ॲलन ग्रीनस्पॅन यांचे सर्वच निर्णय योग्य होते असे नाही. पण निष्क्रिय वा सत्ताशरण बँकप्रमुखापेक्षा स्वत:च्या हिमतीने चालणारा बँकर कधीही अधिक स्वागतार्ह!
अविकसित, विकसनशील हे टप्पे ओलांडून विकसितता गाठावयाची असेल तर न्यायपालिका, बाजारपेठ नियामक यांच्याइतकाच महत्त्वाचा असतो देशाचा मध्यवर्ती बँकर. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आदी अनेक देशांच्या प्रगतीत या बँकर्सची भूमिका कायम वाखाणण्याजोगी राहिली. विशेषत: पहिल्या महायुद्धातील भयानक संहारानंतर चार बँकर्सनी ज्या प्रकारे जगाचा तोल सांभाळला ते या पदाचे महत्त्व दाखवणारे ठरते.
अमेरिकेचे बेंजामिन स्ट्राँग (ज्यु.), बँक दि फ्रान्सचे एमिल मोरॉ, जर्मनीच्या राइश बँकेचे हाल्मर शाष्ट आणि बँक ऑफ इंग्लंडचे माँटेग्यु नॉर्मन या चार बँकरांनी एकमेकांस हात देत जगाचा गाडा पुन्हा रुळांवर आणला. कोणत्याही आधुनिक दळणवळण साधनांअभावी या चौघांनी जे केले ते अविश्वसनीय कौतुकास्पद. ते दाखवून देते की केवळ चलनव्यवहार इतकेच मध्यवर्ती बँकांचे काम नसते. याच्या जोडीने आर्थिक वार्यांची दिशा पाहून काय करावयास हवे आणि त्याहीपेक्षा काय नको याचे भान मध्यवर्ती बँकर्सना असणे गरजेचे. सरकारच्या तालावर ठेका धरणारा मध्यवर्ती बँकर वैयक्तिक आयुष्यात प्रगतीची शिखरे गाठतो हे खरे. पण असा बँकर असलेल्या देशाची अर्थव्यवस्था कधीही उभारी धरू शकत नाही.
अमेरिकेसारखा देश थक्क करणारी आर्थिक प्रगती साध्य करू शकला याचे रास्त श्रेय उद्योजक आणि धोरणकर्त्यांस जाते ते ठीकच. पण त्याचबरोबर यांच्या मागे त्या देशाचे समर्थ बँकर्स होते हे सामान्यांच्या लक्षात न येणारे सत्य. अलीकडच्या काळातील अमेरिकेचे असे दोन बलाढ्य बँकर म्हणजे पॉल व्हॉल्कर आणि ॲलन ग्रीनस्पॅन. यातील व्हॉल्कर २०१९ साली निवर्तले. त्यांच्या कार्याची यथोचित दखल ‘लोकसत्ता’ने ‘महाबँकर’ या संपादकीयात (११ डिसेंबर ’१९) घेतली. दुसरे असे उत्तुंग बँकर ग्रीनस्पॅन यांचे सोमवारी निधन झाले.
ग्रीनस्पॅन हे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकरपदी तब्बल १८ वर्षे टिकले इतकेच त्यांचे मोठेपण नाही. या काळात अमेरिकेने डेमॉक्रॅटिक आणि रिपब्लिकन अशा उभय बाजूंचे चार अध्यक्ष आणि सात अर्थमंत्री अनुभवले. अमेरिकी अर्थव्यवस्थेस उभारी देणारे रोनाल्ड रेगन, जॉर्ज बुश (थोरले), बिल क्लिंटन आणि धाकले जॉर्ज बुश यांच्या अध्यक्षीय काळात अमेरिकी ‘फेड’ची जबाबदारी ग्रीनस्पॅन यांच्याकडे होती. खेरीज आपल्या ‘फेड’ प्रमुखपदाच्या काळात जेम्स बेकर ते वादग्रस्त लॉरेन्स समर यांच्यापर्यंत सात अर्थमंत्री (ट्रेझरी सेक्रेटरी) ग्रीनस्पॅन यांनी पचवले. त्याआधी ग्रीनस्पॅन हे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे सल्लागार होते.
