अमेरिकेशिवायही बरेच काही करता येईल याविषयी युरोपीय नेत्यांना साक्षात्कार होऊ लागला असून सत्याचा सामना करण्याची तयारी कार्नी, लेयेन आणि माक्राँ यांनी बोलून दाखवली आहे.

ग्रीनलँडच्या मागणीवरून युरोपीय नेत्यांना ‘…धरणी ठाय’ करण्याच्या इराद्याने महामहीम डोनाल्ड ट्रम्प दावोसमध्ये दाखल झाले खरे. पण दोन मुद्द्यांवर दोन पायऱ्या उतरण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली याचे कारण प्रमुख युरोपीय नेते आणि कॅनडाच्या पंतप्रधानांनी दाखवलेला खमकेपणा. ‘ग्रीनलँडच्या मागणीवर मी ठाम आहे, पण त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर करणार नाही’ ही ट्रम्प कबुली ही पहिली शरणागती. याशिवाय ग्रीनलँडच्या रक्षणासाठी उभ्या राहिलेल्या आठ युरोपीय देशांविरुद्ध उपसलेली संभाव्य आयात शुल्क वाढीची तलवारही त्यांनी म्यान केली. ही झाली दुसरी शरणागती. ट्रम्प आज जे बोलतात ते उद्या करत नाहीत. जे करणारच म्हणून गर्जतात ते त्यांच्या कृतीतून क्वचितच बरसते. पण माणूस निखालस बेभरवशाचा. त्यातून अमेरिकेची लष्करी-आर्थिक ताकद आणि विध्वंसमूल्य पाहता धोकादायकही. ‘आम्ही लक्षात ठेवू’ हा गर्भित इशारा त्यांनी ग्रीनलँडच्या संदर्भात युरोप आणि उत्तर अटलांटिक संघटनेच्या (नेटो) सदस्य देशांना दावोसमध्ये देऊन ठेवलाच आहे. ते काही असो, पण ट्रम्प काय बोलतात नि काय बोलत नाहीत यावर चर्चा-चिंता-चिंतन करण्यापेक्षा, आपण काय बोलू शकतो आणि भूमिका मांडू शकतो याचा विचारच हल्लीचे बहुतेक राष्ट्रप्रमुख करत नाहीत. बरेचसे ट्रम्प यांची होयबागिरी करतात, काही अनाकलनीयरीत्या गप्प बसतात नि मोजकेच रोकडा प्रतिवाद करतात. या तिसऱ्या गटात कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचे नाव आदराने घ्यावेच लागेल. याला कारणीभूत ठरले दावोसमध्ये बुधवारी रात्री त्यांनी केलेले अप्रतिम भाषण. विशेष म्हणजे या भाषणात ट्रम्प यांचा नामोल्लेखही नव्हता. तरीदेखील ट्रम्प यांच्या लहरी मर्जीतून लोकशाही आणि प्रगत जगताची घडी ज्या प्रकारे विस्कटत आहे त्याविषयी चिंता तर होतीच. पण निव्वळ उपदेशाचे डोस पाजत राहण्यापेक्षा, आपण काय करू शकतो याविषयी ठोस कार्यक्रमच त्यांनी मांडला. त्यांच्या त्या भाषणास सर्व उपस्थितांनी उभे राहून दाद दिली. ही दाद जितकी मार्क कार्नी यांच्या पांडित्याला होती, त्यापेक्षा अधिक त्यांच्या कणखरपणाला होती. त्यांच्या भाषणाच्या काही तास आधी ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर ‘फोटोशॉप’ केलेले छायाचित्र प्रसृत केले. त्यात व्हाइट हाऊसमधील दालनात ट्रम्प यांच्यासमोर प्रमुख युरोपीय नेते बसले होते. त्या दालनातील भिंतीवर नकाशात अमेरिकेप्रमाणेच कॅनडा आणि ग्रीनलँडही अमेरिकी ध्वजाखाली दाखवले होते! हा निव्वळ चावटपणा नाही. ही ट्रम्प यांची राक्षसी मनीषा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ट्रम्प वाटेल त्या थराला जाऊ शकतात, असे मानणाऱ्यांपैकी कार्नी एक. त्यामुळेच दावोसमधील भाषणात त्यांनी दिलेले इशारे आणि सुचवलेले मार्ग याची दखल घ्यावीच लागते.

