‘नासा’ची पृथ्वीवरील नियंत्रण केंद्रे वा कोणत्याही संपर्क यंत्रणांपासून पूर्णपणे तुटलेपणाचा नियोजित टप्पा पार करून ‘आर्टेमिस-२’चा परतीचा प्रवास सुरू झाला…
कोणताही मोबाइल, सॅटेलाइट, रेडिओ फोन वा अन्य कोणतीही यंत्रणा पोहोचूच शकत नाही इतक्या २,५२,७५६ मैल (सुमारे ४.२५ लाख किलोमीटर) अंतरावर साधारण पाऊण तास व्यतीत करायचा, कोणतीही दुर्बीण, कॅमेरा आदींनी कधीही न पाहिलेल्या चंद्राच्या पृष्ठभागाजवळ जायचे आणि एकविसाव्या शतकातही मानवास अजून अनभिज्ञ असलेला चंद्र आठेक हजार किलोमीटरवरून डोळे भरून पाहायचा आणि पृथ्वीवरील मानवांस त्याचे दर्शन घडवायचे ही केवळ आणि केवळ विज्ञानवृत्तीला साजेशी अजोड कामगिरी ‘नासा’च्या ‘आर्टेमिस- २’ मोहिमेतील चार अवकाशयात्रींनी नोंदवली. जगभरातील समस्त विज्ञानप्रेमींचा ऊर या अतुलनीय कामगिरीने भरून आला असेल.
आदिमतेची आठवण करून देणारी अव्याहत सुरू असलेली बिलंदरांची नरसंहारी युद्धे एकीकडे आणि दुसरीकडे कोणत्या तरी क्षुद्र बाबाबापूच्या पायाशी अक्कल गहाण टाकणारा, धर्म/ जात अशा कृत्रिम सीमांमध्ये विभागलेला हास्यास्पद वाटेल इतका केविलवाणा बुद्धिहीन समाज या वास्तवांत अडकलेल्या मानवजातीसाठी ‘नासा’ची कामगिरी हरखून जावे इतकी आनंददायी. पृथ्वीपासून इतक्या लांब अंतरावर कोणीही अद्याप जाऊ शकलेला नाही. आर्टेमिसचा हा विक्रम. याआधी माणूस दोन लाख ४८ हजार मैलांचे अंतर कापू शकला. ती मर्यादाही या आर्टेमिसने ओलांडली. मानवी क्षमतेच्या मर्यादा ओलांडणे हे फक्त आणि फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनच करू शकतो. हा दृष्टिकोन आणि त्याचे महत्त्व डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा विचित्रवीर्य अध्यक्षपदी असतानाही अमेरिका अबाधित राखू शकते यातच त्या देशाचे मोठेपण. त्या वैज्ञानिक वृत्तीस अभिवादन करून ‘आर्टेमिस- २’ मोहिमेचा आनंद साजरा करणे इष्ट.
आर्टेमिस ही ग्रीक पुराणकथांतील प्रकाशदेव अपोलोची बहीण. विद्वत जगासही भारून टाकणार्या ग्रीक कथांत ‘ऑलिम्पस’ पर्वतावर वास्तव्य असलेले १२ मुख्य ऑलिम्पिअन्स पूजनीय मानले जातात. आर्टेमिस ही त्यातील एक. स्त्रीस्वातंत्र्यासाठी कमालीची आग्रही असूनही आर्टेमिस चंद्रास जवळची मानली जाते. चंद्राच्या आतापर्यंत कधीही जवळ न गेलेल्या पृष्ठभागास अनुभवणार्या अंतराळ मोहिमेस आर्टेमिसचे नाव देऊन तेथील वैज्ञानिक समुदायाने आपल्यातील काव्यात्मकतेचेच दर्शन घडवले असे म्हणता येईल. आत्यंतिक वैज्ञानिक वृत्तीचे बुद्धिवादी संशोधक, लेखक यांच्यातील काव्यप्रेम हे नेहमीच लोभस राहिलेले आहे. आइन्स्टाइन ते पं. नेहरू अशा अनेकांचे काव्यप्रेम सर्वश्रुत.
