मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून ज्ञानेश कुमार यांना दूर करणे सरकारला परवडणारे नसेल; पण त्यांना राहू देणेही सत्ताधार्यांनाच तापदायक…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाफुटीची चौकशी पूर्ण होईपर्यंत या आयोगाचे प्रमुख विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला ते योग्य झाले. त्यामुळे गेले १२ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाची कोंडी फुटेल. आंदोलकांस भीमनवार यांचा राजीनामा हवा होता आणि तो दिला जाणार नाही हे सरकारने स्पष्ट केले होते. आंदोलकांना त्याबरोबर आणखीही बरेच काही हवे होते. त्यातील काही मागण्या सरकारने मान्य केल्या. काही आंदोलकांनी सोडून दिल्या.
भीमनवार यांचा राजीनामा न घेता त्यांस चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवणे हा मध्यममार्ग. सरकार आणि आंदोलक या उभयतांनी तो स्वीकारला. म्हणून तिढा सुटला. त्यासाठी सरकार आणि आंदोलकांनी एक-एक पायरी खाली उतरण्याची तयारी दाखवली. ही बाब निश्चितच शहाणपणाची. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे आंदोलन देशभर पसरणार अशी लक्षणे असताना महाराष्ट्रात आणखी एक डोकेदुखी नको असेही कदाचित राज्यातील सत्ताधार्यांच्या केंद्रीय धुरीणांस वाटले असणार. त्यामुळेही हे आंदोलन संपवणे महत्त्वाचे वाटले असेल. तेही योग्य. जे झाले त्यातून मध्यम मार्गाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या मार्गाचा स्वीकार करून महाराष्ट्र सरकारने राज्यापुरता तरी प्रश्न मिटवला. आता कसोटी असेल ती केंद्रातील भाजप नेत्यांची. ‘सीजेपी’पाठोपाठ काँग्रेस, डावे इत्यादी सगळेच आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाची तीव्रता वाढवतील.
विरोधात असताना भाजपने हेच केले होते. तेव्हा विरोधक राजकारण करतात अशी छाती पिटण्यात काही अर्थ नाही. ते टाळून केंद्रीय धुरीणांस तडजोडीचा मार्ग स्वीकारावाच लागेल. अशी तडजोड आपण करू शकतो हे केंद्राने वेळोवेळी दाखवलेले आहेच. सत्तेवर आल्या आल्या जमीन हस्तांतरण, कृषी कायदे सुधारणा इत्यादी विधेयकांवर आपण माघार घेऊ शकतो हे सरकारने सिद्ध केलेले आहे. आता आपल्यातील ही तडजोड-क्षमता सरकारला पणास लावावी लागेल. तथापि आताची परिस्थिती ‘नीट’ आंदोलनापेक्षाही गंभीर आहे. त्या वेळी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा बळी देऊन सरकारला आपली मान वाचवता आली. आताचे निवडणूक आयोगाच्या उद्योगांचे प्रकरण तितके सोपे नाही.
ते तसे का नाही याचा ऊहापोह आधी. शिक्षणमंत्री हे घटनात्मक पद नाही. त्या पदावरील व्यक्तीस मुख्यमंत्री वा पंतप्रधान खड्याप्रमाणे दूर करू शकतात. मुख्य निवडणूक आयुक्तपदाचे तसे नाही. ते देशातील सर्वोच्च घटनात्मक पदांतील एक. त्या पदावरील व्यक्तीची नेमणूक जरी सरकारकडून होत असली तरी ती झाली की या पदावरील व्यक्ती पंतप्रधान वा मंत्रिमंडळास उत्तरदायी नसते. त्यामुळे त्यांस नारळ देण्याचा अधिकार पंतप्रधानांस नाही. बरे तो नाही; म्हणून श्रीमान ज्ञानेश कुमार यांस आहे तेथेच सुखेनैव राहू देणेही सरकारला परवडणारे नाही.
जितका अधिक काळ ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्तपदावर राहतील तितके त्यांच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक होत जाईल. ते मोडून काढायचे उपाय योजावयाचे तर न्यायालयही किती काळ रक्षण करणार हा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनासंदर्भातील आपल्या ताज्या निर्णयाद्वारे आपणास सरकारच्या इभ्रतीपेक्षा न्यायालयीन प्रतिष्ठा महत्त्वाची आहे, हे दाखवून दिले. त्यामुळे न्यायालयाकडे किती काणाडोळा करायचा याचा विचार करून सरकारला पावले उचलावी लागणार. दुसरीकडे आंदोलकांस मोकळे सोडावे तर अधिकच अनवस्था प्रसंग निर्माण होणार.
सरकारची हीच अडचण विरोधकांनी हेरली असून ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी त्यामुळे त्यांच्याकडून दबाव अधिकच वाढत जाणार, हे उघड आहे. या सगळ्यात काही न करावे तर ‘‘बघा… सरकारसाठी ज्ञानेश कुमार किती महत्त्वाचे आहेत’’ हे विरोधक पुन:पुन्हा बोलून दाखवणार हा तिसरा मोठा धोका. ज्ञानेश कुमार आहेत म्हणून हे सरकार निवडणुका जिंकते, त्यांच्या अनुपस्थितीत जिंकण्याची सरकारला खात्री नाही, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होणार यात शंका नाही. ते चित्र पूर्णत्वास जाईपर्यंत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजेल.
