स्वत: सरकारच्या आधारे प्रगती साधणार्‍या मस्क याने आपणास निकोप स्पर्धा इत्यादी नैतिक मुद्द्यांवर अजिबात प्रवचन देऊ नये.

वास्तविक जागतिक पातळीवर ज्यांस अजिबात गांभीर्याने घेऊ नये असे जे डझनभर मानांकित असतील त्यात इलॉन मस्क याचे स्थान अग्रभागी ठेवावे लागेल. अत्यंत वाचाळ, नैतिकतेशी कित्येक पिढ्यांत संपर्क आला नसावा असे वर्तन आणि स्वत:स जगाच्या केंद्रस्थानी मानण्याची वृत्ती यामुळे या इसमाचे दूर-दर्शन देखील डोके उठवण्यास पुरेसे ठरावे. तथापि त्याची दखल घ्यावी लागते कारण त्याने त्याच्या कंपनीसंदर्भात भारताबाबत केलेले विधान. 

बहुतेकांस मस्क याचा परिचय ‘टेस्ला’ या वीजेवर चालणार्‍या मोटार कंपनीचा प्रवर्तक एवढाच मर्यादित. ती त्याची निर्मिती आहेच. पण त्याखेरीज आणखी अर्धा डझन कंपन्यांमागे मस्क आहे. समाजमाध्यमी ‘एक्स’ (पूर्वाश्रमीची ट्विटर), स्पेसेक्स आदींच्या जोडीने कृत्रिम प्रज्ञा ते बोगदे खणण्याची कंत्राटे असे अनेक उद्योग या मस्क याचे आहेत. असा हा मस्क भारतात येऊ पहातो. ‘स्पेसेक्स’ या त्याच्या अवकाशयान क्षेत्रातील कंपनीची दूरसंचार क्षेत्रासाठीची एक उपकंपनी आहे. तिचे नाव ‘स्टारलिंक’. ही कंपनी उपग्रहामार्फत दळणवळण सेवा देते. ही सेवा त्यास भारतात सुरू करावयाची आहे. आपल्याकडे ती सध्या नाही. तीवर ‘लोकसत्ता’ने ‘‘स्टारलिंक की ‘स्टार’ लिंक’’? या संपादकीयात (१७ मार्च २०२५) सविस्तर भाष्य केले होते. मस्क याच्या बरळण्यावर भाष्य करण्याआधी स्टारलिंक सेवा आणि आपल्याकडील उपलब्ध सेवा यांतील फरक लक्षात घ्यायला हवा.

आपल्याकडे प्रचलित असलेल्या मोबाईल सेवेस तंत्रदृष्ट्या ‘सेल्युलर’ असे संबोधले जाते. मानवी शरीरातील पेशी ज्याप्रमाणे एकमेकांशी जोडलेल्या असतात त्याप्रमाणे या सेवेचे जाळे एकमेकांच्या संपर्कात असते. ते एकसंध नसते. तरीही ते तसे आहे असे वाटते. याचे कारण त्याचा वेग. ही सेवा वापरणारी व्यक्ती जेव्हा ‘अ’ येथून ‘ब’ येथील व्यक्तीशी संपर्क साधू पाहते, त्यावेळी  ‘अ’ या  ठिकाणाच्या  सर्वात जवळ असलेला ‘सेल टॉवर’ हा संदेश पकडतो आणि त्यास जोडल्या गेलेल्या एका मनोर्‍यावरून दुसर्‍या मनोर्‍याकडे पाठवत पाठवत आपल्या इप्सित स्थळी त्यास सुखरूप पोहोचवतो. याचा अर्थ मोबाईलवर संपर्क करू इच्छिणार्‍या वा असा फोन स्वीकारू पाहणार्‍याच्या आसपास एकही ‘सेल टॉवर’ नसेल तर या संदेशवहनात खंड पडतो.

अशा वेळी आपण ‘रेंज नाही’ असे म्हणतो. ही समस्या उपग्रहाद्वारे होणार्‍या संदेशवहनास भेडसावत नाही. कारण ही सेवा वापरणार्‍याच्या हातातील फोन थेट अवकाशातील उपग्रहाशी जोडलेला असतो आणि त्याद्वारे अशा दोन वा अधिकांश उपग्रह संदेशवहन जाळ्यातील कोणाशीही विनासायास संपर्क साधता येतो. जमिनीच्या पृष्ठभागावर कोठेही ‘डोक्यावर आकाशच नाही’ अशी शक्यता कमी असल्याने ‘रेंज नाही’ ही अडचण उपग्रह दळणवळणात येत नाही. हा या सेवेचा फायदा. सध्या ही सेवा खोल समुद्रातील जहाजे, दुर्गम लष्करी यंत्रणा इत्यादीकडून वापरली जाते. आपल्याकडेही ‘एन्रॉन’ कंपनीच्या निमित्ताने या अशा उपग्रह दळणवळण यंत्रणेची चुणूक भारतीयांस पहिल्यांदा अनुभवायास मिळाली. मस्क याची कंपनी भारतात ही सेवा सुरू करू इच्छिते. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून बराच काळ लोटला.

पण त्यास आवश्यक परवानग्या अजूनही मिळालेल्या नाहीत. त्या देण्यात भारत सरकार टाळाटाळ करते कारण येथील स्थानिक उद्योगपतीच्या हितास त्यामुळे बाधा येते असे मस्क याचे म्हणणे. हे स्थानिक उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी. त्यांची ‘जिओ’ सेवा या क्षेत्रात येऊ इच्छिते. त्यांच्या व्यवसायांस बाधा येऊ नये म्हणून, त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भारत सरकार आपणास परवानगी देत नाही, असा मस्क याचा आरोप आहे. तो त्याने जाहीरपणे केला.

