विवेकास रजा देऊन एकदा का कट्टरता अंगी बाणण्यास सुरुवात झाली की सर्व काही खुपू लागते आणि स्वधर्मीयांनाच मारणेही सुरू होते…
धर्म कोणताही असो; त्याचे कट्टर, कडवे अनुयायी महिलांवर कसे अन्याय करतात याचा ताजा प्रत्यय केरळमसारख्या सुशिक्षित राज्यात दिसला. त्या राज्यातील इस्लामी पंडित, ज्येष्ठ धर्मगुरू कंथापुरम एपी अबू बकर मुस्लियार ऊर्फ ग्रँड मुफ्ती शेख अबूबक्र अहमद यांची ताजी मुक्ताफळे हे याचे उदाहरण. ‘‘स्त्रियांस सार्वजनिक मंचावर मज्जाव करायला हवा; त्यांचा सार्वजनिक वावर गोंधळ निर्माण करतो’’; हे या अबू बकर यांचे ताजे विधान. ते तेवढेच करून थांबत नाहीत. त्या राज्यातील महत्त्वाच्या शहरात भाषण करताना आपल्या या मुक्ताफळांच्या मांडणीत ते समोरच्या इडली पिठाचे दगडी वरवंटे-पाटे विकणार्या दुकानाकडे बोट दाखवून म्हणतात- ‘‘ही दगडी यंत्रे अशी रस्त्यावर ठेवून गेल्याने काही फारसे बिघडत नाही. येणारे-जाणारे त्याकडे पाहणारही नाहीत. पण स्त्रियांचे असे नाही.
स्त्रिरया म्हणजे गळ्यातील मोलाचे कंठभूषण. ते असे रस्त्यावर ठेवले तर येणारे-जाणारे त्यांस स्पर्श करतील आणि त्या दागिन्याचे सौंदर्य नष्ट होईल. म्हणून स्त्रियांस दागिन्यांच्या पेटीप्रमाणे सुरक्षित कुलूपबंद ठेवायला हवे.’’ म्हणजे स्त्रियांस घरात कोंडून ठेवायला हवे, असे त्यांचे म्हणणे. या आपल्या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ ते इस्लामी धर्मग्रंथ कुराणाचा दाखला देतात. ‘‘कुराण म्हणूनच स्त्रियांस बुरख्यात ठेवण्यास सांगते.
स्त्रिया सार्वजनिक मंचावर आल्या तर विध्वंस अटळ असतो’’, असे या धर्मगुरूंचे म्हणणे. वरवर पाहणारे स्त्रियांस त्यांनी किमती आभूषणांची उपमा दिली यात काही ‘सकारात्मकता’ पाहतीलही. पण तसे करून हे महाशय स्त्रियांच्या बंदिवासाचेच समर्थन करतात. साहजिकच त्यांच्या या विधानाने समस्त विवेकी संतप्त झाले असून त्यात इस्लाम धर्मीय महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या इस्लामी धर्मगुरूस स्वधर्मीय शहाण्यांकडून विरोध होत असताना परधर्मीयांनी त्याविरोधात रान उठवण्यास सुरुवात केली असल्यास नवल नाही. तथापि हे गृहस्थ कोणत्या धर्माचे आहेत हा मुद्दा अत्यंत गौण. ते कोणत्याही धर्माचे असले तरी त्यांच्या या विधानाचा आणि त्यामागील मानसिकतेचा तीव्र धिक्कारच करायला हवा.
तो नोंदवण्यात त्या राज्यातील ‘संयुक्त लोकशाही आघाडी’ सरकारचे मुख्यमंत्री काँग्रेसचे व्ही. डी. सतीशन यांनीच पुढाकार घेतला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. असे म्हणायचे कारण त्यांच्या या आघाडी सरकारात ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’ हा इस्लामी पक्ष हा महत्त्वाचा घटक आहे. ‘मुस्लीम लीग’ला अर्थातच या शेख अबूबक्र यांचा निषेध करणे मान्य नाही. तरीही तो मुख्यमंत्र्यांनी केला आणि तो करताना इस्लामचे प्रेषित महंमद पैगंबर यांची पहिली पत्नी खदिजा ही व्यावसायिक होती आणि दुसरी पत्नी आयेशा यांनी तर युद्धात लष्कराचे नेतृत्व केले होते; हे नमूद करण्यास मागेपुढे पाहिले नाही. केरळमसारख्या ‘आधुनिक आणि सुधारणावादी’ राज्यात अबूबक्र यांचे विधान १९ व्या शतकाचे स्मरण करून देते हे अशोभनीय आहे, अशा अर्थाची जाहीर प्रतिक्रिया सतीशन यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचा मुस्लीम लांगूलचालनाचा इतिहास पाहता केरळमच्या मुख्यमंत्र्यांची ही भूमिका नि:संशय स्वागतार्ह. अनेक दशके भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेला बाबरी मशिदीचा वाद, तेथील मंदिराचे कुलूप उघडण्याचा निर्णय आणि त्यापाठोपाठ शहाबानोप्रकरणी न्यायिक प्रक्रियेत हस्तक्षेप करत इस्लामी धर्मकायदा ‘शरिया’समोर मान तुकवणे ही सारी काँग्रेसची पापे. त्याची प्रतिक्रिया म्हणून आक्रमक हिंदुत्ववादाचा उदय झाला हेदेखील या अलीकडच्या इतिहासातील सत्य. त्या आक्रमक हिंदुत्वाच्या झंझावाताने पुढे काँग्रेसलाच पालापाचोळ्याप्रमाणे राजकीय पटलावरून उडवून लावले. त्या पार्श्वभूमीवर मुस्लीम लीगच्या पाठिंब्यावर सरकार चालवत असणार्या काँग्रेसचा मुख्यमंत्री मागास इस्लामी धर्ममार्तंडाविरोधात इतके स्पष्ट निवेदन करत असेल तर ते बदलत्या काँग्रेसचे तसेच राजकीय टक्केटोणपे खाल्ल्याने आलेल्या शहाणपणाचे लक्षण म्हणावे लागेल.