या निवडणुकांच्या आधी ज्ञानेश कुमार यांच्याबाबत काही निर्णय घेतला गेल्यास तो निवडणुकीचा मुद्दा होण्याची दाट शक्यता. तसा काही निर्णय नाही घेतला तरी निवडणुकीच्या केंद्रस्थानी पुन्हा ज्ञानेश कुमारच असणार. म्हणजे ज्ञानेश कुमारांस धरून ठेवायचे तर विरोधक चावणार आणि त्यांस सोडले तर स्वत:लाच पळावे लागणार अशी ही स्थिती. ती हाताळण्यात आणखी एक गुंता आहे.
तो आहे नोकरशाही हा. विरोधकांच्या दबावास बळी पडून ज्ञानेश कुमारांस वार्यावर सोडून दिले तर त्याचा सर्वात मोठा फटका नोकरशाहीच्या मनोधैर्यास बसेल. सरकार आपणास गरजेपुरते वापरते आणि वेळ आली की फेकून देते असा संदेश त्यातून जाण्याचा धोका आहे. बहुतांश नोकरशाही म्हणजे वातकुक्कुट.
सत्तेच्या वार्याची दिशा पाहून हे नोकरशहा आपल्या चारापाण्याची बेगमी करायची/ नाही करायची ते ठरवतात. तेव्हा अशा या नोकरशाहीसमोर सरकार ज्ञानेश कुमारांस बळीचा बकरा बनवू शकत नाही. तसे होऊ दिले तर उर्वरित नोकरशहांवर परिणाम होणार. तसा तो झाल्यावर हे जिवाजी कलमदाने सरकारसाठी साहाय्यक ठरण्याची शक्यता कमी. अंगाशी आल्यावर वार्यावर सोडणार्या सरकारसाठी कोण कशाला काम करेल! हा एक भाग. दुसरे असे की समजा सरकारला ज्ञानेश कुमार यांचा त्याग करावा लागलाच तर त्यांच्या जागी येणारी व्यक्ती ही त्यांच्याइतकी ‘उपयोगी’ असेलच असे नाही.
किंबहुना ती उपयोगी ठरण्याची शक्यता कमी. कारण ज्ञानेश कुमारांचे वा त्यांच्यामुळे सरकारचे पोळलेले तोंड पाहून तसेच त्यांचे जे काही झाले वा होत आहे ते पाहून त्यांचा उत्तराधिकारी ताकही फुंकून पिणार. म्हणजे त्या अर्थानेही सदर अधिकारी निरुपयोगीच. हे सर्व टाळण्यासाठी समजा सरकारने ज्ञानेश कुमारांस पूर्ण अभय देत पदरी राखले तरी आतापर्यंत ते जे काही करू शकले ते करणे यापुढच्या काळात त्यांना शक्य होण्याची शक्यता नाही. इतके तोंड पोळल्यावर खुद्द ज्ञानेश कुमारांसही पुढचा काळ आहे त्याच पदावर काढणे हे तारेवरच्या कसरतीपेक्षाही अवघड असेल.
अशा वातावरणी ज्ञानेश कुमार हे असून अडचण आणि नसून खोळंबा होत जाणार हे निश्चित. त्यांच्या वहाणेने विरोधक सरकारला ठेचण्याचा प्रयत्न करणार कारण मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वहाणांस लागलेली घाण. अशा वेळी त्यातल्या त्यात आदरणीय मार्गाने या ज्ञानेश कुमारांस निरोप देणे, हे शहाणपणाचे असू शकेल. हे सरकारला ठाऊक नाही, असे अजिबात नाही. पण त्यास मानहानी नको आहे.
आताही विरोधकांशी आम्ही बोलणारच नाही, असा आव जरी सरकार आणत असले तरी प्रत्यक्षात पडद्यामागून काही महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवरील व्यक्ती विरोधकांशी संधान बांधू लागल्या असल्या तर आश्चर्य नाही. यातून सरकारचा अशक्तपणा तेवढा दिसून येईल. तो जसजसा दिसेल तसतसे विरोधक अधिक ताठर होत जातील. त्यातून सरकारची अधिकच कोंडी होईल. तेव्हा ज्ञानेश कुमारांचे असणे या सरकारच्या अस्तित्वासाठी अपरिहार्य आहे असे चित्र निर्माण होणे सरकारला शोभणारे नाही. या मुद्द्यावर आणखी किती ताणायचे याचा विचार सरकारला करावा लागेल. ताण जितका अधिक तितकी जोखीम अधिक. ती वाढवायची की मुख्य निवडणूक आयुक्तांस दूर करून हे कुमार-‘संभव’ एकदाचे संपवायचे इतकेच काय ते पर्याय सरकारकडे आहेत.