स्पिनोझास काव्यात्मक आदरांजली वाहणारा आइन्स्टाइन आणि हिंदी कवी ‘निराला’ ते रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या अनेक कविता मुखोद्गत असलेले पं. नेहरू ही विज्ञानवाद्यांतील काव्यात्मकतेची लोभस प्रतीके. अपोलो या पहिल्या चंद्रयान मोहिमेस आणखी पुढे नेणार्या अवकाशयानाचे ‘आर्टेमिस’चे नाव हे त्याच काव्यात्मकतेचे प्रतीक. चंद्राच्या पृथ्वीवरून आतापर्यंत कधीही न दिसलेल्या पृष्ठभागाचे मनसोक्त दर्शन घेऊन आणि घडवून ‘आर्टेमिस’ आता पुन्हा ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ गात माहेराच्या वाटेवर निघेल. पृथ्वीच्या कक्षेत शिरल्यावर पॅसिफिक महासागरात सुखरूपपणे उतरल्यावर रीड वाईझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, ख्रिस्टिना कोच आणि जेरेमी हॅन्सन या आर्टेमिसमधील चार अवकाशयात्रींच्या चेहर्यावर आतापर्यंत कोणाही मर्त्य मानवास जे जमले नाही ते साध्य केल्याचे समाधान विलसत असेल.
या अवकाश मोहिमेतील सर्वात कठीण, जीवघेणा टप्पा होता तो ‘नासा’ची पृथ्वीवरील नियंत्रण केंद्रे आणि अन्य कोणत्याही संपर्क यंत्रणांपासून पूर्णपणे तुटलेपण अनुभवण्याचा. या जवळपास पाऊण तासात हे यान आणि त्यातील चार यात्रिक यांचे काय झाले, काय होणार आहे आणि तसे काही अघटित घडल्यास त्यांना शोधायचे तरी कसे आणि कोठे याचे उत्तर कोणाहीकडे नव्हते. तरीही ज्ञान आणि अज्ञान यांच्यातील या अंधार्या ‘डोहकाळिमा’त या चार अंतराळवीरांनी डोळस उडी घेतली. हा असा डोळसपणा फक्त विज्ञानातूनच मिळतो. पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडात नळी खुपसून त्याची लाळ शोषून घेणारा एकोणिसाव्या शतकातला लुई पाश्चर आणि त्याआधी शंभर वर्षे आपल्या गवळ्याच्या देवीच्या फोडातला पू परिचित मुलाच्या शरीरात टोचून त्या असाध्य रोगावर लस-प्रयोग करणारा एडवर्ड जेन्नर या आणि अशा अनेक विज्ञानवाद्यांच्या आंधळ्या प्रयोगांमागे डोळस विज्ञान-श्रद्धा होती. हा विज्ञान-विश्वास जे जतन करतात ते देश/ समाज प्रगती करतात.
तथापि या प्रगतीशी कसलेही साधर्म्य नसलेले अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या ‘नासा’च्या मोहिमेतील या चार अंतराळवीरांशी संवाद साधला. अनेक वाहिन्यांनी त्याचे थेट प्रक्षेपण केले. ज्यांनी ते पाहिले त्यांना त्यातील मनोरंजक विसंवाद सहज ध्यानात आला असेल. या संवादात ट्रम्प यांनी या चारही अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यावर ‘व्हाइट हाउस’मध्ये येण्याचे निमंत्रण दिले. हा प्रसंग तर खासच. विश्वविजयी कामगिरी करणार्या आपल्या देशवासीयांच्या सत्काराच्या निमित्ताने त्यांच्या विश्वविजयाचे काही शिंतोडे स्वत:च्या अंगावर पाडून घ्यावेत असे राष्ट्रप्रमुखास वाटणे काही गैर नाही.
