स्वपक्षीय नेत्यांचे खच्चीकरण, अन्य पक्षांस ‘संपवण्यासाठी’ फोडाफोडीचे उद्याोग या साऱ्यानंतर आता भाजपवर आघाडीतील मित्रपक्ष सांभाळण्याची वेळ आली आहे…

जगातील सर्वात मोठ्या, लोकशाहीची जननी इत्यादी असलेल्या देशातील मतदारांनी आज लोकशाहीचे पांग फेडले. प्रत्येक निवडणुकीत कोणी हरणार, कोणी जिंकणार हे असतेच. पण या साध्या जय-पराजयापेक्षाही आजचा निकाल अधिक ऐतिहासिक ठरतो. आमच्या डोक्यावरचा सत्तासूर्य जणू कधी मावळणारच नाही असे वर्तन असलेल्या, विरोधकांस तसेच प्रामाणिक माध्यमांस कस्पटासमान वागवणाऱ्या आणि आपणास या भरतभूच्या उद्धारासाठी परमेश्वराने थेट ‘वरून’ पाठवल्यासारखे दर्शवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा या निवडणुकीत मतदारांनी केलेला पराभव भारतीय लोकशाहीस थेट पहिल्या जगात नेऊन ठेवणारा ठरतो. समाजमाध्यमांतील वावदूक, हिंसक जल्पक आणि प्रचंड मोठा भक्तसंप्रदाय गाठीशी असतानाही हाती केवळ मतदानाचा अधिकार असलेला सामान्य नागरिक प्रसंगी किती दृढ भूमिका घेऊ शकतो, हे या निवडणुकीने दाखवून दिले. म्हणून या निवडणुकीत अन्य कोणाही विरोधक, राजकारण्यापेक्षा सामान्य मतदार अभिनंदनास पात्र ठरतो. साधारण तीन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांतील तसेच काही महिन्यांपूर्वी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात एखाद्या दक्षिण दिग्विजयी सम्राटाच्या थाटात स्वागत केले गेले. त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली होती आणि पक्षीय नेते त्यांना मुजरा करण्यासाठी लवलवून हात बांधून उभे होते. अर्थात कोणी कोणापुढे किती लवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. तथापि या दिग्विजयी सत्कारानंतर पंतप्रधान मोदी यांनी आता २०२४चा निकाल ही केवळ औपचारिकता आहे, असे विधान केले. तो अहं, दंभ आणि आत्ममग्न नेत्याचा आत्मगौरवोद्गार हा सत्ताधारी भाजपच्या घसरगुंडीचा प्रारंभ होता. त्यानंतर पुढचा काळ भाजप नेत्यांचे सर्व प्रयत्न हे ही घसरण अधिक जोमाने कशी होईल याच दिशेने सुरू होते. हाती असलेल्या अमाप प्रशासकीय आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर त्यांनी काय काय केले नाही? विरोधकांतील जमेल त्यास फोडले, जे फुटले नाहीत त्यांना नामोहरम करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांचा बेधडक वापर केला आणि तरीही अपेक्षित यश येत नाही, हे दिसल्यावर धर्माच्या आधारे फूट पडेल यासाठी कसोशीने प्रयत्न केले. ते सर्व अंगाशी आले. म्हणून हा निकाल ऐतिहासिक ठरतो. त्याचे मूल्यमापन दोन पातळ्यांवर व्हायला हवे. एक म्हणजे अर्थातच राष्ट्रीय आणि दुसरे महाराष्ट्रीय.

