सत्तेसाठीच्या तडजोडी, मतभेद वाढवून राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न, लोकहिताच्या नावाने स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी आटापिटा, हे सारे ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ मध्ये आहे…
‘‘इसापनीती’ लिहिणारा इसाप हे ग्रीकांच्या लोकशाहीचे अपत्य. ‘इसापनीती’ ही ग्रीकांच्या लोकशाहीचा परिणाम म्हणून जन्माला आली, असा निष्कर्ष अनेक विद्वानांनी नोंदवला आहे… आपल्याकडे तसा अभ्यास कमी झाला, आपल्याकडे ‘इसापनीती’ची चांगली भाषांतरेसुद्धा कमीच झाली आहेत.’’ – हे नरहर कुरुंदकरांनी ऐन आणीबाणीत सांगितले होते. म्हणजे अर्धशतकापूर्वी. लोकशाहीविषयी आणि फॅसिझमच्या विरोधात त्या वेळी कुरुंदकर महाराष्ट्रभर जी व्याख्याने देत, त्यापैकी एक गाजलेला विषय ‘इसापनीती’. गोष्टींच्या पलीकडला अर्थ समजून घ्या, त्यांचे तात्पर्य लक्षात घ्या, हे कुरुंदकरांचे आवाहन किती लोकांना त्या वेळी भिडले माहीत नाही.
तशीही राजकीय आशयापेक्षा गोष्टी आणि किस्से यांकडेच लक्ष पुरवण्याची आपली सवय. ती अजूनही सुटलेली नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स – इनटू सेव्हरल रिमोट रिजन्स ऑफ द वर्ल्ड’. जोनाथन स्विफ्ट यांच्या या पुस्तकाला परवाच ३०० वर्षे झाली. २८ ऑक्टोबर १७२६ रोजी ही कादंबरी इंग्लंडमध्ये प्रकाशित झाली. अर्थात व्यक्तीप्रमाणेच ग्रंथाचे महत्त्व त्याच्या जन्मसालावरून ठरवायचे नसते. ग्रंथाचे श्रेष्ठत्व तो किती जुना यावरून नव्हे, तर त्याच्या आशयावरून ठरवायचे असते. आज एवढ्या वर्षांनंतरही गलिव्हरचा प्रवास वाचकांना भुरळ घालत आहे. याचा अर्थ त्या पुस्तकात काही तरी आहे. ते नेमके काय, हे पाहणे उद्बोधक ठरावे.
या पुस्तकाची एक गंमत आहे. केवळ आपल्याकडेच नव्हे, तर जगभरात आजही हे मनोरंजक, अद्भुतरम्य गोष्टींचे पुस्तक म्हणून प्रामुख्याने वाचले जाते. आजही गलिव्हर म्हटले की अनेकांना लिलिपुट आठवतील. अवघ्या सहा इंच उंचीची ही माणसे. त्यांच्या देशात गलिव्हर गेला, तेव्हा गलिव्हरच्या गुडघ्यापर्यंत येणारा बूट या लिलिपुटांनी इमारतीसारखा आतून फिरून पाहिला, वगैरे वर्णने आठवतील. एकीकडे हे ‘अंगुलीमात्र’ लोक, तर दुसरीकडे ब्रॉब्डिंगनॅग ही महाकाय, राक्षसी माणसे. त्या देशात आपला गलिव्हर बिचारा पिग्मी होऊन जातो. आपल्याला माहीत असलेला गलिव्हरचा प्रवास या दोन देशांत आणि तेथील अविश्वसनीय, विचित्र गोष्टींत आटोपतो.
