केंद्र सरकारच्या डीपीडीपी कायद्यास देशातील सर्व प्रमुख २१ वृत्त प्रकाशक, वृत्तसंघटना आदींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

लोकशाही ही माशाप्रमाणे असते. मासा मारण्यासाठी काहीही करावे लागत नाही. त्यास पाण्यातून काढले की झाले. तद्वत लोकशाही मारण्यासाठी देखील काही वेगळे प्रयास करावे लागत नाहीत. माहितीचे स्त्रोत, माहितीचे प्रवाह आणि माहितीचा प्रवास यावर नियंत्रण ठेवले की झाले. आतापर्यंत असे करणे सोपे होते. कारण माहितीचा उगम आणि तिचा पुढील प्रवास यांचे मार्ग सुगम आणि सुपरिचित होते.

डिजिटल काळात माहिती अनेक मार्गांनी चराचरात भरून राहू लागली. त्यामुळे तिचा प्रवासही अनेक मार्गांनी होऊ लागला. त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्यप्राय. अशा परिस्थितीत हा माहिती नियंत्रणाचा उद्योग करण्यापेक्षा या इतक्या सार्‍या माहितीची गरज ज्यांना लागते त्यांनाच चेपले की झाले. तोच अथवा तसाच विचार केंद्र सरकारच्या ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन’ (डीपीडीपी) या कायद्यामागे असावा. त्याचमुळे त्यास देशातील सर्व प्रमुख २१ वृत्त प्रकाशक, वृत्तसंघटना आदींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. कारण या कायद्यामुळे बातमीदारी, शोध पत्रकारिता या संकल्पनांचा गळा आवळला जाण्याचा स्पष्ट धोका दिसतो.

‘‘सन्माननीय होऊ पाहणार्‍या सरकारने टीकाकारांवर डूख धरू नये आणि स्तुतीपाठकांस डोक्यावर घेऊ नये’’ असा सल्ला अमेरिकेचे ‘स्वातंत्र्यदाते’ आणि तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी देऊन ठेवला आहे. तो अंमलात येण्यासाठी मुक्त माध्यमे हवीत. विद्यमान सरकारचा कायदा ती शक्यता नाकारत असल्याने त्यावर मुद्देसूद भाष्य गरजेचे ठरते. कारण हा प्रश्न फक्त माध्यमांच्या अस्तित्वाचा नाही. तो लोकशाहीच्या भवितव्याचा आहे.

पहिला मुद्दा व्यक्तीचे खासगी आयुष्य आणि पत्रकारिता यातील कुंपण; हा. एखाद्या व्यक्तीच्या डिजिटल पाऊलखुणा शोधून त्यावर आधारित काही तथ्ये शोधण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केल्यास ते करण्यासाठी त्या व्यक्तीची परवानगी घेणे या संभाव्य कायद्याने अत्यावश्यक केलेले आहे. उच्च दर्जाचा बिनडोकपणा वा लबाडी असल्याखेरीज अशी तरतूद कोणी सुचवणे अशक्य. कारण ज्या व्यक्तीच्या विरोधात/विषयी बातमी असणार आहे तिलाच ‘आम्ही ही बातमी देऊ काय’ असे विचारणे बंधनकारक करण्याची यातील तरतूद. ती कोणा सुबुद्धास सुचणे अशक्य.

या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी ताजे उदाहरण द्यावयाचे झाल्यास निवडणूक आयोगासंदर्भात ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या शोधवृत्ताचे देता येईल. या वृत्तास विविध निवडणूक आयुक्त/ अधिकारी यांच्यातील इ-मेल देवाण-घेवाणीचा आधार असू शकतो. नवीन कायदा संबंधित वार्ताहराने ‘या’ वृत्तासाठी सदरहू व्यक्ती वा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा आशीर्वाद घेणे बंधनकारक करतो. यास विनोदही म्हणता येणार नाही, इतका हा प्रयत्न अल्पबुद्धीचा आहे. असा प्रयत्न करू गेल्यास उद्याच्या ज्ञानेश कुमार वा अन्यांनी वार्ताहरांस ‘‘आमच्याविरोधात लिहा… आनंदाने लिहा’’, असे म्हणणे अपेक्षित आहे काय?

दुसरा मुद्दा पहिल्यापेक्षाही अधिक हास्यास्पद. समजा सरकारच्या या कायद्याप्रमाणे एखाद्या सरकारी अधिकार्‍याने उदार अंत:करणाने पत्रकारांस स्वत:विषयी काहीबाही छापायची परवानगी दिलीच आणि त्यानुसार पत्रकाराने वृत्तलेखन केले तर नंतर ही परवानगी मागे घेण्याचा अधिकार सदरहू कायदा संबंधित व्यक्तीस देतो. हे कसे काय प्रत्यक्षात येणार? असे झाल्यावर वृत्तपत्रे, वृत्तसेवा यांनी आपले वृत्तलेखन/प्रसारण थांबवून सदर माहिती ‘पुसून’ टाकणे हे, हा अधिसूचित कायदा बंधनकारक करतो. तो आहे त्या स्वरूपात मंजूर झालाच तर माध्यमांवर आकाशच कोसळेल. कारण वृत्त ज्यांच्याशी संबंधित आहे त्या व्यक्ती माध्यमांवर ‘ते’ वृत्त न देण्यासाठी वा दिलेले असल्यास त्यात पूर्ण बदल करण्यासाठी सहज दबाव आणू शकतील. हे सरळ सरळ शोधपत्रकारितेचा गळा घोटणारे आहे.

