खेळाडूंचे यश वा लष्कराचा पराक्रम जणू आपल्या नेतृत्वामुळेच वाढल्याचा आव आणणार्‍या ट्रम्प यांनी वार्षिक भाषणात ठोस मुद्दे वा धोरणे न मांडता विरोधी पक्षावर टीकेची झोड उठवली…

एक वेळ ताटीवरील मढ्यात पुन्हा चेतना निर्माण करता येईल. पण आत्मप्रेमात मग्न-मशगुलांस वास्तवाचे भान आणून देणे अशक्य. अशांची अन्य उदाहरणे असली तरी तूर्त त्यांचे शिरोमणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत. कारण त्यांचे ‘स्टेट ऑफ द युनियन ॲड्रेस’ (एसओटीयू – सोटू). म्हणजे राष्ट्रास उद्देशून केलेले भाषण. अभिभाषणासारखी ही अमेरिकी परंपरा. नवीन वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांतील एखाद्या दिवशी अध्यक्ष कायदेमंडळाच्या संयुक्त बैठकीसमोर- म्हणजे सेनेट आणि हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज मिळून होणार्‍या अमेरिकी काँग्रेससमोर- भाषण करतात आणि देशाची परिस्थिती, आव्हाने, त्यावरील उपाय इत्यादी विषयांस स्पर्श करतात. या भाषणासाठी विविध मान्यवरांसही खास निमंत्रण दिले जाते.

अमेरिकी न्यायव्यवस्थेतील अधिकारी व्यक्तीही त्यास हजर असतात आणि हे भाषण संपल्यावर विरोधी पक्षनेता आपल्या पक्षाच्या वतीने भाषणावर अधिकृत प्रतिक्रिया देतो. ट्रम्प यांच्या दुसर्‍या खेपेतील हे महत्त्वाचे भाषण. त्याची प्रमुख कारणे तीन. एक म्हणजे गेल्या वर्षी अध्यक्षपदावर स्वार होऊन त्यांस पुरेसा वेळ मिळालेला नव्हता. दुसरे, यंदाच्या भाषणाआधीच सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांस दिलेला तडाखा. आणि तिसरे कारण म्हणजे अमेरिकेतील परंपरेनुसार होऊ घातलेली मध्यावधी निवडणूक. अध्यक्षांच्या चार वर्षीय कारकीर्दीच्या मध्यबिंदूवर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतरच्या मंगळवारी त्यासाठी मतदान होते. यात सेनेटमधील ४५ आणि हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज या लोकप्रतिनिधिगृहातील ४३५ जागांवर नवे प्रतिनिधी निवडले जातील. या दोन सदनांपैकी एका तरी ठिकाणी ट्रम्प यांस पराभव सहन करावा लागेल, असे म्हटले जाते. तो टाळण्यासाठी हे शेवटचे ‘सोटू’. त्याचा पुरेपूर वापर ट्रम्प यांनी केला आणि आपल्या एक तास ४७ मिनिटांच्या विक्रमी भाषणात या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. त्यावर भाष्य गरजेचे.

कारण या संपूर्ण भाषणात ट्रम्प यांनी आपले किती उत्तम सुरू आहे हे सांगण्यापेक्षा प्रतिस्पर्धी डेमॉक्रॅट्स हे किती नालायक आहेत यावर भर दिला. डेमोक्रॅटिक पक्षाने अमेरिकेसमोरील आर्थिक आव्हानांचा मुद्दा लोकप्रिय करण्यासाठी ‘परवडण्याजोगे’ (ॲफोर्डिबिलिटी) हा परवलीचा शब्द वापरण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात अलीकडे केली. म्हणजे अन्नधान्याचे दर, घरे, प्रवासखर्च, रोजगारनिर्मिती, थिजलेल्या वेतनश्रेणी इत्यादी कोणताही मुद्दा असो. नागरिकांस जे काही आहे ते परवडणारे आहे का, असे डेमॉक्रॅट्स विचारू लागले आहेत. त्यांस उत्तम प्रतिसाद मिळाल्याने ट्रम्प अस्वस्थ झाले आणि त्याबाबतची नाराजी त्यांच्या भाषणांतून थेट प्रक्षेपित झाली.

