समोर राहुलऐवजी विराट कोहली असता, तर अशा प्रकारे त्याला सुनावण्याची हिंमत कुणा मालकाची झाली असती?

लखनऊ सुपर जायंट्स या इंडियन प्रीमियर लीगमधील नवथर फ्रँचायझीचे मालक संजीव गोएंका हे स्वत: बहुधा निष्णात क्रिकेटपटू असावेत. पण ते गंभीर, स्पर्धात्मक क्रिकेट किती खेळले, याविषयी नोंदी उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या आघाडीवर इच्छा असूनही भरभरून लिहावे असे हाती काही लागत नाही. तसे पाहता या देशात निष्णात क्रिकेटपटू कोटय़वधी आढळतील. पण त्यांतील बहुतांनी क्रिकेट ‘खेळण्या’ऐवजी क्रिकेट ‘पाहणे’ आणि क्रिकेट ‘बोलणे’ यालाच आयुष्याचे ईप्सित मानले आणि या खेळावर अनंत उपकार केले. संजीव गोएंका याच संस्कृतीचे प्रतिनिधी. आपल्याकडे चावडीपासून दिवाणखान्यापर्यंत आणि कॉलेज कट्टय़ापासून मद्यालयापर्यंत बैठकांमध्ये क्रिकेटचे बोधामृत पिण्या-पाजण्याची परंपरा जुनी. विनू मंकडला चेंडूला उंचीच देता येत नव्हती.. पतौडी फिल्डर चांगला होता पण डायरेक्ट थ्रो जमत नव्हता.. हाणामारी हा गावस्करचा प्रांतच नव्हता.. कपिलदेव रिव्हर्स िस्वग कुठे करायचा.. तेंडुलकर खेळतो पण बाकीचे मुद्दाम विकेट फेकतात.. इत्यादी इत्यादी बारकाव्यांवर अधिकारवाणीने मतप्रदर्शन करण्यात, राष्ट्रीय नसलेल्या खेळावर राष्ट्रीय वेळ व्यतीत करणाऱ्या पिढय़ान् पिढय़ा या देशात होऊन गेल्या. या सगळय़ांना जितके क्रिकेट समजले, उमजले त्याच्या कणभरही ते प्रत्यक्ष मैदानावर खेळलेल्या अभागींना आकळले नव्हते हा सर्वच चर्चाचा मथितार्थ. या पिढय़ांमध्ये संजीव गोएंका जन्माला आले हा त्यांचा दोष नाही. त्यातून ते ठरले मालक. तेदेखील साधेसुधे नव्हे, तर अवघ्या क्रिकेट जगतासाठी क्रांतिकारी ठरलेल्या इंडियन प्रीमियर लीग या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमधील एका फ्रँचायझीचे मालक. या लीगला अधिष्ठान आहे, क्रिकेट जगतातील सर्वशक्तिमान क्रिकेट मंडळ म्हणजे अर्थात बीसीसीआयचे. तशात दिल्लीतील विद्यमान सत्ताधीश आणि क्रिकेटचे सत्ताधीश यांच्यातील सीमारेषा सध्या बरीचशी पुसट आहे. त्यामुळे सत्ता आणि मालकीच्या युतीतून संजीव गोएंकांसारखी फ्रँचायझी मालक मंडळी शिरजोर झाली नसती, तरच नवल.

Loksatta editorial Sam Pitroda Congress made a controversial statement on diversity in India
अग्रलेख: उष्मा उसळला; कान झाका!
China Becomes India Top Trade Partner
­­­­अग्रलेख : डोळे वटारता वटारता…
rushi sunak
अग्रलेख: पंधराव्या लुईचे पाईक
loksatta editorial bjp bring pakistan issue in lok sabha election campaign for targeting congress
अग्रलेख : शेजार‘धर्म’!
Mumbai Ghatkopar hoarding collapse incident
अग्रलेख : फलक-नायक फळफळले…
loksatta editorial joe biden imposes heavy import tariffs on chinese imports
अग्रलेख : बाजार कुणाचा उठला…
loksatta editorial on one year of women paraded naked in manipur incident
अग्रलेख: समर्थांची संशयास्पद संवेदना
Loksatta editorial Salman Khan house attacked by two assailants on a bike
अग्रलेख: सलमानी सुल्तानी!

