जे झाले ते सुन्न करणारे आहे. देशाच्या राजधानी दिल्लीत गेली जवळपास दोन दशके वास्तव्यास असलेला प्रख्यात मणिपुरी गिटारवादक चोंगथम विक्रम सिंह यांस आठ-दहा जणांनी ठेचून मारले. विक्रम सिंह यांचे वय ५४. शरीरानेही तसे ते कृश. त्यांचे पाप इतकेच की मध्यरात्रीच्या सुमारास घराखाली गोंगाट करणार्या रिकामटेकड्यांस ते शांत बसा असे सांगायला गेले. अलीकडे एका मोठ्या बिनडोकबहुल समाजास वाद्यांचा, फटाक्यांचा, ते काही नसेल तर गाठ्या-फाफडा खात इतरांचे डोके उठवणारा गोंगाट करणे हे पौरुषत्वाचे लक्षण वाटू लागले आहे. या अशा ‘वीरपुरुषांची’ संख्या भूमिती श्रेणीने वाढत असल्याने हे गोंगाट-सम्राट सगळीकडे दिसतात. अगदी विमानातही आपले डबे काढून चरत बसण्यात त्यांना काही वावगे वाटत नाही. या अशा डबे खाण्यात कोणास आक्षेप असण्याचे कारण नाही. पण पिठाच्या गिरणीप्रमाणे तोंडाची चक्की चालू ठेवत हा वर्ग जी वचवच करत असतो तीमुळे कोणाही सज्जन भारतीयाची मान लाजेने खाली जाईल. हे असे करणारे सुशिक्षित असल्याचे म्हणवतात. आर्थिकदृष्ट्याही बर्या घरातले असतात ते. पण डोक्यात अकलेचा ठणठणाट. विक्रम सिंह यांच्यावर हल्ला करणारे रिकामटेकडे आणि हे या दोहोंत अक्कलशून्यता हा समान धागा. त्यात विक्रम सिंह यांच्यावरील हल्लेखोरांची आर्थिक परिस्थितीही अधिक हलाखीची असणार. म्हणून त्यांच्या मनातील विखारही अधिक तीव्र. आपल्या गोंधळ घालण्यास आक्षेप घेणार्या विक्रम सिंह यांचा या बेकाम आणि बेफाम तरुणांनी त्याच्या तिसर्या मजल्यावरील घरापर्यंत पाठलाग केला आणि लाथा-बुक्क्यांच्या वर्षावात त्याचा जीव घेतला. जगातील तिसर्या क्रमांकावर असलेल्या— आणि दुसर्या क्रमांकावर जाण्याचे नावही न काढणार्या (कारण या स्थानी चीन आहे.)— या संभाव्य महासत्तेचे नागरिक आता तरी डोळे उघडून आसपास काय सुरू आहे याची दखल घेतील काय?
अभागी विक्रम सिंह भले दूरच्या मणिपूरचे असतील आणि त्या प्रांतातील सर्वांस नेपाळी म्हणवून हिणवण्याची सोयही आपणास असेल पण त्यांच्याबाबत जे झाले ते आता तितके दूरचे राहिलेले नाही. विद्यानगरी वगैरे असलेल्या पुण्यात कोणा विद्यानंद बापट या तरुणावर ज्या कारणासाठी हल्ला होतो त्याच कारणासाठी विक्रम सिंह यांचा जीव घेतला जातो. दोन्हीही घटनांतील हल्लेखोरांची मानसिकता तीच. तिच्या प्रदर्शनाने आपण समाज म्हणून अजूनही कसे मागास आहोत हेच दिसून येते. दळणवळणाच्या कोणत्याही सोयीसुविधा विकसित झालेल्या नव्हत्या त्या काळी माणसे एकमेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठमोठ्याने बोलत, आवाज करत आणि भडक रंगाचा वापर करत. पुढे उत्क्रांतीच्या वाटेवर माणसाची प्रगती झाली. ते प्रगतीचे वारे आपल्यातील काहींस वळसा घालून पुढे गेले असावेत. कारण प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना अंगी विकसित होणारी सभ्यता, ऋजुता, इतरांचा आदर करण्याची वृत्ती इत्यादी गुणांचा आपल्यातील अनेकांशी कित्येक पिढ्यांत संबंध आल्याचे आढळत नाही. या अशांचे सर्व काही भडक आणि बटबटीत. त्यांची संख्याही अधिक. आणि लोकशाहीत संख्या महत्त्वाची. योग्य की अयोग्य हा मुद्दाच नाही. सर्व काही बहुमत की अल्पमत यावर ठरणार. ‘‘बर्याचदा बहुमत म्हणजे सर्व मूर्ख एकाच बाजूस असणे’’, असे म्हणण्याची हिंमत दाखवणारे जॉन एफ. केनेडी आणि त्यांचा खरा लोकशाहीवाद या अशा बहुमती बलवंतांच्या आकलनापलीकडे असल्याने त्याचा दाखला देणे तसे अयोग्यच. परंतु कोणीतरी कोणाच्या तरी केवळ गोंगाट करण्यावर आक्षेप घेतो म्हणून त्याचा जीव घेतला जात असेल तर अशा समाजास काय म्हणायचे? ही इतकी असंवेदनशीलता येते कोठून? आली तरी तिला अंगी इतके कसे काय मुरू दिले जाते?