डेमॉक्रॅट्सचे हे ‘नवे खूळ’ अशी संभावना ट्रम्प यांनी या शब्दप्रयोगाबाबत केली. ‘‘डेमॉक्रॅट्सना आपली विधाने किती खोटी, प्रचारकी आणि घाणेरडी आहेत हे माहीत आहे, म्हणून ते ज्यात त्यात ‘ॲफोर्डिबिलिटी’चा मुद्दा आणून नागरिकांना भ्रमित करू पाहतात’’, असा ट्रम्प यांच्या म्हणण्याचा सूर. तो लावल्यामुळे आपण उलट डेमॉक्रॅट्सचे प्रचारतंत्र यशस्वी होत असल्याचे सूचित करत आहोत, हे अध्यक्ष महाशयांच्या लक्षात आले नाही. त्यानंतरही ट्रम्प यांनी आर्थिक मुद्द्यास डेमॉक्रॅट्सच्या स्थलांतर-प्रेमाशी वारंवार जोडले.

आगामी निवडणुकांआधी हा स्थलांतरितांचा मुद्दा जितका जमेल तितका तापवावा हा त्यांचा उद्देश. त्यात गैर काही नाही. फक्त स्थळ तितके योग्य नव्हते इतकेच. गेल्या काही आठवड्यांत ट्रम्प यांची लोकप्रियता लक्षणीयरीत्या घसरली असून साधारण फक्त ३०-३२ टक्के अमेरिकन ट्रम्प यांचे बरे चालले आहे या मताचे उरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे आर्थिक ध्येयधोरण ट्रम्प मांडतील ही अपेक्षा होती. ती फोल ठरली. त्यापेक्षा विरोधक किती वाईट आहेत हे सांगण्यावर त्यांनी भर दिला.

ट्रम्प हे दूरचित्रवाणीवरचे कलाकार. त्यामुळे ‘टीआरपी’चे महत्त्व ते जाणतात. त्याचे प्रत्यंतर यंदाच्या ‘सोटू’ भाषणात दिसले. भाषणात मजकूर काही नसला की वक्ता मनोरंजनास प्राधान्य देतो. ट्रम्प यांनी आज ते केले. बर्फावरील हॉकी स्पर्धेत विजेत्या संघातील खेळाडूंस त्यांनी अत्यंत नाट्यपूर्णपणे या समारंभात पेश केले आणि आपल्या धोरणांमुळे हे विजेतेपद अमेरिकेस मिळाल्याची बढाई ध्वनित केली. ती हास्यास्पद होती. जेव्हा एखाद्या सरकारप्रमुखाला खेळाडूंस ओढून ओढून जवळ घेण्याची, मिठीत घेण्याची गरज वाटते तेव्हा ती महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपणास काही फारसे जमत नसल्याची कबुली असते.

ट्रम्प यांनी ‘सोटू’ भाषणात ती मुबलक दिली. काही लष्करी अधिकारीही त्यांनी या भाषणासाठी पाचारण करून ठेवले होते. त्यांना तसेच बर्फावरच्या हॉकी संघाच्या कर्णधारास विशेष नागरी सन्मान त्यांनी जाहीर केले. कहर म्हणजे ट्रम्प या लष्करी अधिकार्‍याच्या जखमांचे रसभरित वर्णन करत बसले. हेतू हा की थेट प्रक्षेपित होणार्‍या या भाषणातून लष्करी अधिकार्‍याच्या वेदनांमुळे का असेना नागरिकांत राष्ट्रवादाची भावना चेतावी. किती अमेरिकन्स यामुळे भारले गेले हे कळण्यास मार्ग नाही. पण अध्यक्षांचा हा प्रयत्न अगदीच हास्यास्पद ठरला.

