वाडवडिलांच्या नावे ओळखले जात असताना स्वत:च्या स्वतंत्र चेहर्याची आस प्रत्यक्षात आणणे अवघड. अजितदादा आता कोठे स्वत:चे नेतृत्वपीठ उभे करतील अशी शक्यता दिसत होती.
आता कोठे नेतृत्व फुलू लागेल असे वाटत असताना अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हृदयास घरे पाडतो खरेच. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील अशा ऐन भरात असलेल्या नेत्यांच्या अकाली मृत्यूनंतर आता महाराष्ट्राने आज अजित पवारांसारखा मोहरा गमावला. त्यांच्या निधनाने या राज्याचे काय आणि किती नुकसान होणार आहे याचा अंदाज येण्यास काही काळ निश्चित जावा लागेल हे मान्य. परंतु आज त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा न घेणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल.
याचे कारण असे की केवळ शरद पवार यांचा पुतण्या इतकीच त्यांची ओळख नव्हती. ज्या घरात सुनील गावस्कर असतात, ज्या घरात अमिताभ बच्चन असतात आणि ज्या घरांत शरद पवार असतात त्या घरांतील पुढच्या पिढीस स्वत:ची ओळख निर्माण करणे अशक्यप्राय, कमालीचे जीवघेणे ठरते. एक तर आपला समाज ‘सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख’ भले म्हणत असेल. पण हे या समाजाचे ग्रांथिक शहाणपण प्रत्यक्ष वर्तनात कधीही आढळत नाही. त्यामुळे रोहन गावस्कर, अभिषेक बच्चन वा अजित पवार यांना या समाजात त्यांच्या वाडवडिलांच्या नावेच ओळखले जाते. असे असताना स्वत:च्या स्वतंत्र चेहर्याची आस बाळगणे आणि ती प्रत्यक्षात आणणे ही बाब अत्यंत अवघड. अजितदादांनी हे अवघडलेपण नेहमीच अनुभवले आणि आता कोठे ते त्यातून बाहेर पडून स्वत:चे नेतृत्वपीठ उभे करतील अशी शक्यता दिसत होती. पण त्याआधीच ते गेले. फांदी फुटण्याची शक्यता दिसत असतानाच एखाद्या वृक्षाच्या मुळावर घाव घातला जावा, तसे हे. जे झाले ते अविश्वसनीयरीत्या दुर्दैवी.
राजकारण्यांचे वर्गीकरण दोन गटांत होते. एक केवळ राजकारणी आणि दुसरे काही एक लांबचे पाहणारे, स्वत:चा अभ्यास असणारे, प्रशासन समजावून घेणारे, विषयाचा अभ्यास करणारे असतात. अजितदादा कोणत्या वर्गातील या प्रश्नाचे उत्तर त्यांचे कडवे टीकाकार आणि ‘पवार’ या आडनावाची नकोशी असणारेही देतील. महाराष्ट्राच्या इतिहासात राज्याचे वीज महामंडळ नफा पाहू शकले, ते अजितदादांमुळे. शेतकर्यांचे, ग्राहकांचे लांगूलचालन हा राजकीय धर्म मानला जात असताना अजितदादा ‘गुमान वीज बिल भरा’ असा सज्जड इशारा आपल्या खास खर्जातून देण्यास कमी करत नसत. हा इशारा फक्त कागदोपत्री नसे. पुढे जाऊन वीज बिल थकवणार्या ग्राहकांची वीज खुशाल तोडा, असा त्यांचा आदेश होता आणि तो प्रत्यक्षात येऊ लागल्याचे पाहिल्यावर वीज बिलांची थकबाकी आपसूक वसूल झाली. त्या वेळी अजितदादा आपल्या अधिकार्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले.
अगदी अलीकडे गेल्या निवडणुकांतही शेतकर्यांना कर्जमाफीची आस असताना अजितदादा त्यांना ‘कर्ज फेडावे लागेल’ असे बजावण्यास कमी करत नव्हते. नंतर ‘लाडक्या बहिणीं’ची अव्यवहार्यता सांगण्याचे धैर्य दाखवले ते अजितदादांनीच. स्वत:च्या खात्यातील विषयांवर त्यांची इतकी घट्ट मांड असे की उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालात त्यांनी एकनाथ शिंदे आणि अन्यांच्या खर्चावर नियंत्रण आणण्याची हिंमत दाखवली. त्याचमुळे ठाकरे यांची साथसंगत सोडून शिंदे आणि कंपूने भाजपशी घरोबा करण्यामागील एक कारण अजितदादा हे होते हे विसरता येणार नाही. त्याचमुळे भाजपशी हातमिळवणी केल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांकडील अर्थ खात्यास हात लावला नाही. अन्य अनेकांची नाराजी ओढवून अर्थ खाते अजितदादांकडेच राहिले.