वास्तवास सामोरे जावे लागणार्या राजकीय पक्षांस असे शहाणपण येईलही. तथापि प्रश्न आहे तो या असल्या मागास, प्रतिगामी, कालबाह्य धर्मगुरूंचा आणि त्यांच्या अनुयायांचा. हे अबूबक्र सुन्नी पंथीय. म्हणजे अधिक कडवे. वास्तविक याच धर्माचे निधान असलेले पवित्र मक्का-मदीना जेथे आहे त्या सौदी अरेबियात सुधारणांचे वारे वाहू लागलेले असताना आपल्याकडे मात्र हे असले धर्मगुरू असे कालबाह्य विचार मांडत असतील त्यास काय म्हणावे? त्याच वेळी शियाबहुल इराणमध्ये या अशा बुरसट धर्मगुरूंच्या विरोधात महिला आवाज उठवत असताना, सरकारी दमनशाहीस तोंड देत असताना भारतासारख्या लोकशाही देशातील धर्मगुरू इतिहासाचे काटे उलटे फिरवू पाहतात, हे निंदनीय.
हा धर्मसल्ला देताना अबूबक्र हे परंपरेचा आधार घेतात आणि त्यांचे अनुयायी (इस्लामी) धर्मोत्सव आता मशिदी आणि मदरसा यांचे कुंपण ओलांडून कसा ‘बाहेर’ गेला आहे याची आठवण करून देतात. धर्माने हे असे कुंपण ओलांडणे त्यांस मंजूर नाही. त्यामुळे धर्म भ्रष्ट होतो असे या अशा मागासांस वाटत असणार. हे असे वाटणे आणि तसे वाटणार्यांस समर्थन मिळणे हे कोणत्याही लोकशाही देशासाठी धोक्याचे आहे. कारण एकदा का हे ‘वाटणे’ स्वीकारार्ह होत गेले की त्यातून केवळ कट्टरपंथीयांचा उदय होतो; त्यांचे फावते आणि शेवटी त्यांच्या हाती धर्मसूत्रे जातात.
आज अनेक देशांत हे कट्टरपंथीय इस्लामी स्वधर्मीयांचेच शिरकाण करताना आढळतात. ‘इस्लामला अशुद्ध केले’, ‘इस्लाम भ्रष्ट केला’ अशी कारणे पुढे करत हे विचारांध कट्टरपंथी बेलाशक स्वधर्मीयांची कत्तल करतात. विवेकास रजा देऊन एकदा का कट्टरता अंगी बाणण्यास सुरुवात झाली की अशांस सर्व काही खुपू लागते. युरोपातील बोस्निया- हर्झगोव्हिना या देशात या कट्टरपंथीयांनी मशिदी पाडल्या कारण त्यावरील घुमट बिगर-इस्लामी आहेत, असे त्यांचे म्हणणे. ते एक वेळ ठीक. पण आपल्याच धर्मबांधवांस कंठस्नान घालण्यासही या कट्टरपंथीयांनी कमी केले नाही.
मल्याळींचा ओणम नुकताच साजरा झाला. त्यात हिंदू तरुणींच्या जोडीने ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मीयही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात आणि यंदाही ते तसे झाले. या भिन्नधर्मीय तरुण-तरुणींच्या उत्सवी उत्फुल्लतेचा धर्मनिरपेक्ष आविष्कार देशाने नुकताच पाहिला. त्याच राज्यात इस्लामी धर्मगुरू महिलांच्या कुलूपबंदतेचे, बुरख्याचे समर्थन आणि आवाहन करत असेल तर त्यामागील धोका दुर्लक्ष करण्यासारखा नाही. हा कोणता धर्म? तरीही त्याचे ज्यांस पालन करावयाचे आहे त्यांनी ते खुशाल करावे. पण आपापल्या मठीच्या चार भिंतींच्या आत. या मठीचा उंबरठा ओलांडून बाह्य जगात आले की एकाच धर्माचा अंमल हवा. हा धर्म म्हणजे देशाचे संविधान. हे संविधान स्त्री-पुरुष असा भेद करत नाही. पुरुषांस जे स्वातंत्र्य देते ते आणि तितकेच स्वातंत्र्य महिलांसही देते. तेव्हा या संविधानाचा अनादर करत महिलांस घराबाहेर पडू देऊ नका असे सांगण्याचा अधिकार या धर्मगुरूंस दिला कोणी? ते भले असतील ‘ग्रँड मुफ्ती’ किंवा अन्य काही. पण ते स्वधर्मवास्तूच्या आत. बाहेर महिलांनी कसे वागावे वगैरे प्रवचनांचा, मर्यादा निश्चितीचा अधिकार त्यांस नाही.
‘धार्मिकता’ या संकल्पनेप्रमाणे ‘मर्यादा’ ही संकल्पनाही बिचारी स्त्री-लिंगी. तिचे नियंत्रण करू पाहणारा ‘धर्म’ मात्र पुरुषी. अन्य अनेक मुद्द्यांप्रमाणे याबाबतची घृणास्पद पुरुषसत्ताकताही मोडून काढणे गरजेचे आहे. कंथापुरम एपी अबू बकर मुस्लियार यांचे ताजे वक्तव्य ती गरज अधोरेखित करते.