पुढे वॉटरगेट प्रकरणात निक्सन यांस पायउतार व्हावे लागले. त्यानंतर त्यांच्याच पक्षाचे रेगन अध्यक्षपदी आले आणि ग्रीनस्पॅन यांच्या हाती ‘फेड’ची सूत्रे आली. हा काळ अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत युनियन यांच्यातील शीतयुद्धाच्या उतरणीचा. रशियाच्या फौजा अफगाणिस्तानात घुसून अर्धदशक उलटलेले, इराणमधील क्रांतीत शहा महंमद रझा पहलवी यांची सत्ता उलथवून अयातोल्ला रूहल्ला खोमेनी सत्तेवर आलेले आणि त्यांनी शेजारच्या सुधारणावादी इराकच्या सद्दाम हुसेनविरोधात युद्ध छेडलेले. अमेरिका या सगळ्यात पडद्यामागून होती. रेगन यांच्या पडद्यामागच्या या उद्योगांस ठाम चलनधोरणाची साथ ग्रीनस्पॅन यांनी दिली. अमेरिकेच्या अलीकडच्या आर्थिक भरारीच्या श्रेयाचा मोठा वाटा रेगन यांच्या पदरात घातला जातो. ते रास्तच. पण रेगन यांस उद्योगस्नेही चलनधोरणाची साथ ग्रीनस्पॅन यांची होती.
ती तितक्या प्रमाणात आपणास मिळाली नाही, अशी जाहीर खंत नंतर पहिल्या जॉर्ज बुश यांनी व्यक्त केली. ग्रीनस्पॅन यांचा व्याजदर वाढवण्याचा निर्णय आपल्या अध्यक्षीय फेरनिवडीच्या आड आला अशी बुश यांची तक्रार. निवडणुकीच्या तोंडावर व्याजदर वाढवणे कोणत्याही देशातील कोणत्याही पक्षाच्या सत्ताधीशांस रुचत नाही. व्याजदर वाढले की पैसा महाग होतो आणि अर्थिक गती मंदावते. म्हणून कमीत कमी व्याजदर हवेत अशी सत्ताधीशांची इच्छा असते. सरकार जितके आर्थिक आघाडीवर निकम्मे तितकी त्यास मध्यवर्ती बँकरच्या मदतीची गरज अधिक.
सत्ताधार्यांच्या मदतीस जाण्याची ही जबाबदारी ग्रीनस्पॅन यांनी अंगावर घेतली नाही. त्यातून रिपब्लिकन बुश गेले आणि डेमॉक्रॅटिक क्लिंटन आले. ग्रीनस्पॅन यांच्या कर्तृत्वाचा लौकिक लक्षात घेऊन राजकीय कारणासाठी त्यांना बदलण्याच्या फंदात क्लिंटन पडले नाहीत. क्लिंटन यांस सलग दोन वेळा अध्यक्षीय कारकीर्द अनुभवता आली. या काळात अमेरिकी फेडचे प्रमुखपद ग्रीनस्पॅन यांच्या हातीच राहिले. क्लिंटन काळ सरला आणि जागतिक नेतृत्वातील शहाणपणासही ओहोटी लागली. नव्या सहस्रकाची पहाट उजाडली तीच मुळी ही ओहोटी रेषा दाखवत. बुश यांच्याच काळात ९/११ घडले आणि त्यानंतर महासत्तेचा मूर्खपणा जगाने अनुभवला. काही तरी करून दाखवण्याच्या, सुडाच्या ईर्ष्येने पेटलेल्या बुश यांनी आधी अफगाणिस्तान आणि नंतर इराकवर हल्ला केला.
वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मनोरे ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात जमीनदोस्त होण्यामागील गंभीर अर्थकारण बुश यांच्याही आधी ग्रीनस्पॅन यांनी ओळखले आणि त्यांनी पैसा कमालीचा स्वस्त केला. युद्धकाळात आर्थिक विवंचना अधिक तीव्र होऊन गुंतवणूकदार हात आखडता घेतात. अनिश्चिततेच्या सावटाखाली जनसामान्यही हाती आहे ते उद्यासाठी राखलेले बरे असा विचार करून काटकसरीला लागतात. हे टाळण्याच्या उद्देशाने ग्रीनस्पॅन यांनी ‘फेड’चे व्याजदर इतके कमी केले की गरज नसलेल्यांनीही कर्जे काढली आणि दौलतजादा सुरू केला.
परिणामी मागणी वाढली आणि मागणी चढी राहिल्याने उत्पादन आणि पुरवठ्याची गतीही कायम राहिली. त्यामुळे दहशतवादी हल्ले, तद्नंतरची युद्धे आदींमुळे अर्थव्यवस्थेवरील मंदीचे सावट टळले. हे श्रेय ग्रीनस्पॅन यांचे. अर्थात या अतिस्वस्त पैशानेच पुढे अमेरिकी अर्थव्यवस्थेचा घात केला. गरज नसतानाही केवळ स्वस्त आहेत म्हणून अनेकांनी घेतलेली कर्जे पुढे बुडत गेली आणि बराक ओबामा यांच्या कारकीर्दीच्या पहिल्याच वर्षी ‘लेहमन ब्रदर्स’सारखी तगडी बँक त्यातून बुडाली. पण तोपर्यंत ग्रीनस्पॅन ‘फेड’च्या प्रमुखपदावरून पायउतार झाले होते आणि चलनधोरणाबद्दल टीकेचे धनीही होऊ लागले होते. यात आश्चर्य नाही. ग्रीनस्पॅन यांचे सर्वच निर्णय योग्य होते असे नाही. पण नि्क्रिरय वा सत्ताशरण बँकप्रमुखापेक्षा स्वत:च्या हिमतीने चालणारा बँकर कधीही अधिक स्वागतार्ह. ग्रीनस्पॅन अमेरिकेसाठी असे होते.
निवृत्तीनंतरही ते सेवाकाळातल्या इतकेच लोकप्रिय राहिले. येथे त्यांची तुलना अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांच्याशी होईल. किसिंजर यांच्याप्रमाणे ग्रीनस्पॅन यांनाही जाड भिंगाचा चष्मा होता. किसिंजर यांच्या चेहर्यावर कायम लबाड कोल्ह्याप्रमाणे समोरच्याला गोंधळवून टाकणारे भाव असत तर ग्रीनस्पॅन यांच्या चेहर्यावरील स्मितरेषा ‘कसे फसवले’ अशी जाणीव करून देत असे. जगाचा अर्थखेळ, त्यातील महत्त्वाच्या खेळाडूंच्या भूमिका याबाबत स्वत:स जे वाटले ते तसेच सांगणारे ‘द एज ऑफ टब्र्युलन्स : ॲडव्हेंचर इन अ न्यू वर्ल्ड’ हे त्यांचे आत्मचरित्र या क्षेत्रात रस असलेले आजही कौतुकाने वाचतात. ते ‘जाझ’ वेडे. वागण्यात एक कलासक्तता असे. पत्नी अँड्रिया मिशेल या ज्येष्ठ पत्रकार.
अमेरिकी सत्तावर्तुळात ही जोडी लक्षवेधी होती. आधुनिक अमेरिकी अर्थव्यवस्थेचा पितामह असे वर्णन केले जाणारे ग्रीनस्पॅन पाइप ओढत. हे धूम्रपान त्यांना शतायुष्यापासून रोखू शकले नाही. चहूबाजूंनी आयुष्याची मजा घेणार्या या बुलंद बँकरने शंभराव्या वर्षी जगाचा निरोप घेतला. न्यायपालिकेप्रमाणे मध्यवर्ती बँकरही सरकारी खातेप्रमुखासारखे वागू लागण्याच्या आजच्या काळात ग्रीनस्पॅन यांच्या कारकीर्दीचे स्मरण प्रेरणादायी ठरावे.