काका शरद पवार यांच्याकडून अजितदादांनी जे काही मोजके गुण घेतले त्यातील हा एक. मंत्रालयात सकाळी साताच्या ठोक्याला ते हजर असत. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच्या नोंदी वाचणे, निर्णयाचा मसुदा अभ्यासणे, त्याचे शब्दप्रयोग, त्याची कार्यकक्षा इत्यादी बारीकसारीक गोष्टीत अजितदादांना गती होती आणि हे मुद्दे ते कधीही नजरेआड करत नसत. मंत्रिमंडळ बैठकीत एखादा निर्णय झाल्यानंतर त्याचे इतिवृत्त वाचणे आणि त्या निर्णयाचा पाठपुरावा करणे ही त्यांची सवय होती. हे आपोआप होणारे नाही. त्यास कष्ट करावे लागतात आणि प्रयत्नांचे सातत्य लागते. ते अजितदादांकडे होते. त्यामुळे अन्य अनेक राजकारण्यांप्रमाणे नोकरशहा अजितदादांच्या बाबत कधीच वरचढ ठरू शकले नाहीत. उलट नोकरशहांसाठी अजितदादा हे काका शरदरावांप्रमाणे आदर्श होते. जे काही करायचे ते नि:संदिग्धपणे आणि जे काही होईल त्याची मालकी घ्यायची तीही नि:संदिग्धपणे. संशय, गोंधळ यांस जागा ठेवायची नाही आणि कागदी घोडे नाचवायचे नाहीत हा पवार कुटुंबाचा खाक्या त्यांनी इमानेइतबारे पाळला.
काकांकडून न घेतलेल्या एका गुणाने मात्र अजितदादांचा घात केला. मुत्सद्देगिरी त्यांना जमली नाही आणि ‘थंडा करके खाओ’ हे ते कधी शिकले नाहीत. त्याचे मूळ लहानपणी घरात झालेल्या त्यांच्या कोडकौतुकात असणार. मुलगा म्हणून लहानग्या आणि तरुण अजितलाही घरी अतिरिक्त मान होता. पण त्यातून त्यांचा ‘मी म्हणेन ती पूर्व’ असा स्वभाव घडला असणार. त्यामुळे राजकारण हे बहुतांश वेळी भावनिक असते, ही बाब त्यांनी दुर्लक्षली. स्पष्टवक्तेपणा हा अन्य क्षेत्रांत भले सद्गुण असेल. पण राजकारणात मात्र तो दुर्गुणच ठरतो. अजितदादांनी या वास्तवाची फिकीर केली नाही; हे खरे. पण या वास्तवाकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले हेही खरे. अजितदादांच्या लोकप्रियता प्रसारास त्यामुळे मर्यादा आल्या. माणसे फटकळ व्यक्तींपासून स्वत:स चार हात दूर ठेवतात. अजितदादांपासून त्यामुळे अनेकांनी हा दुरावा अनुभवला. तो मिटवण्याची गरज कधी अजितदादांना वाटली ना कधी त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले.
पार्श्वभूमीमुळे असेल; पण सत्ता हे त्यांच्यासाठी साध्य ठरत गेले, साधन राहिले नाही. वास्तविक ज्यांनी त्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यांना अजितदादांनी जाहीर आव्हान देत आरोप सिद्ध करा; नपेक्षा मागे घ्या, असे आव्हान देणे अधिक मर्दुमकीचे ठरले असते. अजितदादांनी ही संधी दवडली आणि वर उलट असे आरोप करणार्यांच्या दरबारात स्वत:ला सादर करण्यात कमीपणा मानला नाही. वास्तविक अजितदादांना आपल्या कळपात ओढणे ही केंद्रातील सत्ताधीश भाजपची मानसिक गरज होती. राजकीय नव्हे. हा फरक अजितदादांना ओळखता आला नाही.
