मोबाइलच्या लहान पडद्यावर हिंसक प्रसंग बघताना जेवढे आपण अलिप्त असतो, तेवढेच प्रत्यक्ष हिंसा बघतानासुद्धा असतो का? हिंसा इतकी अंगवळणी पडली आहे की, समोर घडणारा हिंसक प्रसंग पाहतानाही माणसे अस्वस्थ होत नाहीत? तसे असेल तर त्याचा संबंध ‘मला काय त्याचे’ या मध्यमवर्गीय मानसिकतेशी आहे का? मग एक समूह अथवा समाज या संकल्पनेतील व्यक्तीचे स्थान काय? असे कोडगे होत जाणे याला जगणे तरी कसे म्हणायचे? समाजमाध्यमांच्या प्रभावापायी असे वारंवार घडू लागले काय? तसे असेल तर या माध्यमावर नियमनाची गरज आता वाटते काय? अलीकडच्या काळातील काही घटना व प्रसंग बघितले की कोणत्याही संवेदनशील मनाला असे प्रश्न सहज पडतील. मात्र अलीकडे अनेकांना ते पडेनासे झालेत. इतकी बधिरता योग्य कशी ठरवता येईल? मुंबईला खेटून असलेल्या वसईत दिवसाढवळ्या वर्दळीच्या रस्त्यावर एक माथेफिरू प्रियकर प्रेयसीला मारून टाकतो. ते भयावह दृश्य बघायला मोठी गर्दी जमते. मात्र त्यातल्या कुणालाच त्याला थांबवावे असे वाटत नाही. जमलेेले सारे हा मृत्युदंडाचा प्रकार मूकपणे बघत असतात. हे चांगल्या समाजस्वास्थ्याचे लक्षण कसे मानायचे?

गर्दीत माणूस एकटा असतो, त्यामुळे तो स्वत:ला असुरक्षित समजतो असे मानसशास्त्र सांगते. अशा वेळी एखाद्याने हिंमत दाखवून पुढाकार घेतला तर हीच असुरक्षितता क्षणात नाहीशी होते व त्याचे रूपांतर एकीच्या बळात होते असेही याच शास्त्राचे म्हणणे. याच तर्काचा आधार घेतला तर या गर्दीतील एकालाही पुढाकार घ्यावा असे का वाटले नसेल? माणूस जसजसा प्रगत होत चालला तसतशी भावनांच्या प्रकटीकरण व समायोजनाला खीळ बसली. परस्परसंबंध व शेजारधर्मापासून तो दुरावला. यातून हे घडले असा निष्कर्ष आता काढायचा काय? असे समूहकेंद्री होण्यापासून दूर होत जाणे सुदृढ समाजव्यवस्थेसाठी अपायकारक नाही काय? एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर जमलेल्या गर्दीतले काही मोजके जखमींना मदत करण्यासाठी पुढे सरसावतात तर बहुसंख्य अपघाताला कारणीभूत ठरलेल्यांना मारहाण करण्यात धन्यता मानतात. अशा पद्धतीने हाताला व्यायाम देऊन ते व्यवस्थेविषयीचा राग व हताशा बाहेर काढत असतात. अशा प्रकरणात अपघाताला कारणीभूत असलेला दुबळा ठरत असतो म्हणूनच अशी हिंमत दाखवली जाते. मात्र हिंसक घटना असेल तर बहुतेक सारे दर्शकाच्या भूमिकेत वावरतात. ही बघ्यांची दुनिया योग्य कशी ठरवता येईल? अगदी काही महिन्यांपूर्वी याच मुंबईजवळ रेल्वेत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानाने तीन मुस्लीम प्रवाशांना गोळ्या घालून ठार केले. या घटनेकडे बहुसंख्याकवादाचा अतिरेक या दृष्टिकोनातून बघितले गेले, त्या वेळीही डब्यात सत्तरेक प्रवासी होतेच पण कुणीही या जवानाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्या हाती बंदूक होती व जीव तर प्रत्येकालाच प्यारा असतो असे या भेकडपणाचे समर्थन केले गेले. प्रेयसीला मारणाऱ्या या तरुणाच्या हातात धारदार शस्त्र नव्हते. तरीही गर्दीतील एकालाही अटकावासाठी पुढाकार घ्यावासा वाटल्याचे दिसले नाही. यातून निष्कर्ष हाच निघतो की सार्वजनिक ठिकाणी कितीही गर्दी असली तरी माणूस स्वत:ला एकटा समजत असतो. हे शास्त्रीय दृष्टिकोनातून ठीक असेलही, पण हे एकसंध समाज या कल्पनेलाच छेद देणारे. संकटकाळात आपला कोण व परका कोण हे न बघता मदतीलाही धावून जाण्याची वृत्ती अलीकडे कमी होत चालली. यातून हिंमत वाढते ती गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासणाऱ्यांची. प्रेयसीला ठार मारण्यासाठी रस्ता निवडला तरी काही फरक पडत नाही. कुणीही मध्ये येणार नाही अशा भावनेला बळ मिळते ते यातून. याला सामाजिक प्रगतीचे लक्षण कसे समजायचे?

patna high court
अग्रलेख : ‘आबादी…’ आबाद?
loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
loksatta editorial on intention of centre to levy gst on petrol diesel
अग्रलेख : अवघा अपंगत्वी आनंद!  
representation of women in the lok sabha after general elections 2024
अग्रलेख: राणीचे राज्य…
Loksatta editorial A unilateral ceasefire proposal by Russian President Vladimir Putin Ukraine
अग्रलेख: मतैक्याचे मृगजळ..
loksatta editorial on israeli supreme court decisions says ultra orthodox jews must serve in military
अग्रलेख : बीबींचा ‘शहाबानो क्षण’!
Loksatta editorial Safety of Railway Passengers Railway accidents in West Bengal
अग्रलेख: ‘कवच’ काळजी!
Loksatta editorial NCERT changes in 12th Political Science book a
अग्रलेख: ‘गाळीव’ इतिहासाचे वर्तमान!