तर अशा या महाशयांनी नुकत्याच एका सामन्यापश्चात लखनऊचा कर्णधार के. एल. राहुलची सर्वासमक्ष, भर मैदानात झाडाझडती घेतली. लखनऊचा संघ सामना दारुण हरला होता आणि त्यामुळे संजीव गोएंका संतप्त झाले असणे स्वाभाविक आहे. तरीदेखील त्यांनी राहुलला अशा प्रकारे बोल लावायला नको होते, याविषयी मतैक्य आहे. त्यातही राहुल निमूटपणे सारे काही ऐकून घेत होता. त्याचाही पारा चढता आणि ‘अरे’ला ‘का रे’ जबाब तो देता, तर कदाचित तो संवाद इतका एकतर्फी झाला नसता. शिवाय समोर राहुलऐवजी विराट कोहली असता, तर अशा प्रकारे त्याला सुनावण्याची हिंमत कुणा मालकाची झाली असती? कदाचित झालीदेखील असती. कारण या संस्कृतीमध्ये खेळाच्या चाव्या मालकांकडे आहेत. ही मालक मंडळी बोली लावून खेळाडू खरीदतात. त्या बोली लावतानाचे हावभाव आणि ‘किंमत ठरवताना’ दीर्घ कारकीर्द असलेल्यांनाही किरकोळीत कशा प्रकारे काढले जाते, याचे दर्शन दूरचित्रवाहिनीवरून वर्षांनुवर्षे घडत आहेच. या संस्कृतीमध्ये सीमारेषेचे पावित्र्य नसते. ही सीमारेषा खेळाडू आणि इतरेजनांदरम्यानची असते. मागे काही जुन्याजाणत्या खेळाडूंनी एका प्रवृत्तीविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अनेकदा मालक मंडळी किंवा त्यांची पुढची पिढी मैदानात केवळ खेळाडू व प्रशिक्षकांसाठी राखीव असलेल्या विश्रामतंबूत सर्रास बसतात. जुन्याजाणत्यांच्या मते ते गैरच नव्हे, तर मुजोरपणाचेदेखील होते. याचे कारण खेळाडू म्हणजे आपल्या पदरी पैसे मोजून बाळगलेले पगारी नोकर असल्यासारखे या मालक मंडळींना वाटत असावे. त्यामुळे मैदान हे खेळाडूंचेच असते आणि त्याचे पावित्र्य सर्वानी जपले पाहिजे या जुनाट समजुतीशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे कारण नाही. 