राष्ट्रीय पातळीवर लक्षात घ्यावा असा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे ही १४० कोटी नागरिकांना कवेत घेणारी, खंडप्राय देशातील निवडणूक आपण एकट्याच्या खांद्यावरून तडीस नेऊ शकू असे पंतप्रधान मोदी आणि त्यांचे उजवे हात अमित शहा यांचे वर्तन. या भ्रमामुळे त्यांनी स्वपक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांस खड्यासारखे दूर सारले अथवा कस्पटासमान लेखून त्यांची मानहानी कशी होईल हे पाहिले. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडसारख्या अलीकडे जिंकलेल्या राज्यांत भाजपने त्या राज्यांतील स्थानिक नेत्यांस दूर केले. आपण म्हणजे जणू कोणी राजकीय परीस आहोत किंवा आपल्यामुळे दगडही तरंगू लागेल असे त्या वेळी भाजप नेत्यांचे वर्तन होते. ते किती फसवे होते, हे आजच्या निकालाने उघड होते. हे केवळ त्या नेत्यांबाबतच झाले असे नाही. भाजपचा आधारस्तंभ असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही काही अंतरावरच राखले गेले. त्याचा फटका भाजपस बसला. एकट्या मध्य प्रदेशचा अपवाद सोडला तर गोपट्ट्यातील अन्य राज्यांनी भाजपकडे पाठ फिरवली. गेल्या दोन खेपेस भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली होती. त्यामुळे यंदा तर आपला विजयरथ ‘चारसो पार’ची झेप घेणार असे भाजपला वाटू लागले होते. पण नंतर ही झेप जमणार नाही, असे लक्षात आल्यावर ‘रालोआ’च्या ‘चारसो पार’च्या वल्गना सुरू झाल्या. प्रत्यक्षात ‘रालोआ’ची ३०० चा टप्पा ओलांडतानाही दमछाक होताना दिसते. आणि भाजप तर स्वबळावर किमान बहुमताचा आकडाही पार करेल किंवा नाही, अशी अवस्था आहे. त्यात भाजपच्या जखमेवर मीठ चोळले जाईल ते मित्रपक्षांच्या यशाचे. आजमितीस चंद्राबाबू नायडू यांचा ‘तेलुगु देसम’ अथवा नितीशकुमार यांचा जनता दल या पक्षांस जे यश मिळाले ते न मिळते तर भाजपची अवस्था यापेक्षाही दारुण झाली असती. तात्पर्य : राज्य आणि राज्यस्तरीय नेते यांस केंद्रीय नेत्यांनी कधीही कमी लेखू नये. नको त्या ठिकाणी पडल्यावर हे राज्यस्तरीय नेतेच मदतीचा हात पुढे करतात, हा राजकीय इतिहास आहे.

महाराष्ट्रात त्याचेही भान भाजपस राहिले नाही. त्याचमुळे त्यांनी आधी स्वपक्षीय नेत्यांचे उत्तम खच्चीकरण केले आणि नंतर अन्य पक्षांस ‘संपवण्यासाठी’ फोडाफोडीचे उद्याोग केले. ते सर्वार्थाने अंगाशी आले. आज परिस्थिती अशी की दमदार, नैतिकवादी, भारतास महासत्ता बनवणाऱ्या, विश्वगुरू इत्यादींचे नेतृत्व असलेल्या भाजपपेक्षा निर्नायकी, दिशाहीन आणि साधनसामग्रीअभावी अत्यंत खडतर परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस पक्षाकडे महाराष्ट्रात अधिक खासदार असतील. गत लोकसभेत काँग्रेसचा एक खासदार होता. या वेळी १२० टक्के इतकी वाढ करत तो पक्ष डझनभर वा अधिक जागी विजयी होताना दिसतो. शरद पवार यांचे प्रभावक्षेत्र कमी करणे हे भाजपचे स्थापनेपासूनचे उद्दिष्ट राहिलेले आहे. आकाशपाताळ एक करून, अण्णा हजारे ते गो. रा. खैरनार यांच्यासारख्या उपटसुंभांची मदत घेऊनही ते जमत नाही हे लक्षात आल्यावर भाजपने त्यांच्या पुतण्यास फोडले. पुतण्याच्या वहाणेने काकांस ठेचू पाहणाऱ्या भाजपचे हात या प्रयोगातही पोळले. वास्तविक अजित पवार यांचा बेडूक जोपर्यंत काकांच्या सुरक्षित तळ्यात होता तोपर्यंतच त्यात फुगण्याची क्षमता होती. खरे तर तेथे असतानाही सुपुत्र पार्थ यास अजितदादा निवडून आणू शकले नव्हते. आता तर धर्मचारिणीसही त्यांनी पराभवाच्या खाईत लोटले. हे भाजपचे साहसवादी राजकारण. त्याआधी त्यांनी हाच प्रयोग एकनाथ शिंदे यांच्या निमित्ताने शिवसेनेवर करून पाहिला. न्यायालयीन दिरंगाई, सौहार्दपूर्ण निवडणूक आयोग असे सारे दिमतीस असल्याने भाजप तो प्रयोग करू शकला. पण तरीही निकाल आपल्या हाती राखणे त्या पक्षास शक्य झाले नाही. इतकेच काय अशोक चव्हाण यांच्यासारख्या ‘आदर्श’वादी नेत्यांस ऐन निवडणुकांच्या हंगामात आपल्याकडे ओढून विजयी वीराच्या थाटात मिरवणाऱ्यांस तर मतदारांनी चव्हाण यांच्या अंगणातच धूळ चारली. भाजपच्याच भाषेत ‘घर मे घुसके’ मारले!