शासकीय व्यक्तीचा गैरव्यवहार/भ्रष्टाचार, खासगी क्षेत्रातील कोणाविषयी असलेला सरकारी आकस वा अत्याकर्षण, व्यक्ती/व्यवस्थेचा दुरुपयोग इत्यादी विषय माध्यमांना हा कायदा मंजूर झाल्यास हाताळताच येणार नाहीत. किंवा हाताळले तरी ते इतके पातळ होतील की त्यातील बातमीच निघून जाईल. सदर कथित गैरव्यवहारांतील व्यक्तींचा खासगी आयुष्याचा हक्क मान्यच. पण त्या हक्काची ढाल पुढे करून या व्यक्ती स्वत:ची कृष्णकृत्ये दडवून ठेवणार असतील तर हा कायदा समाजोपयोगी असूच शकत नाही.

तिसरा मुद्दा पहिले दोन बरे म्हणावेत असा. त्यानुसार एखादी वृत्तसंस्था एखाद्या विषयाची माहिती शोधपत्रकारितेद्वारे मिळवत असेल तर ती माहिती मागेल तेव्हा सरकारच्या हाती सुपूर्द करावी, असे हा कायदा म्हणतो. ‘‘राष्ट्रीय सुरक्षा हा जर मुद्दा असेल…’’, असा शब्दप्रयोग यात आहे. तो तद्दन तकलादू आणि सामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकणारा आहे. कारण सरकारच्या मते कोणत्याही कारणाने ‘राष्ट्रीय सुरक्षा’ धोक्यात येऊ शकते.

एखाद्या गावात/शहरात एखाद्या आजाराची लागण झाली आणि तीमागे परिसरातील एखाद्या रासायनिक कंपनीचा उत्सर्ग कारणीभूत असेल आणि ते उघड झाल्यास सदर कंपनीविरोधातील उद्रेक हा देखील सरकारच्या मते राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असू शकतो. तसेच ही माहिती माध्यमांस पुरवणार्‍या व्यक्तीविरोधातही सदर तरतुदीचा वापर सरकारी यंत्रणा करू शकतील. आधीच सरकारी अधिकार्‍यांचा  माध्यमांशी कमीत कमी संबंध कसा येईल यासाठी आपले सरकार प्रयत्नशील असते. हा कायदा अस्तित्वात आल्यास माध्यमांस माहिती देण्यास कोणी धजावणारच नाही. परिणामी व्यापक हितासाठी माध्यमांस माहिती मिळणे अशक्यप्राय ठरेल.

विद्यमान सत्ताधीशांच्या समाजमाध्यमी गणंगांस तसे होणे आवश्यक वाटेलही. पण कोणालाही सत्तेचा अमरपट्टा मिळालेला नसतो. कोणत्याही काळात त्यावेळच्या सत्ताधीशांस माध्यमांस काही माहिती मिळूच नये, असेच वाटत असते आणि कोणत्याही काळात त्यावेळच्या विरोधी पक्षीयांचे मत या विरोधात असते. सबब ही तरतूद सद्यस्थितीत योग्य वाटत असली तरी आजचा सत्ताधीश हा उद्याचा विरोधी पक्ष असू शकतो आणि तसे झाल्यास ही तरतूद तेव्हाच्या विरोधी पक्षीयांच्या हक्कांवर गदा आणणारी ठरण्याचा धोका संभवतो. कोणत्याही शहाण्या सत्ताधीशाने उद्या आपल्यालाच अडचणीत आणतील असे निर्णय न घेणे चातुर्याचे असते. या शहाणपणाने दगा दिल्यास काय होते याचा धडा माजी गृहमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांनी त्यावेळी आणलेला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा यातून मिळेल.

यातील चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे तो माहिती कायद्याचा भंग झाल्यास सुचवण्यात आलेल्या दंड रकमेबाबत. असा भंग झाल्याचे संभाव्य केंद्रीय विदा संरक्षण मंडळास वाटले तर ती यंत्रणा तसा भंग करणार्‍यास २५० कोटी रुपये इतका अजस्त्र दंड ठोठावू शकते. हा इतका दंड फेडणे आजमितीस फक्त सरकारला शक्य होईल. अन्य कोणालाही हे परवडणारे नाही. त्यातही पुढे जाऊन हा संभाव्य कायदा म्हणतो की कोणा एकास असा दंड समजा एकापेक्षा अधिक वेळा झाला तर ते प्रकाशनच बंद करण्याची शिफारस हे मंडळ करू शकते.

थोडक्यात सरकारवर टीका केली जाण्याची शक्यताच हा अधिसूचित कायदा संपुष्टात आणेल. हे सर्व बदल केवळ माध्यमांच्याच नव्हे; तर नागरिकांच्या माहिती अधिकारावरही गदा आणणारे आहेत. आधीच माहिती अधिकाराचा आपल्याकडे केवळ सांगाडा शिल्लक आहे. प्रस्तावित बदलानंतर तोही राहणार नाही. हे लोकशाहीत अध्याह्रत असणारे विचार स्वातंत्र्य संपुष्टात आणणारे ठरेल.

म्हणूनच देशातील सर्व माध्यमे—यात अदानी/अंबानींच्या मालकीचीही माध्यमे आली—या अधिसूचित कायद्याविरोधात एकत्र आली आहेत. तथापि लोकशाहीवर प्रेम असणार्‍या सर्वांनीच या ‘माहिती अडवा, माहिती दडवा’ कायद्यास विरोध करायला हवा. लोकशाही राखण्याची जबाबदारी फक्त माध्यमांची नसते; ती नागरिकांचीही असते.