विक्रम सिंह यांच्या हत्येबाबत हा प्रश्न पडतो कारण तो ज्या प्रांतातून येतो ते राज्य आपल्या सामायिक असंवेदनशीलतेचा अनुभव सातत्याने घेत आहे. याच राज्यातील महिलांची विवस्त्र धिंड काढली गेली. तरीही आपणास त्याचे काही वाटले नाही. त्या राज्यातील कुकी आणि मैतेई समाजाच्या संघर्षात शेकडो मारले गेले. त्याही वेळी मरणारे अन्य धर्मीय आहेत यात अनेकांनी समाधान मानले. अन्यत्र अशा अशांत प्रदेशात केवळ लष्कर तैनात करण्यात येत आहे या वृत्ताने शांतता निर्माण होऊ लागते. परंतु याच मणिपुरात प्रक्षुब्ध जमावाने लष्करालाही लक्ष्य केले आणि सरकारी शस्त्रागारही लुटले. तरीही अन्यत्र कोणाची झोप उडाली नाही. या राज्यातील अशांततेचा आगडोंब शांत करण्यासाठी देशाच्या सर्वोच्च नेत्यास तेथे जाण्यास कित्येक महिने, वर्षे लागली. तरीही परिस्थिती शांत झाली नाही ती नाहीच. मुख्यमंत्र्यांविरोधात अन्य मंत्र्यांनी बंड केले, मंत्र्यांविरोधात आणखी कोणी बंडाचा झेंडा उगारला. हे असे अन्य कोणा राज्यात झाले असते तर प्रसारमाध्यमे आणि राजकारणी सर्व पैस ढवळून काढते. पण प्रश्न मणिपूरचा. ते ईशान्येकडील एक राज्य. तेथील माणसे दिसण्या- बोलण्यापासून बहुसंख्याक भारतीयांपेक्षा वेगळी. त्यामुळेही असेल; पण तेथील कोणत्याच संकटाने कोणाच्या मनावर ओरखडा उमटल्याचे जाणवले नाही. आता तर त्या राज्यातील एक अत्यंत लोकप्रिय कलावंत हकनाक मारला गेला. विक्रम सिंह याचे घराणे कलावंताचे. गाणे हे त्याच्या रक्तात. त्याची आई आज ८५ वर्षांची आहे. मणिपूरच्या लता मंगेशकर अशी त्यांची ओळख. आजही त्या शास्त्रीय संगीताच्या शिकवण्या घेतात. याच गाण्याच्या प्रेमापोटी त्यांचा मुलगा राजधानी दिल्लीत आला. सुरांवर मनापासून प्रेम करणार्या या कलावंताने आसमंतात ठासून भरून राहिलेल्या बदसुरास आक्षेप घेतला आणि तो जीव गमावून बसला.
ही घटना काय, पुण्यात बापटांस झालेली मारहाण काय! हे सगळे इशारे आहेत. बहुमताच्या बदसुरांस आक्षेप घेणार्या अल्पसंख्याकास दिले जाणारे. त्या मागील अर्थ एकच. आम्ही गोंगाट करणार, आम्ही बेशिस्त वागणार, आम्ही सर्व नियमभंग करणार… कारण आम्ही बहुमतात आहोत!! जे आक्षेप घेऊ इच्छितात; त्यांनी ते खुशाल घ्यावेत. त्याने काहीही फरक पडणार नाही. पोलीस त्यांच्याकडे पाहणारही नाहीत, न्यायपालिका फार फार तर त्रागा व्यक्त करेल; पण कसला ठोस आदेश देणार नाही आणि प्रशासन तर तेवढेही करणार नाही… कारण ते बहुमतास बांधील असते. तेव्हा गुमान आम्हास सामील व्हा अन्यथा कानात बोळे घालून गप्प बसा असा या सगळ्याचा अर्थ. विक्रम सिंह यांस तो आधीच लक्षात आला असता तर तो घरी येऊन, दारे-खिडक्या बंद करून गिटारच्या तारा छेडत मन रिझवता. ते त्याने केले नाही. उगाच बहुमताचे प्रतिनिधित्व करणार्यांस आव्हान देण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्या बदल्यात जीव गमावला. बहुमतखोरांच्या विरोधात जाण्याआधी आपली वयोवृद्ध आई, पत्नी आणि मुले-बाळे यांचा विचार त्याने केला असता तर कदाचित हे अगोचर कृत्य त्याने केलेही नसते. या जर-तर शब्दप्रयोगास आता काही अर्थ नाही. तो काही परत येणार नाही आणि त्याच्या गिटारच्या तारा काही परत झंकारणार नाहीत. या बहुसंख्याकवादाची नशा इतकी तीव्र की आपली प्रगती नव्हे; अधोगती सुरू आहे हेही अनेकांस लक्षात येत नाही. आपला प्रवास आधुनिकतेकडे नव्हे; तर आदिमतेकडे सुरू आहे, हेही अनेकांस जाणवत नाही.
तथापि कोणत्याही समाजाची प्रगती तेव्हा होते जेव्हा तो समाज बहुमत-अल्पमत यापेक्षा योग्य-अयोग्य अशी फारकत करू लागतो. हे व्हायला हवे. अन्यथा विक्रम सिंह यांच्यासारख्यांचे बळी जातच राहतील. ते मरण सामूहिक शहाणपणाचे असते.
कोणीतरी कोणाच्या तरी केवळ गोंगाट करण्यावर आक्षेप घेतो म्हणून त्याचा जीव घेतला जात असेल तर अशा समाजास काय म्हणायचे? ही इतकी असंवेदनशीलता येते कोठून? आली तरी तिला अंगी इतके कसे काय मुरू दिले जाते?