व्हाइट हाउसमध्ये आल्यावर मला तुमची स्वाक्षरी हवी आहे… मी सहसा कोणाची स्वाक्षरी घेत नाही; पण तुम्ही अपवाद आहात, असे हे अध्यक्ष महाशय आपल्या अंतराळवीरांस म्हणाले. तरी बरे, या संवादात ट्रम्प यांनी अवकाशातून व्हाइट हाउस कसे दिसते इत्यादी काही विचारले नाही. चंद्र पाहताना कसे वाटले असे काहीबाही त्यांनी विचारले. त्याची आवश्यक त्या सभ्यतेसह काहीबाही उत्तरे या अंतराळवीरांनी दिली. एक प्रश्न मात्र निश्चित खास आणि त्यावरील उत्तर त्याहूनही खास. हा प्रश्न अंतराळवीरांच्या अंतराळानंदाबाबत होता. या वेळी हा आनंद विशेष आहे असे त्यातील एक अंतराळवीर म्हणाला आणि या विशेष आनंदामागील कारणही त्यांनी विशद केले. ‘या वेळी कॅनडाचा अंतराळवीर आमच्यासमवेत आहे’, ही बाब या अंतराळवीरांस महत्त्वाची वाटली.
अमेरिकेच्या याच शेजारी देशाविरोधात ट्रम्प यांनी आगपाखड करून त्याविरोधात कडक आयातशुल्क लावले. त्यामुळे अमेरिकेचा पारंपरिक भागीदार आणि शेजारी असलेल्या या देशाशी असलेल्या अमेरिकेच्या ऐतिहासिक संबंधांत कटुता आलेली आहे. पण या वास्तवाची कसलीही तमा न बाळगता अंतराळवीरांनी कॅनडाचाही अंतराळवीर असण्याबाबत आनंद व्यक्त केला. इतकेच नव्हे तर अवकाशयानात अमेरिका आणि कॅनडा यांचे राष्ट्रध्वज कसे एकमेकांस खेटून आहेत याकडेही लक्ष वेधले. हे धाडस फक्त खर्या लोकशाही देशातील नागरिकच करू शकतात.
‘आर्टेमिस’ हे अवकाश वाहन या अशा देशांतील नागरिकांस वागवत आहे, ही बाब महत्त्वाची. एकूणच अवकाशयात्रा काय शिकवते या प्रश्नावर या अंतराळवीरांनी दिलेले उत्तर कोणत्याही शहाण्या सज्जनास भारावून टाकेल. ‘नम्रता’ (ह्युमिलिटी) हे त्यांचे या प्रश्नावरील उत्तर. त्यावरून त्यांची वैचारिक प्रगल्भताही दिसून येते. एकदा का गुरुत्वाकर्षणाच्या मर्यादा ओलांडल्या की देशादेशांतील सीमा अस्पष्ट होतात आणि या जगड्व्याळ विश्वातील आपले शून्यत्व आणि क्षुद्रत्व यांची जाणीव होते. ती या अंतराळवीरांनी अत्यंत अहंमन्य अशी व्यक्ती देशप्रमुख असतानाही व्यक्त केली, ही बाब महत्त्वाची. या अंतराळवीरांस चंद्राची प्रभा दुसर्या बाजूने पाहावयास मिळाली. वास्तविक ‘हा चंद्र ना स्वयंभू, रवितेज वाहतो हा’ हे वास्तव सर्वच जाणतात आणि ‘ग्रहणात तारकांचा अभिशाप भोगतो हा’ ही कविकल्पनाही सर्वांस ठाऊक असते. तरीही या चंद्रदर्शनाचा ‘मुहूर्त’ अजूनही अनेकांस महत्त्वाचा वाटतो. कोणाचा धर्मोत्सव त्या मुहूर्तावर सुरू होतो तर कोणाचे उपास त्यावर सुटतात. या चार अंतराळवीरांस या सगळ्यापलीकडच्या खर्या चंद्राचे दर्शन झाले. आता ते या चंद्रास ‘चंदा रे चंदा रे कभी तो जमींपर आ… बैठेंगे बाते करेंगे’ असा आग्रह प्रेमाने करू शकतील.
