्जेचा गाळात गेलेला गाडा बाहेर काढावा. मुळात जेथे ‘अशा’ एकाही प्रकल्पाची गरज नाही तेथे आणखी असे अनेक प्रकल्प येणार असतील तर ते फक्त सह्यद्रीचे सपाटीकरण ठरेल. हा सोस निव्वळ आत्मघातकी ठरेल.