परकीय गुंतवणूक घटत असताना अनिवासी भारतीयांच्या ठेवी रुपयाला सावरू शकत नाहीत. त्यात, जागतिक युद्धस्थिती आणि दुष्काळ यांतून महागाई वाढणारच…

समाजातील अस्वस्थतेची विभागणी ढोबळपणाने राजकीय वा सामाजिक अशा गटांत केली जाते. ते सुलभीकरण झाले. सर्वसामान्यांची अस्वस्थतेवरील प्रतिक्रिया भले राजकीय, सामाजिक वा प्रसंगी सांस्कृतिकही असेल. पण बहुतेकदा त्या अस्वस्थतेचे मूळ अर्थकारणात असते. या अर्थकारणाच्या काळ्या छटा उघड दिसत नाहीत आणि त्या पाहावयाच्या तर सराईत नजर लागते. मुद्दा आरक्षणाचा असेल, पेपरफुटीचा असेल वा अगदी मतदार याद्या पुनर्रचनेचाही असेल. त्याविषयीच्या संतापाची वात आर्थिक कारणांनी पेटवली जाते.

विद्यमान वर्तमान हे याचे ज्वलंत उदाहरण. आपल्या अमानुष प्रशासकीय बळाच्या जोरावर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांस रोखण्यात सरकारला यश आले असेलही. पण त्या ‘यशा’च्या दुसर्‍याच दिवशी सरकारचे अधिक मोठे अपयश चव्हाट्यावर आले. चलनवाढीचा दर ५.५४ टक्के इतका वाढला हे त्या अपयशाचे कु-वर्तमान. चलनवाढीने साडेचार टक्क्यांचा उंबरठा ओलांडला की रिझर्व्ह बँकेत धोक्याची घंटा वाजू लागते. तशी ती गेल्या आठवड्यात वाजली.

परिणामी चार वर्षांतील पहिली व्याज दरवाढ करण्याची वेळ रिझर्व्ह बँकेवर आली. त्याच वेळी मुक्त घसरगुंडी अनुभवणार्‍या रुपयाचे गडगडणे रोखण्यासाठी एकाच आठवड्यात ५१०० कोटी डॉलर्स खर्च केले हे जाहीरपणे सांगण्याची वेळही रिझर्व्ह बँकेवर आली. अर्थस्थिती जेव्हा इतकी प्रतिकूल होऊ लागते तेव्हा रिझर्व्ह बँक कितीही सरकार-स्नेही असली तरी काही करू शकत नाही. देशातील वाढत्या अस्वस्थतेचे खरे कारण असलेल्या या अर्थ-वास्तवाचा हा परामर्श.

त्याची सुरुवात अधिकाधिक डॉलर्स आकृष्ट करून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने राबवलेल्या ‘एफसीएनआर’ (फॉरीन करन्सी नॉन रेसिडेंट अकाऊंट) या योजनेपासून सुरू होते. डॉलर्स अधिक आल्याने रुपया अधिक स्थिर होईल या धारणेतून रिझर्व्ह बँकेने ही योजना राबवली. परदेशस्थ भारतीयांनी आपल्या डॉलरी उत्पन्नाची ठेव या योजनेत करमुक्त व्याजदराने ठेवावी यासाठी ही योजना. तिला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नाकी-तोंडी डॉलर्स जाऊन बँकेस ही योजना मुदतीआधीच थांबवावी लागली. या योजनेतून डॉलर्स बक्कळ आले. सुमारे १३ हजार ३०० कोटी डॉलर्सच्या ठेवी बँकांस मिळाल्या.

सुरुवातीला ही योजना ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार होती. पण ३१ ऑगस्टला ती बंद करावी लागली. यात डॉलर्स आले भरपूर; पण रुपयाचे काही हवे तितके भले झाले नाही. याचे कारण याबरोबरीने देशात परदेशस्थ गुंतवणूक आटली आणि इराण संघर्षामुळे खनिज तेलाचे दर चढेच राहिले. परिणामी रुपया घसरता राहिला. गेल्या काही महिन्यांत रुपयाचे हे अवमूल्यन ६.१७ टक्के इतके आहे. ते रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेस पुन्हा एकदा आपल्या साठ्यातील डॉलर्स बाजारात आणावे लागले. गेल्या एका आठवड्यात रिझर्व्ह बँकेस आपल्या साठ्यातील ५१०० कोटी डॉलर्स घसरत्या रुपयास रोखण्यासाठी खर्च करावे लागले. त्याआधी बँकेने अन्य काही प्रशासकीय उपायही योजले. बँकांच्या रोखतेसंदर्भातील नियमांत बदल केला गेला. परकीय चलन व्यवहारांच्या नियमांतही बदल केले.

या सगळ्यामागे हेतू एकच. कसेही करून रुपयाची घसरगुंडी थांबवणे. या उपायांमुळे रिझर्व्ह बँक किती सक्रिय होऊ शकते याचे दर्शन झाले. पण ही सक्रियता दीर्घकालीन स्थैर्यापेक्षा तात्कालिक घसरगुंडी रोखण्यासाठी अधिक आहे असाच समज यातून निर्माण झाला. एखाद्याच्या आरोग्यात संतुलित सुधारणा करण्याऐवजी वरवर छायाचित्रांत दिसण्यापुरती रंगरंगोटी केली जावी, तसे हे. अर्थात यात हेही खरे की रिझर्व्ह बँकेच्या हाती करण्यासारखे काही आहे ते इतकेच. याउप्पर अधिक काही करावयाचे असेल तर त्याची जबाबदारी केंद्राची. तिथेच तर आपले घोडे पेंड खाते.