पण या अव्यापारेषु व्यापारात भाजपने स्वगृहासही चूड लावली. शेतीसमोरचे आव्हान, कांदा उत्पादकांचा आक्रोश, इथेनॉलबंदी, भाजपवासी झालेल्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी नेत्यांस या ग्रामीण प्रश्नांमुळे घरातूनच सहन करावा लागणारा बुक्क्यांचा मार, वाढती बेरोजगारी इत्यादी मुद्दे जणू अस्तित्वातच नाहीत, असे भाजपचे वर्तन होते. महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाचा ‘म’देखील भाजपने कधी प्रचार सभांत काढला नाही. कधी नव्हे ते पंतप्रधान मोदी यांस या वेळी एखाद्या मतदारसंघात दोन-दोनदा प्रचार सभा घ्याव्या लागल्या आणि १९ वेळा महाराष्ट्राची यात्रा काढावी लागली. ते सर्व निरुपयोगी ठरले. आपण स्पर्श केला तीच शिवसेना वा राष्ट्रवादी हे खरे पक्ष आणि इतक्या वर्षांचा संसार जिच्याशी केला ती सेना नकली ठरवण्यापर्यंत पंतप्रधानपदावरील व्यक्तीची मजल गेली. ज्या व्यक्तीचे बोट धरून आपण राजकारणात आलो असे अवघ्या काही वर्षांपूर्वी म्हणणाऱ्या पंतप्रधानांचा लंबक या निवडणुकीत ‘भटकती आत्मा’ म्हणण्यापर्यंत गेला. प्रत्येक आघाडीवर नि:शस्त्र ठरणाऱ्या विरोधकांहाती अखेर मतदारांनीच आपले मतास्त्र दिले आणि भाजपवर मात केली. या निकालाचा परिणाम अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांत होणार हे सूर्यप्रकाशाइतके सत्य. तो कसा यावर भाष्य करण्याचा हा प्रसंग नव्हे, हे खरे. पण त्याकडे लक्ष वेधणे आवश्यक ठरते.

आता चित्र असे की ‘मी आणि माझे’ इतक्यापुरतेच कायम मर्यादित राहिलेल्या मोदींच्या राजकीय नेतृत्वांस सत्तेसाठी इतरांशी जुळवून घ्यावे लागेल. मोदी हे २००१ पासून फक्त आणि फक्त सत्तेत आहेत आणि त्यांनी या काळात निर्विवाद सत्ताच राबवलेली आहे. आघाडीतील घटक पक्षांशी सोडा, पण स्वपक्षातीलही सर्वांशी जुळवून घेऊन काम करणे त्यांस माहीत नाही. ‘‘माय वे ऑर हाय वे’’ हा त्यांचा खाक्या. आता तो सोडावा लागेल आणि परदेश दौऱ्यात महासत्ता प्रमुखांस देतात तशी आलिंगने स्वपक्षीय आणि आघाडीतील नेत्यांसही द्यावी लागतील. हे मोठे कठीण काम. ते करावे लागेल. ते कसे करायचे याचे शिक्षण ज्याचा मुद्दा ते निवडणुकीत करू पाहत होते तो प्रभु रामचंद्र त्यांस देऊ शकेल. या निवडणुकीतील जनमताचा रेटा इतका तीव्र की मर्यादापुरुषोत्तमास राजकीय जाळ्यात ओढण्याचा निषेध त्या मतदारसंघानेच केला. अयोध्येत भाजपस पराभव पत्करावा लागला, यातच काय ते आले. तेव्हा भाजपच्या राजकारणास प्रभु रामचंद्रानेच दूर ठेवले म्हणायचे. आता हे राम-विरहित राजकारण- तेही आघाडीधर्म पाळून- मोदी आणि मंडळींस करावे लागेल. मनाला सज्जनपणाची शिकवण देण्यासाठी समर्थ रामदास रघुराजाकडे विस्मयाने पाहण्याची विनंती करतात… ‘‘मना प्रार्थना तूजला एक आहे। रघूराज थक्कीत होऊनि पाहे। अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे।।’’ असा सल्ला देतात. सत्ता राखायची तर भाजपस त्याचे पालन करण्याखेरीज पर्याय नाही.