इतकेच नव्हे तर आपल्या समाजमाध्यमी खात्यातून अंबानी यांस त्याने ‘माननीय पंतप्रधान’ असे संबोधले. असे करून त्याने अंबानी यांचेच कसे भारत देशावर नियंत्रण आहे असे ध्वनित केले. ही अशी चर्चा जाहीरपणे झाल्याने भारत सरकार संकोचले. सरकारच्या वतीने खुलासा केला गेला. त्याचे साद-पडसाद उमटणे सध्या सुरू आहे. या विषयाचे दोन भाग. त्यातील भारत सरकारच्या धोरणांवर भाष्य करण्याआधी मस्क यांस मात्रेचे चार वळसे चाटवणे (हा गृहस्थ निसर्गोपचार कंपनीही चालवतो; म्हणून) गरजेचे.

उद्योगांच्या मक्तेदारीवर मस्क याने भाष्य करणे म्हणजे ‘एकच प्याला’तील तळीरामाने व्यसनमुक्ती केंद्र चालवण्यासारखे. याचे कारण मस्क हाच मुळात सरकार-स्नेही उद्योग विश्वाचा सर्वार्थाने आदर्श नमुना ठरतो. त्याच्यातील उद्यमशीलतेचा गुण कोणीही नाकारणार नाही. तथापि अलीकडे देशापरदेशांत उद्योगपतींचा एक मोठा वर्ग आपल्या आशा-आकांक्षा सत्ताधार्‍यांशी जोडून घेत मोठ्या झपाट्याने प्रगती साधतो. मस्क हा अशांतील एक. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प २०१६ साली आणि आता दोन वर्षांपूर्वी पुन्हा एकदा सत्तापदी आले नसते तर हा इसम इतकी प्रगती साधता ना. या ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा इतिहास झाकून ठेवावा इतका काळा आहे.

‘एन्रॉन’  कंपनीची प्रगती झाली ती रिपब्लिकनांच्या काळात. या कंपनीचे प्रमुख केनेथ ले हे रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख निवडणूक/राजकीय निधीनिर्माते होते. याच रिपब्लिकनांनी ‘एन्रॉन’च्या खनिज तेल/वायू कंत्राटांसाठी ‘तालिबान’ला आधी उभे केले आणि पोसले. त्याच्या पालनपोषणाचा आर्थिक भार ‘एन्रॉन’ ही कंपनी उचलत होती. ‘जिलाद सायन्सेस’ या ‘टॅमी फ्लू’ नामे औषधाची निर्मिती करणार्‍या कंपनीचे भले रिपब्लिकनांच्या काळातच झाले. पुढील ‘योगायोग’(?) असा की आधी ‘बर्ड फ्लू’ची आणि नंतर ‘स्वाईन फ्लू’ची साथही नेमकी याच रिपब्लिकनांच्या काळात आली आणि या कंपनीचे तसेच डोनाल्ड रम्सफेल्ड यांच्यासारख्या रिपब्लिकन राजकारण्याचे भले त्याच काळात झाले. अशी अन्य अनेक उदाहरणे देता येतील. या मस्क महाशयाच्या प्रगतीचा अश्वमेध वेगाने घोडदौड करू लागला तो याच रिपब्लिकनांच्या काळात. केनेथ ले यांच्या प्रमाणे मस्क हाही रिपब्लिकनांचा, त्यातही ट्रम्प, यांचा निधीपुरवठादार.

तेव्हा स्वत: सरकारच्या आधारे प्रगती साधणार्‍या मस्क याने आपणास निकोप स्पर्धा इत्यादी नैतिक मुद्द्यांवर अजिबात प्रवचन देऊ नये. याच सरकारी पाठिंब्याच्या जोरावर बोलिव्हियासारख्या लहानशा देशात लिथियमच्या साठ्यावर कब्जा मिळवण्यासाठी मस्क याने काय काय उद्योग केले हे सामान्य भारतीयांस माहीत नसले तरी उद्योग-जगत जाणून आहे. खरे तर भारत सरकारने हा इतिहास बाहेर काढून मस्क याच्या तोंडावर फेकायला हवा. पण अमेरिकी कंपन्या, अमेरिकी उद्योग यांचा प्रतिवाद करण्याची वेळ आली की आपले सरकार मौनात जाते. या अशा विषयांवरील चर्पटपंजरीसाठी सरकारकडे स्वत:चे ‘संबित पात्रा’ नसावेत हे तसे आश्चर्यच. असो.

वास्तव हे आहे की अमेरिकेचे परराष्ट्र धोरण हेच त्या देशातील उद्योगपतींच्या हिताशी संलग्न असते. त्यात भेद करता येणे केवळ अशक्य. तेव्हा अशा देशातील उद्योगपती भारत सरकारवर येथील उद्योगपतीच्या हितरक्षणाचे आरोप करत असेल तर ते केविलवाणे आणि हास्यास्पद ठरते. तथापि याचा अर्थ इलॉन याच्या ‘मस्क’वाल आरोपांत तथ्य नाही आणि भारत सरकार जे करते ते योग्य असा बिल्कुल नाही. त्यावर दृष्टीक्षेप उद्याच्या संपादकीयात. (पूर्वार्ध)