केंद्र सरकार असे काही भरीव करण्याच्या मन:स्थितीत सध्या असल्याचे दिसत नाही. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या झुरळांनी त्या सरकारला पिडले आहे. त्यातून उसंत मिळाली की विरोधी पक्ष आक्रमक होतात आणि सरकारची डोकेदुखी वाढवतात. बरे, त्यास सरकार आक्षेप घेणार तरी कसा? स्वत: विरोधात असतानाच्या काळात भाजपने हेच केले होते.

रुपयाचे घसरते मूल्य तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मुखदुर्बलतेशी जोडले आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळे रुपया घसरत असल्याचा आरोप सातत्याने केला. त्याचा इतका अतिरेक झाला की सामान्यांस त्यात तथ्य वाटू लागले. ते सरकार रुपयाची इभ्रत सुरक्षित राखण्यास सक्षम नाही, असा समज करून दिला गेला. तो जनतेच्या मनात बसला. परिणामी २०१४ च्या निवडणुकीत सत्ताबदल झाला. त्यात रुपयाची सांगड राष्ट्रीय भावनेशी घालणारे सत्तेत आले. त्यामुळे आता रुपयास बरे दिवस येतील अशी आशा निर्माण झाली. प्रत्यक्षात त्याची अवस्था अधिक दयनीय.

दुर्बल म्हणून गणल्या गेलेल्या सरकारच्या काळात राखली गेलेली रुपयाची प्रतिष्ठा सबल म्हणवून घेणार्‍या सरकारच्या काळात उलट धुळीस मिळाली. मध्यंतरी डॉलर रुपयाच्या शंभरीचे चुंबन घेतो की काय, अशी स्थिती होती. आता तो त्यापासून काहीसा मागे गेलेला आहे. पण तरीही यांतील अंतर सुरक्षित नाही. रुपया या वर्षात अधिक धडधाकट होणे अवघड, असे अनेक तज्ज्ञ मानतात. त्यास आकर्षक बनवण्याची किंमत मोठी असेल असे त्यांचे म्हणणे. जनसामान्यांस हे कळत असेल/नसेल. पण गुंतवणूकदारांस या वास्तवाचा अंदाज असावा. त्याचमुळे अर्थमंत्र्यांचे ‘गुंतवणूक करा’ असे आवाहन ते ऐकून न ऐकल्यासारखे करतात.

हे वास्तव असताना जागतिक परिस्थिती न सुधारणे आणि त्यात भारतास बर्‍याच वर्षांनी दुष्काळाचा फेरा अनुभवावा लागणे ही दोन संकटे आपल्या आर्थिक आव्हानांत भर घालताना दिसतात. गेल्या काही दिवसांत महागाई हाताबाहेर जाते की काय अशी परिस्थिती निर्माण होताना दिसते. सणासुदीच्या तोंडावर डाळींचे दर २०० रु. किलोवर गेले आहेत आणि इंधनाचे दर वाढले तर अन्य सर्व घटकांच्या दरांत वाढ होईल.

परिस्थिती अद्याप हाताबाहेर निश्चितच गेलेली नाही. पण केवळ राजकीय यशापयशावर डोळा ठेवून अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणे असेच सुरू राहिले तर ती हाताबाहेर जाणारच नाही; असे नाही. अशा वातावरणात सर्वाधिक आटतात ते रोजगार. आधीच त्यांच्या निर्मितीचा वेग आपल्याकडे शून्यात. त्यात ही गती आणखी मंदावणार असेल तर कठीणच म्हणायचे. हे कटू वास्तव ‘सीजेपी’च्या निदर्शनांत अधिकांस सहभागी होण्यास उद्युक्त करणारे ठरेल. हे आंदोलनकारी विद्यार्थी पेपरफुटी वगैरे कारणे पुढे करत असले तरी त्यांच्या संतापामागे खरे कारण आहे ते रोजगाराच्या संधींचा दुष्काळ. परकीय गुंतवणूक येण्यास तयार नाही आणि आहे ती गुंतवणूकही थांबून राहत नाही, असे सध्याचे चित्र आहे.

भारतातील या आंदोलन अस्थिरतेची दखल पाश्चात्त्य माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर घेतली. येथील सरकारमान्य देशप्रेमी या माध्यमांस भारतद्वेष्टे ठरवतात आणि त्यांच्या नावे बोटे मोडतात. ते त्यांनी करावे. तेवढेच समाधान. तथापि परकीय गुंतवणूकदार आपल्या देशी दाव्यांवर निर्णय घेत नाहीत. तर परदेशी माध्यमे भारताविषयी काय म्हणतात यावर त्यांचे गुंतवणूक निर्णय अवलंबून असतात. ‘रिझर्व्ह बँक अजिबात रुपयाचे मूल्य निश्चित करू इच्छित नाही. तर केवळ बाजारातील अस्थिरता रोखणे इतकाच बँकेचा उद्देश आहे’ असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. तो दावा ठीक. पण बाजारात भडकू लागलेला अर्थाग्नी हे सरकारसमोरील आव्हान आहे; रिझर्व्ह बँकेचे नाही. जंतर-मंतर दडपता येईल, हा अर्थाग्नी कसा विझवणार?