आणि त्या लिलावांविषयीदेखील काय बोलावे? आयपीएल ही जगातली सर्वाधिक वेगाने विस्तारणारी क्रीडा लीग असल्याचे दावे येथे केले जातात. पण ज्या लीगशी आपण तुलना करतो, त्या लीग – इंग्लिश प्रीमियर लीग, स्पॅनिश ला लिगा, एनबीए, एनएफएल, एनएचएल – लिलावांच्या माध्यमातून खेळाडूंची भरती करत नाहीत. तेथे हंगामाच्या सुरुवातीस किंवा काही वेळा मध्यावरही खेळाडूंसाठी ‘ड्राफ्ट’ बनवले जातात आणि सगळे व्यवहार बंद दरवाजाआड होतात. शिवाय परवाच खेळू लागलेल्यासाठी १५ लाख आणि १५ वर्षे क्रिकेट खेळलेल्यासाठी १५ हजारही नाही अशी क्रूर विनोदी विसंगती सहसा आढळत नाही. मागे एकदा एका आयपीएल लिलावादरम्यान मोहम्मद कैफ या अनुभवी खेळाडूची बोली लागली, त्या वेळी कोची या आता नामशेष झालेल्या फ्रँचायझीच्या चालक-मालक मंडळींनी सुरुवातीस किंमतफलक वर करून मग खाली केला.. आणि नंतर सारे फिदीफिदी हसले! त्या वेळी हसे मोहम्मद कैफचे नव्हे, तर भारतीय क्रिकेटचे झाले हे कळण्याइतपत परिपक्वता त्या मंडळींकडे नव्हती. बहुतेक आयपीएल फ्रँचायझींचे आर्थिक ताळेबंद किंवा मालकी भागीदारीविषयी व्यवहार स्वच्छ अजिबातच नाहीत. आयपीएलचे वय अजून केवळ १७ वर्षे आहे. या काळात अर्धा डझन तरी फ्रँचायझी एक तर कोणत्या तरी वादात अडकल्या किंवा डबघाईस जाऊन गुंडाळाव्या लागल्या. क्रिकेट किंवा क्रिकेटपटूंविषयीचे ज्ञान दूरच राहिले, पण किमान कॉर्पोरेट शिस्त किंवा बाजारपेठेविषयी आकलनातही फ्रँचायझी मालक मंडळींचा स्तर फार वरचा असल्याची लक्षणे आढळत नाहीत. तरीदेखील लिलावातून बोली लावून खरीदले की अशा खेळाडूंवर मालकी हक्क आपोआप प्रस्थापित होतो. मध्ययुगीन काळात तसा तो गुलामांवर किंवा झुंजीसाठी पोसल्या जाणाऱ्या बैल-कोंबडय़ांवर प्रस्थापित व्हायचा. मग अशी जनावरे बाहेर कशी बरे जाऊ द्यायची? क्रिकेटविश्वात आयपीएल ही एकमेव अशी लीग आहे, जेथे करारबद्ध झालेले क्रिकेटपटू इतर देशांतील कोणत्याही लीगमध्ये खेळू शकत नाहीत. म्हणजे एकीकडे बाजारकेंद्री अर्थव्यवस्था आणल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटायची आणि दुसरीकडे तिला पद्धतशीर बंदिस्तही करायचे, असा हा प्रकार.

इंग्लिश प्रीमियर लीगसारख्या स्पर्धामध्येही मालक मंडळींविषयी काही वेळा चाहत्यांचा रोष असतो. पण रोष असो वा नसो, चालक-मालक स्वत:ची जहागिरी असल्यागत मैदानावर फिरत-फिरकत नाहीत. खेळाडूंशी अंतर ठेवून वावरतात. खेळाच्या मैदानाचे दोनच मालक. खेळाडू आणि चाहते. खेळाडू आहेत म्हणून चाहते आहेत. चाहते आहेत तर व्यवसायवृद्धी आणि बाजारपेठ आहे. बाजारपेठ आहे तर समृद्धी आहे, इतकी ही साधी-सरळ शृंखला. या उतरंडीमध्ये घुसखोरी ज्यांना करावीशी वाटते आणि प्रसिद्धीचा झोत स्वत:वर आणावासा वाटतो, त्यांच्यासाठी आयपीएल आहे! पैसा फेकणारे हेच खरे खेळाचे परिचालक या मग्रुरीतून हे घडते. वास्तविक आयपीएलच्या आधी या देशातील सर्व क्रिकेटपटू हे बीसीसीआयच्या अधिकारकक्षेत येतात. त्यामुळे त्यांच्यावर पहिला हक्क बीसीसीआयचा आहे. अशा खेळाडूंना आयपीएल फ्रँचायझी कशा प्रकारे वागवते यावर बीसीसीआयचे नियंत्रण हवेच. त्यामुळे संजीव गोएंकांना झाल्या प्रकाराबद्दल बीसीसीआयने जाब विचारायला हवा आणि इतर फ्रँचायझींनाही तंबी द्यायला हवी. ती शक्यता धूसर. कारण हा खेळ भारतात ब्रिटिशांनी आणला आणि येथल्या उमरावांनी वाढवला. ब्रिटिश गेले, उमराव संपले पण उमरावी मानसिकता बहुधा जिवंत राहिली. ती फ्रँचायझी मालकांच्या परिघापलीकडे, बीसीसीआयमध्येही झिरपलेली आहे. त्यामुळेच लिलावही होत राहणार आणि फ्रँचायझी मालकांकडून खेळाडूंचा जाहीर अपमानही. त्यामुळे संजीव गोएंकांच्या कृतीचा हजारोंना राग येत असला, तरी उमरावी मानसिकता ही नेहमीच मुजोर, मग्रूर आणि मध्ययुगीन असते याला ते तरी बिचारे काय करणार?