अलीकडे या साऱ्या घटनांमध्ये एक समान धागा दिसतो. तो म्हणजे घटनेचे चित्रीकरण करण्याचा. सहजपणे हातात आलेले स्मार्टफोन हे या सवयीमागचे सूत्र. वसईच्या घटनेतसुद्धा अनेक जण त्या दुर्दैवी प्रेयसीच्या मदतीला जाण्याऐवजी चित्रीकरण करण्यात व्यस्त असलेले दिसले. हे केवळ वसईतच घडते असे नाही. असे चित्रण करून आपण चौकशी यंत्रणांचे काम सुकर करू, अशी भावना असणारे फार थोडे. यातील बहुसंख्यांना असे चित्रण माध्यमावर टाकले की भरपूर लाइक्स मिळतील असेच वाटत असते. ही प्रसिद्धिलोलुपता धोक्याच्या वळणाकडे जाणारी. मात्र माध्यमांच्या प्रेमात असलेल्या सध्याच्या पिढीला त्यात काहीही वावगे वाटत नाही. समाजमाध्यमांचा वापर व गैरवापर यातली सीमारेषा तशी धूसर. त्यात योग्य व अयोग्य काय हे शिकवण्याची जबाबदारी सर्वप्रथम कुटुंबाची. मात्र अनेक घरांमध्ये याविषयीची पुरेशी स्पष्टता नाही. त्यातून या गैरवापरात कमालीची वाढ झालेली दिसते. समाजमाध्यमांवर लोकप्रिय ठरणाऱ्या ‘रील्स’ तयार करण्यासाठी जीव धोक्यात टाकून चित्रीकरण करणारी मुले बघितली की हे सहज लक्षात येते. मग ती उंच तटबंदीला लटकणारी मुलगी असो वा चालवता येत नसतानाही कारमध्ये बसून ती मागे घेत दरीत कोसळून मरणारी तरुणी असो. किंवा स्टेअरिंग हातात न धरता दुचाकीवर बसून हातवारे करणारी मुलगी असो. कोणतेही माध्यम हाताळायचे असेल तर त्यासाठी आवश्यक असलेली साक्षरता महत्त्वाची. त्याची सर्वत्र वानवा. केवळ भारतच नाही तर जगातल्या अनेक देशांत अलीकडे सार्वत्रिकपणे दिसणारे हे चित्र. या विकृतीवर मात करण्याचे मोठे आव्हान जगासमोर निर्माण झाले आहे हे आपण मान्य करणार की नाही?

अगदी दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेतील सर्जन जनरल डॉ. विवेक मूर्ती यांनी नेमका हाच इशारा दिला. सहजपणे हाताळता येणारी समाजमाध्यमे ही मानसिक आरोग्यासाठी अपायकारक ठरू लागली आहेत. एका अमेरिकी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार १३ ते १७ वयोगटातील ९५ टक्के मुले या माध्यमांचा वापर करतात. तो रोखता यावा म्हणून हे आरोग्यासाठी अपायकारक अशी तळटीप तरी त्यावर टाका असे या मूर्तींचे म्हणणे. त्यांनी तेथील लोकप्रतिनिधींना तसा कायदा आणण्याचे आवाहन केले. तंबाखूजन्य पदार्थांवर असा धोक्याचा इशारा दिल्याने बराच फरक पडला असे त्यांचे निरीक्षण व म्हणून त्यांचा हा नवा आग्रह. एकूणच आरोग्याच्या बाबतीत सजग असलेल्या अमेरिकेत यावर काही तरी निर्णय होईलही. पण भारताचे काय? एवढी तत्परता दाखवण्याची खबरदारी सरकार खरेच घेईल का? आजही आपल्याकडे सार्वजनिक कार्यक्रमात लहान मुलांना घेऊन येणारे पालक त्याने गोंधळ घालू नये म्हणून अगदी सहजपणे त्याच्या हाती स्मार्टफोन देऊन टाकतात. यातून सभागृहातील शांतता टिकवण्यासाठी त्या बालकाची मदत होईलही पण त्या बालमनावर होणाऱ्या परिणामांचे काय? मूल कोणत्या वयात काय बघते याकडे लक्ष कोण देणार? सरकार असो वा पालक, हा गाफीलपणाच कडेलोटाकडे नेणारा ठरेल, याची जाणीवच अजून कुणाला झालेली दिसत नाही. अशा स्थितीत घडणारा समाज हा तसाच तयार होणार. आत्मकेंद्री, स्वार्थी, चित्रीकरणाला प्राधान्य देणारा, रील्स हेच जग अशा भ्रमात वावरणारा, संवेदनशीलता हरवलेला. अशी वाटचाल सुरू राहिली तर वर्दळीच्या ठिकाणी आणखीही खून पाडले जातील. अशी हिंसा व त्यावरचे मौन समाजाच्या अधोगतीचे- किंबहुना समाजभावना गतप्राण झाल्याचे लक्षण ठरते. या लक्षणाची लक्तरे समाजमाध्यमांवर ठिकठिकाणी सापडतीलच.