कदाचित केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळणे हे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे आणि प्राधान्याचे असावे. विकास हे कारण भले त्यांनी पुढे केले असेल. पण त्यावर शेंबड्या पोराचाही विश्वास नव्हता. कारण सत्तेशिवायही विकास कसा होऊ शकतो याचे उदाहरण त्यांच्या काकांनी घालून दिलेले होते. त्याकडे दुर्लक्ष करणे ही अजितदादांची राजकीय अपरिहार्यता होती. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठापासून ते उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या अनुक्रमे अननुभवी आणि कनिष्ठ मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्यात त्यांना कमीपणा वाटला नाही. आताही ते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू साथीदार मानले जात. कारण मुख्यमंत्र्यांविरोधात कारवाया, काड्या आणि कागाळ्या करण्याचा कुटिरोद्योग त्यांनी कधीही केला नाही. अर्थात तसे करण्याखेरीज त्यांस पर्यायही नव्हता, हेही खरे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यापासून त्यांचा पक्ष दूर करणे ही भाजपची गरज होती. ती अजितदादांनी पूर्ण केली.
त्याचमुळे त्यानंतरच्या प्रत्येक राजकीय चाचणीत यशस्वी होणे ही त्यांची गरज बनली. यशाचा अभाव त्यांना परवडणारा नव्हता. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांत या यशाने हुलकावणी दिल्यानंतर अजितदादा आगामी जिल्हा परिषदांसाठी अधिक त्वेषाने कामाला लागले. या अपघाताचे कारण ठरलेला विमानप्रवास त्यामुळेच त्यांना करावा लागला. जे झाले ते दुर्दैवी. पण यानिमित्ताने तरी राजकारणात अतोनात वाढलेल्या स्पर्धेचा (कॉम्पिटेटिव्ह पॉलिटिक्स) संबंधित विचार करणार आहेत की नाही? राजकारण हे सर्वस्व नाही आणि त्यातील यश हे तर अजिबातच नाही. जगण्याच्या अनेक अंगांतील ते एक. पण ते जगण्याचे प्रयोजन बनत असल्याचे अलीकडे दिसून येते. काव्यशास्त्रविनोद, चित्र, संगीत, नाट्य अशा जगणे समृद्ध करणार्या घटकांत या अलीकडच्या राजकारण्यांस कसलीही रुची नाही.
पवार घराण्यातील असूनसुद्धा अजितदादांनी ही अंगे काकांकडून घेतली नाहीत, हे खेदाने नमूद करावे लागते. सतत नुसते धावायचे. कसल्या तरी पराजयाच्या भीतीने नुसते धावायचे. पण हा कथित पराजय टाळून मिळवायचे काय याचे उत्तर सोडा; पण या मंडळींस तो प्रश्नही पडत नाही. ‘‘कोणतेही यश अंतिम नसते आणि अपयश जीवघेणे नसते’’ असे इंग्लंडास दुसरे महायुद्ध जिंकून देणारे विन्स्टन चर्चिल म्हणत. तरीही अनामिक यशामागे हे सारे धावणारे आपले सांस्कृतिक अपंगत्व तेवढे प्रदर्शित करतात. त्याच यशामागे धावण्यात धन्यता मानताना अजितदादांनी आपले आयुष्य हकनाक गमावले. मुख्यमंत्रीपद हे त्यांचे स्वप्न होते. ते आता कायमचे अपूर्ण राहील.
त्यांच्या मातोश्री हयात आहेत. आपल्या अपत्याची अंतिम यात्रा पाहण्यापेक्षा अधिक दु:खद त्या आईसाठी दुसरे काय असेल? नेत्यावर अपेक्षा लादणार्या कार्यकर्त्यांसाठी, उपनेत्यांसाठी भले एक पक्षप्रमुख, आश्वासक उद्धारकर्ता गेला असेल. पण त्या आईस गोविंदाग्रज लिहून गेले त्याप्रमाणे ‘‘दुर्दैवनगाच्या शिखरी/ विधवा दु:खी आई/ मांडीवर मेलें मूल/ तो हृदया धक्का बसला/ राजहंस माझा निजला’’ असेच वाटेल. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे अजितदादांच्या आप्तेष्टांप्रति सहवेदना.