त्यातल्या त्यात अध्यक्षांचा शहाणपणा म्हणजे समोर बसलेल्या न्यायाधीशांची बेअदबी होईल असे काही ते बोलले नाहीत. आयातशुल्काच्या विरोधात ट्रम्प यांच्या विरोधात निकाल देणारे न्यायाधीश या भाषणासाठी सदनात होते. या निकालावर त्वरित भाष्य करताना ट्रम्प यांनी न्यायाधीशांची संभावना ‘मांडीवरचे कुत्रे’, ‘देशद्रोही’ वगैरे शब्दांत केली होती. आज त्या मानाने त्यांनी आपल्या रसवंतीस आवर घातला. निकालावर बोलताना त्यांनी फक्त नाराजी व्यक्त केली. न्यायाधीशांबाबत सांभाळून बोलावे लागल्याने त्यांनी सभ्यतेची ती भरपाई डेमॉक्रॅट्सवर आगपाखड करून केली.

अशा भाषणांतील काही महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी वक्त्यास उभे राहून मानवंदना (स्टँडिंग ओव्हेशन) देण्याची पद्धत अनेक पाश्चात्त्य देशांत आढळते. ही मानवंदना उत्स्फूर्त नसेल तर अगदीच केविलवाणी ठरते. ट्रम्प यांच्या रिपब्लिकनांनी आज हा प्रकार अनेकदा केला. तथापि डेमॉक्रॅट्स मात्र बसून होते. ट्रम्प यांचा आगाऊपणा असा की त्यांनी डेमॉक्रॅट्सनाही अशी मानवंदना देण्याची सूचना केली. ती अर्थातच त्यांनी ऐकली नाही. त्यावर ट्रम्प यांनी हे डेमॉक्रॅट्स किती दुष्ट आहेत वगैरे चर्‍हाट लावले. ते अगदी बालिश दिसले. भाषणात ट्रम्प यांनी डेमॉक्रॅट्सच्या राज्यांतील भ्रष्टाचाराची उदाहरणे दिली. मात्र त्याच वेळी स्वपक्षीय राज्ये आणि खुद्द स्वत:ची राजवट याबाबत भाष्य करणे टाळले. सार्‍या जगास ग्रासलेल्या एपस्टीन प्रकरणाचा उल्लेखही त्यांच्या भाषणात नव्हता.

अमेरिकेत लगेच या भाषणाच्या शास्त्रोक्त विच्छेदनाची प्रथा आहे. सीएनएन, बीबीसी, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट आदी माध्यमांनी हा उद्योग अत्यंत निर्भयतेने केला. ट्रम्प यांनी किती मुद्द्यांवर आपल्या भाषणात ‘फेकाफेकी’ केली याचे तपशील लगोलग या माध्यमांतून प्रसृत केले गेले. ट्रम्प म्हणाले काय आणि वास्तव काय याचे ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ असे माध्यम- सादरीकरण ही तेथील लोकशाहीच्या जिवंतपणाची साक्षच. या भाषणानंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या नवनिर्वाचित नेत्या, व्हर्जिनियाच्या गव्हर्नर (मुख्यमंत्री) ॲबिगेल स्पॅनबर्गर यांनी नागरिकांस फक्त तीन प्रश्न विचारले : अध्यक्ष ट्रम्प यांच्यामुळे तुमचे जगणे अधिक सुखी झाले आहे का? तुम्ही अधिक सुरक्षितता अनुभवत आहात का? आणि हा अध्यक्ष आपल्यासाठी काम करतो असे तुम्हांस वाटते का? कोणत्याही खर्‍या लोकशाहीत सत्ताधार्‍यांविषयी या तीनही प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच येतील. पण ट्रम्प यांना याची फिकीर नाही. आपल्यामुळे अमेरिका किती महान होऊ झाली आहे, या आभासात ते मग्न आहेत. ती तशी आहे किंवा काय याचे उत्तर नोव्हेंबरात मिळेल. पण तोवर तरी रिपब्लिकनांतील मोजके शहाणे आणि अन्यांस या आत्ममग्न अध्यक्षाचे आव्हान झेलावे लागेल.