‘नियमाधिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे गोडवे गात प्राप्त परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्याचा भोळसटपणा सोडा’, हा कार्नी यांनी दिलेला एक खणखणीत इशारा. तो काळ कधीच सरला. आता आपण महासत्तांच्या साठमारीच्या युगात जगत आहोत. या महासत्ता कधी आर्थिक निर्बंधांचे हत्यार उपसतात, कधी शस्त्रास्त्रांच्या जोरावर दंडेली करतात. त्याने ते शक्य असते. त्यांचा आकार, बाजाराची व्याप्ती, लष्करी ताकद त्यांच्यापाशी असते. ती सूट मध्यमसत्तांना नसते. म्हणूनच महासत्तांशी समोरासमोर एकल वाटाघाटी असे काही नसते. त्यांच्यासमोर आपण करतो, ती तडजोड. यात आपण आपले सार्वभौमत्व राखल्याचा आव आणतो, पण तो केवळ बनाव असतो. कारण आपण महासत्तांसमोर कमकुवतपणा मान्य करून निम्नत्व स्वीकारलेले असते. कारण एकटे त्यांच्यासमोर गेलेलो असतो. त्याऐवजी मध्यमसत्तांनी एकत्र येऊन तिसरा पर्याय शोधावा. परस्परांशी मूल्याधिष्ठित पण व्यवहार्य संबंध स्थापित करावेत. महासत्तांची कृपा पदरात पाडण्यासाठी एकमेकांशी लढण्यापेक्षा, आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहून एकजूट उभी करावी आणि स्वत:स सक्षम करावे. हे ठसवताना कार्नी बोलून गेले, ‘तुम्ही जेवण-टेबलाच्या खुर्चीत नसाल, तर ताटातल्या पदार्थात असाल!’ म्हणजे निर्णय घेणाऱ्यांत नसाल तर तुम्हास खाऊन टाकले जाईल.

या संपूर्ण भाषणात कार्नी यांनी वारंवार मूल्यांचा दाखला दिला. मूल्यांची कास सोडू नयेच. पण गतकाळातील स्मृतींना उजाळा देण्याची वेळ सरली. जुने दिवस परत येणार नाहीत, कारण प्रस्तुत काळ संक्रमणाचा नसून जागतिक व्यवस्थेचे धागे फाटण्याचा असल्याची आठवण कार्नी यांनी करून दिली. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांनी नियमाधिष्ठित व्यवस्था नियममुक्त झाल्याचा इशारा दावोसमध्ये दिला. युरोपने आपल्या मर्जीबरहुकूम वागवावे अशी अमेरिकेची इच्छा दिसते हे माक्राँ यांनी बोलून दाखवले. युरोपियन कमिशनच्या प्रमुख उर्सुला व्हॉन डेर लेयेन यांनीही कार्नी यांचेच विचार बोलून दाखवले, पण त्यांनी ट्रम्प यांचा उल्लेख केला आणि त्यांची भाषा अधिक सबुरीची होती. फिनलँडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब्स यांनी ट्रम्प यांच्या दंडेलीचा थेट उल्लेख करत, ‘अमेरिका युरोपची मुस्कटदाबी करतेय कारण अमेरिकेला आता युरोपची मैत्री महत्त्वाची वाटेनाशी झाली’ असे सुनावले.

ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात युरोपची यथेच्छ खिल्ली उडवली. ग्रीनलँडचा ताबा आम्हास देणे म्हणजे अमेरिकेच्या कैक वर्षांच्या ऋणातून युरोपने मुक्त होण्यासारखेच आहे, असे ते म्हणाले. ‘‘ग्रीनलँडवर बळाचा वापर करून कब्जा करू शकतो, पण आम्ही तसे करणार नाही’’, हे त्यांचे विधान. अमेरिकेशिवाय युरोपचे पानही हलत नाही असे त्यांनी सांगितले असले, तरी दावोसमध्ये उमगलेले एक सत्य म्हणजे, अमेरिकेशिवायही बरेच काही करता येईल याविषयी युरोपीय नेत्यांना अलीकडे होऊ लागलेला साक्षात्कार. यासाठी सत्याचा सामना करण्याची तयारी कार्नी, व्हॉन लेयेन आणि माक्राँ यांनी बोलून दाखवली आहेच. कॅनडाला अमेरिकेच्या समीप असूनही युरोपच्या बाजूने जावेसे वाटते, कारण उरल्यासुरल्या मूल्याधिष्ठित जागतिक व्यवस्थेची चाड या खंडातच शिल्लक असल्याची जाणीव कार्नी यांना आहे. यासाठीच नेटोच्या सदस्य देशाविरुद्ध अमेरिकेसारखा दांडगा देश शस्त्रे उपसणार असे म्हणत असताना, कार्नी यांनी डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. कारण वैचारिक बैठक पक्की आहे आणि निर्धार स्पष्ट आहे. यापूर्वी बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर म्हणून कार्नी किमान तीसेक वेळा दावोसला जाऊन आले. यंदा प्रथमच ते एका राष्ट्राचे प्रमुख म्हणून हजर होते. तसे जावेसे वाटले, कारण तेथे काही तरी मांडलेच पाहिजे याची निकड त्यांना जाणवली. एरवी दावोसची वार्षिक वारी म्हणजे शोकेस आणि बर्फाळ पर्यटन यापेक्षा वेगळे काय असते? कार्नी यांनी विद्यामान ट्रम्पकेंद्री व्यवस्थेत आपण काय केले पाहिजे आणि करू शकतो याची रूपरेषा मांडून दाखवली. त्यामुळे लक्षात अधिक राहिले ते कार्नी यांचे भाषण. ट्रम्प हे ट्रम्पसारखेच वागणार नि बोलणार. आपण कसे वागायचे हे आपण कधी ठरवणार नि सांगणार? महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या मध्यमसत्तांनी याविषयी ठरवण्याची वेळ आलेली आहे हा कार्नी यांच्या भाषणाचा अन्वयार्थ.

मध्यमसत्तांचा हा मध्यममार्ग किंवा तिसरा मार्ग ही संकल्पना म्हणजेच अलिप्ततावाद नव्हे काय? सुमारे ७५ वर्षांपूर्वी तशी ती संयुक्त राष्ट्रांमध्ये भारत आणि (तत्कालीन) युगोस्लाव्हियाने पहिल्यांदा मांडली. तिचे प्रणेते होते पंडित जवाहरलाल नेहरू. स्वयंपूर्ण आणि विधायक अलिप्ततावाद हाच शाश्वत आणि स्वाभिमानी शांततेचा राजमार्ग हे नेहरूंनी तेव्हा ओळखले होते. कार्नी यांनी हेच तत्त्व वेगळ्या शब्दांत मांडले. तो कृतीत आचरणाऱ्यांचा फायदा होऊ शकतो. तो दुर्लक्षणाऱ्यांच्या नशिबी अमेरिकेकडून टोमणे, उपेक्षा आणि कृपेची प्रतीक्षा आहेच! विलक्षण प्रतिगामी ट्रम्प हे लसीकरण आणि डोस या आरोग्यशास्त्रातील आधुनिकतम पद्धतींच्या सतत विरोधात असतात. कार्नी यांनी दिलेला जाहीर ‘डोस’ ट्रम्प यांना असला तरी इतरांनी त्यापासून धडा घेण्यास हरकत नाही.