आपल्याकडे हरिकृष्ण दामले यांनी हे पुस्तक ‘गलिव्हरचा वृत्तान्त’ पहिल्यांदा मराठीत केले. तेव्हापासून झालेले बहुतेक अनुवाद वा रूपांतरे या दोन देशांच्या सफरींतच आटोपलेले आहेत. स्विफ्ट यांनी मात्र गलिव्हरच्या चार सफरी घडवून आणलेल्या आहेत. त्यातील एक प्रवास तर लापुटा नामक उडत्या बेटांवरचा, तर चौथा प्रवास ह्युहन्हंम्स या विवेकी अश्वांच्या देशातला. या प्रवासातले गलिव्हरचे अनुभव अफलातूनच. बाल आणि किशोरांच्या आकलनास मोहवणारे, कल्पनेस पंख लावणारे. गोष्टींतून नैतिकतेचे पाठ देणारे. हे पुस्तक आज तीन शतकांनंतरही टिकले त्याचे हे एक महत्त्वाचे कारण. पण हे एवढेच नाही. गलिव्हरचे प्रवास हे त्याही पलीकडचे आहेत.
हे पुस्तक लिहिले गेले तो फ्रेंच राज्यक्रांती (१७८९) आणि औद्योगिक क्रांती (१७६० पासून) अद्याप दूरच असतानाचा काळ. पण ‘एन्लायनमेंट’ म्हणून ओळखला जाणारा आणि आधुनिकतेची पूर्वावस्था ठरणारा विचारप्रवाह या काळच्या युरोपात सर्वत्र पसरलेला होता. विज्ञानवाद आणि मानवमुक्तीच्या विचाराची ही सुरुवात. पण १७२६ पर्यंत त्या ‘एन्लायनमेंट’चे प्रतिबिंब समाजात दिसत नव्हते, त्यामुळे ‘कळते पण वळत नाही’ अशी गत झाली असल्याची तगमगी खंत त्या काळातल्या अनेक विचारवंत किंवा विश्लेषकांना होती.
न्यूटनचे तिन्ही नियम मांडून झालेले असून, तो आता ८४ वर्षांचा वृद्ध झालेला आहे. मुंबई बेट ब्रिटिशांच्या ताब्यात येऊन तेथे आता पहिले न्यायालयसुद्धा सुरू झालेले आहे आणि बाळाजी विश्वनाथ गेल्यानंतर शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांना नुकतेच पुणे शहर इनाम दिलेले आहे असे १७२६ हे वर्ष. त्या वर्षी चार खंडांचे हे कल्पित प्रवासवर्णन जोनाथन स्विफ्ट यांनी लिहिले. या पुस्तकापूर्वीच ते एक लेखक म्हणून प्रस्थापित झालेले होते.
पण ते नुसतेच ‘लेखकराव’ नव्हते. ते राजकारणात, समाजकारणात होते. त्यातही जाहीर भूमिका घेत होते. व्हिग आणि टोरी हे तेव्हाचे दोन पक्ष. आधी ते व्हिगच्या जवळ होते. नंतर त्यांची टोरीशी जवळीक झाली. हे केवळ पक्षांतर म्हणता येणार नाही. ते विचारांतर होते. राजकीय धोरणे, निर्णय, सत्तासमीकरणे यांचा त्या पक्षबदलावर प्रभाव होता. त्याविषयी मतांतरे असतील; पण बजबजपुरी, अधिकारांचा स्वैर वापर, सत्ताधार्यांचा स्वार्थ अशा गोष्टींची त्यांना घृणा होती. त्यांच्या लेखनातून आणि खासकरून गलिव्हरच्या प्रवासांतून या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसते. ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ ही एक राजकीय उपहासिका आहे, हे येथे लक्षात येते.
या कादंबरीत ओतप्रोत भरलेला आहे तो तत्कालीन इंग्लंडबद्दलचा राजकीय उपरोध. त्यातला साळसूदपणा इतका की, एरवी कुणाला ही साधी काल्पनिका वाटेल. गलिव्हरच्या प्रवासातला एक किस्सा आहे. लिलिपुटांचा प्रधान सचिव त्याला लिलिपुट आणि ब्लेफुस्कू या दोन देशांतील ‘जानी दुश्मनी’ची कारणे सांगत असतो. त्यातले हे एक.
लिलिपुटमध्ये अंडे खाण्यासाठी ते त्याच्या मोठ्या टोकाकडून फोडण्याची प्राचीन परंपरा होती. सगळे त्या परंपरेचे पाईक. पण एके दिवशी अंडे त्या प्रकारे फोडताना राजपुत्राचे बोट कापले. ते पाहून राजाने आज्ञा दिली, की आजपासून प्रत्येकाने अंडे त्याच्या मोठ्या नव्हे, तर छोट्या टोकाकडूनच फोडायचे. लोकहिताचा आदेश तो. मोडणार्यास सक्त शिक्षा. पण हा परंपराभंग. सत्ताधार्यांनी असा संस्कृती आणि परंपरांत हस्तक्षेप करायचा नसतो. त्यावरून राज्यात दोन गट पडले. अनेक ग्रंथांतून मोठे टोक की छोटे, असे वाद झडले. राजाच्या बाजूचे लोक धर्मग्रंथांचा आधार घेऊ लागले. त्यांच्या प्रेषिताने म्हटले होते, की श्रद्धाळूंनी अंडे सोयीच्या टोकाकडून फोडावे. पण हे सोयीचे टोक कोणते? धर्मग्रंथांची वचने अनेकदा अशी निसरडी, संदिग्ध असतात. त्यांचा सोयीने वापर केला जातो. तेथे मोठे टोकवाल्यांनी सहा वेळा बंड केले. त्यात एका राजाची हत्या झाली. एकाची सत्ता गेली.
छोट्या टोकाकडून अंडे फोडण्यास नकार देणार्या बंडखोरांना मारण्यात आले. कित्येकांना हाकलण्यात आले. अशांना शेजारचे ब्लेफुस्कू आसरा देत असे… धर्म, परंपरा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विरोधकांचे दमन, क्षुल्लक मतभेदांतून रक्तरंजित संघर्ष, सत्तेच्या माध्यमातून एकाच विचारसरणीचे वर्चस्व प्रस्थापित करण्याची वृत्ती अशा अनेक गोष्टींवरचा हा स्विफ्ट यांचा उपरोधिक प्रहार. तो केवळ तत्कालीन – इंग्लंड विरुद्ध फ्रान्स यांच्यातील वाद- संघर्षापुरता मर्यादित नव्हता. तो सर्वकालिक आहे. गलिव्हरच्या प्रवासांतील अशा अनेक प्रसंगांतून उपहास, उपरोध, विनोद, चमत्कृती यांच्या आधारे जोनाथन स्विफ्ट हे राजकीय भाष्य करीत असतात. सत्ता मिळवण्यासाठी माणूस करीत असलेल्या तडजोडी, मतभेद वाढवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि अंतिमत: सार्याच सत्ताधार्यांचा लोकहिताच्या नावाने स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी चाललेला आटापिटा हे सारे या राजकीय उपहासिकेच्या गाभ्यात आहे.
गरज आहे ती ते समजून घेण्याची. यावर जॉर्ज ऑर्वेलसारख्या अनेक अभ्यासकांनी, लेखकांनी भाष्य केले आहे. ‘गलिव्हर’चे लेखक जोनाथन स्विफ्ट हे ‘एकाधिकारशाही प्रवृत्तीचा उपरोधिक निर्देश करणारे पहिलेच’ असे ऑर्वेलचे म्हणणे. आपल्याकडे मात्र अजूनही एका मोठ्या वर्गात ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’कडे लहान मुलांसाठीची अद्भुत साहसकथा म्हणून पाहिले जाते. चारशेवे वर्ष सुरू होताना तरी या ‘गलिव्हर’चे मर्म ओळखले पाहिजे. आजच्या काळातील राजकारण समजून घेण्यासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे.
